आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
कॅमेऱ्यामध्ये शूट केलेल्या दृश्यांमध्ये प्रेक्षकांना पडद्यावर चिकटवून ठेवण्याची क्षमता असते. मग तो एखादा हॉलिवुडचा ब्लॉकबस्टर असो किंवा एखादा लोकल टेलिव्हिजन शो. कुठलाही सीन शूट करताना सर्जनशीलतेचा कस लावावा लागतो. शूटिंग दरम्यान सेटिंग या घटकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्थान ठिकाणी आणि ज्या वेळेवर कथानक घडतं त्याला सेटिंग म्हणतात. सेटिंग जास्त प्रभावीपणे प्रेक्षकांच्या मनात उतरावी यासाठी शूटिंग लोकेशन्सची निवड योग्य असावी लागते.
पूर्वी कृत्रीम ठिकाणांची निर्मिती करून त्याठिकाणी शूटिंग केलं जात असे. मात्र, काळाच्या ओघात चित्रपटांमध्ये आणखी जिवंतपणा आणण्यासाठी प्रत्यक्ष ठिकाणांवर जाऊन शूटिंग करण्यास सुरुवात झाली. सध्याचे अनेक दिग्दर्शक ऑन-लोकेशन शूटिंगला प्राधान्य देतात.
अशा दिग्दर्शकांमध्ये जस्टीन लीन या अष्टपैलू दिग्दर्शकांचा समावेश होतो. आपल्या परफेक्शनसाठी ओळखल्या जाणाऱ्या जस्टीननं आतापर्यंत ऑन-लोकेशन शूटिंगच्या नादात अनेक धोके पत्करले आहेत. एकदा तर त्याला अटकही झाली होती! ‘फास्ट अँड फ्युरियस’ डिरेक्टरनं स्वत: हा किस्सा एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितला होता. हा किस्सा नेमका काय होता हे जाणून घेण्यापूर्वी आपण जस्टीन लीनबाबत अधिक माहिती घेऊया…
जस्टिन लीन हा तैवानी-अमेरिकन ॲक्शन फिल्म डिरेक्टर आणि प्रोड्युसर आहे. लीनच्या चित्रपटांनी जगभरात जवळपास २ अब्ज डॉलर्सची कमाई केलेली आहे. बेटर लक टुमॉरो, द फास्ट अँड द फ्युरियस ३ ते ६ आणि स्टार ट्रेक बियॉन्ड या चित्रपटांसाठी तो प्रसिद्ध आहे. ‘कम्युनिटी’ आणि ‘ट्रू डिटेक्टिव्ह’ – २ सारख्या टेलिव्हिजन शोसाठीही तो ओळखला जातो.
तैवानमधील तैपेई शहरात लिनचा जन्म झाला. मात्र, त्याचं बालपण कॅलिफोर्नियातील ऑरेंज काउंटीमधील सायप्रस कामगार-वर्गाच्या वसाहतीत गेलं. UCLAमध्ये येण्यापूर्वी लीननं सायप्रस हायस्कूल आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया येथे दोन वर्षे शिक्षण घेतलं. त्यानंतर तो UCLA फिल्म स्कूलमध्ये दाखल झाला. तिथे त्यानं ‘फिल्म अँड टेलिव्हिजन’मध्ये बीए व ‘फिल्म डिरेक्शन अँड प्रॉडक्शन’मध्ये एमएफए पूर्ण केलं.
लीननं कॉलेजमधून बाहेर पडताच ‘शॉपिंग विथ फॅन्ग्स’ नावाचा पहिला चित्रपट बनवला होता. वर्गमित्र, क्वेंटिन लीसह सह-दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आशियाई-अमेरिकन समुदायात एक कल्ट क्लासिक ठरला. जस्टिन लीनकडे एक आश्वासक तरुण दिग्दर्शक म्हणून पाहिलं गेलं. त्यानंतर त्यानं ‘बेटर लक टुमॉरो’ हा आणखी हिट चित्रपट दिला. या चित्रपटानं दिग्गज चित्रपट समीक्षक, रॉजर एबर्ट यांची मान्यता मिळवली. तसंच ‘सनडान्स चित्रपट महोत्सवात’ प्रतिष्ठित ग्रँड ज्युरी पुरस्कारासाठी नामांकनही मिळवलं.
त्यानंतर, २००६मध्ये, लीननं ‘द फास्ट अँड द फ्युरियस’ या सर्वांत मोठ्या ॲक्शन फ्रँचायझींपैकी एक असलेल्या तिसऱ्या चित्रपटाचं दिग्दर्शन हाती घेतलं. ‘द फास्ट अँड द फ्युरियस: टोकियो ड्रिफ्ट’ हा वर्षभरातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. फास्ट अँड फ्युरियसमुळं जस्टीन लीनला एका रात्रीत आंतरराष्ट्रीय स्तरावर दिग्दर्शक म्हणून प्रतिष्ठा मिळाली. त्यानंतर लीननं याच फ्रँचायझीमधील पुढील तीन चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. आज हॉलीवुडमध्ये काम केलेल्या सर्वात अष्टपैलू दिग्दर्शकांमध्ये जस्टीन लीनची गणना होते.
फास्ट अँड फ्युरियस हेल्मर असलेल्या जस्टिन लिननं या सिरीजमधील तीन चित्रपटांसाठी दिग्दर्शन केलं आहे. ‘फास्ट अँड फ्युरियस: टोकियो ड्रिफ्ट’ या कार फ्रँचायझीपटांमधील त्याचा पहिलाच चित्रपट होता. आता चित्रपटाच्या नावातच त्याचा प्लॉट कुठे घडलेला असेल, याची माहिती मिळते. नावातच टोकियो असल्यामुळं चित्रपटाचं शूटिंग टोकियोमध्ये होणं अपेक्षित होत.
रियल लोकेशनचा फॅन असलेल्या जस्टीनं त्यासाठी जपानला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही गोष्ट नक्कीच सोपी नव्हती. कारण, जपानमध्ये सार्वजनिक ठिकाणांवर जाऊन शूटिंग करण्यासाठी खूप परवानग्यांची आवश्यकता भासते. सिनियर अथॉरिटीजकडून परवाने मिळाले तरी लोकल पोलीस शूटिंगमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करते. या गोष्टीची जस्टीनला कल्पना नव्हती. त्यामुळं त्याची टीम टोकियोला पोहचली.
त्यांना टोकियोमधील सर्वात गर्दीचं ठिकाण असलेल्या शिबुया येथे शूट करायचं होतं. त्यानं लोकेशनवर जाऊन शूटिंग सुरू देखील केली. पाहिजे असलेले सर्व शॉट्स जस्टीनं मिळवले पण शेवटी पोलीस त्याला अटक करण्यासाठी आले. पोलिसांनी जस्टीन लीन नावाच्या व्यक्तीला अटकही केली होती. पण, ती व्यक्ती खरीखुरी जस्टीन नव्हती!
टोकियोतील शूटिंग रुल्सबाबत जस्टीन लीन जरी काहीसा अनभिज्ञ असला तरी युनिव्हर्सला स्टुडियोला मात्र, जपानमधील नियमांची पुरेपुर कल्पना होती. म्हणून त्यांनी क्रूसोबत एका व्यक्तीला फक्त जस्टीन लीन म्हणून अटक करून घेण्यासाठी पाठवलं होतं. जेव्हा जपानी पोलीस चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक करण्यासाठी आले तेव्हा अचानक त्या व्यक्तीला जस्टीन लीन म्हणून अटक झाली. या प्रकारानं स्वत: खराखुरा जस्टीनसुद्धा आश्चर्यचकित झाला होता. जर युनिव्हर्सल स्टुडिओनं पूर्व तयारी केली नसती तर जस्टीनला निदान एक रात्र तरी जपानी तुरुंंगात काढावी लागली असती. मात्र, सुदैवानं तसं झालं नाही.
जपानमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं. त्यासाठी जपानी राज्यघटनेमध्ये कलम २१ तयार करण्यात आलं आहे. त्यामुळं तिथे चित्रीकरण आणि फोटोग्राफीला परवानगी देण्यात आलेली आहे. कारण, त्यांचा समावेश अभिव्यक्ती स्वातंत्र्यांमध्ये होतो. परंतु, येथील लोकांच्या संमतीशिवाय फोटो आणि व्हिडिओ कव्हरेज करणं प्रतिबंधित आहे.
येथे सार्वजनिक ठिकाणी शूटिंग करण्यापूर्वी तेथील लोकांना, तुम्ही कुठल्या कारणासाठी शूटिंग करत आहात याबद्दल स्पष्ट माहिती द्यावी लागते. जरी तुमच्याकडे कायदेशीर परवानगी असेल आणि प्रत्यक्ष लोकेशनवरील लोकांनी त्यावर आक्षेप घेतला तर तुम्हाला तुमचे शूटिंग तत्काळ थांबवावे लागते. जपानमध्ये शूटिंगसाठी मुबलक लोकेशन्स आहेत. त्यामध्ये काही नैसर्गिक आहेत तर काही मानवनिर्मित. पण, तेथील नियमांच्या चौकटीत राहूनच त्यांचा वापर करता येतो. याची प्रचिती खुद्द जस्टीन लीनलादेखील आली आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.