पुण्याच्या एका दिव्यांग इंजिनिअरने तयार केलीये दिव्यांगांसाठीची ‘अँड्रॉइड’ व्हीलचेअर!

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


जर काही करून दाखवण्याची इच्छाशक्ती असेल तर अशक्यप्राय वाटणारी गोष्ट देखील मनुष्याला सहज शक्य असते, याचीच प्रचिती अनेकदा आपल्याला येत असते. आपल्या समोरील अडचणींवर रडत बसण्याऐवजी त्या अडचणीवर मात करून पुढे जाणाऱ्या व्यक्तींनीच आजवर इतिहास घडवला आहे.

शारीरिक अपंगत्वामुळे आपल्या वाटेला आलेल्या अडचणींचा सामना करत असताना, दैवाला यासाठी दोष देण्या ऐवजी स्वतःच्या हिंमतीने त्या अडचणींवर मात करून एका तरुणाने असंख्य दिव्यांगांना वरदान ठरू शकेल अशा यंत्राची निर्मिती केली आहे. 

अनिकेत जगताप असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा पुण्याचा आहे. 

शरीराने ७९ टक्के अपंग असून देखील त्याने आपल्या शारीरिक दुर्बलतेला कधीच आपल्या मानसिक दुर्बलतेचे कारण बनू दिले नाही. पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (COEP )  या प्रख्यात अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकीचे हा तरुण शिक्षण घेत असून त्याने शारीरिक दिव्यांगांसाठी अँड्रॉइड कंट्रोल्ड स्मार्ट व्हीलचेअरची निर्मिती केली आहे. 

त्याने त्याचा फेसबुक पोस्टमधून या विषयी माहिती दिली असून या व्हीलचेअर संदर्भात एक युट्युब व्हिडीओ देखील त्याच्या पेजवर अपलोड केला.

काय होती व्हीलचेअर बनवण्यामागची प्रेरणा?

आजच्या बदलत्या ऑटोमेटेड तंत्रज्ञान युगात शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींना चालणे, प्रवास करणे इत्यादी गोष्टींत अनंत अडचणींचा सामना करावा लागतो, ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही.

या बदलत्या काळात अनिकेत स्वतः दिव्यांग असल्यामुळे त्याला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यातूनच या समस्यांवर समाधान शोधण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले. 

 

आपण व आपले दिव्यांग बांधव ज्या हालअपेष्टा सहन करत आहेत, त्यावर त्यांना मात करण्यास मदत होऊ शकेल अशा स्वरूपाच्या तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी अनिकेत प्रयत्नशील होता. याच प्रयत्नातुन त्याचा या व्हीलचेअरने आकार घेतला. 

व्हीलचेअरचे वैशिष्ट्य-

दिव्यांग व्यक्तींना मदत करण्यासाठी म्हणून मायक्रोकंट्रोलवर आधारित सर्किटसमवेत अँड्रॉइड अप्लिकेशन डिझाइन अनिकेतने विकसित केले असून त्याने आपल्या या नव्या वाहनाला अँड्रॉईड नियंत्रित स्मार्ट व्हीलचेअर म्हटले आहे. 

या व्हीलचेअरमध्ये शारीरिकदृष्ट्या असक्षम लोकांसाठी गतिशील एम्बेड प्रणाली समाविष्ट करण्यात आली असून या व्हीलचेअर प्रणालीचा उपयोग भविष्यात रेल्वे प्लॅटफॉर्म, आयटी उद्योग, शैक्षणिक संस्था आणि इतर बऱ्याच दैनंदिन वापरामध्ये केला जाऊ शकणार आहे.

अनिकेत म्हणतो की ‘दिव्यांग किंवा (शारीरिक) विकार असलेल्या लोकांच्या हालचालींना समर्थन देणे त्याच्या या प्रोजेक्टचे प्रमुख उद्दिष्ट असून जे ज्येष्ठ नागरिक हालचाल करण्यास असमर्थ आहेत अशा लोकांना हे यंत्र उपयोगी ठरणार आहे.’ 

व्हीलचेअरमध्ये वापर करण्यात आलेल्या अँड्रॉईड प्रणालीमुळे अनेक समस्या सुटणार आहे, यामुळेच या प्रणालीचा उपयोग करून शारीरिकदृष्ट्या विकलांग लोकांसाठी काही तरी करण्याचा प्रयत्न अनिकेतकडून केला जात आहे. प्रास्तविक प्रकल्पातील निर्मिती शुल्क कपातीसाठी (Production Cost Cutting) साठी अनिकेत प्रयत्न करत आहे.

या प्रोजेक्टला तांत्रिकदृष्ट्या अजून कसे विकसित करता येईल यासाठी अनिकेतने प्रयत्न सुरू केले असून सध्या त्याच्या व्हीलचेअरमध्ये व्हॉइस कमांडस म्हणजे आवाजाने निर्देशन करणे, रिमोट ऑपरेटिंग आणि अँड्रॉईड ऍप ऑपरेटिंगसारख्या प्रणाली विकसित करण्यात आल्या आहेत. 

अनिकेत सध्या या प्रोजेक्टला अजून अत्याधुनिक स्वरूप देण्यासाठी कार्यरत असून लवकरच त्यात सोलर पॉवर चार्ज, वेग नियंत्रक यंत्रणा, रस्त्यात येणाऱ्या अडथळ्यांचा शोध घेऊ शकणारी सेन्सर यंत्रणा व सेल्फ ड्राइव्ह यंत्रणा विकसित केली जात आहे.

अनिकेत म्हणतो त्याच्या कॉलेजचे प्रोजेक्ट हे सध्या कालमर्यादेला बाध्य असल्यामुळे त्याचा फोकस हा प्राथमिक डेमो मॉडेल विकसित करण्यावर आहे. भविष्यात त्याला यात ज्या सुधारणा करता येतील त्या करून तो या उपकरणाला अजून अत्याधुनिक रुपात लोकांसमोर घेऊन येणार आहे.

सध्या अनिकेतने त्याच्या प्रोजेक्टच्या विकासावर लक्ष केंद्रित केले असुन काही काळातच तो भारतच नव्हे तर जगभरातील दिव्यांगाना उपयुक्त ठरू शकणाऱ्या या संशोधनाला मूर्त स्वरूप देणार आहे.

अनिकेतला त्याच्या या भविष्यातील प्रोजेक्टमध्ये यश येईल आणि तो हे प्रोजेक्ट आंतरराष्ट्रीय मंचावर घेऊन जाऊ शकेल अशा शुभेच्छा आपण त्याला देऊया!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!