आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारत एक कृषिप्रधान देश आहे. पूर्वी तर जवळपास प्रत्येकच घरात गायी पाळल्या जात असत. त्यामुळे दही, दूध, लोणी भरपूर प्रमाणात उपलब्ध असायचेच. दूध व दुधाचे पदार्थ हे शरीरासाठी उत्तम तर असतातच शिवाय चविष्ट असल्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडत.
पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती असल्याने हे पदार्थ सहसा घरीच बनत. याचमुळे सायीचे विरजण लावून त्यापासून लोणी-तूप बनवण्यातच भारतीय स्त्रियांना अत्यंत सुख पण मिळायचे हे म्हणायला हरकत नाही. जेव्हा घरीच लोणी बनवता येते तर बाहेरून विकत कशाला घ्या? हाच सगळ्यांचा विचार होता.
अशात १९०० साली पॉलसन नावाचा एक बटर ब्रँड बाजारपेठेत उतरतो, लोकांच्या विचारसरणीला बदलून टाकतो व घराघरांत लोणी-तूप भरलेले असूनसुद्धा लोक या ब्रँडच्या “बटर”ला पसंती देतात ही केवढी मोठी गोष्ट आहे नाही?
पण हे घडलं कसं? चला तर जाणून घेऊया कठीण स्पर्धेला तोंड देत घरा घरात पोहोचलेल्या पॉलसनची कहाणी.
भारतात १९४७पर्यंत ब्रिटिश राजवट होती. ब्रिटिशांच्या जेवणातला अविभाज्य घटक असलेल्या “बटर”ची त्या काळात भारतात कमर्शियल स्तरावर उत्पादन व विक्री होत नसे. त्यामुळे ब्रिटिश सैन्याला बटरची अत्यंत कमतरता जाणवू लागली. त्यांना बटर कमी पडू लागले.
या संधीचे सोने केले ते पेस्तोंजी ईदुल्जी दलाल या पारसी कॉफी उद्योजकाने!
पॉलसन ही एक कॉफीचे उत्पादन करणारी कंपनी होती. त्यांनी त्यांची पहिली बटर फॅक्टरी गुजरातच्या कैरा येथे सुरू केली. दलालांचे बरेच ब्रिटिश अधिकारी मित्र होते त्यांच्यापैकीच एका अधिकाऱ्याने त्यांना “पॉली” असे गमतीने टोपण नाव दिले. या नावावरूनच आपल्या ब्रँडला पॉलसन नाव दिले.
बटर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध तर होते पण भारतीय ग्राहकांना ही फारशी पटणारी गोष्ट नव्हती. शिवाय बटर तर लोणीच आहे ना! मग साध्या लोण्यासाठी इतके जास्त पैसे खर्च करणे त्यांना पटत नव्हते.
इंग्रजी बटरसारखे भारतीय लोणी चवीला खारट नसते. त्यामुळे लोकांना ही चव आवडेल की नाही हाही मोठा प्रश्न होता. पण पॉलसनच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीने हा प्रश्नही मोठ्या मुत्सद्दीपणे सोडवला. त्यां
नी बटरच्या प्रत्येक पाकिटावर कूपन देणे सुरू केले. ठराविक संख्येत कूपन गोळा केले की त्या कूपनच्या बदल्यात फ्री मिक्सर व टोस्टर देणे सुरू केले. या युक्तीमुळे कंपनीचा खप भरपूर वाढला.
१९५० साल उजाडले तसे पॉलसन बटर घराघरांत पोहोचले होते. मार्केटिंग एक्स्पर्ट नवरोज डी धोंडी सांगतात की, सुरुवातीला हे बटर अशा सामान्य ग्राहकांना या बटरची किंमत अजिबात परवडत नव्हती. शिवाय ब्रँडही नवीन आणि लोकांना घरगुती लोण्यावर जास्त जास्त विश्वास होता.
त्या काळात पॉलसन बटर विकत घेणे एक स्टेटस सिम्बॉल बनले होते. ज्या श्रीमंत लोकांकडे फ्रिज आहे असेच लोक हे बटर विकत घेत. एक “स्टेटस सिम्बॉल” म्हणून. पण पॉलसनच्या कूपन स्ट्रॅटेजीने त्यांच्या बटरला घराघरात पोहोचवले. पॉलसनला सामान्य लोकांचा ब्रँड बनविले.
आज प्रत्येक वनस्पती तेलाला आपण डालडा म्हणून ओळखतो किंवा प्रत्येक इन्स्टंट नूडल्सच्या ब्रँडला मॅगी म्हणतो, त्याचप्रमाणे त्या काळात बटर म्हटल्यावर लोकांच्या डोळ्यापुढे “पॉलसन” हे एकच नाव यायचे.
पॉलसनचे यश वाढत होते आणि तेव्हाच बाजारात एन्ट्री झाली “अमुल”ची. ६०च्या दशकात अमुलने जगप्रसिद्ध “व्हाइट रीवोल्युशन”चा पाय रोवला.
देशातील दुध उत्पादकांनी अवस्था अत्यंत खालावलेली व दयनीय असताना, डेअरी इंजिनिअर व्हर्गिस कुरीएन यांच्यावर या चळवळीच्या मार्केटिंगची जबाबदारी सोपवण्यात आली.
हीच को. ऑपरेटिव्ह मूव्हमेंट पुढे जाऊन “अमुल” नावाचे डेअरी जायंट बनून संपूर्ण भारतात पसरले आणि पॉलसनच्या बाजारपेठेतील नावाचा क्षणार्धात नायनाट झाला. सुरुवातीला अमुलला बाजारात पाय रोवण्यासाठी भरपूर कष्ट पडले. पण पॉलसनच्या तुलनेत त्यांच्या बटरची क्वालिटी, चव अतिशय उत्तम दर्जाची होती. आजही अमूलच्या बटरला तोड नाहीच.
ब्रँड अँड मार्केटिंग कन्सल्टंट हरीश बिजूर यांच्या म्हणण्यानुसार, पॉलसनकडे दूरदृष्टी नव्हती. त्यांनी कधीच मोठा व भविष्याचा विचार केला नाही.
पॉलसनने काळानुसार स्वतःच्या उत्पादनांमध्ये सुधारणा न केल्यामुळे अमुलसारख्या नवख्या ब्रँडपुढे हार मानावी लागली.
पण तरीही भारतीयांना सगळ्यात आधी “बटर” विकत घेऊन, चवीने खायला लावणारा पॉलसन आजही लोकांच्या स्मरणात आहे!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.