आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात ऑटोमन साम्राज्य तुर्कस्थानवर राज्य करत होते. त्यावेळी अनेक तरुण ख्रिश्चन मुलांचे अपहरण केले जाई. त्यांना इस्तंबूलमध्ये परत नेले जाई. त्या मुलांना सुलतानाला नजराणा म्हणून सादर करण्याची पद्धत होती. हे तरुण नंतर गुलाम बनत. त्यांना लग्न करण्याचा अधिकार नसे. त्यांना यु*द्धाचे प्रशिक्षण दिले जाई आणि केवळ सुलतानाशीच एकनिष्ठ राहण्याचे त्यांच्यावर बंधन असे. त्यांना केवळ एकाच हेतूने तयार केले जात असे, ते म्हणजे शत्रूला ठार मारणे आणि ऑटोमन साम्राज्याची ताकद अबाधित राखणे. या मुलांना जेनेसरीज म्हटले जाई. त्यांच्याकडे वादातीत यु*द्धकौशल्य होते.
कॉन्स्टँटिनोपलच्या पडावात यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. इजिप्शियन मामलुक आणि इराणीयन सफाविद यांचा पराभव केला. ऑटोमन साम्राज्य आता अस्तित्वात नसले तरी अजूनही या पद्धती, लढण्याची ही तंत्रे अस्तित्वात आहेत. आजही हे जेनेसरीज अस्तित्वात आहेत, फक्त दुसऱ्या एका नावाने. ओल्ड वाईन इन न्यू बॉटल म्हणतात तसे. आज त्यांना प्रायव्हेट आर्मी असे नाव आहे. असे राजकीय शिपाई, जे त्या राज्यांशी नाहीत तर राजघराण्याशी आणि सत्ताधीशांशी निष्ठावान आहेत.
प्रायव्हेट आर्मी हा मल्टी बिलियन डॉलर उद्योग आहे. प्रायव्हेट आर्मी म्हणजे असे शिपाई जे भाडोत्री म्हणून वापरले जातात. काही सरकारे तसेच खाजगी व्यक्तीही पैसे देऊन या लोकांकडून आपल्याला हवी ती उलथापालथ घडवून आणतात. हे शिपाई यु*द्धाच्या बहुतेक सर्व तंत्रांमध्ये कुशल असतात.
त्यांचा वापर सरकार तसेच इतर सामर्थ्यशाली व्यक्तींकडून केला जातो. हे लोक कंत्राटी पद्धतीने काम करतात आणि यांची कामे लष्कराप्रमाणेच असतात. फक्त त्यांच्यावर अधिकृतरित्या सरकारची देखरेख नसते. थोडक्यात ते राज्याला किंवा राष्ट्राला जबाबदार नसतात, तर त्यांची नियुक्ती करणाऱ्या, त्यांना पगार देणाऱ्या लोकांना जबाबदार असतात. सगळ्यात महत्त्वाचे हे, की त्यांच्या कामामागची प्रेरणा देशभक्तीची नसते, तर पैशाची असते. परिणामांची पर्वा न करता केवळ येन केन प्रकारेण जिंकण्याच्या आणि समोरच्याला ठरवमारण्याच्या इराद्याने हे लोक मैदानात उतरतात.
यात अमेरिका आघाडीवर आहे. विशेषतः द*हश*तवादाविरोधात अमेरिकेने जागतिक स्तरावरचे यु*द्ध पुकारले आहे. त्यामध्ये त्यांनी जेनेसरीजचा वापर करून घेतला होता. युएस मरिन्सना संरक्षण देण्यासाठी हे कंत्राटी सैनिक नेमले गेले होते. अकॅडमी किंवा ब्लॅक वॉटर या नावाने प्रसिद्ध असलेली प्रायव्हेट मिलिटरी कंपनी हे यात एक प्रमुख नाव होते. इराकमध्ये जे जे यु*द्धविषयक गुन्हे झाले, त्यामध्ये या कंपनीचे नाव ठळकपणे समोर आले. या कंपनीचे यश बघून जागतिक स्तरावरल्या अनेक कंपन्या या स्वरूपाचे काम करण्यासाठी पुढे सरसावल्या.
अनेक ठिकाणच्या सरकारांनी या कंपन्यांना लष्करी स्वरूपाची कामे कंत्राटी पद्धतीने द्यायला सुरुवात केली. रशियामधील वॅग्नर ग्रुप ही अशीच एक कंपनी. सिरियन सिव्हील वॉ*र, युक्रेनमधील डॉन बॉस्को वॉ*र अशा यु*द्धांमध्ये वॅग्नर कंपनीने रशियाचे हितरक्षण करण्याची जबाबदारी पार पाडली. आफ्रिकेतल्या गुप्त लष्करी कारवायांमध्येही या कंपनीचा हात होता.
प्रायव्हेट आर्मी हा एक मोठा आणि फायदेशीर प्रचंड आर्थिक उलाढाल असलेला उद्योग आहे. किती मोठा? तर सन २०२० मध्ये कितीतरी कंपन्यांचा महसूल बिलियन डॉलर्सच्या घरात होता.
या सगळ्यात या प्रश्नाची धोकादायक बाजूही लक्षात घ्यायला हवी. विशेषतः जेव्हा या खाजगी लष्करांना पैसा पुरवून दहशतवादी कारवायांसाठी त्यांचा वापर केला जातो तेव्हा चित्र अधिकच धोकादायक बनते. सादत इंटरनॅशनल ही टर्किश कंपनी केवळ तुर्कीच्या अध्यक्षांसाठी काम करते.
या महाशयांना म्हणे ऑटोमन साम्राज्य पुनर्स्थापित करायचे आहे. इस्तंबूलमधील ही कंपनी अदनान तांबरी बेदर्दी यांच्या मालकीची आहे. त्यांना त्यांच्या अतिरेकी आणि कडव्या विचारसरणीमुळे लष्करातून काढून टाकण्यात आले होते. या कंपनीचे काम पश्चिम आशिया आणि आफ्रिका या खंडांमध्ये चालते. बंडखोरांना मनुष्यबळ, सैनिक, शस्त्रास्त्रे आणि सामरिक सल्ले पुरवणे हा त्यांचा मुख्य उद्योग आहे. माली, लिबिया, सोमालिया, अझरबैजान या ठिकाणी द*हश*तवादी कारवायांसाठी हे बंडखोर पाठवले जातात.
येमेन, कतार, लेबेनॉन इथलेही चित्र काही वेगळे नाही. सीरियामध्ये जेव्हा २०११ मध्ये यु*द्ध सुरू झाले तेव्हा यासाठी सादत यांनी कन्सल्टंट म्हणून काम केले. ज्या गोष्टी टर्किश आर्मी पुरवू शकली नाही त्याही गोष्टी या कंपनीने देऊ केल्या, याचे कारण म्हणजे टर्किश मिलिटरीला असलेले आंतरराष्ट्रीय कायद्याचे बंधन. सादतने मुख्यतः द*हश*तवाद्यांना आणि जिहाद्यांना शस्त्रास्त्रे वापरणे, गनिमी कावा यु*द्धनीती या सगळ्यांसंबंधी प्रशिक्षण दिले. अल नुसरा, अल कायदा, आयसिस यासारख्या द*हश*तवादी संघटनांबरोबर या गटाने काम केले आहे. याशिवाय सीरियामधील काही बंडखोर गटांसाठीही त्यांनी काम केले आहे.
सीरियामधील अनेक बंडखोर संघटनांनी तुर्की नावे धारण केली आहेत आणि ऑटोमन साम्राज्याचा झेंडा ते फडकवतात हे चित्र पुरेसे बोलके आहे. तुर्कस्थान त्यांना शस्त्रास्त्रे पुरवतो, प्रशिक्षण देतो, त्यांचा नेता निवडतो आणि एकंदरीत नियंत्रण ठेवण्याचे काम करतो. शिवाय त्यांना पैसा पुरवण्याचे कामही तुर्कस्थानकडूनच केले जाते. त्या बदल्यात ते तुर्कीचे प्रॉक्सी म्हणून शॅडो मोडमध्ये कामगिरी बजावतात.
ऑक्टोबर २०२० मध्ये तुर्की मॅसिनरी अझरबैजानमध्ये देखील आढळून आले होते. ताराबाग येथील संघर्षादरम्यान त्यांनी टर्किश प्रॉक्सीज म्हणून काम केले होते. त्यांना सादत इंटरनॅशनलच्या मालकीच्या विमानांनी सीरियामधून अझरबैजानमध्ये नेण्यात आले होते. तुर्की लष्कराने प्रशिक्षित केलेल्या सीरीयन बंडखोरांना अफगाणिस्तानमध्येही पाठवण्यात आले. नुकताच तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला, त्यावेळीही हे बंडखोर कार्यरत असल्याचे आढळले.
हे सर्व उद्योग अदनानला करणे शक्य झाले आहे ते टर्किश अध्यक्षांशी त्याच्या असलेल्या जवळच्या संबंधांमुळे. या माणसाने इस्लामने एकत्र येण्याच्या गरजेवर भर दिलेला आहे. प्रत्येक मुस्लिम राष्ट्राने संरक्षणाच्या बाबतीत स्वावलंबी असावे, त्यांच्याकडे कोणत्याही हल्ल्याला सक्षमपणे तोंड देईल असे लष्कर असावे हे या माणसाचे आणि त्याच्या कंपनीचे उद्दिष्ट आहे. शस्त्रास्त्रांच्या बाबतीत स्वावलंबी असण्यात गैर काहीच नाही, परंतु द*हश*तवादी कारवायांना समर्थन आणि पैसा दिला जात असेल तर ही नक्कीच धोक्याची घंटा आहे.
थोडक्यात पुढील काळ ‘सावध ऐका पुढल्या हाका’ असा असणार आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.