आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
सध्या देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच जात आहे. आशा परिस्थितीत देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था ही ठप्प झालेली आहे. देशभरात रुग्णांची संख्या आता चार हजारांच्या पल्याड गेली असून त्या संख्येत मोठी वाढ होऊ नये यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहेत.
लोकांना घरात राहण्याचे आवाहन केले जात असून पोलीस बाहेर फिरणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारत आहे.
आज देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे देशव्यापी लॉक डाऊन करण्यात आलं आहे, त्यामुळे अनेक लोक घरी बसून आहेत. लोक घराबाहेर पडू नये यासाठी मोठे प्रयत्न सरकारच्या वतीने केले जात आहेत. आशा परिस्थितीत उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काही ऐतिहासिक पावलं उचलली असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न योगी उत्तर प्रदेशात करत आहेत.
लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी लोकांना घरपोच दूध सेवा पुरवणाऱ्या दूधवाल्याना मोठं आर्थिक सहाय्य योगी सरकार करत असून त्यांना त्यांच्या गाईंचे भरण पोषण करण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकार पशुखाद्य देखील पुरवणार आहे.
ह्या योजनेमुळे उत्तर प्रदेशातील २३ कोटी लोकसंख्येला फायदा होणार असून त्यांना दुधाची कमतरता जाणवू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न योगी आदित्यनाथ सरकार करत आहे. फक्त राज्यातील गाईच नाहीतर भटके कुत्रे आणि मंदिराच्या परिसरातील माकडांना देखील रोज अन्न मिळत रहावं याची काळजी उत्तर प्रदेश सरकार घेत आहे.
उत्तर प्रदेश सरकारच्या पशुसंवर्धन व कुकुटपालन विभागाचे सचिव भुवनेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण भाग आणि शहरि भाग यांच्यातील दुधाची साखळी तुटू नये यासाठी उत्तर प्रदेशात युद्ध पातळीवर काम केले जात आहे. रोजच्या रोज त्यांच्या कर्मचारी वर्गाकडून भटक्या प्राण्यांना मदत करण्याचे अनेक व्हिडीओ प्राप्त होत आहेत व प्रत्येक जण कोणताही प्राणी उपाशी राहणार नाही याची काळजी घेत आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ५००० गोशाळा निर्माण केल्या असून ह्या गोशाळांमध्ये तब्बल ५ लाख गाई आहेत.
योगी आदित्यनाथ रोजच्या रोज ह्या गायींची काळजी घेत असून त्यांच्या पोषणात कमतरता नको यायला यासाठीचे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकारी वर्गाला दिले आहेत. इतकंच नाही कृषी विभागाच्या कार्यालयाची एक हेल्पलाईन देखील योगी आदित्यनाथ यांनी सुरू केली असून यामाध्यनातून पशुपालन करणाऱ्या लोकांना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.
उत्तर प्रदेश हे भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक दूध उत्पादक राज्य आहे. देशभराच्या एकूण दूध उत्पन्नात उत्तर प्रदेशचा १८ टक्के इतका वाटा आहे.
सध्या उत्तर प्रदेश राज्य जरी कोरोनाचा सामना करत असलं तरी लोकांना दुधाचा तुटवडा पडू द्यायचा आणि दूध वाया जाऊ द्यायचं नाही, यासाठी मोठे प्रयत्न ह्या राज्यात केले जात आहेत. अनेक दूध व्यवसायिकांचे मोठे नुकसान कोरोनामूळे झाले असून त्यांना आसरा देण्याचे काम केले जात आहे.
भुवनेश कुमार हे आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञ असून या अगोदर त्यांनी अलिगढ, मुझफ्फरनगर आणि मीरतच्या दंगलीत मोठ्या शिताफीने व्यवस्थापन केले आहे. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील कामाच्या अनुभवाच्या बळावर त्यांना आज भारतात पुरवठा सुरळीत ठेवणे सहज शक्य झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात दुधविक्रेत्यांवर कारवाई केली जाणार नाही, याची काळजी कुमार घेत आहे.
तब्बल १७००० माणसे ही खाजगी अथवा शासकीय क्षेत्राशी निगडित असून ते रोज दारोदारी दूध वाटप करत आहे.
सध्या स्थितीत दुधाचे प्रमाण कमी होत नसून कुठलीही काळाबाजारी उत्तर प्रदेशात नाही असा दावा पशुपालन खात्याने केला आहे. सध्याचे दुधाचे भाव उत्तर प्रदेशात कोसळले असले तरी त्याठिकाणी दुग्धव्यवसाय सुरळीतपणे चालू असल्याने डेअरी चालक आनंदात आहेत. सरकारकडून खाजगी कंपन्यांना देखील मोठ्या प्रमाणवर दुधाचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
सरकारसमोर आता ५००० गोशाळांच्या संचलनाचे आणि ५ लाख गाईंच्या रक्षणाचे आव्हान आहे, जे आता पर्यंत यशस्वी रित्या पार पाडले आहे. इतकेच नाहीतर ज्या लोकांनी आपली कामे व्यवस्थित केली नाहीत त्यांना सरकारने निलंबित देखील केलं आहे. ह्या गोशाळांच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील लोकांची दुधाची गरज भागवण्यात योगी आदित्यनाथ यांचे सरकार यशस्वी ठरले आहे.
कोरोना व्हायरसचे देशावरील सावट गडद होत चालले असून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जर ह्याच तीव्र गतीने वाढ होत राहील तर कदाचित सरकार द्वारा लॉक डाऊनचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सरकारकडे ३ जून पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली आहे. जर असं काही झालं तर जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा अबाधित राहील यासाठी सरकारला युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक असणार आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचे हे मॉडेल निश्चितच प्रेरणादायी ठरू शकते.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.