आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सिनेमागृहातील पडद्यावर कलाकार प्रेमकथा रंगवतात व त्यांच्यातल्या केमेस्ट्रिमुळे आपल्याला त्या अक्षरशः खऱ्या वाटु लागतात. प्रेमकथा सर्वांनाच मोहात पडतात, कारण कुठे ना कुठे तरी ते आपल्यासोबत घडलेले असते किंवा आपल्या बरोबर हे घडावे अशी आशा मनात निर्माण होते.
हिंदी सिनेमात अधिकाधिक प्रेम कथेवर आधारित चित्रपट बनवले जातात. त्या पात्रांना साकारणारे कलाकार कधी कधी आपल्या अभिनयाची अशी छाप सोडतात की लोक त्यांना त्यांच्या पात्राच्या नावे ओळखतात. आणि खऱ्या आयुष्यात पण हीच जोडी असावी असे चाहत्यांना वाटू लागते.
सिनेमा सृष्टीत पडद्यामागेसुद्धा अनेक प्रेम कथा रंगल्या. विशेषतः भारतीय क्रिकेट व हिंदी सिनेमा या दोन अगदी भिन्न क्षेत्रातील व्यक्ती प्रेमात पडताना आपण अनुभवलेच आहे. दोन्ही क्षेत्र हे रसिकांच्या अगदी जिव्हाळ्याचे. आणि प्रसिद्धी, सतत मीडियाची असलेली पाळत यामुळे त्यांच्या विषयी चर्चाही भरपूर रंगतात. असे सोहळे किंवा प्रेमकथा अगदी परीकथेप्रमाणे भासत असतात व सामान्य माणसाच्या डोळ्यांचे जणू पारणे फिटते.
अशीच एक बहुचर्चित जोडी, जिने आपल्या एकत्र येण्याच्या निर्णयाने सर्व स्तरांवर चर्चांना उधाण आणले होते, ती जोडी म्हणजे ‘शर्मिला – टायगर’.
टायगर एक देखणा, राजबिंडा नवाब होता तर शर्मिला ही कोमल सौंदर्याने नटलेली, बंगाल येथील प्रतिष्ठित टागोर घराण्यातली कन्या. नवाब असला तरी टायगरला फार काही नवाबी शौक नव्हते. त्या इतर श्रीमंत मित्रांच्या अगदी उलट तो पुस्तकांत रमायचा. जगप्रसिद्ध ऑक्स्फर्ड युनिवर्सिटीतील पदवीधर असूनही टायगरचे राहणीमान काळापेक्षा मॉडर्न आणि वेस्टर्नाइझ होते.
नवाब असल्या बरोबरच टायगरची भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान म्हणुनसुद्धा ओळख होती. एक यशस्वी कप्तान व भारतीय क्रिकेट संघाला लाभलेला सर्वोत्कृष्ट स्कीपर म्हणून टायगरने स्वकर्तुत्वावर आपली अशी ओळख निर्माण केली होती. शर्मिला देखील यशाची शिखरे गाठतच होती व प्रसिद्धीच्या झोतात होती.
त्याकाळातली भारतीय सिनेमातली पहिली बोल्ड नायिका म्हणूनसुध्दा शर्मिलाला ओळखले जात होते. आपल्या गालावरच्या गोड खळ्यांनी तिने रसिकांना आपल्या प्रेमातच पाडले होते. आपआपल्या क्षेत्रांत दोघंही यशस्वी होती, दोघांचे ही वेगळे आणि आपले असे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व व मते होती. दोघांमध्ये किती ही समानता असली तरी बऱ्याच बाबतीत त्यांच्यात भिन्नता ही होती.
टायगर हा शाही मुसलमान घराण्याचा होता तर शर्मिला ही उच्च हिंदु. टायगरच्या कुटुंबीयांचा सिनेसृष्टीत काम करणाऱ्या महिला कलाकारांबद्दल दुषित पूर्वग्रह होता. तर, शर्मिलाचे कुटुंबीयसुद्धा पतौडींबद्दल बरे-वाईट ऐकून होते. पण हे कोणतेच अडथळे टायगर व शर्मिलाला हरवू शकले नाहीत.
टायगर व शर्मिला एका मॅचनंतरच्या पार्टी दरम्यान भेटले. त्यावेळी टायगर भारतीय संघाचा कप्तान होता, तर शर्मिला सामना बघायला आली होती. एकमेकांना बघता क्षणीच ते प्रेमात पडले व पुढे अतिशय चर्चित, लाईम लाईटमध्ये असलेली प्रेमकहाणी आपल्या समोर आली.
दोघांनी हे स्वीकारले की टायगर शर्मिलाच्या ‘स्टारडम’पासून अनभिज्ञ होता तर शर्मिलाला देखील क्रिकेटबद्दल फार काही ठाऊक नव्हतेच. काही वर्षांनी, कुटुंबीयांची संमती मिळवुनच टायगरने अतिशय फिल्मी स्टाईलने शर्मिलाला पॅरिसमध्ये प्रपोज केले. आणि त्यांचा विवाह पार पडला.
बऱ्याच लोकांनी हा विवाह काही फार काळ टिकून राहणार नाही, यांच्यात मतभेद होतील अशा टिप्पण्या केल्या.
टायगर व शर्मिला प्रेमात इतके आकंठ बुडाले होते की त्यांना या प्रतिक्रियांचा काहीच फरक पडत नव्हता.
जात, धर्म, या सगळ्या मुद्द्यांवरुनही त्यांच्यावर टीका-टिप्पणी करण्यात आली. पण शर्मिला एका मुलाखतीत म्हणाली की ‘व्यक्तीचे जात व धर्म, हे प्रेमापेक्षा मोठे असूच शकत नाही. एखाद्या व्यक्तीबरोबर संपूर्ण आयुष्य घालवण्याची ओढ व तीव्र इच्छा असली की हे कोणतेच अडथळे त्यांना एकमेकांपासून लांब ठेवूच शकत नाही’. ती पुढे हे पण म्हणाली की ‘लग्नाच्या चर्चेपर्यंत सेक्युलर, कम्युनल’ हे शब्द देखील आम्हाला माहित नव्हते. आम्ही तर फक्त एकमेकांत आसरा शोधत होतो.’
लग्नानंतरही शर्मिलाच्या आयुष्यात फार असे बदल घडले नाहीतच. तिने पुन्हा चित्रपटात पदार्पण केले, व ‘आराधना, अमर प्रेम’ यांसारखे सुपरहिट सिनेमे तिने सैफ अली खानच्या जन्मानंतर दिले.
याउलट शर्मिला म्हणते, आंतरधर्मिय विवाह केल्यामुळे मला दोन नवीन संस्कृती कळल्या. पोषाख, रितीरिवाज, पाककृती, भरपूर काही नवीन शिकायला मिळाले. टायगरनेही कधी तिला सिनेमात काम करण्यास, आपले स्वतंत्र अस्तित्व जपण्यास विरोध केला नाही. उलट भरपूर प्रोत्साहन दिले.
अखेर २०११ साली टायगरला झालेल्या देवाज्ञामुळे ते वेगळे झाले. पण ‘टायगर -शर्मिला’ ही जोडी मात्र कायम अजरामर राहील.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.