आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
आपण जोपासलेले छंद आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देत असतात. पण, काही लोकांचे छंद हे सृष्टीलाही आकार देतात. बागकामाचा छंद अनेकांना असतो. परसदारी भाज्या लावणे, टेरेसवर भाजीपाला पिकवणे, अंगणात विविध प्रकारची झाडे लावून त्यांची जोपासना करणे हे छंदही बऱ्याच जणांना असतात.
केरळच्या जोसेफ फ्रान्सिस यांनाही बागकामाचा छंद आहे. आपल्या या छंदालाच त्यांनी जीवन वाहिले आहे. हा छंद विकसित करत असतानाच त्यांनी आंब्याची एक नवी प्रजाती देखील विकसित केली आहे, ज्याला त्यांनी त्यांच्या प्रिय पत्नीचे नाव दिले आहे.
बागकामाकडे फक्त एक वेळ घालवण्यासाठी किंवा विरंगुळ्यासाठी जोपासलेला छंद म्हणून ते पाहत नाहीत. तर झाडांच्या बाबतीत जी काही नवनवी माहिती मिळेल ती आपल्या कृतीत उतरवत त्यातून स्वतः काही आणखी नवीन घडवण्याचा प्रयत्न करतात.
बागकामातील त्यांचा उत्साह पाहून त्यांचे शेजारी, नातेवाईकही त्यांच्याकडून झाडे विकत नेतात.
त्यांच्या घराच्या छतावर त्यांनी आंब्याची बागच वसवली आहे. या बागेत आंब्याच्या एकूण ५० प्रजाती आहेत.
छतावर पालेभाज्या किंवा फळभाज्या उगवणे सोपे आहे. पण, आंब्याची बाग? कसे बरे शक्य असेल? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. जोसेफचे बागकामातील आगळेवेगळे वैशिष्ट्य याच प्रश्नाच्या उत्तरात दडले आहे.
केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील जोसेफ यांना शेतीमध्ये विशेष रस आहे. तसे तर ते व्यवसायाने एसी टेक्निशियन आहेत. पण गेली वीस वर्षे ते शेतीच करत आहेत. शेतीत विविध प्रयोग करणे, वेगवेगळे तंत्रज्ञान शिकणे आणि त्याला आपल्या ज्ञानाची, माहितीची, कल्पनेची जोड देऊन नवे शोध लावणे हीच त्यांची जीवनशैली बनून गेली आहे.
एखादा संगीतकार ज्याप्रमाणे सातत्याने रियाज करून आपले संगीतातील कौशल्य वरच्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करतो. अगदी तोच प्रयोग जोसेफ शेतीच्या बाबतीत करतात. शेतीत अधिकाधिक सर्जनशीलता आणण्यातच ते प्रयत्नरत असतात.
अगदी सुरुवातीला घराभोवतालच्या जागेत त्यांनी काही गुलाबाची रोपे लावली होती. नंतर त्यांनी मशरूम लावण्याचे प्रयोग केले. आता तर त्यांनी गच्चीतच आंब्याची बाग उभी केली आहे!
जोसेफ सध्या एर्नाकुलममध्ये राहत असले तरी त्यांचे मुळगाव कोच्ची जवळील नानिहाल हे आहे. शेती, झाडे, झुडपे याबद्दलची ओढ त्यांना इथेच लागली. त्यांच्या नानिहाल गावात गुलाबाच्या वेगवेगळ्या जाती पाहायला मिळतात.
एखाद्या विशिष्ट प्रदेशातच फुलणारा गुलाबही त्यांच्या नानिहालमध्ये पाहायला मिळतो. या गुलाबांनीच त्यांना झाडांच्या सान्निध्यात राहण्यास उद्युक्त केले.
प्रयोगशील शेतकरी कधीच स्वस्थ बसू शकत नाही. जोसेफही नेहमी नाविन्याच्या शोधात असतात. त्यासाठी ते विविध कृषी आणि वृक्ष प्रदर्शनांनाही हजेरी लावतात. अशाच एका प्रदर्शनात त्यांना कमी जागेत आंबा लागवड कशी करायची याची माहिती मिळाली.
त्या प्रदर्शनात त्यांनी पहिले की अगदी छोट्या छोट्या प्लास्टिकच्या पिशवीत देखील आंब्याची झाडे चांगली वाढलेली होती आणि त्यांना आंबे देखील लागले होते. तेव्हाच त्यांच्या डोक्यात विचार आला की, एवढ्याशा प्लास्टिक पिशवीत जर आंबे उगवता येत असतील तर माझ्याकडे तर, १८०० स्क्वेअर फुटची जागा आहे. प्रदर्शनातून घरी परत आल्यावर त्यांनी त्या आंब्याच्याच रोपांचा ध्यास घेतला.
छतावर कमी जागेत आंबा कसा उगवला जाऊ शकेल यावर त्यांनी विचार सुरु केला आणि त्यांना ड्रममध्ये आंबा उगवण्याची कल्पना सुचली. मग आधी त्यांनी घराच्या छतावर मोठमोठे ड्रम बसवले. हे ड्रम त्यांनी एका विशिष्ट प्रकारच्या स्टँडवर बसवले आहेत. जेणेकरून कधीही ड्रमची हालचाल करता येईल.
स्टँडवर बसवण्यात आलेले हे ड्रम हलवायला जास्त सोपे जातात. या ड्रम्समध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ५० जातीचे आंबे लावले आहेत.
यातील काही आंबे एकाच वर्षात फळ देतात तर काही आंब्यांना दोन वर्षांनी फळ धारणा होते. या वेगवेगळ्या जातीच्या आंब्यापासून त्यांनी स्वतःची एक नवी प्रजाती शोधली आहे. यासाठी त्यांनी स्वतःच्याच ग्राफिटी टेक्निकचा अवलंब केला आहे.
त्यांनी स्वतः शोधलेल्या आंब्याच्या जातीला पॅट्रिसिया हे आपल्या पत्नीचेच नाव दिले आहे. जोसेफ सांगतात की सर्व आंब्यापेक्षा या पॅट्रिसिया आंब्याची चव जास्तच गोड आहे.
दर रविवारी आजूबाजूच्या भागात राहणारे वीस-पंचवीस लोक तरी जोसेफ यांच्या या अफलातून बगिच्याला भेट देतात. काही लोक जोसेफ यांच्या बागेतील झाडेही नेतात.
या बागेतील फळे किंवा फुले यांच्याकडे जोसेफ एक उत्पादन म्हणून अजिबात पाहत नाहीत. त्यामुळे या फळांची किंवा फुलांची ते विक्रीही करत नाहीत. फक्त जी नवी झाडे त्यांनी बनवलेली आहेत, ती मात्र ते विकत देतात.
त्यांच्या मते एखाद्या रोपाचा सांभाळ करणे ही बाब खूपच कठीण आहे. म्हणूनच मी झाडांचे पैसे घेतो. या झाडांची काळजी घेणे फार महत्वाचे काम आहे. त्यांना पाण्याची कमी पडू नये म्हणून प्रत्येक झाडाला नेहमी पाणी मिळत राहील याचीही त्यांनी सोय केलेली आहे. या झाडांच्या मुळांना सतत पाणी मिळत राहिल्याने प्रत्येक झाड सुमारे ९ फुटापर्यंत वाढले आहे. यांची मुळेही मजबूत झाली आहेत.
आपल्या बागेतील फळे आणि फुले ते कधीच विकत नाहीत. आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, शेजार-पाजारच्या लोकांना या बागेतील फळे आणि फुले ते स्वतःहून नेऊन देतात. ते म्हणतात, यातून मला फार मोठा फायदा व्हावा म्हणून मी हे काम करत नाही.
पण, झाडांसाठी नक्कीच पैसे घेतो. आजूबाजूचे लोक त्यांना पैसे देऊन त्यांच्याकडील नवीन रोपे घेऊन जातात.
थोडक्यात जोसेफ यांनी घरच्या घरी एक छोटीशी नर्सरीच काढली आहे.
त्यांच्या या छोट्याशा बागेत फक्त आंबाच नाही तर इतरही फळांची झाडे आहेत. गुलाबाच्या फुलांचीही भरपूर व्हरायटी त्यांच्याकडे आहे. पण, ते सांगतात त्यांच्या या बागेतील फळे आणि फुले मात्र ते कधीच विकत नाहीत.
ही फळे आणि फुले ते शेजाऱ्या-पाजाऱ्यांना, नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना फुकट वाटतात. कुणी रोप मागितले तरच ते पैसे घेतात. जोसेफ यांच्या या छंदाचा फायदा फक्त त्यांना एकट्याला होतो असे नाही तर कितीतरी लोकांना यामुळे फायदा झाला आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.