आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सर आयझॅक न्यूटनची फॅन फॉलोइंग किती आहे, हे काही वेगळं सांगायला नको. अकरावी-बारावीची सायन्स ब्रँच, फिजिक्स विषयाची स्पेशल ब्रँच, इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे विद्यार्थी तर सर न्यूटन यांना आपलं ‘आराध्य’च मानतात! न्यूटनच्या नावाचा जप केल्याशिवाय फिजिक्सचा अभ्यास अजिबात पूर्ण होत नाही.
तुम्हाला कदाचित वरील ओळींमध्ये सरकॅझम जाणवत असावा. हो, वरील ओळी या सरकॅस्टिकलीच लिहिलेल्या आहे. पण, त्यामध्ये खरेपणादेखील आहे. सर आयझॅक न्यूटन या नावाभोवती जवळपास अर्धा फिजिक्स विषय फिरतो. न्यूटनचे लॉ अभ्यासल्याशिवाय कुठलाही विद्यार्थी चांगला डॉक्टर किंवा इंजिनिअर बनू शकत नाही, असं म्हटलं जातं. एक इंग्रजी गणितज्ज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, धर्मशास्त्रज्ञ आणि लेखक अशी न्यूटनची ओळख आहे.
जगातील सर्वकालीन महान गणितज्ज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञांमध्ये न्यूटनचं नाव घेतलं जातं. अशा या व्यक्तीनं एकेकाळी जगातील सर्वात घातक महामारी ठरलेल्या बुबॉनिक प्लेगवर उपचार तयार केले होते, असं म्हटलं तर? फिजिक्सचा ‘मास्टर’ असलेल्या न्यूटननं औषधनिर्मितीमध्येदेखील आपला हात आजमावून पाहिला होता. त्यानं बेडकापासून बुबॉनिक प्लेगसाठी औषध तयार केलं होतं, असं म्हटलं जातं.
या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे, हे जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा….
न्यूटनच्या औषधनिर्मितीची गोष्ट सुरू होते २५ जुलै १६६५ या दिवसापासून. त्या दिवशी इंग्लंडमधील केंब्रिजस्थित होली ट्रिनिटीच्या पॅरिशमधील जॉन मॉर्ले नावाचा पाच वर्षांचा मुलगा मृतावस्थेत आढळला. जेव्हा शहरातील अधिकाऱ्यांनी त्याच्या मृतदेहाची तपासणी केली तेव्हा त्याच्या छातीवर काही काळे डाग दिसले. हे डाग म्हणजे बुबॉनिक प्लेगचं लक्षण होतं. त्यावर्षी केंब्रिजमधील जॉन मॉर्ले हा या प्लेगचा पहिला बळी ठरला होता. याचाच अर्थ असा होता की महामारीनं लंडनमध्ये पाऊल ठेवलं आहे.
शहरात प्लेग आल्याची बातमी पसरताच शहरातील जवळजवळ सर्व लोकसंख्या विलगीकरणासाठी ग्रामीण भागात गेली. गावाकडे धाव घेतलेल्या लोकांमध्ये ट्रिनिटी कॉलेजमधील स्कॉलर तरुण आयझॅक न्यूटनचादेखील समावेश होता. विद्यापीठाच्या उत्तरेला सुमारे साठ मैलांवर वूलस्टोर्प नावाच्या फार्मवर न्यूटनचं घर होतं.
बुबॉनिक प्लेग हा इतिहासात सर्वांत वाईट रोग म्हणून ओळखला जातो. येर्सिनिया पेस्टिस बॅक्टेरियामुळं त्याचा संसर्ग होत असे. या प्लेगमुळं १३४७ ते १३५१ पर्यंत ब्लॅक डेथ महामारी आणि इसवी सनपूर्व ५४१ ते ६४९ मध्ये जस्टिनियन प्लेगसारख्या जगातील सर्वांत जास्त प्राणघातक महामारी उद्भवल्या होत्या.
१६६५ ते १६६६ या वर्षभराच्या काळात आयझॅक न्यूटन जवळपास एक वर्षाच्या कालावधीसाठी या फार्मवर वास्तव्याला होता. या वर्षभराच्या काळात बहुतेक लोक बाहेर पडू नयेत म्हणून त्यांच्या दरवाजांना खिळे ठोकण्यात आले होते. जर एखाद्या घरातील लोकांना प्लेगची लागण झालेली असेल तर त्यांच्या दारावर लाल क्रॉस रंगवला जाईल.
न्यूटननं महामारीच्या काळातही आपला अजिबात वेळ वाया घालवला नाही. तो आपल्या फार्मवर कायम पुस्तकांमध्ये डोकं घालून बसत असे. परंतु, यावेळी तो फिजिक्स किंवा मॅथ नाही तर बायोलॉजीचा अभ्यास करत होता. पूर्वीच्या विद्वानांनी इतिहासात बुबॉनिक प्लेगबाबत काय संशोधन नोंदवलं आहे, याचा शोध न्यूटन घेत होता.
प्राचीन वैद्यकीय ग्रंथांव्यतिरिक्त त्याला जेन बॅप्टिस्ट व्हॅन हेल्मोंट (१५८०-१६४४) यांच्या लेखनात विशेष रुची निर्माण झाली. जेन बॅप्टिस्ट ही अशी व्यक्ती होती जी १६०५ साली बुबॉनिक प्लेगची लागण होऊनही जगली होती. त्यानंतर त्यांनी ‘डी पेस्टे’ नावाचं पुस्तक लिहिलं. प्लेग साथीच्या रोगावर त्यांनी केलेल्या संशोधनाचा उल्लेख या डी पेस्टे पुस्तकात नोंदवण्यात आलं होतं. या पुस्तकातून न्यूटनला बुबॉनिक प्लेगची कारणं, बॅक्टेरिया एका जीवातून दुसर्या जीवात संक्रमित होण्याचे मार्ग, तसेच संभाव्य उपचारांबद्दल अधिक चांगल्या प्रकारे माहिती मिळाली.
जेन बॅप्टिस्ट व्हॅन हेल्मोंटच्या पुस्तकात न्यूटनला प्लेगच्या लक्षणांची यादी देखील सापडली. न्यूटननं १६०५ च्यापूर्वी उद्भवलेल्या बुबॉनिक प्लेगसंदर्भात आणखी काही वैद्यकीय नोंदी पाहिल्या. त्याच्या आजूबाजूच्या लोकांची या आजाराबाबत काय रिॲक्शन आहे, हे देखील काळजीपूर्वक पाहिलं. यातील बहुतेक माहिती न्यूटनच्या अप्रकाशित नोट्समध्ये सापडली आहे. (केंब्रिज विद्यापीठानं त्याच्या या नोंदी कधीही स्वीकारल्या नाहीत)
विलगीकरणादरम्यान केलेल्या सर्व संशोधनांच्या आधारे न्यूटन एका अत्यंत विचित्र निष्कर्षापर्यंत पोहोचला होता. ज्याचं वर्णन ऐकून चांगली कल्पनाशक्ती असलेल्या व्यक्तीला मळमळून उलटीदेखील होऊ शकते!
एक जिवंत बेडूक जोपर्यंत खाल्लेल्या कीटकांच्या उलट्या करत नाही, तोपर्यंत चिमणीच्या वर उलटा धरावा. जेव्हा तो किटकांची उलटी करतो ती, पिवळ्या मेणामध्ये मिसळावी. त्यानंतर बेडकाची पातळ पावडर तयार करावी आणि ती उलटी आणि मेणापासून तयार केलेल्या ‘लोझेंज’मध्ये मिसळावी. हे तयार झालेलं सीरम शरीराच्या प्रभावित भागावर लावल्यास थोड्याच वेळात, शरीरावरील बुबॉसमधून विष बाहेर पडतं. त्यानंतर संक्रमित व्यक्ती हळूहळू बरी होते, असा विचित्र उपचार न्यूटननं शोधून काढला होता.
न्यूटनच्या अप्रकाशित नोट्समधील मजकुराशिवाय याबाबत दुसरा कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. न्यूटननं सांगितलेल्या सिरममुळं बुबॉनिक प्लेग बरा होतो, असं सांगणारा एकही पुरावा उपलब्ध नाही. पण, सतराव्या शतकामध्ये काही लोक वरती नमूद केल्याप्रमाणं विचित्र उपचार वापरत असल्याची काही पुरावे आढळले आहेत. म्हणजेच कदाचित न्यूटनचा सल्ला काही लोकांनी अंमलात आणला असावा.
अनेक इतिहासकार न्यूटनच्या उपचारावर टीका करतात. कारण, तो मुळात वैद्यकक्षेत्राचा अभ्यासक नव्हताच. केवळ वर्षभराच्या अभ्यासातून त्यानं शोधून काढलेल्या या विचित्र उपचार पद्धतीवर विश्वास ठेवणं म्हणजे वेडेपणा आहे, असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.