आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
कोरोना महामारीमुळं जगभरात कोट्यवधी लोकांचा जीव गेला. कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात अनेकदा कडक लॉकडाऊन लावण्यात आलं. त्याकाळात जगातील बहुतेक लोक आपापल्या घरांमध्ये कैद झाले होते. कित्येक महिने लोक घरांमध्ये अडकून पडले होते.
याकाळात कोरोना महामारीनं घातलेला धुमाकूळ तर आपल्याला सर्वांना दिसला मात्र, त्याचवेळी आणखी एका महामारी गुपचुप जोर धरला होता. ती महामारी म्हणजे ‘डिप्रेशन’! हो गेल्या काही वर्षांपासून डिप्रेशनची समस्या ‘सायलेंट कि*लर’ ठरत आहे.
आतापर्यंत डिप्रेशन हा जगभरातील एक सामान्य आजार झाला आहे. जगातील अंदाजे ३० करोडपेक्षा जास्त लोक सध्या डिप्रेशनच्या समस्येनं त्रस्त आहेत. हा आकडा जवळपास अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येइतका आहे. कोट्यावधी लोक आपल्या दैनंदिन जीवनात विविध मानसिक आव्हानांना तोंड देण्यात अपयशी ठरत आहेत.
सर्वांत वाईट म्हणजे, डिप्रेशन अर्थात नैराश्यामुळं दरवर्षी ८ लाखांहून अधिक लोक आत्मह*त्येचा पर्याय निवडतात. आत्मह*त्या हे १५ ते २९ वयोगटातील मृत्यूचं चौथं प्रमुख कारण आहे.
डिप्रेशनसारख्या विविध मानसिक आजारांवर प्रभावी उपचार उपलब्ध असले तरी, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील ७५ टक्क्यापेक्षा जास्त लोकांना उपचार मिळत नाहीत. संसाधनांचा अभाव, प्रशिक्षित आरोग्य-सेवा कर्मचाऱ्यांचा अभाव, सामाजिक गैरसमजांमुळं लाखो लोकांचा जीव जातो. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, या समस्येची व्याप्ती किती मोठी आहे.
आपण सर्वांनी आपल्या आयुष्यात कधी ना कधी दु:ख आणि उदासीनता अनुभवली असेल. अपयश, संघर्ष किंवा जीवलग लोकांपासून विभक्त झाल्यामुळं दुःखी वाटणं खूप सामान्य गोष्ट आहे. पण जर हे दुःख, असहायता आणि नैराश्यासारख्या भावना दीर्घकाळापर्यंत कायम राहिल्या तर त्याला डिप्रेशन म्हटलं जातं.
भारतासह संपूर्ण जगासाठी नैराश्य आणि एकटेपणा ही एक मोठी समस्या बनली आहे. ती केवळ समाजाची जबाबदारी मानून त्याकडं दुर्लक्ष करता येणार नाही. एकटेपणाने वेढलेला माणूस स्वतःच्या जीवासाठी देखील धोकादायक बनतो. कारण, तो जगण्याचा विचार करण्याऐवजी मृत्यूचा विचार करू लागतो. एकटेपणानं ग्रासलेली व्यक्ती आयुष्यभर त्रस्त राहते. अलीकडची परिस्थिती पाहता जगभरातील देशांनी आता डिप्रेशनच्या समस्येला गांभीर्यानं घेण्यास सुरुवात केली आहे.
डिप्रेशनसाठी अनेक कारणं जबाबदार ठरू शकतात. पुढीलपैकी एका किंवा अधिक कारणांमुळं नैराश्य येऊ शकतं. ब्रेक अप होणं, घटस्फोट होणं, नोकरी जाणं, एखाद्या मित्राचा किंवा जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू होणं, यासारख्या तणावाच्या गोष्टींमुळं डिप्रेशनची सुरुवात होऊ शकते.
तुमची फॅमिली हिस्ट्रीसुद्धा डिप्रेशनसाठी कारणीभूत ठरू शकते. जर तुमचे पालक किंवा भाऊ-बहिण या स्थितीत असतील तर समान जीन्समुळं तुम्हालाही डिप्रेशनचा सामना करावा लागू शकतो. युकेमध्ये अशा प्रकारच्या केसेसचं प्रमाण लक्षणीयरित्या जास्त आहे. शास्त्रज्ञांच्या मते, ४० टक्के डिप्रेशन केसेस जेनेटिक स्टडीमधून ट्रेस करता येऊ शकतात.
गर्भधारणेदरम्यान आणि बाळाच्या जन्मानंतर स्त्रीच्या शरीरात होणारे हार्मोनल आणि शारीरिक बदल, अतिरिक्त जबाबदारी यामुळं महिला डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. याला ‘बेबी ब्लूज’ असंही म्हणतात. बेबी ब्लूजचा सामना करणाऱ्या महिलांची संख्यासुद्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
दीर्घकाळ राहणारी ही समस्या जीवघेणी ठरू शकते. आपल्या शरीरामध्ये सेरॉटिनन नावाचं एक फिलगुड हार्मोन असते. या हार्मोनच्या पातळीमध्ये मोठे चढ-उतार झाल्यासही डिप्रेशनची स्थिती निर्माण होऊ शकते. स्त्री आणि पुरुष या दोन घटकांचा विचार केला तर स्त्रिया डिप्रेशनला लवकर बळी पडतात. हेरिडेटरी डिप्रेशनला बळी पडणाऱ्यांमध्ये ४२ टक्के महिलांचा समावेश होतो. तर, पुरुषांमध्ये हे प्रमाण २९ टक्के आहे.
सध्या जगभरात डिप्रेशनच्या केसेस लक्षणरित्या वाढण्यामागे काही घटक कारणीभूत आहेत. विकसनशील देशांमध्ये आजही मेंटल ईलनेसला स्टिग्मा समजलं जातं. या देशांमध्ये आजही मानसिक आजारांबाबत पुरेशी जागरूकता नाही. त्यामुळं बहुतेक जणांना एकतर डिप्रेशनबाबत जाणीव होत नाही किंवा मग ते उघडपणे त्याबाबत बोलण्यास घाबरतात. विकसनशील देशांमध्ये तर नैराश्यावरील उपचारांचीदेखील कमतरता आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या अहवालानुसार, नैराश्यानं प्रभावित असलेल्या प्रत्येक चार लोकांपैकी केवळ एका व्यक्तीला प्रभावी उपचार मिळतात. कारण, उच्च उत्पन्न असलेल्या देशांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लोकसंख्येमध्ये दर एक लाख लोकांमागे मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांची संख्या फारच कमी आहे.
२००१ मध्ये, डब्ल्यूएचओनं विकसनशील देशांमध्ये उपलब्ध मानसिक आरोग्य संसाधनांचा नकाशा तयार करण्यासाठी ‘प्रोजेक्ट ॲटलस’ लाँच केलं आहे. या प्रॉजेक्टमधील लेटेस्ट आकडेवारीनुसार, जगभरातील गरीब आणि विकसनशील देशांपैकी ७६ टक्के देशांमध्ये मेंटल हेल्थ संबंधित रिर्सोसेस उपलब्ध आहेत. विकसित देशांमध्ये हेच प्रमाण ९७ टक्के आहे.
डिप्रेशनसारख्या सायलंट कि*लरला मात देण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न होण्याची गरज आहे. मेंटल हेल्थकेअर रिसोर्सेसव्यतिरिक्त यामध्ये प्रभावशाली व्यक्तींचा प्रभावीपणे वापर करण्याची गरज आहेत. कारण, कुठलीही समस्या जर एखाद्या फेमस सेलिब्रेटीच्या तोंडून एक्सप्लेन झाली तर ती लोकांना जास्त प्रमाणात अपील करते.
आता अनेक सेलिब्रेटींनी डिप्रेशनबाबत खुलेपणानं बोलण्यास सुरुवातही केली आहे. रॉबर्ट पॅटीन्ससन, प्रिन्स हॅरी, मेघन मार्केल, ड्वेन जॉन्सन, दीपिका पदुकोण, ग्लेम मॅक्सवेल यासारख्या सेलिब्रेटींनी डिप्रेशनचा सामना केलेला आहे. आणि याबाबत त्यांनी जाहीरपणे आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. सोबतच त्यांनी डिप्रेशनबाबत जागृती करण्याचं देखील काम सुरू केलं आहे. यांच्याप्रमाणेच जगभरातील आणखी सेलिब्रेटींनी या मोहिमेमध्ये उतरण्याची गरज आहे. असं झाल्यास लोकांमध्ये डिप्रेशनच्या समस्येबाबत मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण होऊ शकते.
बाहेरून कुणी आपल्याला मदत करेल यापेक्षा आपण प्रत्येकानं आपली स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. आपल्या शरीरासोबतच आपलं मन कसं निरोगी राहील, याकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येकानं आपल्या मानसिक आरोग्याबाबत जागृक राहिल्यास डिप्रेशनसारख्या जटील समस्या काही प्रमाणात तरी कमी येण्यात यश मिळू शकतं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.