आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
अश्मयुगात दगडधोंड्यांसोबत राहणाऱ्या मानवानं काळाच्या ओघात प्रचंड प्रगती केली साधली आहे. या प्रगतीची व्याप्ती थेट अंतराळापर्यंत जाऊन पोहचली आहे. मानवानं आतापर्यंत चंद्र आणि मंगळावर आपली यानं पोहोचवली आहेत. यापैकी मंगळ हा ग्रह भविष्यात मानवी वस्तीसाठी अनुकुल ठरू शकतो, अशी शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. तेव्हापासून ‘मंगळावरील वसाहतीकरण’ या संकल्पनेला चांगलीच हवा मिळाली.
मंगळावरील या वसाहतीकरणाच्या कल्पनेमध्ये पब्लिक स्पेस एजन्सीज आणि प्रायव्हेट कॉर्पोरेशन्सनी कमालीचं स्वारस्य दाखवलं आहे. याशिवाय सायन्स फिक्शन, मुव्हिज आणि आर्ट या क्षेत्रांमध्येसुद्धा ही संकल्पना व्यापकपणे हाताळली जात आहे.
मंगळावर कायमस्वरूपी वस्ती करण्याच्या दृष्टीनं नासा, ईएसए, इस्त्रो, सीएनएसए, स्पेस एक्स, लॉकहीड मार्टिन आणि बोईंग या अंतराळ संस्थांनी संशोधन सुरू केलं आहे. या सर्व संस्थांपैकी स्पेस एक्स ही संस्था यामध्ये आघाडीवर आहे. स्पेस एक्सचा मालक इलॉन मस्क मंगळावर पर्यटक घेऊन जाण्यासाठी सर्वांत जास्त उत्साही आणि प्रयत्नशील असल्याचं दिसतं. त्यामुळं स्पेस एक्स भविष्यातील ‘ईस्ट इंडिया कंपनी’ ठरू शकेल, अशा काही शक्यता चर्चेत आहेत. यामध्ये नेमकं किती तथ्य आहे, हे जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही कदाचित मानवी इतिहासातील सर्वात शक्तिशाली कॉर्पोरेशन आहे. ही कंपनी अनेक राष्ट्रांपेक्षा मोठी होती आणि एकेकाळी संपूर्ण भारतीय उपखंडाचा सम्राट म्हणून काम करत होती. एक खासगी कंपनी असूनही तिच्याकडं दोन लाख ६० हजार सैनिकांचा भव्य-दिव्य ताफा होता. या सैन्याच्या बळावर ईस्ट इंडिया कंपनीनं ब्रिटन आणि भारत, चीन, पर्शिया यांच्यातील व्यापार नियंत्रित केला.
व्यवहार कौशल्याच्या बळावर बक्कळ नफा कमावला. त्यांनी युरोपमध्ये चहा, कापूस आणि मसाल्यांचा अक्षरश: पूर आणला होता. कंपनीच्या प्रत्येक गुंतवणूकदाराला सरासरी ३० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळाला होता. पण, कंपनीला हा नावलौकिक एकट्या व्यापाराच्या बळावर मिळालेला नव्हता.
कंपनीनं व्यापाराशिवाय साम्राज्यविस्ताराला प्राधान्य दिलं. त्यांनी आशिया, आफ्रिका आणि अमेरिका या तीन प्रमुख खंडांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या. या वसाहतींच्या मदतीनेच त्यांनी हळूहळू कित्येक देश आपल्या अधिपत्याखाली आणले होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या वसाहतीकरणाचा पसारा इतका मोठा होता की, ब्रिटिशांच्या साम्राज्यात कधी सूर्यास्त होत नाही, असं म्हटलं जाई. आता तुम्ही म्हणालं की, अंतराळाचा आणि ईस्ट इंडिया कंपनीचा काय संबंध?
सध्या विविध अंतराळ संस्था मंगळावर जाण्याचा विचार करत असताना स्पेस एक्स पुन्हा वापरता येण्याजोगे रॉकेट तयार करून मंगळावर वसाहत करण्याची योजना आखत आहे. कंपनीचं सर्व लक्ष याचं एका गोष्टीवर केंद्रीत झालेलं आहे.
परिणामी तिला सर्वात अगोदर मंगळावर जाण्यात यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. जर असं झालं तर स्पेस एक्स मंगळावरील भूमीवर आपला हक्क सांगू शकतो. पण, असा हक्क सांगणं शक्य आहे का? मंगळ ग्रहावर ‘फर्स्ट कम फर्स्ट रूल’चा नियम लागू होईल का? या प्रश्नांची उत्तर जाणून घेणं गरजेच आहे.
कुठल्याही राष्ट्राला अंतराळातील भूमीवर आपला हक्क सांगण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी १९६८मध्ये एक अंतराळ करार झाला होता. परंतु, हा करार म्हणजे केवळ औपचारिकता म्हणून केला गेला होता. त्याचं पालन करायचं की नाही हे ऐच्छिक आहे. त्यामुळं भविष्यात एखादा देश किंवा एखादी खासगी अंतराळ संस्था मंगळ आणि अंतराळातील जमीनीवर आपला हक्क सांगू शकते. कारण, काही कॉर्पोरेशनमध्ये जगातील प्रमुख देशांशी सौदेबाजी करण्याची ताकद तर नक्कीच आहे. स्पेस एक्स या संधीचा नक्कीचा फायदा घेऊ शकते.
ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना १६०० साली झाली होती. त्यावेळी ब्रिटनची राणी एलिझाबेथ I सत्तेवर होती. राणीनं ईस्ट इंडिया कंपनीला मुक्त व्यापार करण्याची मुभा दिली होती. पण, कंपनीनं काही काळात राजसत्तेलादेखील आपल्या हातातील खेळणं बनवलं होतं.
‘स्पेस एक्स’सुद्धा एक खासगी कंपनी आहे. मात्र, आर्थिक फायदा आणि जागतिक राजकारणाचा विचार करता फेडरल गव्हर्नमेंटसुद्धा भविष्यात मुकपणे कंपनीच्या धोरणांना पाठिंबा देऊ शकतं. असं झाल्यास स्पेस एक्स मंगळावर वसातहतीकरण करण्यात यशस्वी होऊ शकतं.
स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन अर्थात स्पेस एक्स ही अमेरिकन एरोस्पेस कंपनी आहे. २००२ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीनं व्यावसायिक अंतराळ उड्डाणाच्या युगात प्रवेश करण्यास मदत केली. पृथ्वीच्या कक्षेतून अंतराळयान यशस्वीपणे प्रक्षेपित करणारी आणि ते परत उतरवणारी स्पेस एक्स ही पहिली खासगी कंपनी आहे.
याशिवाय क्रू असलेलं अंतराळ यान प्रक्षेपित करणारी आणि ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासह (ISS) डॉक करणारी ही पहिली कंपनी आहे. उद्योजक इलॉन मस्क यानं एरोस्पेस उद्योगात क्रांती घडवून आणण्याच्या आणि परवडणारं अंतराळ उड्डाणाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या उद्देशानं या कंपनीची स्थापना केली होती.
कंपनीनं आपल्या फॅल्कन 1 रॉकेटसह अंतराळ प्रवास क्षेत्रात प्रवेश केला होता. हे रॉकेट लहान उपग्रहांना कक्षेत पाठवण्यासाठी डिझाइन केलेलं आहे. फाल्कन 1 त्याच्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत तयार करण्यासाठी आणि ऑपरेट करण्यासाठी खूपच स्वस्त आहे. स्पेस एक्सनं पुन्हा वापरता येण्याजोगे रॉकेट्स तयार करण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. या रियुजेबल रॉकेट्सच्या सहाय्यानं स्पेस एक्स मंगळावर वसाहत स्थापन करण्याची मोहिम प्रत्यक्षात आणू शकतं.
स्पेस एक्सचा मालक इलॉन मस्क सध्या जगातील सर्वांत श्रीमंत लोकांपैकी एक आहे. त्यामुळं सध्या तरी त्याच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ योजनांना आव्हान देण्याची धमक कुठल्याही व्यक्तीमध्ये किंवा सरकारमध्ये नाही, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.