आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
कझाकस्तान हा सर्वाधिक क्रिप्टो करन्सी खणून काढणाऱ्या देशांमध्ये अमेरिकेपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला होता. एकीबस्तूझ शहरालगतच्या वाळवंटी भागात तब्बल ५० हजार संगणक क्रिप्टोकरन्सीच्या मायनिंगचे काम करतात. ऑगस्ट २०२१ पर्यंत बिटकॉइनच्या एकूण मायनिंगपैकी तब्बल एक पंचमांश मायनिंग या एका देशातून केले जायचे.
या ठिकाणचे थंड हवामान, मायनिंगची केंद्र म्हणून वापरता येण्याजोगी जुनी गोदामे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त उपलब्ध असलेली वीज यामुळे क्रिप्टोकरन्सीचे मायनिंग करणाऱ्यांसाठी या देशात काम करण्याची संधी म्हणजे ‘जॅकपॉट’च ठरला. मर्यादित कर आणि स्वस्त मनुष्यबळ याचाही लाभ त्यांना मिळाला. मात्र, मोठ्या प्रमाणावर फोफावलेल्या या व्यवसायाला देशभरात निर्माण झालेल्या वीज तुटवड्यामुळे मोठा फटका सहन करावा लागला आहे. या व्यवसायात काम करणारे लोक वर्ष- दोन वर्षाच्या कालावधीतच रशिया किंवा अमेरिकेत स्थलांतर करण्याचा विचार करारायला लागले आहेत.
चीनने सप्टेंबर २०२१ मध्ये क्रिप्टोकरन्सी मायनिंगच्या उद्योगाला बेकायदेशीर ठरवले. त्या वेळी या उद्योगातील काम करणाऱ्यांनी घाईघाईने कझाकस्तानला स्थलांतर केले. या स्थलांतरामुळे चीनमधून कझाकस्तानमध्ये तब्बल ८७ हजार ८४९ लोक दाखल झाले.
क्रिप्टोकरन्सीचे मायनिंग करणाऱ्यांपैकी ६० ते ७० टक्के लोक बिटकॉइनसाठी काम करत होते. आता मात्र, विजेचा पुरवठा खंडीत करण्यात आल्याने ठप्प झालेले संगणक राजकीय आणि सामाजिक अशांतता आणि देशभरात फिरणाऱ्या रशियन सैन्यामुळे या उद्योगाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच देशाच्या दक्षिणेकडच्या भागात इंधनाच्या किमती बेसुमार वाढल्याने त्याच्या निषेधार्थ संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. पोलिसांनी नागरिकांवर दडपशाही सुरू केली. सुरक्षा परिषदेचे प्रमुख असलेले माजी अध्यक्ष नुरसुलतान नजरबायेव यांची पदावरून हाकालपट्टी करण्यात आली आणि कझाकस्तानमध्ये अराजकाची परिस्थिती निर्माण झाली. देशभरात इंटरनेट बंद झाले. रशियन सैन्य देशात तैनात करण्यात आले. या सगळ्याचा परिणाम म्हणून क्रिप्टोकरन्सी मायनिंगच्या कामावर परिणाम झाला आणि एकट्या बिटकॉइनला १२ टक्के हॅशरेट गमावावे लागले.
‘क्रिप्टोकरन्सी व्यवहारांवर नजर ठेवणाऱ्या ‘आर्केन रिसर्च’ कंपनीचे विश्लेषक जारान मेलेरुड यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, क्रिप्टोकरन्सी मायनिंगसाठी ६ दिवस वीज आणि इंटरनेट जोडणीचा पुरवठा न झाल्याने १०० कामाच्या तासाचे नुकसान झाले. त्यामुळे क्रिप्टो मायनिंगचे काम करणाऱ्यांना सुमारे २ करोड डॉलरचे नुकसान सहन करावे लागले.
देशभरातल्या कामगारांपैकी ८ टक्के तंत्रज्ञ क्रिप्टोकरन्सी मायनिंगचे काम करतात. त्यांचे काम मागच्या काही काही महिन्यांपासून विस्कळीत झाले आहे. ब्लॅकआउट्स आणि वीज तुटवड्याला तोंड देत असलेल्या सरकारने मागच्या वर्षापासूनच नोंदणीकृत मायनर्सना मर्यादित वीज पुरवठा सुरू केलं होता. आता विजेच्या तुटवड्यात मोठी वाढ झाल्यास या कामासाठी दिली जाणारी वीज बंद करण्याचा इशाराही दिला आहे.
क्रिप्टोकरन्सी मायनिंगची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे. त्यासाठी किचकट गणितीय कोड्यांचा उलगडू शकणारे मोठ्या क्षमतेचे संगणक वापरले जातात. या संगणकांबरोबरच अनेक डेटा सुरक्षेसाठीची महागडी यंत्रसामुग्रीही वापरावी लागते. या अद्ययावत आणि महागड्या यंत्रणेला विजेची आवश्यकताही मोठ्या प्रमाणात आणि अखंडित पुरवठा असलेली असावी लागते. सध्याच्या काळात कझाकस्तानमध्ये अखंडीत वीज पुरवठा हाच कळीचा मुद्दा बनला आहे.
क्रिप्टोकरन्सी मायनिंग करणाऱ्यांना सर्वाधिक वीज मागणीच्या काळात आपले काम थांबवावे लागते. लोक हिवाळ्यामुळे हिटरचा वापर चालू करतात, तेव्हा तर ही समस्या क्रिप्टो मायनिंगच्या कामाला अधिक भेडसावणार आहे.
Xive या क्रिप्टो मायनिंग कंपनीचे संस्थापक दिदार बेकबाओव म्हणतात की, अपुरा वीज पुरवठा ही नक्कीच एक गंभीर समस्या आहे. मार्च महिन्यात हिवाळा संपल्यावर परिस्थिती सुधारण्याची आशा आहे. मात्र, ब्लॅकआऊट, इंटरनेट खंडित होणे आणि अन्य कारणांसाठी या उद्योगाला दर महिन्याला आतापर्यंत महिन्याला किती तरी दशलक्ष डॉलर्सवर पाणी सोडावे लागले आहे. याशिवाय कझाकस्तानमधील गोठवणारी थंडी, शून्या खालच्या तापमानामुळे विशेषतः काम ठप्प असतानाच्या काळात संगणकाच्या हार्डवेअरवर परिणाम होतो आणि ते धडाधड बंद पडतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मात्र, एवढ्या अडचणी असूनही क्रिप्टोकरन्सी मायनिंग कंपन्या इतर देशांमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता कझाकिस्तानच्या नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लॉकचेन आणि डेटा सेंटर्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष एलन दोरजीयेव यांनी फेटाळून लावली. त्यांनी सांगितले की, रशिया, कॅनडा आणि अमेरिकेसह कोणत्याही देशात या उद्योगांना आवश्यक सुविधांचा अभाव आहे.
कझाकस्तानात सध्याची अस्थिर परिस्थिती लवकरच संपुष्टात येईल. क्रिप्टोकरन्सी मायनिंग क्षेत्राचे अधिक चांगले नियमन करण्याची सरकारची योजना आहे. नोंदणी नसलेल्या उद्योगांवर बंदी घातली जाईल. त्यामुळे या उद्योगात अधिक स्थिरता आणि स्पष्टता येईल. सरकारने देशाची वीजनिर्मिती क्षमता वाढवण्याचेही आश्वासन दिले आहे, क्रिप्टोकरन्सी मायनिंग कंपन्याही देशाला आवश्यक वीज उत्पादनाचे लक्ष्य गाठण्यासाठी मदत करू शकतात. आम्ही सक्षम वीज उत्पादक प्रकल्पांमध्ये पैसे गुंतवण्यास तयार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. आम्ही काही पवन किंवा जलविद्युत केंद्र उभारण्यासाठी तयार आहोत, असे ते म्हणाले.
दोरजीयेव परिस्थिती सुधारण्याबाबत आशावादी असले तरी क्रिप्टोकरन्सी मायनिंगचे काम करणारे चीनमधून आलेले अनेक तंत्रज्ञ पुन्हा स्थलांतर करण्याचा विचार गांभीर्याने करत आहेत. देशात स्थिर सरकार सत्तेवर येईल, त्याच्याकडून या उद्योगाला आवश्यक सुविधा सुरळीतपणे उपलब्ध करून दिल्या जातील आणि हा उद्योग इथेच पुन्हा उभारी धरू शकेल, यावर त्यांचा विश्वास नाही. रशिया किंवा अमेरिकेत जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
विजेच्या तुटवड्यामुळे कंपनीचा व्यवसाय गुंतागुंतीचा झाला आहे, वीज बिल भरण्यासाठी आणि पगार देण्यासाठी पैसे कुठून उभे करायचे हा आमच्यासमोर असलेला गंभीर प्रश्न आहे. या क्षणी आम्ही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे आहोत, असे ३ डेटा सेंटर्स चालविणाऱ्या आणि क्रिप्टोकरन्सी मायनिंगच्या ३० हजार रिग्ज चालविणाऱ्या एका उद्योजकाने सांगितले. आमचे अनेक ग्राहक आणि तंत्रज्ञही अन्य देशांचा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही तो म्हणाला.
सध्या राजकीय अस्थैर्यामुळे कझाकस्तान सरकारकडे या उद्योगाला वाचविण्यासाठी काही करण्याची उसंत नाही. मात्र, रशियाच्या मध्यवर्ती बँकेने क्रिप्टो करन्सीवर बंदी घालण्याचे सूतोवाच केले आहे. जर रशियामध्ये बिटकॉइन मायनिंगवर बंदी घातली गेली तर तो अधिक मोठ्या प्रमाणावर कझाकस्तानाकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार पुढाकार घेऊ शकते. त्यासाठी इंटरनेट आणि विजेच्या सुविधांमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. अर्थात, जो पर्यंत कझाकस्तानमधील राजकीय अस्थैर्य दूर केले जात नाही तोपर्यंत केवळ क्रिप्टोकरन्सी मायनिंग उद्योगाचेच नव्हे, तर देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेचे भविष्य, परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याची क्षमताच अधांतरी राहणार आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.