आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
विट्रुव्हियन मॅनचं चित्र इटलीतल्या व्हेनिसमधल्या ‘डेल अकाडेमिया’ या संग्रहालयात ठेवलेलं आहे. त्याची गुणवत्ता किंवा जुनेपण टिकून रहावं म्हणून ते शक्य तितकं लोकांपुढे जास्तवेळा न आणता काही विशिष्ट प्रसंगी हे चित्र प्रदर्शित केलं जातं. २४ ऑक्टोबर २०१९ ते २४ फेब्रुवारी २०२० या काळात पॅरिस, फ्रान्समध्ये लिओनार्डो दा विंचीच्या चित्र आणि संग्रहांचं एक प्रदर्शन भरवलं गेलं आणि त्यातही विट्रुव्हियन मॅनचं चित्र तिथे ठेवलं गेलं होतं.
पण विट्रुव्हियन मॅन म्हणजे काय ? आणि त्याचं चित्र काढण्याची गरज तरी का पडली असावी ? जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा!
लिओनार्दो दा विंची हे नाव माहीत नसेल असा माणूस जगभरातल्या कलाप्रेमींमध्ये सापडणं कठीण आहे. त्याच्या चित्रांचा, संशोधनाचा अवाकाच तेवढा मोठा आहे. त्याने काढलेल्या मोनालिसाच्या चित्राचं गूढ, त्याबद्दलचं कुतूहल आणि आकर्षण आजही कायम आहे. त्याच्या हातून निर्माण झालेलं आणखी एक गूढ आणि वेगळं असं चित्रंही प्रसिद्ध आहे, ‘विट्रुव्हियन मॅन’ या नावाने हे चित्र ओळखलं जातं. हे एक प्रकारचं अद्भुत असं चित्र आहे त्याची कल्पनाही सहसा कोणी करणार नाही.
विट्रुव्हियन मॅनची निर्मिती
माणूस आणि निसर्ग यांचं नातं चित्रातून जोडणं ही लिओनार्डो दा विंची याची बरीच आधीपासूनच इच्छा होती. आणि त्याचंच प्रतीक म्हणजे ‘विट्रुव्हियन मॅन’ची निर्मिती झाली. जेव्हा या चित्राची निर्मिती करायचं ठरवलं विंचीने त्यावेळी हे एक गणितीय प्रकारचं चित्र असेल अशी त्याने कल्पना केली होती. गणितीय चित्र म्हणजे काय हे बघण्यासाठी आपल्याला विंचीचा त्यामागचा विचार समजून घ्यावा लागेल.
एका चौरसाचं क्षेत्रफळ (एरिया) काढण्यासाठी गणितामध्ये एक सूत्र वापरलं जातं, ज्यामधून आपण जेवढ्या मापाचा चौरस घेतला आहे त्यात किती क्षेत्र सामावलं आहे हे सांगू शकतो. तसंच काहीसं वर्तुळाच्या बाबतीत आहे. वर्तुळाच्या क्षेत्रफळासाठीही एक सूत्र वापरलं जातं, ज्यातून आपण त्या वर्तुळात सामावला जाणाऱ्या क्षेत्राचं मोजमाप घेऊ शकतो. अशी वेगवेगळी सूत्र वेगवेगळ्या आकारांसाठी वापरली जातात.
या सूत्रांचा आणि आकृत्यांचा थोडा विचार केल्यावर दा विंचीला एक कल्पना सुचली. जर आपण चौरस आणि वर्तुळ एकाच सूत्राने काढू शकलो तर? किंवा दोन्हीचं क्षेत्रफळ एकाच पद्धतीने मिळू शकेल असं काही करता आलं तर ?
आता यात आपल्याला विंचीमध्ये दडलेल्या गणित अभ्यासकाची बाजू दिसते. आपण जर जमिनीला समांतर हातांची स्थिती ठेऊन उभ्या असलेल्या माणसाची आकृती घेतली आणि त्याच्या हाताला आणि पायांना स्पर्श करेल अशा पद्धतीने बाजूंचं मोजमाप घेऊन एक चौरस त्या माणसभोवती काढला तर एक जादू दिसते.
त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत एक सरळ उभी रेषा काढली आणि त्याच्या डाव्या हाताच्या बोटांच्या टोकापासून ते दुसऱ्या बाजूला सरळ असलेल्या उजव्या हाताच्या बोटांच्या टोकापर्यंत अंतर घेऊन एक रेषा काढली आडवी तर आपल्याला त्या दोन्ही रेषांची लांबी सारखीच मिळते. अशाप्रकारे विंचीने एकाच लांबीच्या चौरसामध्ये एका ‘दोन्ही बाजूला हात समांतर ठेऊन उभ्या असलेल्या माणसाची आकृती’ ठेऊन दाखवली आणि माणूस उभा आणि आडवा एकाच लांबीचा आहे हे एका चित्राने सिद्ध करून दाखवलं ! हा झाला एक भाग.
आता त्याने त्याच चौरसाच्या एका बाजूच्या लांबीच्या आकाराचं एक वर्तुळ काढून त्यातही एक माणूस त्याच प्रकारे बसवला, फक्त त्या वर्तुळातल्या माणसाच्या पायामध्ये थोडं अंतर होतं आणि चौरसातला माणूस दोन्ही पाय एकमेकांना चिकटवून उभा होता. त्या माणसाचे पाय आणि लांब केलेले हात हे चारही अवयव वर्तुळाला स्पर्श करत होते. हा झाला दुसरा भाग.
मग दा विंचीने पायात अंतर असलेला वर्तुळातला माणूस वर्तुळासह त्या चौरसात पाय जुळवून उभ्या असलेल्या माणसावर ठेवला आणि तशी कल्पना करून एक नवीन (सुपर-इम्पोज्ड) चित्र काढलं, ज्याला विट्रुव्हियन मनुष्याचं चित्र म्हटलं जातं.
त्याने यात आणखी एक वेगळा विचार केला होता. माणसाच्या नाभीला केंद्र मानून आणि त्याची नाभी ते डोक्यापर्यंत लांबी मोजून तेवढ्या लांबीचं जर एक वर्तुळ काढलं तर तेही या विट्रुव्हियनच्या चित्रातल्या वर्तुळात अगदी फिट बसलं.
मार्कस विट्रुव्हियस हा इ.स पूर्व पाचव्या शतकातला एक इंजिनिअर होता. त्याने इमारत बांधणी संबंधातल्या त्याच्या एका पुस्तकात या विट्रुव्हियन आकृतीची कल्पना मांडली होती. त्याच्या या पुस्तकातून विंचीने प्रेरणा घेतली.
लिओनार्डोने १४९२ साली विट्रुव्हियन मॅन काढला, ज्याला विट्रुव्हियसनुसार ‘मानवी शरीराचे प्रमाणग्राह्य चित्र’ असं म्हटलं गेलं. एका कोऱ्या कागदावर पेन, शाई आणि मेटलपॉइंट (ज्याच्या मदतीने वर्तुळ काढले जाते) यांच्या मदतीने चित्रित केलेली, चौरस आणि वर्तुळात उभ्या असलेल्या (नग्न) पुरुषाची ही प्रतिमा होती.
केवळ कल्पकतेने, लिओनार्डोने हे आदर्श असं चित्र निर्माण केलं ज्यामध्ये चित्रकला आणि गणित या दोन्ही गोष्टी एकत्रित केल्या गेल्या होत्या.
आता वर दिलेल्या भागात आपण गणितीय आणि कलात्मक दृष्टिकोन बघितला,पण याला एक वैचारिक बाजूही होती. याच काळात इटलीमध्ये एक नवीन विचार जन्माला येत होता ज्याला ‘निओप्लेटोनिजम’ म्हटलं गेलं. चौथ्या शतकात प्लेटो आणि अरिस्टोटल यांनी हा विचार मांडला होता. त्यानुसार या विश्वात जैविक रचनेची एक साखळी अस्तित्वात आहे जी देवापासून सुरू होऊन ग्रह, तारे, प्राणी अशांना जोडत ती राक्षसापर्यंत येऊन थांबते.
जेव्हा ही संपूर्ण साखळी एका रेषेत क्रमाने लावली तेव्हा त्याच्या बरोब्बर मध्यभागी माणूस आहे असं मानलं गेलं. माणसापासून वरच्या बाजूला ज्यांना भौतिक अस्तित्व नाही अशा म्हणजे सर्व देव, आकाश, तारे, या गोष्टी ठेवल्या गेल्या आणि माणसापासून खाली सर्व भौतिक गोष्टी म्हणजेच माणूस, प्राणी, पक्षी, राक्षस वगैरे गोष्टींना ठेवलं गेलं. अशाप्रकारे हे विश्व माणसाचा संदर्भ घेऊन दोन भागात विभागलं. हा झाला आणखी एक भाग.
मग आला पिको मिरांडोला, ज्याने आणखी एक नवी कल्पना मांडली आणि या साखळीची रचना बदलून सर्व विश्व हे माणसामध्येच सामावलं आहे असं मानलं. म्हणजे असं की या साखळीच्या सर्वात वरच्या भागात देव आहेत आणि सर्वात खालच्या भागात राक्षस किंवा दानव.
माणसाने जर ठरवलं तर माणूस सर्व गोष्टींचा त्याग करून पवित्र विचार घेऊन देवासारखाही वागू शकतो आणि माणसाची वेगळ्या विचाराने पकड घेतली तर तो दुष्कृत्य करून राक्षसांप्रमाणेही वागू शकतो.
मग यामध्ये संपूर्ण साखळीत असलेल्या जीवांचे आणि निर्जीवांचे गुणही सामावलेले असतातच. अशाप्रकारे कोणतीही साखळी तयार न करता एकाच माणसात आपण देव आणि दानव अशी दोन्ही टोकाची रूपं पाहू शकतो असा विचार मिरांडोला याने मांडला.
आता या निओप्लेटोनिजमचा, या साखळीचा, मिरांडोलाचा आणि आपल्या विट्रुव्हियन मॅन चा काय संबंध आहे असं वाटू शकतं. तर विंचीने असं सांगितलं की हे चित्र फक्त चित्रकला आणि गणित एवढ्यापुरतंच मर्यादित नाही. त्यामध्ये जसं वर्तुळ आणि चौरसाचं क्षेत्रफळ या दोन भिन्न आकृत्यांचं क्षेत्रफळ एकत्र चितारलं आहे, तसंच प्रतिकात्मक रीतीने आपण असंही सांगू शकतो की एकाच चित्रात आपण मानवाचं दैवी आणि राक्षसी अशी दोन्ही टोकाची रूपंही साकारली आहे.
जर आपण एक माणूस चौरस आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ एकाच वेळी दाखवू शकतो, तर एकाच चित्रात मानवाने दोन टोकाचे गुणधर्म किंवा जैविक साखळीच्या दोन भिन्न स्थितीही दाखवू शकतो. मग या एकाच माणसात प्राण्यांचे गुणही आले, दैवी गुणही आले आणि राक्षसी गुणही आलेच. या चित्रात विंचीने माणूस आणि निसर्ग यांना एका चित्रात एकत्र आणलं असंही म्हणता येईल.
यातून हे सहज स्पष्ट होतं की एकाच चित्रासाठी दा विंचीने कल्पनेच्या किती उंचच उंच भराऱ्या मारल्या आहेत. एकाच चित्रात त्याने कला, गणित, तत्वज्ञान, भूमिती, धर्म, जीवशास्त्र अशा वेगवेगळ्या गोष्टी फक्त कल्पनेच्या जोरावर एकत्र आणल्या. म्हणूनच ‘लिओनार्दो दा विंची’ला ‘ग्रेट’ मानलं जातं पण त्याचं हे ‘विट्रुव्हियन मॅन’चं चित्रंही बाकी चित्रांपेक्षा का वेगळं आहे हेही लक्षात येतं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.