आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
“बालपण” हा नुसता शब्द उच्चारला तरी मन भूतकाळात रमतं. बालपण हा असा काळ असतो ज्यात आयुष्य खूप सोपं असतं, सगळ्या प्रकारच्या ताण, तणावापासून आणि अपेक्षांपासून आपण मुक्त असतो. बालपणात तुमचं जग हे तुमच्या शेजारच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत मर्यादित असतं. तुमची आवडती खेळणी आणि आवडता खाऊ मिळाला की स्वारी खुश. पण या बालपणातला सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे खेळणी. गाड्या, भातुकली, बाहुल्या, टेडी बीयर, अशी बरीच खेळणी तुम्ही पाहिली असतील.
ही खेळणी जरी कितीही साधी, सरळ, सोपी दिसत असली तरी या खेळणी तयार करण्याऱ्या उद्योगांची गोष्ट फार गुंतागुंतीची आहे. खेळणी तयार करणे व त्याची निर्यात करणे हा अब्जावधी डॉलर्सचा उद्योग आहे. तर खेळणी तयार करणाऱ्या उद्योगांमागची गुंतागुंत नेमकी काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. हा खेळण्यांचा व्यवसाय कायम तेजीत असतो पण आश्चर्याची बाब म्हणजे या खेळण्यांच्या व्यवसायात एकाच देशाला निरंतर फायदा होत आहे, तर बाकी सर्व देश हे आपला खेळण्यांचा व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी धपडत आहेत.
लहान मुले खेळून शिकतात आणि खेळण्यांच्या माध्यमातून त्यांना जगाची ओळख होते. खेळण्यांमुळे लहान मुलांचा शारीरिक, भावनिक, सामाजिक विकास होतो. एखादं खेळणं पकडणे आणि ते कसे हाताळायचे हे शिकणे या कृतीमुळे लहान मुलांचा शारिरीक विकास होण्यास मदत होते. खेळणी लहान मुलांच्या संज्ञानात्मक विकासाला प्रोत्साहन देतात. उदाहरण द्यायचे झाले तर, बोर्ड गेम्स हे लहान मुलांना समस्यांचे सर्जनशीलपणे निराकरण करण्यास शिकवतात.
इतर मुलांसोबत खेळल्याने आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे, एकमेकांना सहकार्य केले पाहिजे, असे चांगले संस्कार लहान मुलांवर होतात. थोडक्यात खेळण्यांमुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते.
लहानपणी आपण ज्या खेळण्यांसोबत खेळलो होतो ती खेळणी आपल्या सभ्यतेइतकी जुनी आहेत. प्राचीन स्थळांचे उत्खनन करताना बरीच खेळणी सापडली आहेत. ही खेळणी मुख्यतः माती, लाकूड, व दगड यांपासून बनवली जात होती. सर्वांत प्राचीन ज्ञात खेळण्यांमध्ये लाकडापासून बनवलेल्या बाहुल्या आणि संगमरवरी दगडापासून तयार केलेला चेंडू ही खेळणी इजिप्तमध्ये इ.स.पू ४००० मध्ये अस्तिवात होती.
प्राचीन चीनमध्ये बांबू आणि रेशमाचे बनवलेले पतंग तर, प्राचीन ग्रीसमध्ये लाकडापासून तयार केलेला चेंडू आणि मेणापासून बनवलेल्या बाहुल्या खेळणी म्हणून वापरले जात होते. लहान गाड्या, शिट्ट्या ही खेळणी सिंधू संस्कृती उत्खननाच्या वेळी सापडली होती व ही खेळणी इ.स.पू १९०० इतकी जुनी आहेत. त्यामुळे जगाच्या जवळपास सर्व भागांत खेळणी तयार करण्याचा समृद्ध वारसा आहे.
आधुनिक खेळणी उद्योगाची सुरुवात ही १८व्या शतकात औद्योगिक क्रांतीपासून झाली. औद्योगिक क्रांतीमुळे तंत्रज्ञानात प्रगती झाली व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे खेळण्यांचे विविध प्रकार वाढले, आणि त्यामुळे ही खेळणी आता शिकण्यास उत्तेजन देणारी साधने बनली.
औद्योगिक क्रांतीमुळे खेळण्यांची उत्क्रांती झाली. मुलांना भूगोल शिकण्यास मदत करण्यासाठी जॉन स्पिल्सबरी यांनी १७६७ साली “जिग सॉ पझल” हा खेळ तयार केला. त्याच काळात “रॉकिंग हॉर्स” नावाच्या खेळण्याचा शोध लावला गेला.
पुढे डेव्हिड ब्रूस्टरने १८१७ साली कॅलीडोस्कोपचा शोध लावला ज्यामुळे मुलांना आकार आणि रूपे समजण्यास मदत झाली. पहिली “टॉय कार” १९५२ साली तयार करण्यात आली.
स्टीफ नावाच्या एका जर्मन माणसाने “टॉय बेअर” तयार केला व या खेळण्याला भरपूर मागणी मिळाली. अमेरिकेत, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष थिओडोर टेडी रुझवेल्ट यांनी त्यांच्या शिकार मोहिमेदरम्यान एका अस्वलाला मारण्यास नकार दिला या घटनेची भरपूर चर्चा झाली व यावरून टॉय बेअर हा टेडी बेअर म्हणून ओळखला जाऊ लागला.
आता हा खेळणी तयार करण्याचा उद्योग एवढा गुंतागुंतीचा का आहे? हे समजून घेऊयात. आज जागतिक खेळणी उद्योग हा १०० अब्ज डॉलर्सचा आहे आणि २०२४ साली तो १३० अब्ज डॉलर्सपर्यंत पोचेल असा अंदाज लावण्यात आला आहे.
या उद्योगात वर्चस्व कुणाचं आहे?
“बंदाई नामको” या जपानी कंपनीचे खेळणी उद्योगात वर्चस्व आहे. बंदाई नामको कंपनीनंतर येते “लेगो” ही डॅनिश कंपनी. २०२३च्या आकडेवारीनुसार, बंदाई नामकोचा रेव्हेन्यू ७१७ करोड डॉलर एवढा आहे तर लेगोचा रेव्हेन्यू ४०० करोड डॉलर एवढा आहे.
आता खेळण्यांच्या व्यवसायातील देशनिहाय योगदानावर एक नजर टाकूया. खेळण्यांच्या व्यवसायात अमेरिकेचे योगदान सर्वात मोठे आहे. अमेरिकेतील खेळणी उद्योगाचे योगदान ९७.२ अब्ज डॉलर्स इतके आहे आणि अमेरिकन खेळणी उद्योगावर सुमारे ६,२३,००० लोकांचे रोजगार अवलंबून आहेत.
जरी खेळणी व्यवसायात अमेरिकेचे योगदान भरपूर असले तरीही सर्वांत जास्त खेळणी आयात करणारा देशही अमेरिकाच आहे. अमेरीकेनंतर खेळणी आयात करण्यात जर्मनी, जपान, व युके हे देश येतात.
पण आपल्याला प्रश्न हा पडतो की हे देश खेळणी नेमकी आयात कुठून करतात? हे सर्व देश खेळणी ही चीनमधून आयात करतात. चीन हा खेळण्यांचा सर्वांत मोठा उत्पादक आणि निर्यात करणारा देश आहे. जागतिक खेळण्यांच्या पुरवठ्यात चीनचा ८०% वाटा आहे. चीनची खेळण्यांची निर्यात ही ६८ अब्ज डॉलर्स एवढी आहे.
आज जगाला बुद्धिबळ, लुडो, बॅडमिंटन, सापशिडी, पत्ते या सारखे खेळ देणारा भारत देश या खेळणी व्यवसायात नेमका कुठे आहे? हे जाणून घेऊ. जगतिक खेळण्यांच्या बाजारपेठेत भारताचा वाटा सुमारे ९००० करोड डॉलर्स इतका आहे. भारताने जगाला एवढे खेळ दिले तरी भारत ८०% खेळणी चीनकडून आयात करतो. दरवर्षी भारत किमान ६० करोड डॉलर्स किंमतीची खेळणी चीनकडून आयात करतो.
आता आपण एवढ्या प्रमाणात जी खेळण्यांची आयात करतो त्यावरून एक प्रश्न उपस्थित होतो की भारत खेळणी उत्पादन करू शकत नाही का? जर असेच आपण चीनकडून खेळणी आयात करत राहिलो तर भारतीय खेळणी नामशेष होतील. आज भारतात “फन स्कुल”सारखे अनेक भारतीय खेळण्यांचे ब्रँड आहेत आणि हे ब्रँड वैज्ञानिक आणि शैक्षणिक खेळ तयार करत आहेत. जगातील सर्वांत मोठा खेळणी उत्पादक होण्याची क्षमता, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, आवश्यक असलेले कौशल्य आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मौलिकता या सर्व गोष्टी भारताकडे आहेत.
भारतातील जवळपास ९०% खेळणी उद्योग हे असंघटित आणि विखुरलेले आहेत. भारतीय खेळणी उद्योगाच्या समस्या ओळखून भारत सरकारने भारतीय खेळण्यांचा मेळावा आयोजित केला. या मेळाव्याचा उद्देश हा भारतीय खेळणी उद्योगाला प्रोत्साहन देणे हा आहे. या मेळाव्यात प्रधानमंत्री नरेंद मोदींनी भारतीय खेळणी उद्योग आणि भारताची अर्थव्यवस्था हे एकमेकांना पूरक आहेत, व यामुळे प्रधानमंत्र्यांनी या पुरकतेला “टॉयकोनॉमी” ही संकल्पना वापरली.
आज जर भारताला व भारतीय अर्थव्यवस्थेला जर आत्मनिर्भर बनवायचे असेल तर भारतीय बनावटीची उत्पादने जास्तीत जास्त वापरायला हवीत. तुम्ही देखील तुमच्या घरी कोणासाठी खेळणी विकत घेताना ती भारतीय आहेत याची खात्री करूनच घ्या!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.