आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
फोर व्हीलर कार उत्पादन करणाऱ्या बऱ्याच कंपन्या आहेत. ह्युंडाई मोटर्स ही कंपनी दक्षिण कोरियात स्थित आहे. आज आपण ह्युंडाई मोटर्सच्या या प्रवासाबद्दलच जाणून घेणार आहोत.
ह्युंडाई मोटर्स कंपनीची स्थापना १९६७ मध्ये चुंग जुयु ग यांनी केली. दक्षिण कोरियातील उलसान येथे ह्युंडाई मोटर्सचा जगातील सर्वात मोठा ऑटोमोबाईल उत्पादन प्रकल्प आहे. या ऑटोमोबाईल उत्पादन प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता सुमारे १४ लाख युनिट्स इतकी आहे आणि या प्रकल्पामुळे जगभरात सुमारे ७५ हजार लोकांना रोजगार मिळतो.
ह्युंडाई मोटर्सचे संस्थापक चुंग जु युग यांचा जन्म उत्तर कोरियातील टॉंगचॉन या गावात एका गरीब शेतकरी कुटुंबात १९१५ साली झाला. चुंग जु युग हा घरातील सर्वात मोठा मुलगा होता आणि त्याचा वडिलांना आशा होती की भविष्यात तो कुटुंबाची शेती आपल्या हाती घेईल.
चुंग जु युग प्राथमिक शाळा पूर्ण करू शकला नाही कारण तो बहुतेक वेळ त्याच्या पालकांच्या शेतात मजुरी करीत असे. चुंग जु युगला मोठं आणि वेगळं काहीतरी करायची इच्छा होती आणि त्यासाठी त्याने आपल्या गावातून आणि गरिबीतून सुटका करण्याचा मार्ग तयार करण्यास सुरुवात केली.
वयाच्या सोळाव्या वर्षी चुंग जु युगने टॉंगचॉनमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याचा एक मित्रही त्याच्या सोबत होता. काम शोधण्याच्या प्रयत्नात धोकादायक असलेली पीचॉन व्हॅली ओलांडून पंधरा मैलांचे अंतर पार करून अखेर ते कॉवॉन शहरात पोचले. कॉवॉनमध्ये त्यांनी बांधकामाच्या ठिकाणी गवंडी म्हणून काम करायला सुरुवात केली. काही दिवसात चुंग जु युगचे वडील त्याला हुडकत हुडकत कॉवॉन शहरात पोहोचले व त्याला व त्याच्या मित्राला परत घरी घेऊन गेले.
पण चुंग जु युगने हार मानली नाही. चुंग जु युगने परत एकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी तो थेट दक्षिण कोरीयाच्या सोलमध्ये पोचला. सोलला जाण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून चुंग जु युगने आपल्या घरातील एक गाय विकली आणि त्यातून मिळालेल्या पैशातून तो ट्रेनने सोलमध्ये पोचला. त्याच्या वडिलांनी दोन महिन्यात त्याला हुडकून काढले आणि चुंग जु युगचा पळून जाण्याचा हा प्रयत्नही फसला.
चुंग जु युगाच्या महत्वकांक्षेला मारणे त्याच्या कुटुंबाला वाटले तेवढे ते सोपे नव्हते. वयाच्या अठराव्या वर्षी परत एकदा चुंग जु युग घरातून पळून गेला आणि थेट सोलला येऊन पोचला. सोलमध्ये आल्यानंतर उदरनिर्वाहासाठी चुंग जु युगने मिळेल ते काम केले.
सोलमध्ये चुंग जु युगला एका तांदळाच्या दुकानात डिलिव्हरी मॅन म्हणून काम मिळाले. नोकरीच्या पहिल्या सहा महिन्यात त्याला बुक कीपर आणि अकाउंटंट म्हणून बढती मिळाली आणि नंतर तो दुकानाचा अविभाज्य भाग बनला. चुंग जु युगने आपल्या कौशल्याच्या जोरावर तांदळाच्या दुकानाला समृद्धीकडे नेले आणि विद्यमान मालकाच्या मृत्यूनंतर तो दुकानाचा मालक बनला.
चुंग जु युगने दुकानाचे नाव बदलून “क्यूनगील राईस शॉप” असे ठेवले आणि त्यामुळे त्याला चांगले उत्पन्न मिळाले. याच दरम्यान कोरिया जपानच्या ताब्यात गेला आणि जपानच्या वसाहतवादी धोरणांमुळे चुंग जु युगचा व्यवसाय अडचणीत आला आणि नंतर तो व्यवसाय संपुष्टात आला.
व्यवसाय संपुष्टात आल्याने चुंग जु युग घरी परतला पण त्याला शेती करण्याची काही एक इच्छा नव्हती. यावेळी चुंग जु युगने नवीन योजना आखली आणि तो परत सोलमध्ये येऊन पोचला. काही दिवसांनी त्याने सर्व्हिस गॅरेज उघडण्याचा निर्णय घेतला त्याचा हा उपक्रम यशस्वी झाला आणि या उपक्रमात त्याच्या हाताखाली ७० कर्मचारी कामाला लागले. १९४३ साली जपानी सरकारने त्याचे गॅरेज स्टील प्लांटमध्ये विलीन केले आणि परत एकदा चुंग जु युगला घरी जावे लागले.
१९४६ साली कोरियाला जपानपासून स्वातंत्र्य मिळाले. युद्धानंतरच्या पुनर्बांधणीचा फायदा घेण्यासाठी चुंग जु युग परत सोलला आला आणि ह्युंडाई मोटर्स नावाची कंपनी स्थापन केली.
ह्युंडाई मोटर्सने न्यूक्लिअर प्लांटस आणि रेल्वेसह अनेक महत्वाचे करार जिंकले. चुंग जु युगच्या भावाच्या इंग्रजी संभाषणाच्या जोरावर ह्युंडाई मोटर्सला अमेरिकन लष्करी करार मिळाले आणि त्यांचा व्यवसाय आणखी मोठा झाला.
यानंतर ह्युंडाई मोटर्स दक्षिण कोरियातील सर्वात यशस्वी उद्योग समूहांपैकी एक बनली. आयोनिक, किया मोटर्स आणि जेनेसीस मोटर्स या ह्युंडाई उद्योग समूहाच्या उपकंपन्या आहेत. कोरियन भाषेत “ह्युंडाई” या शब्दाचा अर्थ आधुनिकता असा होतो. “नवीन विचार नव्या शक्यता” हे सध्या ह्युंडाई मोटर्सचे घोषवाक्य आहे. ह्युंडाई मोटर्सच्या लोगोमध्ये “H” हे अक्षर कंपनीचे नाव दर्शवते तर H भोवती असलेला अंडाकृती ही कंपनीचा जागतिक विस्तार दर्शवते. सुमारे ५००० डीलरशिप आणि शोरूम्सद्वारे १९३ देशात ह्युंडाई मोटर्सच्या गाड्या विकल्या जातात.
११९८ साली चुंग जु युगने सोलला पळून जाण्यासाठी आपल्या वडिलांकडून चोरलेल्या गाईंची परतफेड म्हणून उत्तर आणि दक्षिण कोरियामधील डीमिलीटराइज्ड झोनमध्ये ५०० गायी ते स्वतः घेऊन गेले. या गाई देताना चुंग जु युग यांनी ही आशा व्यक्त केली की या गायी उत्तर कोरियातील गरीब लोकांना मिळतील आणि या गायी कोरिया द्वीपकल्पाच्या एकीकरणाचे प्रतीक म्हणून लोक लक्षात ठेवतील.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.