आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
बाबा आमटे यांच्या आनंदवनमध्ये माणूस आणि जंगली प्राणी अगदी गुण्यागोविंदाने राहतात. ते जंगली प्राणी इतके माणसाळलेले आहेत की ते तिथल्या लोकांना काहीच इजा पोचवत नाहीत. आनंदवनच्या आजूबाजूला जंगल असल्याने या प्राण्यांची ये-जा असते, पण जर एखादा जंगली प्राणी तुमच्या घरात राहिला तर? आज अशीच एक गोष्ट आपण जाणून घेणार आहोत.
आता तुम्हाला कुणी विचारले की पाच जंगली प्राण्यांची नावे घ्या तर काही विचार न करता तुमच्या तोंडातून वाघ आणि सिंह अशी दोन नावे पहिले निघतील. तर, आज आपली ही गोष्ट वाघाशी निगडित आहे.
आज जगामध्ये तीन हजार ते चार हजार वाघ शिल्लक राहिले आहेत. दुर्दैवाने काही वाघांच्या प्रजाती या नामशेष पावल्या आहेत. वाघाच्या बऱ्याच प्रजाती आहेत त्यातील काही प्रसिद्ध प्रजाती पुढील प्रमाणे, बंगाल वाघ, मलयान वाघ, सायबेरीयन वाघ, सुमात्राण वाघ, बाली वाघ, दक्षिण चीनी वाघ, इंडो-चायनीज वाघ. वाघाचे वास्तव्य हे पावसाळी जंगलात, गवतमय परदेशात, सवाना प्रदेशात दिसून येते.
काही लोकं हौस म्हणून घरात पाळीव प्राणी ठेवतात. घरात किंवा माणसांच्या वस्तीत जंगली प्राणी ठेवणे हे धोकादायक आहे आणि तो गुन्हा आहे. पण न्यूयॉर्क शहरात एका माणसाने घरात चक्क वाघ पाळला.
अँटोईन येट्स हा न्यूयॉर्क शहरातल्या हार्लेम भागातला एक सामान्य नागरिक. २००० सालच्या एप्रिल महिन्यात ३१ वर्षीय अँटोईन येट्सने मिंग नावाचा एक वाघाचा बछडा बेअरकॅट नॅशनल पार्क मिनेसोटा येथून खरेदी केला. हा वाघाचा बछडा बंगाल-सायबेरीयन संकरित प्रजातीचा होता. ज्यावेळी अँटोईन येट्सने मिंगला विकत घेतले त्यावेळी तो केवळ ८ आठवड्यांचा होता.
३० सप्टेंबर २००३ रोजी अँटोईन येट्स अचानक हार्लेम हॉस्पिटलच्या आपत्कालीन कक्षात दाखल झाला. अँटोईन येट्सच्या हाताला आणि पायाला जखमा दिसत होत्या. डॉक्टरांनी अँटोईन येट्सचे निरीक्षण केल्यावर त्यांना हे लक्षात आले की प्राण्याच्या चाव्यामुळे या जखमा झाल्या आहेत. उपचारा दरम्यान अँटोईन येट्सने दावा केला की त्याच्या पाळीव कुत्र्याने त्याच्या हाता पायाचा चावा घेतला आहे, पण डॉक्टरांना येट्सचा दावा संशयास्पद वाटला. डॉक्टरांनी बारकाईने निरीक्षण केल्यावर त्यांना हे लक्षात आले की हा चावा कुत्र्याने नाही तर एखाद्या जंगली प्राण्याने घेतला आहे.
३ ऑक्टोबर २००३ रोजी अँटोईने येट्सला डिस्चार्ज देण्यात आला. ज्या दिवशी येट्सला डिस्चार्ज दिला गेला त्याच दिवशी हार्लेम हॉस्पिटल प्रशासनाने येट्सबद्दल असलेली संशयास्पद माहिती न्यूयॉर्क पोलीस विभागाला दिली. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यूयॉर्क पोलीस विभागाने त्यांच्या एका अधिकाऱ्याला या प्रकरणाच्या चौकशीसाठी येट्सच्या घरी पाठवले. येट्सच्या घरी पोचतात पोलीस अधिकाऱ्याला घरातून मोठे आवाज ऐकू येत होते ते आवाज हिंस्र प्राण्याचे वाटल्याने पोलीस घराच्या आत जाणे टाळत होते.
पोलिसांनी घरात नेमका कोणता प्राणी आहे हे बघण्यासाठी शेजारच्या भिंतीमधून छिद्र पाडले आणि त्या छिद्रातून कॅमेरा आत घातला आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. येट्सच्या घरात एक भला मोठा वाघ होता. घरात वाघ आहे हे कळताच दुसऱ्या पोलिसाला बिल्डिंगच्या छतावर पाठवण्यात आले. दोरीच्या मदतीने पोलिस वरून खाली येट्सच्या घराच्या खिडकीपर्यंत पोचले. खिडकीत पोचलेल्या पोलिसाला पाहून मिंगने जोरात डरकाळी फोडली.
मिंग आक्रमक होऊ नये यासाठी डार्ट रायफलच्या मदतीने मिंगला भूल देण्यात आली. भूल दिल्यानंतर औषधाचा प्रभाव होण्यासाठी पोलिसांनी काहीवेळ वाट पाहिली आणि नंतर प्राणी नियंत्रण पथकाने येट्सच्या घरात प्रवेश केला.
मिंगला आता सुरक्षित स्थळी नेण्याची प्रक्रिया सुरू झाली. वाहतुकीदरम्यान मिंग शुद्धीवर येऊ नये याकरता पशुवैद्यांनी मिंगला अजून एकदा भूल दिली. मिंगला लिफ्टमधून ट्रकपर्यंत नेण्यासाठी भरपूर मनुष्यबळ लागले.
मिंगची रवानगी केल्यानंतर पोलिसांनी येट्स आणि त्याच्या शेजाऱ्यांची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान एका व्यक्तीने हा खुलासा केला की येट्स दररोज नऊ किलो चिकन घरी घेऊन जायचा. नऊ किलो चिकन पाहून येट्स एवढं चिकन कसे खात असेल? हा प्रश्न त्याच्या शेजाऱ्यांना पडायचा. अखेर या प्रश्नाचे उत्तर येट्सच्या शेजाऱ्यांना मिळाले.
सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणे आणि मानवी वस्तीत वन्य प्राणी बाळगणे या आरोपाअंतर्गत येट्सला न्यूयॉर्क पोलिसांनी अटक केली. ज्या बिल्डिंगमध्ये येट्स राहत होता तिथे येट्सची आई लहान मुलांची देखभाल करत होती, इतक्या धोकादायक वातावरणात लहान मुलांचा जीव धोक्यात आणल्या प्रकरणी येट्सच्या आईला अटक झाली. येट्सच्या आईवरील आरोप कमी करण्याच्या विनंती कराराचा भाग म्हणून येट्सला पाच वर्षांच्या प्रोबेशनसह पाच महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
आज जर तुम्ही माणसाला एका बंदिस्त खोलीत दीर्घकाळासाठी बंदी केले तर त्या माणसाची अवस्था कशी होईल याचा विचार करा आणि जर माणसाला इतका त्रास होऊ शकतो तर आपल्या मनोरंजनासाठी किंवा हौसेसाठी बंदी केलेल्या प्राण्यांना किती त्रास होत असेल याची कल्पना करवत नाही. जसा माणसाला स्वच्छंदीपणे जगण्याचा अधिकार आहे तोच अधिकार पृथ्वीवरील इतर प्राण्यांना ही आहे. त्यामुळे पृथ्वीवरील जैवविविधतेचे रक्षण जर करायचे असेल तर सर्व बंदिस्त प्राणी परत जंगलात सोडून देणे हे त्या जैवविविधतेच्या रक्षणाअंतर्गत पहिले पाऊल असेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.