कोरोनाने आपल्या आवडत्या क्रिकेट सम्राटचा देखील बळी घेतलाय

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


भारतीयांना तीन गोष्टीचं फार वेड आहे. एक म्हणजे “सिनेमा”, दुसरी गोष्ट “क्राईम स्टोरीज” आणि या दोहोंच्या वर नंबर लागतो “क्रिकेट”चा.

संपूर्ण भारतीय उपखंडालाच क्रिकेटचे वेड आहे. बघायला गेलं तर, भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी, याशिवाय भारतात इतर ४०० प्रकारचे खेळ खेळले जातात. असे असूनही भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर “एक क्रिकेटवेडा देश” अशीच आहे.

अर्थात ही क्रेझ काही एका दिवसात आली नाही. भारतात स्वातंत्र्यपूर्व काळापासून, म्हणजे इंग्रजांच्या कारकिर्दीत, क्रिकेटची सुरुवात झाली होती. त्यावेळी टेस्ट सामने ५–५ दिवसांचे असायचे, ते फारच कंटाळवाणे असत.

याकाळात क्रिकेटच्या बरोबरीने फुटबॉल आणि हॉकी या खेळांना भारतीय सैन्याने प्रसिद्धी मिळवून दिली. मेजर ध्यानचंद यांनी आपल्या जादुई खेळाने भारताला स्वातंत्र्यपूर्व काळात ऑलिम्पिकमध्ये जवळपास ८ सुवर्णपदकांची कमाई करून दिलेली होती. त्यामुळे हॉकी आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ बनला होता.

साधारणपणे १९८०च्या सुरुवातीला भारतात क्रिकेटबद्दल उत्सुकता वाढायला सुरुवात झाली.

१९८३ साली कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला विश्वचषक जिंकला आणि लोकांमध्ये क्रिकेटची क्रेझ वाढायला सुरुवात झाली.

कुठल्याही खेळाला पुढे आणण्यात तो खेळ खेळणाऱ्या खेळाडूचा वाटा मोठा असतो. मेजर ध्यानचंदमुळे हॉकी प्रसिद्ध झाला. तसाच कपिल देव आणि त्याची १९८३ची टीम, मोहिंदर अमरनाथ, गुंडाप्पा विश्वनाथ, सुनील गावस्कर, आणि त्यानंतर उदयाला आलेला क्रिकेटचा राजा सचिन तेंडूलकर या सगळ्यांनी भारतीय क्रिकेटला उच्च शिखरावर ठेवले.

त्या काळात क्रिकेट, खेळाडू, खेळाडूंचे व्यक्तिगत जीवन, क्रिकेटच्या तांत्रिक बाबी, खेळाचे नियम, क्रिकेट विश्वातील बाकी घडामोडी जाणून घेण्यासाठी लोक प्रचंड उत्सुक असायचे. लोकांना कुतूहल जरी असले तरीही माहितीची साधने मर्यादित होती.

दूरदर्शन होते पण टीव्ही प्रत्येक भारतीयाच्या घरात परवडण्यासारखा नव्हता. रेडीओ, वृत्तपत्रे, मासिके यामधून येणाऱ्या बातम्यांवर लोक जास्त विसंबून राहत. तेव्हाच फक्त क्रिकेट विश्वाला वाहून घेतलेल्या अनेक साप्ताहिक आणि मासिकांचा उगम त्यावेळी झाला.

त्यातले सर्वाधिक खप असणारे मासिक म्हणजे हिंदी भाषेतील दिल्लीवरून प्रकाशित होणारे “क्रिकेट सम्राट”. आजही क्रिकेट सम्राटचे अनेक अंक क्रिकेट प्रेमींनी आपल्या घरात जपून ठेवलेले सापडतील.

साधारणपणे १९७५-७६च्या सुमारास भारतीय क्रीडा विश्वासंदर्भात लिखाण करण्याच्या हेतूने खेल सम्राट या नावाने आनंद दिवाण नावाच्या माणसाने हे मासिक काढले होते. पण या मासिकात इतर कुठल्या खेळांऐवजी क्रिकेट संदर्भात माहिती जास्त येत असे. त्यामुळे लोकांनी या मासिकाला पत्रे लिहून, “तुम्ही मासिकाचे नाव क्रिकेट सम्राट का ठेवत नाही?” असे विचारले.

त्यानंतर दिवान यांनी काही दिवस विचार करून आपल्या मासिकाचे नाव क्रिकेट सम्राट असे बदलले आणि तेंव्हापासून मासिकामध्ये फक्त क्रिकेट संदर्भातील गोष्टी यायला सुरुवात झाली.

जरी मासिकाची सुरुवात दिल्लीपासून झाली असली तरी हिंदीभाषिक पट्ट्यात या मासिकाने अल्पावधीत प्रचंड मोठे स्थान मिळवले. अगदी घराघरात क्रिकेट मासिकचा अंक त्यावेळी घेतला जात असे.

१९८३ नंतर क्रिकेटची लोकप्रियता वाढली सोबतच क्रिकेट सम्राट आणि क्रिकेट या विषयाला वाहून घेतलेल्या इतर मासिकांचीही लोकप्रियता वाढली. मात्र क्रिकेट सम्राटची सर बाकी दुसऱ्या कुठल्याही प्रकाशनाला आली नाही.

क्रिकेट सम्राटमध्ये काय नसायचे? आपली भारतीय टीम जे दौरे खेळत असेल त्याबाबतचा सविस्तर वृतांत, भारतीय क्रिकेटपटूची माहिती, देशांतर्गत राज्याराज्यात चालणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धांची माहिती.

क्रिकेट सम्राट हे पहिले असे मासिक होते जे रणजी ट्रॉफी असो वा पंजाब-हरयाणा आणि अन्य राज्यात खेळल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धा असतील या सर्वांचा समर्पक लेखाजोखा आपल्या लेखातून घेत असे.

लोकांना फक्त भारतीय संघात जे खेळाडू निवडले जात त्यांचे चेहरे आणि नावे माहिती असत. मात्र हे चेहरे भारतीय संघात येण्यापूर्वीचा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आणि इतर माहिती क्रिकेट सम्राटकडे उपलब्ध असे.

दुसरी बाजू म्हणजे अर्थात सांख्यिकीची. क्रिकेटमध्ये कोण किती सामने खेळला, किती सामन्यात किती धावा काढल्या, त्याचा रनरेट काय होता? कोणत्या सामन्यात कोणी किती विकेट घेतल्या, या विकेटचा स्ट्राईक रेट काय होता हा प्रचंड मोठा साठा क्रिकेट सम्राट आपल्याकडे बाळगून होता.

प्रत्येक खेळाडूची माहिती अपडेट करण्याबरोबरच तो खेळाडू किती मॅचेस खेळला, त्याने आजवर किती रन काढलेत, त्याने किती विकेट घेतल्या, टेस्ट मॅच किती खेळल्या आहेत आणि एक दिवसीय सामने किती खेळले आहेत, कुठल्या देशाच्या खेळाडूला त्याने किती वेळा आउट केले आहे, कुणाच्या बॉलवर किती वेळा चौकार, षटकार ठोकले आहेत याचे सगळे रेकॉर्ड क्रिकेट सम्राटच्या वाचकांसाठी उपलब्ध होत असे.  

या व्यतिरिक्त क्रिकेटच्या तांत्रिक बाबी, त्याच्या नियमांसंबंधी माहिती देणारे लेख, तंत्रशुद्ध फलंदाजी आणि तंत्रशुद्ध गोलंदाजी याबाबतची माहिती, कव्हर ड्राईव्ह, क्रीझ एंड शॉट, हेलिकॉप्टर शॉट, अशा अनेक गोष्टींचे विश्लेषण ही क्रिकेट सम्राटची खासियत होती.

त्यामुळे जे उदयोन्मुख अथवा उभरते क्रिकेटर्स होते त्यांच्यासाठी क्रिकेट सम्राट म्हणजे क्रिकेटची गीताच होती. ज्या बारीकसारीक गोष्टी कोणीही शिकवू शकत नाही त्या गोष्टींची माहिती त्यांना क्रिकेट सम्राटमधून मिळत असे.

क्रिकेट सम्राटने आपल्या अंकांमधून क्रिकेट जगात होणाऱ्या अनेक रोचक सामन्यांचे, सामन्या दरम्यान होणाऱ्या भांडणांचे, ड्रेसिंग रूममधल्या सेलिब्रेशनचे साग्रसंगीत वर्णन वेळोवेळी केले. याच कारणासाठी क्रिकेट सम्राट वाचणारे लाखो लोक भारतात होते आजही आहेत.

पण जसजसा काळ पुढे गेला तसतसा टीव्ही, केबल आणि नंतर इन्टरनेटने मासिकांचे मार्केट खाऊन टाकले. याचाच फटका क्रिकेट सम्राटला देखील बसला. तरीही क्रिकेट सम्राट नेटाने आपल्या वाचकांसाठी आपला अंक प्रकाशित करणे चालूच ठेवले होते मात्र जाहिराती येणे कमी झाले होते त्यामुळे अडचणींमध्ये वाढ झाली.

तशात २०२०मध्ये कोव्हीड-१९च्या महामारीमुळे अनेक प्रेस बंद पडल्या, वृत्तपत्रे बंद पडली आणि शेवटी क्रिकेट सम्राटलासुद्धा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला!

ही खरंतर भारतीय क्रिकेटप्रेमी वाचकांसाठी अत्यंत दु:खद घटना आहे. ज्या मासिकाने गेले ३० वर्षे मनोरंजन केले, क्रिकेटबाबत खडा न खडा माहिती दिली, अनेक उत्तम रंगीत पोस्टर्स दिले, क्रिकेटचं ज्ञान दिले असे मासिक या कोव्हीडमुळे २०२०ला बंद करावे लागत आहे.

अर्थात याचे संस्थापक दिवाण साहेब अजूनही आशावादी आहेत. कोव्हीड गेल्यानंतर कदाचित आम्ही क्रिकेट सम्राट पुन्हा चालू करू शकू असा त्यांचा निर्धार आहे. त्यांचा हा निर्धार सत्यामध्ये उतरो हीच समस्त क्रिकेटप्रेमींकडून प्रार्थना!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!