आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
शाळेतील भूगोलाच्या पुस्तकामध्ये ‘लोकसंख्या’ या घटकाचा अभ्यास करण्यासाठी एक स्वतंत्र चॅप्टर ठेवलेलं असायचं. त्यामध्ये आपलं राज्य, देश आणि जागतिक लोकसंख्येचा अभ्यास असायचा. बहुतेक विद्यार्थ्यांना हे चॅप्टर म्हणजे डोक्याला कटकट वाटायची. कारण, त्यातील आकडे लक्षात ठेवता-ठेवता नाकी नऊ यायचे. कितीही पाठांतर केलं तरी या चॅप्टरबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांपैकी एखादा प्रश्न हमाखास चुकायचाच.
शालेय जीवनापासूनच आपल्या मनावर लोकसंख्येचा अभ्यास का बिंबवला जातो? याचा कधी तुम्ही विचार केलाय का? किंवा, कधीकाळी ‘वन चाइल्ड पॉलिसी’चा काटेकोरपणे अवलंब करणाऱ्या चीननं आता अचानक ती बंद करण्याचा निर्णय का घेतला? याचा तुम्ही कधी विचार केलाय का? जगाचा शाश्वत विकासासाठी लोकसंख्या हा घटक खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच, लोकसंख्येचा अभ्यास केला जातो.
गेल्या काही वर्षांमध्ये तर लोकसंख्या अभ्यासाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. कारण, कधीकाळी झपाट्यानं वाढणारा जन्मदर आता अचानक खालावत चालल्याचं चित्र आहे. काही देशांमध्ये तर घटता जन्मदर मोठ्या चिंतेची बाब ठरत आहे.
‘लॅन्सेट’ या मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, जगभरात प्रजनन दर कमी होत आहे. याचाच अर्थ या शतकाच्या अखेरीस जवळजवळ सर्व देशांमध्ये लोकसंख्या कमी होईल. प्रजनन दर कमी का होत आहे? त्याचा भविष्यातील लोकसंख्येवर काय परिणाम होईल? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा…
प्रजनन दर घसरणं म्हणजे या शतकाच्या अखेरीस जवळजवळ प्रत्येक देशाची लोकसंख्या कमी होण्याचं लक्षणं आहे. सध्या स्पेन आणि जपानसह एकूण २३ राष्ट्रे घसरणाऱ्या प्रजनन दराचा सामना करत आहेत. २१०० पर्यंत या देशांची लोकसंख्या निम्मी होईल अशी अपेक्षा आहे. काही देश तर नाटकीयरित्या वृद्ध होतील. कारण, त्यांच्या एकूण लोकसंख्येपैकी सर्वात जास्त लोक वृद्धापकाळात असतील.
प्रजनन दर कमी होणं म्हणजे काय आणि सध्याची परिस्थिती काय आहे? हे आपण अगोदर समजून घेऊया. एक महिला सरासरी किती मुलांना जन्म देते, याचं प्रमाण म्हणजे प्रजनन दर असतो. जर ही सरासरी २.१च्या खाली आली तर लोकसंख्येमध्ये घट होऊ लागते. १९५०मध्ये, एक महिलांना त्यांच्या आयुष्यात सरासरी ४.७ मुलांना जन्म देत होती.
युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनमधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, १९५०च्या तुलनेत २०१७मध्ये जागतिक प्रजनन दर जवळपास निम्म्यानं घटला आहे. २०१७मध्ये जागतिक प्रजनन दर २.४ इतका होता आणि २१०० पर्यंत तो १.७ पेक्षाही खाली जाईल असा अंदाज आहे. परिणामी, संशोधकांच्या अंदाजानुसार २०६४पर्यंत जगाची लोकसंख्या ९.७ अब्जांपर्यंत पोहोचेल तर शतकाच्या अखेरीस ८.८ अब्ज पर्यंत खाली घसरेल. ही नक्कीच खूप मोठी आणि चिंतेची बाब आहे.
सध्या घसरत असलेल्या प्रजनन दरासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. अभ्यासकांच्या मते, स्पर्म काऊंट किंवा प्रजननक्षमतेबद्दल चर्चा करताना मनात येणाऱ्या नेहमीच्या गोष्टींशी त्याचा काहीही संबंध नाही. शिक्षणाचा वाढता प्रसार, कामातील स्त्रियांचा अधिक सहभाग, गर्भनिरोधकांची उपलब्धतता यासारख्या कारणांमुळं स्त्रिया कमी मुलं जन्माला घालत आहेत. बारकाईनं विचार केला तर प्रजनन दर घसरणं ही एक यशोगाथाच आहे.
हीच परिस्थिती जर दीर्घकाळ राहिली तर मात्र, धोक्याची ठरू शकते. कारण, भविष्यात अशा काही घटना घडू शकतात ज्यामुळं लोकसंख्या झपाट्यानं कमी होऊ शकते. अशा स्थितीत जन्मदर कमी असून चालणार नाही. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ मिशियो काकू यांनी ‘फिजिक्स ऑफ फ्युचर – द इन्व्हेन्शन दॅट ट्रान्सफॉर्म्ड अवर लाईव्ह्स’ या पुस्तकात वातावरण बदलांना लोकसंख्येतील बदलांसाठी जबाबदार धरलं आहे.
सध्या जपान, चीन आणि इटलीसह एकूण २३ देश घसरलेल्या प्रजनन दराच्या समस्येचा सामना करत आहेत. त्यांच्या भविष्यावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार या शतकाच्या अखेरीस जपानची लोकसंख्या निम्मी होईल. २०१७च्या जनगणनेनुसार, जपानची लोकसंख्या १२ कोटी ८० लाख होती. परंतु, या शतकाच्या अखेरीस ती कमी होऊन केवळ पाच कोटी ३० लाख होईल असा अंदाज आहे.
जपान हा लोकसंख्येनुसार जगातील सर्वात वृद्ध देश आहे. कारण, त्या ठिकाणी वृद्ध नागरिकांची संख्या जास्त आहे. परिणामी, जपानमध्ये काम करण्याची क्षमता असलेल्या लोकांची संख्या सातत्याने कमी होत आहे आणि भविष्यात ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
सध्या चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश आहे. पण, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देशदेखील सध्या कमी होणाऱ्या प्रजनन दराचा सामना करत आहे. लॅन्सेटच्या अहवालानुसार, पुढील चार वर्षांत चीनची लोकसंख्या एक अब्ज ४० कोटी होईल. परंतु, शतकाच्या अखेरीस ती कमी होऊन सुमारे ७३ कोटी इतकी होईल.
सरकारी आकडेवारीनुसार, २०१९मध्ये चीनचा जन्मदर गेल्या ७० वर्षांतील नीचांकी पातळीवर आला आहे. काही तज्ज्ञांच्या मते, चीन हा ‘डेमोग्राफिक टाईम बॉम्ब’ बनला आहे. म्हणजेच तिथे कामगारांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. चीन ही जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. त्यामुळे चीनच्या लोकसंख्येतील चढउतारांचा संपूर्ण जगावर प्रभाव पडणार आहे.
पर्यावरणाचा विचार केला तर लोकसंख्येतील घट चांगली ठरू शकते. कमी लोकसंख्येमुळं कार्बन उत्सर्जन कमी होईल. तसेच, शेतजमिनीसाठी जंगलतोड कमी होईल. परंतु, याचे आर्थिक परिणाम फार गंभीर आहेत. १९६०च्या दशकात, प्रत्येक निवृत्त व्यक्तीमागे कामाचं वय असलेले सहा लोक होते. आज, हे गुणोत्तर तीनपर्यंत खाली आलं आहे. तर, २०३५पर्यंत ते एकपर्यंत येण्याची शक्यता आहे.
प्रजनन दर वाढवण्यासाठी काही पर्याय समोर आणले जात आहेत. युकेसह इतर काही देशांनी त्यांची लोकसंख्या वाढवण्यासाठी आणि घटत्या प्रजनन दराची भरपाई करण्यासाठी स्थलांतराचा वापर केला आहे. पण, हा काही शाश्वत उपाय ठरू शकणार नाही. काही देशांनी सुधारित मातृत्व आणि पितृत्व रजा, मोफत बालसंगोपन, आर्थिक प्रोत्साहन आणि अतिरिक्त रोजगार अधिकार यासारख्या धोरणांचा प्रयत्न केला आहे. परंतु, त्यातूनही ठोस रिझल्ट मिळालेला नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.