आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
क्रिकेट. गरीब-श्रीमंत, जात-धर्म, लहान-मोठा अशा सगळ्या भेदभावाला विसरुन एकत्र येण्यासाठी वर्षानुवर्षे कारणीभूत असलेला एक खेळ. तसं त्याला खेळ म्हणायचं हे सुद्धा चुकच. याच खेळाने गरीब, मागासलेल्या खेड्यातील अनेक भारतीय खेळाडुंना जगाच्या नकाशावर देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.
यातच एक अतिशय प्रेरणादायी कहाणी आहे अफगाणिस्तानसारख्या सतत युद्धजन्य परिस्थीती असणाऱ्या देशात निर्वासित छावण्यांमध्ये बालपण गेलेल्या क्रिकेट क्षेत्रातील एका जादूगराची. रशिद खान असं या अवलीया गोलंदाजाचं नाव.
अफगाणिस्तानमध्ये दहशतवाद सगळीकडे पसरलेला असताना स्वत:चा जीव वाचवण्यासाठी कित्येक लोक सैन्याच्या निर्वासित छावण्यांमध्येच राहत असत. याच छावण्यांमध्ये एक १० वर्षाचा मुलगा आपल्या आई-बाबांबरोबर राहत होता. एवढ्या छोट्या वयात असतानाच रशिद खानला क्रिकेटचे वेड लागले होते. लहान असताना छावणीत राहताना त्याने गोलंदाजीची सुरुवात केली.
हे काम सोपं नक्कीच नव्हतं. भितीमुळे रशिदला बाहेर जाण्यास परवानगी नसे. रशिदच्या आई-बाबांना त्याने डॉक्टर व्हावे असे वाटत होते म्हणुन त्यांनी कित्येक वेळा त्याला क्रिकेट सोडण्यासही सांगितले.
परिस्थिती सुधारली तेव्हा रशिद आपल्या पालकांसोबत आपल्या घरी परतला. परंतु आता त्याचं मन क्रिकेट आणि गोलंदाजीमध्ये गुंतलेले होते. शाळेत जाऊन परत आल्यावर तो आपल्या भावंडांबरोबर क्रिकेट खेळत असे. घरच्यांची अभ्यासाकडे लक्ष देण्याची मागणी धुडकावत रशिद क्रिकेट आणि गोलंदाजी करत राहिला. शाहिद आफ्रिदी आणि अनिल कुंबळे यांसारख्या महान गोलंदाजांचं अनुकरण करत करत तो गोलंदाजी शिकत राहिला.
अफगाणिस्तानमध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये आपलं नाव कमवत रशिदला अफगाणिस्तानच्या १९ वर्षाखालील राष्ट्रीय संघात निवडप्रक्रियेसाठी बोलावण्यात आले. त्यावेळी अफगाणिस्तानच्या संघाचे प्रशिक्षक असलेले दौलत हमाजे यांना रशिद खानची गोलंदाजी एवढी आवडली की त्यांनी त्याची निवड १९ वर्षाखालील अफगाणिस्तानच्या संघात केली.
त्यावेळी दौलत हमाजे यांनी रशिदला एक सल्ला सांगीतला, “३ महिने स्वत:वर कष्ट घेतलेस तर क्रिकेटमध्ये तु खुप पुढे जाशील”. प्रशिक्षकाचा हा सल्ला रशिदने मनावर घेतला आणि केवळ १९ व्या वर्षी अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. अफगाणिस्तान संघात आल्यावर जागतिक पातळीवर आपली छाप सोडण्यास रशिदला जास्त वेळ लागला नाही.
अफगाणिस्तानची राजधानी असलेले काबुल शहरापासुन ३-४ तासांच्या अंतरावर आहे जलालाबाद. जलालाबाद जवळ रशिदचे गाव निनगनहार वसले आहे. या गावापासुन पाकिस्तानची सीमा फक्त एक तासाच्या अंतरावर आहे.
रशिद खानला सहा भाऊ आहेत. आश्चर्यकारक बाब म्हणजे ते सगळे क्रिकेट खेळतात आणि त्यात सगळेच रशिद सारखेच लेगस्पिन गोलंदाजी करतात. कौटुंबिक कारणांमुळे रशिदच्या बाकी भावंडांना आपले स्वप्न पुर्ण करण्याची संधी मिळाली नाही.
१९ वर्षे. स्वप्न बघण्याच्या वयात स्वप्न पुर्ण करणाऱ्या रशिद खानने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. १८ ऑक्टोबर, २०१५ ला झिंबाब्वेच्या बुलावायो शहरात क्विंस स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर रशिदने आपले पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात १० षटकांमध्ये त्याने केवळ ३० धावा देऊन १ बळी घेतला. त्यातच २ निर्धाव षटकेसुद्धा टाकली.
एक रंजक बाब म्हणजे सलग ११ टी-२० जिंकण्याचा पराक्रम करणारया अफगाणिस्तान संघाच्या यशात रशिदचा खुप मोठा हात होता. या ११ सामन्यात २३ बळी घेऊन त्याने जगात खळबळ माजवुन दिली.
रशिदने आपल्या ४४ आंतरराष्ट्रीय सामन्यात १०० बळी घेऊन सगळ्यात वेगवान १०० बळी मिळवण्याचा इतिहास केला. त्यानंतर फेब्रुवारी, २०१८ मध्ये रशिद खानने आयसीसी क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवून आणखी मानाचा तुरा आपल्या शिरपेचात लावला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या प्रसिद्धी आणि यशानंतर जगातील सर्वात मोठ्या घरगुती स्पर्धा असलेल्या इंडियन प्रेमियेर लीगमध्ये खेळण्याची संधी रशिद खानला मिळाली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक नामवंत खेळाडू ज्या स्पर्धेत खेळतात अशा स्पर्धेत रशिद खानचा खरा कस लागणार होता.
२०१७ मध्ये सनरायजर्स हैदराबाद या संघाने त्याला ४ करोड रुपयात खरेदी केले. आपल्या पहिल्याच सामन्यात विराट कोहलीचा बळी घेऊन त्याने आपली निवड सार्थ ठरवली.
पुढच्या वर्षी त्याच संघाने रशिद खानला दुप्पट रक्कम देऊन ९ करोड रुपयाला खरेदी केले. किंमतीबरोबरच रशिदने आपल्या प्रदर्शनामध्ये सुद्धा विलक्षण वाढ केली आणि १७ सामन्यांमध्ये २१ बळी घेऊन सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान मिळवले. त्याच्या याच प्रदर्शनामुळे २०१८ ला त्याचा संघ अंतिम फेरीत पोहचला.
वय आणि परिस्थिती तुम्हाला कणखर बनवते. चिखलात कमळ फुलावं तसंच काही अफगाणिस्तान सारख्या देशात रशिद खान याने स्वत:चं कर्तुत्व निर्माण केलं असं म्हणता येईल.
आजही रशिद खान आपल्या खेळाने आणि वागण्याने अनेक तरुणांसमोर आदर्श निर्माण करतो आहे. ही फक्त सुरुवात आहे. रशिद खान आपल्या कारकिर्दीच्या शेवटी एक दिग्गज खेळाडू म्हणुन ओळखला जाईल एवढं नक्की.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.