आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
२१ ऑक्टोबर १९५९ साली चिनी सैन्याने १० भारतीय जवानांची निर्घृण ह*त्या केली, ह्या घटनेमुळे भारत आणि चीनचे संबंध बिघडतच गेले व त्याची परिणीती १९६२च्या भारत-चीन यु*द्धात झाली. हा सर्व घटनाक्रम लडाखच्या उंच पहाडी भागात घडत होता. ही घटना ‘हिंदी चिनी भाई भाई’ असे नारे देणाऱ्या नेहरूप्रणित भारत सरकारसाठी एक धक्कादायक बाब होती.
या घटनेचे भारतातील डाव्या राजकारणावर अनेक दुरगामी परिणाम झाले. भारतात अस्तित्वात असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या विघटनाला ही घटना कारणीभूत ठरली होती.
खरंतर भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनापासूनच भारतीय कम्युनिस्ट पक्षातील नेत्यांचे एकमेकांशी जुळत नव्हते. वेगवेगळ्या विचारसरणी व कार्यपद्धतीच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षातील नेत्यांचे एकमेकांशी वैचारिक वैर होते.
१९६२च्या यु*ध्दादरम्यान मात्र हे वैचारिक वैर पक्षाच्या ध्येय-धोरणांच्या पलीकडे गेले आणि याची परिणीती पक्षाच्या विघटनात झाली.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या १९६२च्या यु*ध्दादरम्यानच्या भूमिकेवर आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीचा मोठा प्रभाव होता. खरंतर हा प्रभाव आधीपासूनच पक्षावर होता.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना देखील भारतात न होता, सोव्हिएत रशियाच्या ताशकंद या शहरात १९२० साली करण्यात आली. कम्युनिस्ट इंटरनॅशनल या संस्थेने भारतातील विविध कामगार चळवळींना कम्युनिस्ट चळवळीचा छत्रछायेखाली आणून भारतातील जुलमी ब्रिटिश राजवट उलथवून टाकत कम्युनिस्ट राज्याची स्थापना करणे या उद्देशाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सुरुवात केली.
कम्युनिस्ट पक्षाने स्वातंत्र्य आंदोलनात एक महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्यांनी काँग्रेससोबत ब्रिटिशांशी लढा दिला. पण कम्युनिस्ट पक्षाच्या धोरणावर आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीचा मोठा प्रभाव होता.
ज्यावेळी १९४२ साली महात्मा गांधींनी छोडो भारत चळवळ सुरू केली, तेव्हा सोव्हिएत संघाच्या सुचनेप्रमाणे भारतीय कम्युनिस्ट हे ब्रिटिशांच्या बाजूने उभे राहिले कारण सोव्हिएत संघ त्यावेळी दुसऱ्या महायु*द्धात ब्रिटिशांचा मित्र देश होता. राष्ट्राच्या स्वातंत्र्यापेक्षा सोव्हिएत रशियाचे ऐकणे कम्युनिस्टांनी पसंत केले होते.
१९५० आणि ६०च्या दशकात सोव्हिएत रशिया आणि चीनमध्ये मार्क्स-लेनिनवादी तत्त्वज्ञानाच्या गाभ्यावरून वादंग निर्माण झाले, याचा परिणाम जगभरातील कम्युनिस्ट चळवळींवर झाला. चीन आणि रशियाचे संबंध खराब होऊन दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला.
चीनचा रशियाच्या पाश्चिमात्त्य देशांशी करार करून शांतता प्रस्थापित करण्याचा धोरणाला विरोध होता.
एकीकडे सोव्हिएत रशिया आणि चीनमध्ये वाद होत असताना, दुसरीकडे रशियाने भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित केले होते.
रशियाने भारतीय कम्युनिस्टांना नेहरू प्रणित सरकारला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. इतकेच नाही तर त्यांच्या मंत्रिमंडळाचा भाग होण्यास सुचवले. ही बाब काही कम्युनिस्ट नेत्यांना रुचली नाही आणि त्यांनी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला.
जेव्हा भारत-चीन सिमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि १९५९ साली आपली मायभूमी सोडून दलाई लामा तिबेटहून भारतात आश्रय घ्यायला आले होते. त्यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने एक परिपत्रक जारी केले. त्यात त्यांनी म्हटले होते की, चीनचे तिबेटवरील आक्रमण हे तिबेटच्या नागरिकांच्या हिताचे आहे.
तिबेटच्या जनतेला शतकांच्या अंध:कारातून बाहेर काढण्याचे माओप्रणित कम्युनिस्ट चळवळ करत आहे.
यावरून एक गोष्ट स्पष्ट दिसून येते की कम्युनिस्ट पक्षाने चीनच्या तिबेटवरील आक्र*मणाचे स्वागत केले होते.
जेव्हा चीनने ईशान्य भारतातील सीमेवर आणि लडाखमध्ये आक्र*मक हालचाली सुरू केल्या त्यावेळी भारतीय कम्युनिस्टांनी त्याकडे दुर्लक्ष करण्याचे अथवा त्या विषयाचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले. जेव्हा स्थिती बिकट झाली त्यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने कोलकातामध्ये तातडीची बैठक बोलावली, या बैठकीत त्यांनी एक ठराव मंजूर केला. ज्यात त्यांनी पुन्हा चीनची बाजू घेतली.
कम्युनिस्टांचा एक गट भारत सरकारच्या बाजूने होता तर दुसरा चीनच्या. दुसऱ्या गटातील लोकांची संख्या जास्त होती. त्याचा प्रभाव त्या ठरावावर दिसला. त्यावेळी कम्युनिस्ट पार्टीचे अध्यक्ष अजोय घोष यांनी हे प्रकरण शांततापूर्णपणे हाताळून दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये समन्वय बसवण्याचे काम केले होते. पण परिस्थिती चिघळत गेली.
संयुक्त महाराष्ट्र समितीने या दरम्यान ‘चीनविरोधात’ कठोर भूमिका घेतली, त्यांनी मॅकमोहन सीमारेषेपर्यंतचा भाग भारताचाच असून चीनचा त्यावर कुठलाच अधिकार नाही, असं स्पष्ट केलं.
पुढे श्रीपाद अमृत डांगे यांनी पुढे येऊन चीनचा प्रखर विरोध केला. त्यांनी नेहरूंना चीनला तोडीचे उत्तर देण्याचे आवाहन केले, त्यांच्या पाठोपाठ केरळमधील कम्युनिस्ट नेते ए के गोपालन, हृदयनाथ मुखर्जी जे राज्यसभेत खासदार होते यांनी देखील चीन विरोधात सूर ओढला.
अमृतसर, अहमदाबाद आणि दिल्लीस्थित कम्युनिस्ट नेत्यांनी देखील एकमुखाने नेहरू सरकारची बाजू घेतली आणि चीनला विरोध केला.
परंतु बंगालमधील कम्युनिस्ट नेत्यांच्या मनात वेगळाच प्रकार सुरू होता. त्यांनी उघडपणे चीनची बाजू घेत, नेहरू आणि त्यांच्या धोरणांवर टीका करायला सुरुवात केली. चीन प्रकारणावरून भारतीय कम्युनिस्ट पक्षात उभी फूट पडली होती.
एकीकडे भारतधार्जिणे, दुसरीकडे चीनधार्जिणे. १९६१ साली कसेतरी पक्षाचे अस्तित्व टिकून होते पण पुढे पक्षाला बांधून ठेवणाऱ्या कॉम्रेड अजय घोष यांच्या निधनानंतर ही दरी प्रचंड वाढली. पक्षातच कम्युनिस्ट डावे आणि कम्युनिस्ट उजवे हे दोन गट निर्माण झाले.
पुढे १९६२ साली चीनने भारतावर प्रत्यक्ष आक्र*मण केले. त्याचा काही दिवस अगोदर उजव्या गटाचे कम्युनिस्ट कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगेंचे ब्रिटिश सरकारला लिहिलेले माफीपत्र डाव्या गटाचे कम्युनिस्ट द्विजेन नंदी यांनी प्रकाशित केले. यावरून पक्षात अंतर्गत वाद पुन्हा वाढीस गेला.
जेव्हा १९६२ साली यु*द्ध सुरू होते तेव्हा कम्युनिस्टांच्या एका गटाने मजुरांचा संप पुकारला. हा संप पुकारण्याचे कारण सैन्याला जाणारी रसद तोडणे हा होता, असं अनेक इतिहासकार मानतात.
याला प्रतिक्रिया अच्युतानंद यांच्या गटाने सैनिकांना रक्त पुरवठा करण्यासाठी रक्तदान मोहीम हाती घेतली. यातून पुढे भारतधार्जिणे उजवे कम्युनिस्ट आणि चीन धार्जिणे डावे कम्युनिस्ट दुरावत जाऊन ‘मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष’ हा नवा पक्ष अस्तित्वात आला.
हा पक्ष चीनधार्जिण्या डाव्या कम्युनिस्ट नेत्यांनी भरलेला होता, कालांतराने यातूनच अजून एक गट बाहेर पडला ज्याने भारतीय कम्युनिस्ट पक्षाची (माओवादी) स्थापना केली. हा पक्ष संपूर्णपणे माओच्या रक्तरंजित क्रांतिच्या सिद्धांतावर आधारलेला असून यातूनच ‘नक्षलवादी’ चळवळीचा उगम झाला आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.