आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
कोरोनाच्या माहामारीने संपूर्ण विश्व त्रस्त आहे. जगातल्या सगळ्या देशांची व्यवस्था या माहामारीशी झुंजण्यात गुंतली आहे. एकीकडे हा रोग पसरवण्यापासून वाचण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, तर दुसरीकडे कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काही प्रमाणात उपचाराला फळ देखील येत आहे, व कोरोना ने संक्रमित झालेले बरे होऊन घरी परततात आहेत. पण हा या माहामारीवर पूर्ण उपाय नाही. ही माहामारी पूर्णपणे संपवायची असेल तर लस शोधून काढणं हाच उपाय आहे. या दिशेने सुद्धा संपूर्ण जगात प्रयत्न सुरू आहेत.
जगातील सर्व वैज्ञानिक लस शोधण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सर्व लॅब, फार्मा कंपनी याची लस शोधण्यात गुंतले आहेत. पण अशात वेगवेगळ्या उपायांच्या अफवा उठणे अत्यंत धोक्याचे आहे.
अशीच काहीशी अफवा उठली इराणमध्ये. मिथॅनोल नावाचे रसायन या आजाराला बरे करू शकते अशी अफवा सोशल मीडियामार्फत सर्वत्र पसरली. खरंतर मिथॅनोल एक प्रकारचं विष आहे. थोड्या प्रमाणातही शरीरात गेलं तर मिथॅनोलमुळे विषबाधा होऊन मृत्यू होऊ शकतो. ही अफवा पसरताच, इराणमधील अनेकांनी कुठलीही विचार न करता हा उपाय करून बघितला व मिथॅनोलच्या विषबाधेचे शिकार झाले.
जवळपास ३०० नागरिकांचा मिथॅनोल विषबाधेने मृत्यू झाला. एवढेच नव्हे, हजारांहून अधिक नागरिक यामुळे आजारी पडले.
हा केवळ अंदाज वर्तवला जात आहे. स्वास्थ मंत्रालयाला शंका आहे की जवळपास मिथॅनोलमुळे झालेला मृतांचा आकडा ५०० च्या वर गेला आहे व आजारी असणाऱ्या नागरिकांची संख्या १००० च्याही वर आहे. इराणला कोविड १९ सोबतच या आणखी एका संकटाचा सामना करावा लागला. इतर देशांना तर केवळ कोरोनाशी सामना करावा लागतोय, पण इराणला या दोन भयंकर महामारी विरुद्ध लढावे लागत आहे, अशी खंत इराणच्या स्वास्थ मंत्रालयाचे सल्लागार डॉ. हॉसान हस्सानियन यांनी व्यक्त केली.
साधारण फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला एक अफवा पसरली होती. एका ब्रिटीश शिक्षकाने व इतर काही लोकांनी मधात व्हिस्की घेतली व कोरोना वर मात केली.
ही अफवा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. कुठलाही विचार न करता नागरिकांनी ‘फॉरवर्ड’ केली . फॉरवर्ड होता होता, मुख्य मेसेज बदलला आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचता मेसेजचे स्वरूप पूर्णपणे बदललेले होते. वायरसपेक्षा उपाय जीवघेणा असेल याचा कोणी विचारसुद्धा नव्हता केला. यात सगळ्यात दुर्दैवी घटना समोर आली ती पाच वर्षाच्या छोट्या मुलाची.
ही अफवा त्याच्या आई वडिलांपर्यंत पोहोचली. त्यांनी डॉक्टरांचा सल्ला न घेताच हा उपाय मुलावर सुद्धा केला. दुर्दैवाने तो मुलगा आंधळा झाला व आता त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कुझेस्तान आणि फार्स मधे तर मिथॅनोल विषबाधेमुळे मृतांची संख्या कोरोनानी झालेल्या मृतांच्या संख्येपेक्षा जास्त आहे . इराणमधे मिथॅनोलचे उत्पादन आणि व्यापार अधिकृत आहे. इथेनॉल म्हणजेच दारूपेक्षाही मिथॅनोल कमी दरात उपलब्ध आहे .
अशा काही अफवा इतर देशांमधे सुद्धा पसरल्या. पण त्यांचा फारसा परिणाम दिसला नाही.
८ करोड लोकसंख्या असलेल्या इराण देशावर कोरोनाचे थैमान सुद्धा कमी नाही. नोव्हेंबर २०१९ मध्ये चीनमध्ये कोरोनाने बाधित पहिला रुग्ण आढळला. पुढच्या तीन महिन्यातच इराणमध्ये दोन रुग्ण सापडले. उपचार होण्याअगोदरच दोन्ही रुग्णांचा मृत्यू झाला. पुढील दोन दिवसांतच दोन मृत्यु झाल्याचं सरकारने सांगितलं. इराणमध्ये हा व्हायरस कसा आला याचा शोध अजुनही लागला नाही, पण संख्या वाढता वाढता हा आकडा आता ७६,००० पर्यंत पोहोचला.
इस्लामिक रिपब्लिकने मध्यपूर्व स्थित राज्यात सर्वात अधिक कोरोना ग्रस्त रुग्णांची नोंद केली आहे. २९,००० नवीन केसेस व २२०० मृत्यूंची नोंद केली आहे.
वैज्ञानिक लस शोधण्याच्या पूर्ण प्रयत्नात आहेत. प्रयोग सुरू आहेत. मानवावर चाचणी होणे आवश्यक आहे. मानवाचं शरीर कशा प्रकारे ही लस स्वीकारेल त्यानुसार ती अधिकृत केली जाईल. जोपर्यंत कुठलीही अधिकृत बातमी येत नाही, तोपर्यंत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवणं प्राणघातक ठरू शकतं.
कुठलाही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काहीही करू नका.
डॉक्टरांनी व सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करा. कुठलाही मेसेज पुढे पाठवण्याआधी त्याची सत्यता पडताळून घ्या. आपल्या कुटुंबाला, परिचितांना आणि स्वतःला अशा अफवांपासून वाचवा. या लढाईत आपण सगळे एकत्र राहून, एकमेकांची काळजी घेवून या संकटावर नक्कीच मात करू.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.