आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
माणसाला जगण्यासाठी अन्न लागतं, पण आज पृथ्वीवर सर्वांनाच पोटभर अन्न मिळतं का? आणि जे अन्न मिळतं ते किती प्रमाणात पौष्टिक असतं? आज माणसासमोर अन्न सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे. सध्या पृथ्वीवर ७.८ अब्ज लोक राहतात. यातील सुमारे ८० करोड लोक दररोज उपाशी पोटी झोपतात. दर १० सेकंदाला एक मूल भुकेने मरते. ५ वर्षांखालील असंख्य मुले कुपोषित आहेत. मग आपल्याला हा प्रश्न पडतो की, आपण उत्पादन करत आहोत पण या उत्पादनाचा उपयोग काय, जर आपण लोकांची भूक भागवू शकत नाही? शास्त्रज्ञांनी याच समस्येवर उपाय शोधला आहे आणि या समस्येचे उत्तर आहे “लॅब फूड”.
लॅब फूड हा शब्द ऐकल्यावर तुम्हाला काही प्रश्न पडतील लॅब फूड म्हणजे काय?, जर शेती करून अन्न मिळत असेल तर आपल्याला लॅब फूडची गरज आहे का? लॅब फूडची चव ही आपण नेहमी खातो त्या अन्नासारखीच असेल का? लॅब फूड हे आपल्या आरोग्यासाठी चांगले असेल का? प्रयोगशाळेत हे कसे बनवले जाईल? लॅब फूडचे सेवन केल्याने माणसं शेती करणे बंद करतील का? या अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.
आता लॅब फूड म्हणजे काय ते आधी समजून घेऊया.
प्रयोगशाळा आणि कारखान्यांमध्ये तयार केलेल्या अन्नाला लॅब फूड असं म्हणतात. लॅब फूड हे पटकन कुठेही बनवता येते. लॅब फूड तयार करण्यासाठी कमी पाणी आणि कमी जमीन लागते. आज जे लॅब फूड बाजारात उपलब्ध आहे त्यात मांस, दुग्धजन्य पदार्थ, मैदा, कॉफी या पदार्थांचा समावेश होतो.
शेती करून तयार केलेले अन्न हे जास्त काळ टिकत नाही आणि हे अन्न न टिकण्यामागची कारणे देखील बरीच आहेत, जसे की, शेतातील पीक हवामानाच्या अधीन आहे. उदाहरण द्यायचे झाले तर प्रतिकूल हवामानामुळे पिकांचे नुकसान होते व अन्नाचे भाव वाढतात. तर शेतात वापरलेली कीटकनाशके आणि खते यामुळे शेतजमीन दूषित होते, पाणी दूषित होते. त्यामुळे प्रश्न हा पडतो की या प्रतिकूल हवामानात शेती करणे योग्य की अयोग्य ? येत्या काही वर्षांत हवामान बदलामुळे पारंपारिक शेती कोलमडणार आहे असे काही वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. या सर्व गोष्टींमुळे शेती करून तयार केलेल्या धान्यापेक्षा लॅब फूडला महत्त्व प्राप्त झाले आहे.
आता हे लॅब फूड प्रयोगशाळेत तयार कसे केले जाते ती प्रक्रिया आपण समजून घेऊया. प्रयोगशाळेत सेल कल्चरिंग (Cell Culturing) प्रक्रियेद्वारे लॅब फूड तयार केले जाते. सेल कल्चरिंगची प्रक्रिया करून प्रयोगशाळेत चिकन कसे तयार केले जाते हे समजून घेऊ.
सर्वप्रथम कोंबडीमधून मसल स्टेम सेल काढला जातो. या मसल स्टेम सेलची विभागणी लहान लहान तुकड्यांमध्ये केली जाते. त्याच्या या लहान लहान तुकड्यांचे सॅम्पल हे एका बायो-रिॲक्टरमध्ये बुडविले जाते. या बायो-रिॲक्टरमध्ये एक द्रव्य असतं, या द्रव्यात क्षार, प्रथिने, आणि जीवनसत्त्वे असतात. याला ऑक्सिजन समृद्ध आणि तापमान नियंत्रित असलेल्या वातावरणात ठेवले जाते. दोन आठवड्यांच्या कालावधीनंतर तुम्हाला मसल स्टेम सेलपासून तयार झालेलं चिकन बघायला मिळते.
काही संशोधन संस्था असे म्हणतात की लॅब फूड हे पर्यावरणासाठी घातक आहे. आज अमेरिकेसारख्या प्रगत देशात, प्रयोगशाळेत तयार केले गेलेले खाद्यपदार्थ, हे तिथल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. प्रयोगशाळेत तयार केलेल्या मांसाला मान्यता देणारा सिंगापूर हा पहिला देश ठरला आहे.
सेल कल्चरिंगच्या मदतीने कृत्रिम बीफ तयार करण्यात आले आणि २०१३ साली या कृत्रिम बीफचा वापर करून जगातील पहिला कृत्रिम बीफ बर्गर तयार करण्यात आला. नैसर्गिक मांसामध्ये E-Coli आणि Salmonella हे जीवाणू असतात, जे त्या मांसाला दूषित करतात पण प्रयोगशाळेत तयार केलेल्या मांसामध्ये E-Coli आणि Salmonella हे जीवाणू नसल्याने प्रयोगशाळेत तयार केलेले मांस हे दूषित होत नाही.
आज लॅब फूड तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हार्मोन्सबद्दल काही तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की लाल मांसाचे सेवन आरोग्यासाठी चांगले नाही, कारण लाल मांसात Saturated Fat असते आणि त्याचा हृदयविकाराशी संबंध आहे. प्रयोगशाळेत लाल मांस तयार करताना शास्त्रज्ञ चरबीची पातळी समायोजित करू शकतात जेणेकरून हे लाल मांस सेवन केल्यामुळे माणसाला हृदयविकार होऊ नयेत. यावरून हेच सिद्ध होते की, लॅब फूडचे Nutrient Profile नियंत्रित केले जाऊ शकते.
दिवसेंदिवस लॅब फूड हे स्वस्त होत चालले आहे. २०१३ साली तयार करण्यात आलेल्या कृत्रिम बीफ बर्गरची किंमत ही त्यावेळी ३,२५,००० डॉलर्स एवढी होती. आज हाच कृत्रिम बीफ बर्गर केवळ ११ डॉलर्सला मिळतो. २०४० सालापर्यंत जगात सेवन केल्या जाणाऱ्या एकूण मांसापैकी ३०% मांस हे प्रयोगशाळेत तयार केले जाईल.
भविष्यात प्रयोगशाळा या अन्न निर्मितीसाठी अपारंपरिक ऊर्जेचा वापर करणार नाहीत ही काळजी त्यांना घ्यावी लागेल. जर नैसर्गिक अन्नाची जागा लॅब फूडने घेतली तर लोकांच्या नोकऱ्या आणि रोजगार वाचवण्यासाठी सरकारला कठीण आर्थिक बदल करावे लागतील. तर आपण ही आशा करू शकतो की लॅब फूड हा भविष्यात अन्न सुरक्षेच्या समस्येवर प्रभावी उपाय ठरू शकतो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.