आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
ज्या पद्धतीनं नैसर्गिक परिसंस्था एकमेकींवर अवलंबून असतात त्याचप्रमाणं उद्योगधंदेसुद्धा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे एकमेकांवर अवलंबून असतात. औद्योगिक क्षेत्राचा विचार केल्यास एकाच वेळी अनेक उद्योगांवर परिणाम करणारी कुठली गोष्ट असेल तर ती नक्कीच ‘कच्चे तेल’ आहे. आपण असं म्हणू शकतो की, सध्या संपूर्ण जग जीवाश्म इंधनांवर अवलंबून आहे आणि कच्चं तेल त्यापैकी सर्वांत जास्त मौल्यवान आहे. ते इतकं मौल्यवान आहे की त्याला कधीकधी ‘ब्लॅक गोल्ड’ किंवा ‘लिक्विड गोल्ड’ असंही म्हटलं जातं.
कोरोना महामारीमुळं बाजारात तयार झालेल्या अस्थिरतेनंतर आता कच्च्या तेलासाठी नवीन सुपर सायकल सुरू झाली आहे. काही तज्ज्ञांच्या मते ही तेलाची शेवटची सुपर सायकल असू शकते. कारण जगातील प्रमुख अर्थव्यवस्था जीवाश्म इंधनाला पर्याय शोधण्यासाठी वचनबद्ध झाल्याचं दिसून येतं आहे. वाहन उत्पादकांनीसुद्धा आता इलेक्ट्रिक वाहननिर्मितीवर भर दिला आहे. यासर्व गोष्टींचे तेलाच्या भविष्यावर आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतात, याचा अभ्यास करणं गरजेचं झालं आहे.
कच्च्या तेलाच्या भविष्याबाबत माहिती जाणून घेण्यापूर्वी, कच्च तेल म्हणजे काय? त्याच्या इतिहास काय आहे? हे थोडक्यात जाणून घेऊया. कच्चं तेल हे एक पिवळसर काळा द्रव आहे जे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली आढळतो. या द्रवामध्ये हायड्रोकार्बन्स आणि इतर सेंद्रिय संयुगे असतात. कच्चं तेल, त्याच्या अनरिफाईंड स्वरूपात, चिकट आणि पूर्णपणे निरुपयोगी आहे. म्हणून, त्याचा वापर करण्यासाठी ते रिफाईन करणं आवश्यक असतं. कदाचित तुम्ही शाळेमध्ये वाचलं असेल की जेव्हा क्रूड ऑईल शुद्ध केलं जातं तेव्हा त्याचं रुपांतर पेट्रोकेमिकल्समध्ये होतं.
क्रूड ऑईल रिफाईन केल्यानंतर त्यापासून पेट्रोल, डिझेल, केरोसीन आणि वंगण अशी बायप्रॉडक्टस तयार होतात. कदाचित तुम्हाला असं वाटेल की, कच्च्या तेलाचा शोध आधुनिक काळामध्ये लागला आहे. परंतु, ही गोष्ट खरी नाही. अनेक प्राचीन संस्कृती संसाधनांसाठी या कच्च्या तेलावर अवलंबून होत्या. इसवी सनपूर्व ३००० या काळात मध्य पूर्वेतील प्राचीन लोकांना तेलाचा शोध लागला होता.
पृथ्वीच्या आत असलेलं कच्चं तेल अनेकदा बुडबुड्याच्या स्वरूपात पृष्ठभागावर आल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं होतं. बाबिलोनचे लोक त्यांच्या विविध गरजांसाठी कच्च तेल वापरणाऱ्या प्राचीन संस्कृतींपैकी एक होते. बांधकामात मोर्टार म्हणून त्यांनी तेलाचा वापर केला. शिवाय ते आपल्या बोटींसाठी वॉटरप्रूफ कोटिंग म्हणून त्याचा वापर करायचे.
आधुनिक युगाचा विचार केल्यास १८५०च्या दशकात आधुनिक तेल उद्योगाचा जन्म झाला. औद्योगिक क्रांती दरम्यान कच्च्या तेलाच्या वापराचं व्यापक महत्त्व लोकांच्या लक्षात आलं. उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या साहाय्याने, शास्त्रज्ञांनी हे ‘काळं सोनं’ अनेक इंधनांमध्ये रूपांतरित केलं आणि त्याचा उपयोग यंत्रांना उर्जा देण्यासाठी केला. कच्च्या तेलानं गोष्टींच्या कार्यपद्धतीत क्रांती घडवून आणण्यात मोठी भूमिका बजावली.
२०व्या शतकाच्या मध्यापर्यंत युनायटेड स्टेट्स तेलाच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक ठरला. पण, काही काळानंतर अमेरिकेच्या कच्च्या तेलाच्या उत्पादनात मोठी घट झाली आणि ओपेकसारख्या इतर पुरवठादारांकडून त्यांना तेल आयात करणं भाग पडलं.
१९६०च्या दशकात स्थापन झालेली ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज (OPEC) ही संस्था कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. ओपेकअंतर्गत जगात ८० टक्के पेक्षा जास्त तेलाचे साठे आहेत. ओपेकची सुरुवात इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला या पाच सदस्य राष्ट्रांसह झाली होती. सध्या, ओपेकमध्ये १३ सदस्य आहेत आणि त्यात कुवेत, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसारखे मध्य पूर्वेकडील देश आणि इतर काही आफ्रिकन देशांचा समावेश आहे.
ओपेकच्या सदस्यांव्यतिरिक्त इतर अनेक देशही कच्च्या तेलाचं उत्पादन करतात. यामध्ये ब्राझील, कॅनडा, रशिया, मेक्सिको आणि नॉर्वे यांचा समावेश आहे. हे देश सामान्यतः नॉन-ओपेक देश म्हणून ओळखले जातात. ओपेक आणि नॉन-ओपेक देश मिळून दररोज सुमारे ९० ते १०० दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचं उत्पादन करतात.
२०२० मध्ये कच्च्या तेलाच्या बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला. कोविड-19 महामारी आणि अनेक देशांनी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळं कच्च्या तेलाच्या मागणीत मोठी घट झाली होती. त्याच वेळी, रशिया आणि सौदी अरेबिया या दोन सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशांमध्ये किंमतीवरून वाद सुरू होता. या दोन्ही परिस्थितींमुळं कच्च्या तेलाचा पुरवठा मागणीपेक्षा कितीतरी पटीने जास्त झाला. त्यामुळे तेलाच्या दरात मोठी घसरण झाली होती.
हा तर झाला तेलाचा इतिहास. आता आपण जरा त्याच्या भविष्याचा वेध घेऊया. कच्चं तेल हे जीवाश्म इंधन आहे हे तुम्हाला माहीतच आहे. याचा अर्थ ते नूतनीकरणक्षम नाही. भविष्यात जेव्हा आपण पृथ्वीवरील कच्च्या तेलाचे सर्व साठे संपवून टाकू, तेव्हा पुढील लाखो वर्षे आपल्याला तेल मिळणार नाही. एकीकडे भविष्यात तेलाचा साठा संपण्याची भीती असताना दुसरीकडं कच्च्या तेलाची मागणी सातत्यानं वाढत आहे. मर्यादित पुरवठा आणि सतत वाढत जाणारी मागणी यामुळं तज्ज्ञांनी काळ्या सोन्याच्या म्हणजेच कच्च्या तेलाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
कच्च्या तेलाच्या वापराबाबत आणखी एक मोठी समस्या आहे. कच्च्या तेलासारख्या जीवाश्म इंधनाच्या वापरामुळं वायू प्रदूषण आणि हवामान बदलामध्ये सातत्यानं वाढ होतं आहे. त्यामुळं अनेक देशांनी आता कच्च्या तेलाऐवजी अक्षय ऊर्जा (Renewable Energy) वापरण्यावर भर दिला आहे. इतकेच नाही तर गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन आणि वापरही वाढला आहे. जरी सध्याच्या घडीला इलेक्ट्रिक वाहनांची संख्या मर्यादित आहे.
चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव आणि जास्त किमतींमुळे, मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांना बाजारात येण्यासाठी एक दशक किंवा त्याहून अधिक कालावधी लागू शकतो. परंतु, टेस्ला आणि इतर तत्सम इव्ही स्टार्टअप्सकडे पाहता, येत्या दशकात गोष्टी वेगाने बदलतील असं दिसतं. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरात आव्हानं असूनही, जागतिक समाज क्रूडचा वापर दूर करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
पुढील ३० वर्षे हे असंच सुरू राहिलं, तर कदाचित आपण जीवाश्म इंधनावर चालणारी वाहनं पूर्णपणे सोडून देऊ आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करू. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार २०५० पर्यंत कच्च्या तेलाची मागणी इतकी कमी होऊ शकते की पुरवठा जास्त दिसेल. या सर्व कारणांमुळे कच्च्या तेलाचे सोनेरी दिवस हळूहळू कमी होत आहेत असं आपण म्हणू शकतो. तसं झाल्यास, कच्च्या तेलाच्या किमती त्याच्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर येऊ शकतात, जसं २०२० मध्ये कोविड-१९ महामारीच्या काळात आपल्याला दिसलं होतं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.