आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
९ नोव्हेंबर २०१९ला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिराचे कार्य हाती घेण्यात आले. या कार्यासाठी तिथल्या भूभागाचे खोदकाम करत असताना काही प्राचीन मंदिराचे अवशेष आढळून आले आहेत.
यात एक २० फूट उंच शिवलिंग, काही मंदिराचे जुने खांब आढळून आले. या अवशेषांमुळे त्या जागेवर प्राचीन मंदिर होते ह्या दाव्याला खूप बळकटी मिळाली आहे.
९०च्या दशकात भारतीय पुरातत्व खात्याचे एक अधिकारी के के मोहम्मद आणि त्यांच्या टीमने आयोध्येत उत्खनन केले होते. त्या उत्खननानंतर दावा करण्यात आला होता की त्या ठिकाणी एक मंदिर होते. आता ह्या नवीन शोधामुळे के के मोहम्मद यांच्या दाव्याला अजून बळकटी मिळाली आहे.
के के मोहम्मद यांनी सुरुवातीला दावा केला होता की १९७६ साली ज्यावेळी त्या ठिकाणी पुरातत्व विभागाने उत्खनन केले होते, त्यावेळी बी बी लाल यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या संशोधकांना त्याठिकाणी काही प्राचीन खांब आढळून आले आहेत.
इतकंच नाही त्या ठिकाणी जी मशीद होती तिचे निर्माण देखील याच खांबांपासून करण्यात आली आहे. त्या खांबांवर मनुष्याच्या आणि प्राण्यांच्या विविध शिल्पाकृती कोरण्यात आल्या होत्या.
के के मोहम्मद यांचे म्हणणे होते की इस्लाममध्ये मूर्तिपूजा हराम आहे, त्यामुळे तिथे असे खांब तयार केले जाऊच शकत नाहीत, त्यामुळे आधीच्याच मंदिरावर मशिदीची निर्मिती करण्यात आली आहे.
आता जे बांधकाम आणि उत्खननाचे काम तिथे हाती घेण्यात आले आहे, त्याठिकाणी काही नवीन अवशेष आढळून आले आहेत. ज्यामुळे के के मोहम्मद यांच्या दाव्याला नुसतीच बळकटी दिली नसून एक भक्कम पुरावा जगासमोर उपस्थित केला आहे.
के के मोहम्मद यांनी ९०च्या दशकात जेव्हा मंदिराच्याच भागावर मशिदीच्या निर्मितीचा दावा केला होता त्यावेळी ते पुरातत्व विभागाचे प्रादेशिक अधिकारी म्हणून कार्यरत होते.
आता जे नवीन अवशेष राम जन्म भूमीस्थळावर आढळून आले आहेत, त्या अवशेषांमुळे विश्व हिंदू परिषदेच्या राम मंदिराला पाडुन मशीद उभारल्याच्या दाव्याला पण बळकटी दिली आहे. इतकेच नाही राम मंदिर प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाला यामुळे अजून महत्व प्राप्त झाले आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या मते ह्या ठिकाणी अनेक कलश, मडके यांसारखे जुने शिल्प देखील आढळून आले होते. ज्यामुळे याठिकाणी मंदिर होते, हे जवळ जवळ सुनिश्चित होते आहे. के के मोहम्मद यांचे संशोधन आणि सध्या मिळालेले नवीन अवशेष हे सरळ सिद्ध करतात की प्राचीन मंदिराचा विध्वंस करून मशिदीची निर्मिती करण्यात आली आहे.
यामुळे अनेक डाव्या इतिहासकार आणि संशोधकांनी केलेला मंदिर पाडून मशिद निर्माण केल्याचा दावा यामुळे खोटा सिद्ध झाला आहे.
के के मोहम्मद यांचे जुने संशोधन
के के मोहम्मद हे इन्स्टिट्यूट ऑफ आर्कियोलॉजीकल रिसर्चचे विद्यार्थी असताना त्यांनी बी बी लाल ह्यांच्या टीमसोबत आयोध्येत उत्खनन केले होते, त्यावेळी त्यांना त्याठिकाणी १२ खांब आढळून आले होते. हे १२ खांब प्राचीन हिंद स्थापत्यकलेचा उत्तम नमुना होते. यावरूनच के के मोहम्मद यांनी तिथे मंदिर पाडून मशिदीच्या निर्मितीचा दावा केला होता.
फक्त खांबच नाही, विश्व हिंदू परिषदेच्या मताप्रमाणे त्यांना त्याठिकाणी एक पूर्ण कलश देखील आढळून आला होता. हा कलश १२ व्या आणि १३ व्या शतकातील मंदिरांप्रमाणेच होता.
मोहम्मद यांना काही चिनी मातीच्या मुर्त्यादेखील सापडल्या होत्या. यामुळेच त्यांना त्याठिकाणी मंदिर असल्याचे लक्षात आले. त्यांनी जेव्हा दुसऱ्यांदा उत्खनन केलेले त्यावेळी देखील याच परिसरात त्यांना अजून ५० खांब आढळून आले होते.
इतकंच नाही मगरीच्या मुखाची मकरा प्रणाली आढळून आल्याचा दावा देखील के के मोहम्मद यांनी केला होता. त्यांच्या मते असे जुने स्थापत्य फक्त जुन्या मंदिरात आढळून येतात. यामुळेच त्यांना ह्या ठिकाणी मंदिर होते असे वाटले होते.
सुप्रीम कोर्टाने देखील राम मंदिराच्या प्रकरणात निर्णय देण्याच्यावेळी के के मोहम्मद यांच्या दाव्याला विचारात घेतले होते. के के मोहम्मद यांचे सततचे संशोधन आणि दावे नुकत्याच मिळालेल्या पुराव्यांनी अजून बळकट झाले आहेत.
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. ThePostman.co.in संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.