आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे मानवाने डोळे विस्फारणाऱ्या वास्तुरचना उभ्या केल्या आहेत. आपण त्याचं तोंड भरून कौतुकही करतो. मात्र, आज उपलब्ध असलेलं तंत्रज्ञान, अजस्त्र यंत्रसामग्री हे काहीही नसताना आपल्या पूर्वजांनी शेकडोच नव्हे तर हजारो वर्षांपूर्वी सध्याच्या वास्तूंपेक्षाही अवाक करणाऱ्या भव्य, देखण्या आणि मुख्य म्हणजे मजबूत वास्तू कशा उभारल्या असतील; ही कुतूहलाची बाब आणि कौतुकाचीही!
इजिप्तचे पिरॅमिड्स, भारतातली हजारो वर्षं जुनी मंदिरं, अजंठा, वेरूळसारखी लेणी अशा अनेक वास्तू आज आपल्याला ज्ञात आहेत आणि आपण पुरातन वारसा म्हणून त्यांचे जतनही करतो आहोत. मात्र, काळाच्या उदरात गडप झालेली अशी अनेक आश्चर्य अजून आपल्याला अज्ञात आहेत. काही उघडकीला येत आहेत.
त्यातलीच एक आश्चर्यकारक वास्तू म्हणजे जपानमध्ये समुद्राच्या तळाशी आढळलेली पिरॅमिड्स! या पिरॅमिड्सचं किमान वय १० हजार वर्षं किंवा त्याहूनही अधिक असू शकतं, असा काही तज्ज्ञांचा दावा आहे.
ओकिनावा जिल्ह्यात योनागुनी बेटाजवळ सन १९८६ मध्ये समुद्राच्या तळाशी एक वास्तुसमूह आढळून आला. एका स्थानिक डायव्हरने तो सर्वप्रथम पाहिला आणि त्याबाबत सागरी भूगर्भशास्त्रज्ञांना माहिती दिली. त्यानंतर सन १९९५ मध्ये त्याची पुरातत्व विभागाकडे अधिकृत नोंद करून त्यावर संशोधन करण्यात येत आहे.
या वास्तुसमूहामध्ये एका वाड्याचे अवशेष, कमान, पाच मंदिरं, एक मोठी स्टेडियमसदृश वास्तू, त्रिकोणी आकाराचे सार्वजनिक स्नानगृह, रंगमंच अशा वास्तूंचे अवशेष आहेत. या सर्व गोष्टी रस्ते आणि जलवाहिन्यांनी जोडलेल्या आहेत काही ठिकाणी संरक्षित भिंतींचे अवशेष आढळून येतात.
याशिवाय मुद्दाम खणलेले खड्डे, पायऱ्या, कासवाच्या आकाराचा खडक, गच्ची यांसह प्राचीन ‘काइडा’ लिपीमधील एक शिलालेखही सापडला आहे. पायऱ्यांवरून उतरत २५ मीटर खोल जाणारं पिरॅमिड ही इथली सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. हा संपूर्ण वास्तुसमूह ४५ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर उभा आहे. याशिवाय ओकिनावाच्या मुख्य बेटावर अशाच प्रकारच्या आणखी ५ वास्तूंचे अवशेष आढळून आले आहेत.
ज्येष्ठ सागरी भूगर्भशास्त्रज्ञ प्रा. मासाकी किमुरा यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांचा एक समूह या वास्तुसमूहावर संशोधन करत आहे. हे अवशेष किमान ५ हजार वर्षांपूर्वीचे असल्याचा संशोधकांचा दावा आहे. पाण्याखाली आढळून आलेले हे दगडी बांधकामांचे अवशेष सुमारे २ हजार वर्षांपूर्वी जलसमाधी मिळालेल्या ‘अटलांटिस’ या शहराचे अवशेष आहेत, असंही एक मत आहे. प्रा. किमुरा आणि त्यांचे सहकारी मागच्या १५ वर्षांहून अधिक काळ या जागेचा अभ्यास करत आहेत.
मात्र, योनागुनीमध्ये जे काही सापडलं आहे ते मानवनिर्मित आहे, या प्रा. किमुरा यांच्या दाव्यांशी सर्व तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता नाही. अनेक शास्त्रज्ञांच्या मते भूगर्भात घडणाऱ्या घडामोडींमुळे ही संरचना नैसर्गिकरित्या तयार झाली आहे. या दोन मतांवरून अभ्यासक आणि संशोधकांमध्ये मतमतांतरं आहेत. पायऱ्या किंवा गच्चीसारख्या दिसणाऱ्या या सर्व संरचना नैसर्गिक आहेत. भूस्तरांवर होणाऱ्या विविध प्रकारच्या घडामोडींमुळे घडून येणाऱ्या रचनांचे हे उत्तम उदाहरण आहे. विशेषतः समुद्राच्या तळाशी असलेल्या पाण्याच्या दबावामुळे खडक तासले जाऊन अशा रचना आकाराला येतात, असाही काही संशोधकांचा दावा आहे.
प्रा. किमुरा यांच्या दाव्यानंतर वादाच्या फैरी मोठ्या प्रमाणावर झडल्या. तरीही ते आपल्या मतांबाबत ठाम आहेत. ‘मी या संरचनेबद्दल पहिल्यांदा ऐकलं तेव्हा माझी देखील ही नैसर्गिक रचना असल्याची धारणा होती. मात्र, पाण्याखाली उतरून प्रत्यक्ष पाहणी केल्यावर माझं मत बदललं’, असं ते सांगतात.
या संरचनांवर असलेला मानवी संरचनांचा प्रभाव लक्षात घेता त्या पूर्णपणे नैसर्गिक असल्याचं प्रा. किमुरा यांना मान्य नाही. समुद्राच्या तळाशी असलेल्या मानव आणि प्राणीसदृश आकृतींची प्रतिकृती त्यांनी प्रयोगशाळेत साकारली आहे. त्यावरून या आकृत्या आशिया खंडातील संस्कृतीतली प्रतीकं असल्याचं सूचित होतं. त्या मानवी आकृतीचं चिनी किंवा प्राचीन ओकिनावन राजाच्या प्रतिमेशी साधर्म्य आहे. हे शहर भूकंपामुळे जमिनीखाली गाडलं गेलं असेल आणि कालांतराने ही जमीन समुद्राच्या उदरात आली असेल, अशी शक्यता हा वास्तुसमूह मानवनिर्मित असल्याचं मत असणारे संशोधक वर्तवतात. पॅसिफिक समुद्रात अशी अनेक उदाहरणे आढळतात.
यापूर्वी एप्रिल १७१७ मध्ये योनागुनी जीमा येथे जगातल्या सर्वात मोठ्या त्सुनामीची नोंद झाली आहे. त्यावेळी ही महालाट तब्बल १३१ फूट (४० मीटर) पेक्षा जास्त उंचीच्या खडकावर धडकली होती. असंच काही यापूर्वी घडलं असावं. किनार्यावर सापडलेल्या अवशेषांमधून १ हजार ६०० वर्षांपूर्वीचा कोळसा मिळाला आहे. हा मानवाच्या प्राचीन अधिवासाचा संकेत आहे. मात्र, या ठिकाणी मानवी रहिवासाचे सुस्पष्ट पुरावे मिळणं कठीण होत आहे.
मातीची भांडी आणि लाकूड समुद्राच्या तळाशी टिकत नाही, तरीही संशोधकांना त्या जागेवर अधिक संशोधन करण्यात स्वारस्य आहे. काही ठिकाणी रंग दिलेला गायीसारख्या आकाराच्या भाग दिसून येतो. या भागावर अधिक लक्ष केंद्रित केलं तर ठोस काही तरी हाताशी लागण्याची शक्यता आहे.
कोबे विद्यापीठातील भूकंपशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक टोरू ओची हे प्रा. किमुरा यांनी व्यक्त केलेल्या शक्यतेला दुजोरा देतात. जमिनीवर किंवा पाण्याच्या खाली असलेल्या भूभागावर नैसर्गिक घडामोडींचा असा परिणाम झाला नसल्याचं तिथे पाण्याखाली जाऊन पाहणी करून आलेल्या प्रा. टोरू सांगतात. प्रा. किमुरा यांच्या दाव्यात अजिबात अतिशयोक्ती नाही. या रचना भूकंपामुळे किंवा नैसर्गिक प्रक्रियांमुळे तयार झालेल्या नाहीत हे उघड आहे, अशा शब्दात ते प्रा. किमुरा यांचं समर्थन करतात.
शासकीय पातळीवर या स्थळाबाबत उदासीनता दाखवली जात असल्याची खंत सांस्कृतिक क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांकडून व्यक्त होत आहे. जपान सरकारचा सांस्कृतिक विभाग आणि ओकिनावा जिल्हा प्रशासन योनागुनीमधल्या अवशेषांबाबत पुरेसे गंभीर असल्याचे दिसत नाही. त्यांना हा एक महत्वाचा सांस्कृतिक वारसा ठरू शकतो, याची जाणीवच नाही. कोणत्याही सरकारी यंत्रणेने या स्थळावर संशोधनही केलेले नाही किंवा त्याच्या जतनासाठी यंत्रणाही विकसित केलेली नाही. हे सगळं काम हौशी संशोधक आणि प्राध्यापकांवर सोडून दिलं आहे, अशी टीका होत आहे.
योनागुनी जिमा हे जपानच्या रिऊक्यू द्वीपसमूहाच्या दक्षिणेच्या टोकाजवळ, तैवानच्या पूर्व किनाऱ्यापासून सुमारे ७५ मैल (१२० किलोमीटर) अंतरावर असलेले एक बेट आहे. योनागुनीला जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे नोंद करणे आवश्यक आहे. नोंदणी करून कोणीही पर्यटक आणि संशोधक या ठिकाणी मुक्तपणे डुबकी मारू शकतात.
योनागुनीच्या ही संरचना नैसर्गिक आहे की मानवनिर्मित, याबाबत संशोधकांमध्ये मतभेद आणि वादविवाद होत असले तरीही ते स्वागतार्हच आहेत. कारण त्यातून जगातलं एक आश्चर्यकारक कोडं उलगडायला मदत होणार आहे. ते मानवनिर्मित आहेत असं सिद्ध झालं तरीही एका अज्ञात संस्कृतीची आणि त्यांच्या कर्तृत्वाची ओळख होणार आहे. ही संरचना नैसर्गिक असेल तर निसर्गाच्या शक्तीची मानवाला पुन्हा एकदा जाणीव होईल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.