आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
‘गुन्हेगारी’ हा मानवी समाजाचा अविभाज्य घटक झालेला आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुन्हा करण्याचा अंगभूत गुण असतो. काहींना त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळतं तर काहींना ते शक्य होत नाही. ज्यांना हे शक्य होत नाही त्यांना गुन्हेगार म्हणून ओळखतो. गुन्हेगारी या विषयाची व्याप्ती प्रचंड आहे.
सध्याच्या घडीलादेखील जगभरातील हजारो तुरुंगामध्ये लाखो गुन्हेगार शिक्षा भोगत आहेत. हे तुरुंग म्हणजे एक वेगळीच दुनिया असते. तेथील दैनंदिन आयुष्य, कैद्यांतील गटबाजी, अधिकाऱ्यांचं राजकारण या घटकांभोवती तुरुंगाची दुनिया फिरत असते. काही कैद्यांना तुरुंगातील ही दुनियाच आपला शेवट आहे, असं वाटतं. त्यामुळं ते तेथील गोष्टींशी जुळवून घेऊन जगण्याचा प्रयत्न करतात.
काही कैद्यांना मात्र, तुरुंगातून बाहेर पडण्याची आस असते. ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. जेल एस्केप हा विषय घेऊन अनेक चित्रपटदेखील तयार करण्यात आले आहेत. द शॉशांक रिडम्पशन, एस्केप प्लॅन यासारखे हीट चित्रपट तर तुमच्यापैकी काहींनी बघितलेही असतील. द शॉशांक रिडम्पशन या चित्रपटाची सर्वात अप्रतिम चित्रपटांमध्ये गणती होते. पण, माझा पर्सनल फेव्हरेट म्हणला तर तो ‘एस्केप प्लॅन’ आहे.
२०१३मध्ये रिलीज झालेल्या एस्केप प्लॅनमध्ये सिल्वेस्टर स्टॅलोन आणि अरनॉल्ड श्वार्झनेगर या दिग्ग्जांनी अभिनय केला आहे. या चित्रपटामध्ये तुरुंगातून पसार होण्यासाठी केलेले अगणित प्रयत्न अतिशय रंजकपणे दाखवले आहेत. त्यांचे प्रयत्न पाहून प्रत्यक्षात असं कधी घडत असेल का? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. सिनेमा हे समाजजीवनाचं प्रतिबिंब असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळं सिनेमात दाखवलेल्या गोष्टींनाही कुठेना कुठे प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचा आधार असतो.
एस्केप प्लॅनमध्ये दाखवल्याप्रमाणं एका खऱ्याखुऱ्या कैद्यानं हेलिकॉप्टरनं पळून जाण्याचा प्रयत्न केला होता! आणि हेलिकॉप्टर चालवत होती त्याची पायलट पत्नी! तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे.
प्रेम माणसाला काहीही करण्यास प्रवृत्त करू शकतं. एखादी गोष्ट कितीही तर्कहीन असली तरीही प्रेमात असलेला माणूस आपल्या पार्टनरसाठी काहीही करण्यास तयार होतो. अशीच एक अनोखी घटना १९८६ मध्ये घडली होती. त्यावेळी एका प्रेमळ पत्नीनं आपल्या तुरुंगात असलेल्या पतीला बाहेर काढण्यासाठी आपल्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन प्रयत्न केले होते.
मिशेल वाज्युअर नावाच्या व्यक्तीची ही पत्नी होती. १९८५मध्ये बँक दरोडा आणि हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल मिशेलला दोषी ठरविण्यात आलं होतं. त्याला १८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही ठोठावण्यात आली होती. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला त्याची फारशी चिंता नव्हती. कारण, त्याला शिक्षा होण्यापूर्वीच त्यानं स्वत:च्या सुटकेचा प्लॅन तयार केलेला होता!
कुठल्याही चांगल्या जेल ब्रेक प्रोसेससाठी एखाद्या सहकाऱ्याची गरज असते. मिशेलकडे असा एक अत्यंत विश्वासू सहकारी होता आणि तुरुंगाबाहेर तो मिशेलची वाट पाहत होता. हा सहकारी दुसरा-तिसरा कुणी नसून मिशेलची बायको नादिन होती. मिशेल लवकरात लवकर बाहेर यावा यासाठी नादिननं सर्व प्रयत्न सुरू केले.
नवऱ्याला अटक होताच तिनं हेलिकॉप्टर पायलट म्हणून लायसन्स मिळविण्यासाठी क्लास लावले. लायसन्स मिळाल्यानंतर ती दक्षिण पॅरिसमधील हेलिकॉप्टर भाड्यानं देणाऱ्या एका कंपनीची नियमित ग्राहक बनली. कंपनीच्या मालकानं दिलेल्या माहितीनुसार, ती महिन्यातून दोनदा हेलिकॉप्टर भाड्यानं घ्यायची.
तिच्यासोबत कधी एखादी मैत्रिण असायची तर कधी नादिन एकटीच असायची. त्यावेळी हेलिकॉप्टर भाड्यानं घेण्यासाठी प्रति तास अंदाजे २ हजार २०० फ्रँक (३१५ डॉलर्स) खर्च येत असे. नादिन रोख स्वरूपात ही रक्कम भरायची.
मिशेलला ‘जेल दे ला सेंट’च्या या भयंकर तुरुंगामध्ये ठेवलेलं होतं. तिथे त्यानं पियर हर्नांडेझ नावाच्या माणसाशी मैत्री केली होती. तो माणूसही सशस्त्र दरोड्याच्या आरोपांखील तुरुंगात होता. नादिन घेऊन येणारं हेलिकॉप्टर उतरण्यासाठी योग्य जागा शोधण्यासाठी त्या दोघांनी तुरुंगात अनेक महिने नियोजन केलं.
२६ मे १९८६ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास नादिननं हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं मध्य पॅरिसमधून उड्डाण केलं. तिनं रेडिओ वॉर्निंगकडे दुर्लक्ष करत तुरुंगातील एका इमारतीच्या छतावर आणलं. त्याचवेळी तिचा पती मिशेल आणि त्याचा मित्र पियर दोघेही छताच्या दिशेने धावले.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे सर्व घडत असताना तुरुंगातील रक्षक काय झोपले होते का? हेलिकॉप्टर कारागृहाच्या वरती घिरट्या घालत असताना, रक्षकांचं लक्ष रेडिओवर येणाऱ्या आणखी एका एमर्जन्सी रिपोर्टकडे होतं. आणि जेव्हा मिशेल आणि त्याचा मित्र छतावर पळाल्याचं रक्षकांच्या लक्षात आलं तोपर्यंत या दोन कैद्यांनी ग्रेनेड्स हातात घेतले होते. त्यांनी सुरक्षा रक्षकांना संपूर्ण तुरुंग उडवून देण्याची धमकी दिली. त्यामुळं समोर जे होत आहे ते पाहत बसण्याशिवाय रक्षकांकडे दुसरा पर्याय नव्हता.
दोन्ही कैदी हेलिकॉप्टरपर्यंत पोहचले, मिशेलच्या मित्रानं ऐनवेळी माघार घेतली आणि सरेंडर केलं. पण, मिशेल मात्र आपल्या पत्नीसोबत हेलिकॉप्टरमधून पसार झाला.
त्यानंतर नादिननं हेलिकॉप्टर जवळच्या ॲथलेटिक मैदानात उतरवलं आणि कारच्या मदतीनं ही जोडी गायब झाली. चार महिन्यांहून अधिक काळ ते फरार होती. या काळात त्यांनी पोलिसांच्या देखरेखीखाली असलेल्या आपल्या दोन मुलींनाही गायब केलं. या गोष्टीमुळं त्यावेळी फ्रान्स पोलिसांची जगभर नाचक्की झाली होती.
पण, मिशेल आणि नादिन जास्त काळ लपून राहू शकले नाही. त्यांनी शुद्ध मुर्खपणा करत लपून राहण्यासाठी पॅरिसचीच निवड केली. तेच शहर ज्यामध्ये त्यांचा शोध घेतला जात होता. तीन महिन्यांनंतर एका पहाटे पोलिसांनी त्यांना पकडलं. या जोडप्यानं तीन दिवसांत दोनदा बँक लुटण्याचा प्रयत्न केला होता.
दुसऱ्या प्रयत्नात असताना त्यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांसोबत झालेल्या गोळीबारात मिशेलच्या डोक्यात एक गोळी लागली. ज्यातून तो कसा तरी वाचला. पाच वेळा तुरुंगातून पळालेला मिशेल आठवडाभरानंतर कोमातून बाहेर आला. नंतर त्याच्यावर खटला चालवला गेला आणि त्याला दोषी ठरवण्यात आलं. त्याला जास्तीत जास्त सुरक्षेच्या तुरुंगात पाठवण्यात आलं.
आश्चर्यकारकपणे, २००३ मध्ये, मिशेलला २७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर स्वातंत्र्य देण्यात आलं. मिशेलनं तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ‘लव्ह सेव्ह्ड मी फ्रॉम सिंकिंग’ नावाचं आत्मचरित्र प्रकाशित केलं आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.