आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
‘Leaders instill in their people a hope for success and a belief in themselves. Positive leaders empower people to accomplish their goals,’ सध्या युक्रेनमधील नेत्यांकडे पाहून या वाक्याची प्रचिती येते. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियानं लष्करी मोहिमेद्वारे कारवाई करून युक्रेनविरुद्ध ‘यु*द्ध’ पुकारलं. दोन्ही देशांदरम्यानच्या वाढत्या लष्करी तणावामुळे जगाला तिसऱ्या महायु*द्धाचा धोका जाणवत आहे. त्यामुळं अमेरिका आणि युरोपियन युनियनमधील देशांनी भारतासारख्या देशांना रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची मनधरणी करण्याची विनंती केली.
अमेरिका आणि युरोपियन युनियननं रशियावर आर्थिक निर्बंध लादले. मात्र, तरीदेखील पुतीन माघार घेण्यास तयार नाहीत. बॉ*म्बस्फो*टांनी हादरलेल्या युक्रेनमधील सध्याची परिस्थिती भयावह आहे. सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन कोणत्याही प्रकारे झुकण्यास तयार नाहीत.
अशा परिस्थितीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही रशियाला जोरदार टक्कर देण्याचा निश्चय केला आहे. त्यांनी देशातील सर्वसामान्य नागरिकांना शस्त्र हाती घेण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या आवाहनाला एका प्रसिद्ध युक्रेनियन नागरिकानं प्रतिसाद दिला आहे. विताली क्लिट्स्को (Vitali Klitschko), असं या व्यक्तीचं नाव आहे. क्लिट्स्को कोण आहेत आणि यांनी यु*द्धाच्या मैदानात उतरण्याचा निर्णय का घेतला? हे जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या यु*द्धाच्या घोषणेनंतर रशियानं जमीन, हवाई आणि समुद्रमार्गे युक्रेनवर आक्र*मण सुरू केलं. स्फो*ट आणि बंदुकीच्या गोळ्यांनी युक्रेनमधील प्रमुख शहरं हादरली आहेत. यामध्ये युक्रेनची राजधानी ‘कीव’चा देखील समावेश आहे. यु*द्धाच्या सुरुवातीच्या काळात कीवमधील अनेक लोकांनी सब-वे, मेट्रो स्टेशन, अंडरग्राउंड शेल्टरमध्ये आसरा घेतला होता.
जर कीव शहर संपूर्णपणे ताब्यात घेण्यात रशियाला यश मिळालं तर युक्रेनचा पाडाव निश्चत होईल. त्यामुळं कीवला शत्रूच्या ताब्यातून वाचवण्यासाठी युक्रेनियन सैन्य आजही जीवाचं रान करत आहे.
सैन्याला आता कीवच्या महापौरांची साथ मिळाली आहे. प्रोफेशनल सर्किटमध्ये दोन वेळा वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप विजेते असलेले विताली क्लिट्स्को यांनी यु*द्धात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. माजी खेळाडू असलेले क्लिट्स्को २०१४ पासून युक्रेनची राजधानी कीवचे महापौर आहेत. आपल्या शहराला वाचवण्यासाठी लढण्यास तयार झाले आहेत. ५० वर्षीय क्लिट्स्को हे नागरिकांमध्ये ‘डॉ. आयर्नफिस्ट’ म्हणून प्रसिद्ध आहेत.
कीवच्या महापौरांनी नागरिकांसाठी एक ट्विट केलं आहे. ‘युक्रेन मजबूत आहे हे आपण दाखवून दिलं पाहिजे! कीव ही आमची मजबूत राजधानी आहे. आमचे लोक स्वातंत्र्य, सार्वभौम आणि शांततेसाठी ओळखले जातात. आपल्याला स्वातंत्र्याची तीव्र इच्छा आहे. युक्रेन महान आहे!’, असं ट्विट करून क्लिट्स्को यांनी जनतेचा आत्मविश्वास वाढण्याचा प्रयत्न केला.
युक्रेनच्या जनतेवर आपला विश्वास असल्याचं त्यांनी आवर्जनून नमूद केलं आहे. युक्रेनियन लोक बलवान आहेत. या भयंकर परीक्षेत ते स्वतःशी आणि आपल्या देशाशी प्रामाणिक राहतील. युक्रेनचे लोक सार्वभौमत्व आणि शांततेसाठी आसुसलेले आहेत. आम्ही रशियन लोकांना आपलं भाऊ मानणारे लोक आहोत.
युक्रेनियन जनता लोकशाही लोकशाहीची पुरस्कर्ती आहे. परंतु, सध्या देशातील लोकशाही नाजूक स्थितीत आहे. लोकशाही स्वतःचं रक्षण करू शकत नाही, त्याला नागरिकांची इच्छा आणि प्रत्येकाची बांधिलकी आवश्यक आहे. त्यामुळं लोकशाही आणि देशाच्या रक्षणासाठी हातात शस्त्र घेणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया कीवचे महापौर विताली क्लिट्स्को यांनी एका माध्यम प्रतिनिधीला दिली. विताली क्लिट्स्को यांच्यासोबत त्यांच्या भावानं व्लादिमिर क्लिट्स्को यांनीही हातात शस्त्र घेतलं आहे. विशेष म्हणजे व्लादिमिरदेखील जगप्रसिद्ध बॉक्सर आहेत.
सध्या कीवचे महापौर म्हणून जनतेची काळजी घेणारे विताली क्लिट्स्को यांनी एकेकाळी अनेक जागतिक हेवीवेट चॅम्पियनशिप जिंकलेल्या आहेत. त्यांनी १९९९ पासून ते २००० पर्यंत WBO खिताब आपल्याकडे ठेवला होता. २००४ ते २०१३ याकाळात त्यांनी दोनदा WBC जेतेपद पटकावलं आहे. एकूणच, विताली यांनी जागतिक हेवीवेट विजेतेपदाच्या लढतीत १५ प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आणि १२ यशस्वी विजेतेपदं राखली आहेत.
२०११ मध्ये, विताली आणि त्याचा धाकटा भाऊ व्लादिमीर क्लिट्स्को यांनी सर्वाधिक जागतिक हेवीवेट विजेतेपद जिंकणारी भावंडांची जोडी म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश केला होता. विताली क्लिट्स्को यांनी २०१२ मध्ये शेवटची लढत खेळली होती. डिसेंबर २०१३ मध्ये त्यांनी खेळातून निवृत्तीची घोषणा केली होती.
तीन वेगवेगळ्या दशकांत विश्वविजेतेपद भूषवणारे क्लिट्स्को हे एकमेव हेवीवेट बॉक्सर आहेत. विताली क्लिट्स्को आणि जॉर्ज फोरमन हे इतिहासातील असे दोन हेवीवेट बॉक्सर आहेत, ज्यांनी ४० वर्षांचं झाल्यानंतर जागतिक विजेतेपद मिळवलं होतं. याशिवाय विताली हे पीएचडी पदवी मिळवणारे पहिले व्यावसायिक बॉक्सिंग विश्वविजेते आहेत.
क्लिट्स्को यांनी औपचारिकपणे २००६ मध्ये राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली, तेव्हा कीव महापौरपदाच्या शर्यतीत ते दुसऱ्या स्थानावर होते. २०१० मध्ये त्यांनी युक्रेनियन डेमोक्रॅटिक अलायन्स फॉर रिफॉर्म (UDAR) या पक्षाची स्थापना केली आणि २०१२ साली या संसदेत निवडून गेले.
२०१३-१४ च्या युरोमैदान प्रोटेस्टमधील ते एक प्रमुख व्यक्ती होते. त्यांनी युक्रेनियन अध्यक्षपदासाठी त्यांची उमेदवारी जाहीर केली होती. परंतु, नंतर माघार घेतली आणि पेट्रो पोरोशेन्को यांना पाठिंबा दिला. २०१४ मध्ये त्यांनी युक्रेनची राजधानी असलेल्या कीव शहराच्या महापौरपदाची निवडणूक लढवली. २५ मे २०१४ रोजी त्यांची कीवच्या महापौरपदी पहिल्यांदा निवड झाली होती. तेव्हापासून ते आजतागायत कीवचे महापौर राहिले आहेत. महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो आणि शहरातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी त्याच्यावर असते. ही गोष्ट लक्षात घेऊन विताली क्लिट्स्को यांनी आता शहराच्या संरक्षणासाठी दंड थोपटले आहेत.
दरम्यान, युक्रेनच्या महिला खासदार किरा रुडिक याचे देखील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात त्यांनी हातामध्ये बंदूक घेतलेली आहे. याशिवाय युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी देखील शेवटच्या श्वासापर्यंत युक्रेनमध्ये राहण्याचा निश्चय केला आहे. युक्रेनमधील लहान-मोठ्या सर्व नेत्यांनी समोर येऊन सैन्याचं नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला आहे. या गोष्टीचं सर्व जगभरातून नक्कीच कौतुक होत आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.