आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
सोप्या भाषेत सांगायचे तर, युद्धादरम्यान शत्रूकडून जप्त केलेल्या कोणत्याही मालमत्तेला युद्धातील लूट (स्पॉईल्स ऑफ वॉर) असे म्हटले जाते. यामध्ये कायदेशीररीत्या जप्त केलेल्या, शासनाने ताब्यात घेतलेल्या किंवा बळाचा वापर करून हस्तगत केलेल्या कोणत्याही गोष्टीचा समावेश असू शकतो. अमेरिकन सैनिकांनी युद्ध लढल्यानंतर किंवा एखाद्या देशावर आक्रमण केल्यानंतर हजारोंच्या संख्येने कलाकृती, प्राचीन वस्तू, शस्त्रे आणि युद्धातील इतर स्मृतिचिन्हे मायदेशी नेल्याची इतिहासात नोंद आहे. चला तर मग, युद्धातील या लू*टीशी संबंधित सर्व पैलूंचा आढावा घेऊया.
“युद्ध व आक्रमणे”
स्पॉईल्स ऑफ वॉर म्हटल्या जाणाऱ्या वस्तू कुठून आणि कशा आल्या, हे समजून घेण्यासाठी अमेरिकेची प्रमुख युद्धे तसेच आक्रमणांवर नजर टाकणे गरजेचे आहे. अमेरिकेने आजवर अनेक देशांवर आक्रमणे व लष्करी कारवाया केल्या आहेत. जपान, व्हिएतनाम, कोरिया, अफगाणिस्तान, इराक, जर्मनी आणि इटली यांच्याविरुद्ध अमेरिकेने थेट युद्धे लढली. या संघर्षांदरम्यान, अमेरिकन सैनिक अनेकदा युद्धातील लूट म्हणून स्मृतिचिन्हे, विजयचिन्हे आणि इतर वस्तू गोळा करून मायदेशी घेऊन आले. बऱ्याच लोकांनी त्या पोस्टाने पण पाठवल्या.
“पसंतीच्या वस्तू”
सर्वाधिक लोकप्रिय स्मृतिचिन्हांची यादी युद्धक्षेत्रानुसार बदलत असल्याचे दिसते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान दुर्बिणी, कॅमेरे, झेंडे, हेल्मेट्स, अरिसाका रायफल्स, जपानी तलवारी आणि जर्मन लुगर्स व पी३८ पिस्तुले यांसारख्या वस्तूंना पसंती असायची. या वस्तू सहसा ओसाड जागांवरून, युद्धातील कैद्यांकडून किंवा रणांगणात मृत पावलेल्यांच्या ताब्यातून घेतल्या जात असत. व्हिएतनाम युद्धादरम्यान अमेरिकन सैनिकांनी आणलेल्या स्मृतिचिन्हांमध्ये एसकेएस रायफल्स, व्हिएतनामी लष्करी झेंडे, पदके, बिल्ले आणि कॅमेऱ्यांचा समावेश होता. पुढे अधिक कठोर नियम लागू झाल्यामुळे साधारण २००१ पासून पारंपरिक स्मृतिचिन्हे घरी आणण्याचे प्रमाण खूपच कमी झाले.
नियमांचे सांगायचे झाले तर, अमेरिकन सैन्य अनेकदा सैनिकांना मर्यादित मूल्याची यु*द्ध-स्मृतिचिन्हे सोबत नेण्याची परवानगी देत असे. काही प्रकरणांमध्ये, स्मृतिचिन्ह म्हणून उचलल्या जाणाऱ्या वस्तूंच्या जप्तीची कायदेशीर कागदपत्रेही तयार केली जायची. या वस्तू सैनिक घरी परतताना स्वतः सोबत नेत किंवा अमेरिकेत टपाल सेवा वापरून पाठवत असत.
अमेरिकन सैन्याकडून शत्रू देशाच्या नागरिकांच्या खाजगी मालमत्तेची कधी लूट झाली होती का? याचे उत्तर ‘होय’, असे आहे. अनेक अभ्यासांतून हे समोर आले आहे की अमेरिकन सैन्याने जर्मनीमध्ये नागरिकांच्या मालमत्तेची लूट केली होती. इतिहासातील नोंदी असेही दर्शवतात की, त्यांनी अनेक देशांवर आक्रमण करताना कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन लोकांची दारू, कलाकृती, घड्याळे, कॅमेरे, चांदीची भांडी आणि इतर घरगुती वस्तू लुटल्या.
अमेरिकन सैन्य फ्रान्सविरुद्ध कधीच लढले नाही; मग फ्रेंच वस्तू युद्धातील लूट किंवा आठवण म्हणून अमेरिकेत कशा आल्या? पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकन सैन्य काही काळासाठी फ्रान्समध्ये मित्रदेशांच्या मदतीसाठी तैनात होते. अनेक वृत्तपत्रांनुसार, या सैनिकांनी तेथील वास्तव्यादरम्यान फ्रेंच वस्तू खरेदी केल्या. त्याचबरोबर त्यांनी रणांगणावरील उरलेले अवशेष (भंगार), पोस्टकार्ड्स, हेल्मेट, बिल्ले, बटणे आणि इतर वस्तू अमेरिकेत परतताना सोबत आणल्या.
“विक्रीसाठी दोन पर्याय: लिलाव की पॉन शॉप?”
पॉन शॉप्समध्ये जुन्या वस्तू विकत घेतल्या जातात किंवा त्या गहाण ठेवून पैसे दिले जातात. सैनिकांनी यु*द्धावरून परतताना आणलेल्या अनेक वस्तू लिलाव, इस्टेट सेल्स (मालमत्तेची विक्री), अँटीक विक्रेते, बंदुकांची दुकाने, पॉन शॉप्स आणि अगदी गॅरेज सेल्स सारख्या बाजारपेठांमध्ये आढळतात. तात्काळ पैशांची गरज म्हणून खुद्द माजी सैनिकांच्या कुटुंबीयांनीही यातील काही वस्तू विकल्या आहेत. सहसा, (माजी) सैनिक वृद्ध झाल्यावर किंवा त्यांच्या निधनानंतर या वस्तू विकल्या जातात; कारण पुढच्या पिढीला या वस्तू स्वतःकडे ठेवण्यात रस नसतो आणि अशा वस्तूंमुळे उगाच जागा अडते असे त्यांना वाटते.
विक्रीस असलेल्या वस्तूंची अधिकृत कागदपत्रे किंवा त्यामागील इतिहास पुराव्यासह माहीत असल्यास अशा वस्तूंना मोठी मागणी असते आणि विकताना त्यांचा चांगला मोबदलाही मिळू शकतो. म्हणूनच ज्यांच्याकडे उच्च दर्जाच्या आणि योग्य कागदपत्रे असलेल्या वस्तू आहेत, ते लोक लिलावाचा पर्याय निवडतात किंवा त्या वस्तू विशिष्ट संग्राहकांना विकतात.
दुसरीकडे, सामान्य दर्जाच्या युद्धकालीन ट्रॉफीज आणि आठवणींच्या वस्तू विकण्यासाठी पॉन शॉप्स हा एक सोयीस्कर पर्याय ठरतो. विक्रेत्यांना लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि ग्राहक शोधण्यासाठी महिनो महिने वाट पाहावी लागत नाही. परंतु, पॉन शॉप्स लगेचच पैसे देतात असे नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील अनेक बनावट वस्तू बाजारात उपलब्ध असल्याने पॉन शॉपचालकसुद्धा या वस्तूंची पार्श्वभूमी नीट पडताळून पाहतात.
हे व्यवहार कसे होतात हे जाणून घेण्यासाठी हिस्ट्री चॅनेलचा ‘पॉन स्टार्स’ हा लोकप्रिय अमेरिकन कार्यक्रम उत्तम उदाहरण ठरेल. कार्यक्रमाच्या अनेक भागांमध्ये लोक युद्धातील स्मृतिचिन्हे विकण्यासाठी दुकानात येताना दाखवले आहे. या कार्यक्रमात १९ व्या शतकातील जपानी तलवार, जर्मन लुगर पी०८ पिस्तूल, पहिल्या महायुद्धातील वैद्यकीय किट आणि ना*झींचे अस्सल हँडबुक यांसारख्या वस्तू विक्रीसाठी आणल्याचे दाखवले जाते. कार्यक्रमादरम्यान रिक हॅरिसन वस्तूंची नीट पडताळणी करतात आणि गरज पडल्यास एखादी गोष्ट तपासायला तज्ज्ञ व्यक्तीलाही बोलावतात.
“काही लु*टलेल्या वस्तूंची मूळ देशांना वापसी”
युद्धातील लूट दोन प्रकारांत विभागली जाऊ शकते. पहिला प्रकार म्हणजे सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेली मालमत्ता. यात संग्रहालयाच्या दर्जाच्या कलाकृतींचा समावेश होतो. दुसरा प्रकार म्हणजे यु*द्धभूमीवरून आणलेली वैयक्तिक पातळीवरील स्मृतिचिन्हे. अशा वस्तू कमी मूल्याच्या असून त्या खासगी मालकीच्या राहतात.
अमेरिकेने अशा लुटलेल्या वस्तू परत केल्या आहेत का? याचे उत्तर ‘होय’, असे आहे. चीन, जर्मनी, जपान आणि इटलीला अनेक पुरातन वस्तू व सांस्कृतिक कलाकृती अमेरिकेकडून परत करण्यात आल्या आहेत. परंतु, आजही शेकडो युद्ध-स्मृतिचिन्हे संग्रहालये, खासगी संग्रहांचा भाग म्हणून किंवा खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
सध्याच्या लष्करी नियमांनुसार, यु*द्ध किंवा संघर्ष क्षेत्रांमध्ये असताना अमेरिकन सैनिकांना कोणत्याही वस्तू ताब्यात घेण्यास पूर्णपणे बंदी आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








