आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आता कुठे आपण कोविडच्या संकटातून थोडे थोडे सावरू लागलो आहोत आणि त्याच वेळी जगभरातल्या बातम्यांनी परत एकदा आपले बीपी वाढवायला सुरुवात केली आहे. चीनमध्ये परत एकदा कोविडने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. चीनच्या जिलिन आणि शेन्झेनसह काही शहरांमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचे रुग्ण आढळल्याची बातमी आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढल्याने तेथे निर्बंध आणि लॉकडाऊन नव्याने लादण्यात आले आहेत. मंगळवार दिनांक 15 मार्च रोजी, चीनमध्ये कोरोना संक्रमणाची 3600 हून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली गेली. चीनमध्ये धुमाकूळ घालणारा कोविडचा नवीन स्ट्रेन B.A.2 किंवा स्टेल्थ ओमिक्रॉन या नावाने ओळखला जातो.
दोन वर्षांपूर्वी या आजाराची सुरुवात झाली होती. चीनमधील वुहान प्रांत त्यावेळी हॉटस्पॉट ठरला होता. या ओमिक्रॉनचे शास्त्रीय परिभाषेनुसार नाव B.A.1.1.5 असे आहे. ओमिक्रॉनचे B.A.1, B.A.2 हे सर्व प्रकार मूळ कोरोना व्हायरसपेक्षा बरेच वेगळे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते B.A.1, B.A.2, B.A.3 हे मुळात ओमिक्रॉनचे उपप्रकार आहेत, आणि शास्त्रज्ञांच्या मते हे उपप्रकार जेव्हा ओमिक्रॉनची सुरुवात झाली त्याच काळात उत्परिवर्तित झालेले असण्याची शक्यता आहे.
आता या B.A.2 ऊर्फ स्टिल्थ ओमिक्रॉनने एवढा धुमाकूळ माजवण्याचे कारण काय?
तर हा विषाणू आरटीपीसीआर सारख्या चाचण्यांमधून शोधणे अतिशय कठीण आहे. मूळ कोरोना व्हायरसवरील स्पाईक प्रोटीन्समध्ये जी उत्परिवर्तने आढळून येतात, ती या विषाणूमध्ये दिसत नाहीत. स्पाईक प्रोटीनमधील मुख्य म्युटेशन येथे गायब झालेले दिसते. हे म्युटेशन संसर्ग शोधण्यासाठी अतिशय महत्त्वाचे समजले जाते.
B.A.1 व B.A.2 या दोन व्हेरियंट्समध्ये उत्क्रांती दरम्यान झालेले फरक आहेत. शिवाय हे दोन व्हेरियंट्स मूळ व्हायरसपेक्षा आणि त्याच्या अल्फा व्हेरियंटपेक्षा वेगळे आहेत. B.A.2 आणि B.A.1 यांच्यामधील जवळपास 30 उत्परिवर्तने सारखी आहेत, पण B.A.2 मध्ये त्याखेरीज 28 खास उत्परिवर्तने आहेत.
शिवाय स्टिल्थ किंवा B.A.2 हा प्रकार मूळ ओमिक्रॉनपेक्षाही जास्त संसर्गजन्य आहे. मुळात ओमिक्रॉन हाच विषाणूचा सर्वात जास्त संसर्ग क्षमता असलेला प्रकार मानला जात होता, त्यापेक्षाही स्टिल्थ ओमिक्रॉन अधिक वेगाने पसरतो. मूळ ओमिक्रॉनपेक्षा तो दीडपट वेगाने अधिक पसरतो. त्यामुळे काही जणांच्या मते स्टिल्थ ओमिक्रॉनमुळे भारतात कोविडची चौथी लाट येऊ शकेल, पण वैद्यकशास्त्रातील तज्ञ वेगळे मत मांडत आहेत.
गेल्या महिन्यात आयआयटी कानपूरने एक गणितीय मॉडेल विकसित केले होते. अर्थातच या मॉडेलचा अजून पुरेसा अभ्यास करण्यात आलेला नाही.
या मॉडेलनुसार भारतामध्ये 22 जूनच्या आसपास चौथी लाट येण्यास सुरुवात होऊ शकते, आणि ऑगस्ट 2022 च्या उत्तरार्धात ही लाट तिचा परमोच्च बिंदू गाठेल. या मॉडेलनुसार चौथी लाट साधारण चार महिने टिकेल.
या लाटेची गंभीरता दोन गोष्टींवर अवलंबून असेल, एक म्हणजे देशभरात व्हॅक्सिनेशन किती प्रमाणात झाले आहे आणि दुसरे म्हणजे एखादा नवीन व्हेरियंट त्यादरम्यान येतो आहे का?
पण भारतीय शास्त्रज्ञांच्या मते ओमिक्रॉनमुळे भारतावर फार गंभीर परिणाम होणार नाही. कोविड-19 टास्क ग्रुपचे प्रमुख नरेंद्रकुमार अरोरा यांच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय लोकांमध्ये जवळपास 75 टक्के एवढ्या लोकसंख्येमध्ये स्टिल्थ ओमिक्रॉनचा संसर्ग यापूर्वीच होऊन गेलेला आहे. त्यामुळे एखादा काळजी करण्यासारखा नवीन व्हेरियंट आल्याशिवाय भारतामध्ये चौथी लाट येणार नाही.
सद्यस्थितीत भारतात परिणामकारक अशी चौथी लाट येईल का आणि आली तर कधी येईल हेदेखील सांगणे कठीण आहे. कोविड-19 टास्क ग्रुपचे प्रमुख नरेंद्रकुमार अरोरा यांनी आयआयटी कानपूरने मांडलेले गणितीय मॉडेल नाकारले आहे. चीनमध्ये प्रसार वेगाने होण्याचे कारण म्हणजे चीनमधील ज्येष्ठ नागरिकांच्या व्हॅक्सिनेशनचे प्रमाण भारताच्या तुलनेत बरेच कमी आहे.
स्टिल्थ ओमिक्रॉनची लक्षणे पुढील प्रमाणे आहेत. या विषाणूमुळे श्वसनमार्गाचा वरचा भाग म्हणजे अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट जास्त प्रमाणात बाधित होतो. त्यामुळे पूर्वीच्या व्हेरियंट्सच्या तुलनेत लक्षणे सौम्य स्वरूपाची आहेत. बहुतेक लोकांना सर्दीसारखी लक्षणे जाणवतात. जोडीला थकवा, अशक्तपणा ही लक्षणेही आढळत आहेत. ही लक्षणे संसर्ग झाल्यानंतर साधारण दोन ते तीन दिवसांत दिसून येतात.
इतर काही लोकांमध्ये थोडाफार ताप, घसा खवखवणे, खोकला, डोकेदुखी, हार्ट रेट वाढणे यासारखी लक्षणे आढळतात. परंतु फुफ्फुसांमध्ये संसर्ग आणि न्यूमोनियासदृश लक्षणे यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. शिवाय या व्हेरियंटमुळे संसर्ग झाला तरी वेळी पूर्वीच्या व्हेरियंट्सप्रमाणे तोंडाला चव नसणे, गंधाची संवेदना नसणे, धाप लागणे, आणि श्वास घेण्यात अडचणी ही लक्षणे दिसत नाहीत.
थोडक्यात सांगायचे तर भारतासाठी तरी सध्या फार काळजीचे कारण नाही. पण म्हणून या विषाणूला गृहीत धरता येत नाही. सध्यातरी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे महत्त्वाचे आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.