आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
गत वर्षी संपूर्ण जगाने एका अशा साम्राज्ञीचा अस्त होताना बघितला जिच्या कारकिर्दीबद्दल येणाऱ्या असंख्य पिढ्यांना सांगितलं जाईल. ८ सप्टेंबर २०२२ रोजी इंग्लंडची राणी एलिझाबेथ द्वितीयचे निधन झाले आणि १९५२ पासून सुरू झालेली तब्बल ७० वर्षांची कारकीर्द संपुष्टात आली. जगाच्या इतिहासातील अतिशय महत्त्वपूर्ण कारकीर्द म्हणून एलिझाबेथची कारकीर्द ओळखली जाईल.
इंग्लंडचा राजा ‘जॉर्ज द सिक्स्थ’ आणि राणी ‘एलिझाबेथ (पहिली)’ यांची थोरली मुलगी म्हणजे ‘एलिझाबेथ (दुसरी)’. तसं पाहता एलिझाबेथ एवढ्या मोठ्या साम्राज्याची राणी बनणं हे तिचं नशीबच म्हणावं लागेल. कारण, तिचे वडील जॉर्ज हे नंबर दोनचे अपत्य. त्यामुळे त्याच्या वाट्याला राजगादी येईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. खुद्द जॉर्जला सुद्धा. त्यातून जॉर्जचा स्वभाव बुजरा, एखाद्या राजाची असावी अशी त्याची पर्सनॅलिटी नव्हती. पण मग असं काय घडलं की ज्यामुळे जॉर्ज आणि परिणामी एलिझाबेथ (द्वि.) यांना राजगादी मिळाली.
या सगळ्या घडामोडींसाठी फक्त एकच नाव कारणीभूत होतं. “वॉलिस सिम्पसन”!
कारण, एलिझाबेथ द्वितीयचे वडील ‘जॉर्ज द सिक्सस्थ’ला आपल्या अडखळत बोलण्याच्या सवयीमुळे आणि बुजऱ्या स्वभावामुळे राजे पदात काडीमात्र स्वारस्य नव्हते. मात्र राजा असलेल्या त्याच्या थोरल्या भावाला म्हणजे एडवर्डला एका घटस्फोटित अमेरिकन महिलेशी विवाह करायचा होता. ती होती वॉलिस सिम्पसन. त्याकाळी राजघराण्यात हे कृत्य स्वीकारार्ह नव्हते. पण, एडवर्डने राजगादीपेक्षा प्रेमाला अधिक महत्व दिले आणि १९३६ साली स्वेच्छेने राजपदाचा त्याग केला. त्यामुळे नाईलाजानेच जॉर्जला ते पद स्वीकारणे भाग पडले आणि अशाप्रकारे ते एलिझाबेथ द्वितीयकडे आले.
जिच्या प्रेमाखातर एडवर्डने इतक्या मोठ्या ब्रिटिश साम्राज्याच्या राजेपदाचा त्याग केला, ती वॉलिस सिम्पसन होती तरी कोण
बाल्टिमोर येथे राहणारे वॉलिस वॉरफील्ड आणि एलिस मोन्टेग्यू यांची एकुलती एक अपत्य वॉलिस सिम्पसन. १९ जून, १८९६ रोजी वॉलिस सिम्पसनचा जन्म झाला. वॉलिसचे आजोबा नावाजलेले पीठ व्यापारी आणि नावलौकिक मिळवलेले नागरिक म्हणून प्रसिद्ध होते. शिवाय १८७५ च्या महापौर पदाच्या निवडणूकीसाठी ते उमेदवार होते. तिची आई, विल्यम, लॅटिन मोन्टेग्यू या प्रसिद्ध स्टॉकब्रोकरची मुलगी होती. एकंदर वॉलिस सिम्पसन ही अमेरिकेच्या उत्तम घराण्यात वाढलेली स्त्री होती.
वॉलिस सिम्पसन अगदी काही महिन्यांची असतानाच तिच्यावरचे पितृछत्र हरपले. वडिलांच्या निधनानंतर ती व तिची आई कुटुंबियांच्या मदतीनेच उदरनिर्वाह करत होत्या. वडील वॉलिस आणि तिची मावशी बेसी यांच्या नावावरून तिचे नाव ‘बेसी वॉलिस’ असे ठेवण्यात आले होते. मात्र तारुण्यात तिचे बेसी हे नाव वगळले. १९१२ ते १९१४ दरम्यान वॉलिस सिम्पसनला तिच्या काकाने मेरिलॅन्डच्या सर्वांत महागड्या मुलींच्या शाळेत घातले. वॉलिस नेहमीच काहीतरी चांगले करण्याच्या उद्देशाने प्रेरित होती. शालेय शिक्षणात ती हुशार होती. ध्येयवादी होती. वॉलिसच्या चरित्र लेखकांनाही तिचे सौंदर्य आणि संभाषण कौशल्यांची तोंड भरून वर्णने करण्याचा मोह आवरला नाही.
१९१६ साली वॉलिस फ्लोरिडा येथे तिचा भाऊ कोरिन मस्टीन याला भेटायला गेली. तिथे तिची ओळख तिचा पहिला पती अर्ल स्पेंसर या यू.एस. नेव्ही मध्ये काम करणाऱ्या तरुणाशी झाली आणि अवघ्या काही महिन्यांतच या दोघांनी लग्न केले. मात्र अर्लच्या कामाच्या स्वरूपामुळे त्याला सतत घरापासून दूर राहावे लागत होते. वॉलिसने संसार टिकवण्यासाठी प्रयत्न केले. ती अर्ल सोबत त्याच्या नोकरीच्या ठिकाणी राहू लागली. परंतु त्याची व्यसनाधीनता दोघांच्या नात्यात अडसर बनू लागली आणि ते दोघे वेगळे झाले.
या वळणावरून जात असताना तिची एरनेस्ट सिम्पसनशी ओळख झाली. वॉलिसशी लग्न करण्यासाठी एरनेस्टने त्याच्या पहिल्या बायकोला घटस्फोट दिला. खरं तर वॉलिस सिम्पसनचे वैवाहिक जीवन हा तिच्या संपूर्ण आयुष्यात सर्वाधिक चर्चेचा विषय राहिला आहे. एकीकडे तिच्या दुसऱ्या नवऱ्याने तिच्या बालपणीच्या मैत्रिणीशी व्यभिचाराचे कृत्य केल्याने तिचा संसार थाटण्याचा दुसरा प्रयत्नही अपयशाच्या मार्गी होता.
तर दुसरीकडे राजकुमार एडवर्ड (नंतरचा राजा एडवर्ड) आठवा याला त्याच्या वडिलांनी १९३० साली बेल्व्हेडेरचा राजकिल्ला दिला होता. ज्याकडे एडवर्ड पारंपरिक आणि सततच्या औपचारिक राजपद्धती यांपासून सुटका म्हणून पाहू लागला. कालांतराने जणू हेच त्याचे घर बनले, जिथे एडवर्ड आणि त्याचा मित्र परिवार मनोरंजन, पार्ट्या आणि मेजवान्यांचा लाभ घेत असत.
१९३०-३१ च्या दरम्यान अशाच ‘हाय सोसायटी’ पार्टी, मेजवानीच्या निमित्ताने एडवर्ड आणि वॉलिस सिम्पसन यांची ओळख झाली. योगायोगाने सिम्पसन दाम्पत्य देखील यावेळी घटस्फोट घेण्याच्याच मार्गावर होते. (पुढे ऑक्टोबर १९३६ मध्ये ते कायदेशीरपणे वेगळे झाले). त्यामुळे एडवर्ड आणि वॉलिस यांच्या मैत्रीत आणि जवळीकतेत भरच पडली. एडवर्ड तर वॉलिसच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. त्यांच्या या नात्याबद्दल एडवर्डने आपले वडील आणि तत्कालीन राजा जॉर्ज पाचवा याला सांगायचे ठरवले. मात्र दुर्दैव असे की, या विषयाबाबत बोलणं होण्याआधीच राजाचा जानेवारी १९३६ मध्ये त्याचा मृत्यू झाला आणि राजेपदावर आता एडवर्डची वर्णी लागली.
वॉलिस आणि एडवर्ड यांचे प्रेम लपून राहणे आता स्वाभाविक कारणांनी शक्य नव्हते. मात्र निमित्त झाले ते वॉलिसने एडवर्डला खिडकीतून पाहण्याचे. स्पेनमधील सेव्हिल येथे पारंपारिक सेमाना सांता मिरवणुकीदरम्यान त्यावेळी ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ असलेल्या एडवर्डला वॉलिसने खिडकीतून पहिले असा आरोप केला जातो. अविवाहित महिलेने असा धार्मिक कार्यक्रम पाहणे अयोग्य मानले जात असल्याने ब्रिटिश साम्राज्यात राजाने शिष्टाचाराचा भंग केला अशा चर्चांना उधाण आले. कोर्ट आणि सरकारी गोटात वॉलिस आणि एडवर्ड यांना विवाह करायचा आहे याची स्पष्ट चिन्ह दिसू लागली.
कोणत्याही पुरुषप्रधान संस्कृतीला साजेसे वर्तन ब्रिटिश राज्यात सुरू झाले. ब्रिटनचे उच्च पदस्थ अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांना वॉलिस ही अमेरिकेतील दोन वेळा घटस्फोट झालेली एक स्त्री असल्याने, ती राजकीय, सामाजिक आणि नैतिकदृष्ट्या इतके मोठे ब्रिटीश साम्राज्य सांभाळू पाहणाऱ्या एडवर्डसाठी अनुरूप वाटत नव्हती.
दुर्दैव असे की, आता वॉलिस सिम्पसन ही तिच्या एडवर्ड सोबत असलेल्या नात्यामुळे जणू काही सार्वजनिक चर्चेचा विषयच झाली होती. अगदी राजघराण्यात देखील त्यांच्या नात्याचा कधी स्विकार झाला नाही. तिच्याबाबत लोकांच्या मनात असणाऱ्या समजुती आणि दृष्टिकोन अगदीच नकारात्मक होत्या. यापासून सुटका म्हणून ती या सर्व कोलाहलापासून लांब फ्रान्समध्ये राहायला गेली.
इकडे एडवर्ड वॉलिसशी लग्न करण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करत होता. लोकांची मते वळवण्याचा प्रयत्न करत होता. त्याने तत्कालीन पंतप्रधान स्टॅन्लीशी चर्चा केली. त्याला एडवर्डने ‘मॉर्गनाटिक’ विवाहाची पद्धत सुचवली. ज्यामुळे वॉलिस एडवर्डची पत्नी तर झाली असती मात्र राणी म्हणून कोणताही मान-सन्मान तिला मिळाला नसता. पण, स्टॅन्ली आणि इतर सत्ताधीशांनीही या पद्धतीस नकार दिला आणि या सगळ्याचा विरोध पत्करून लग्न करायचे तर ब्रिटनच्या राजसत्तेवर त्याचा तीव्र परिणाम होणार होता.
एडवर्डने शर्थीचे प्रयत्न करून देखील त्यांच्या प्रेमाचा ब्रिटिश साम्राज्यात निभाव लागला नाही. अखेर डिसेंबर १९३६ मध्ये एका रेडिओवर एडवर्डने जाहीर केले, “माझी राजा म्हणून या साम्राज्याप्रती असणारी कर्तव्ये आणि या जबाबदारीचे ओझे, माझे ज्या स्त्रीवर प्रेम आहे तिच्या समर्थानाशिवाय पेलणे मला अशक्य वाटत आहे.”
प्रेमासाठी अगदी सिंहासनावर पाणी सोडणारा एडवर्ड हा ब्रिटिश साम्राज्यातील पहिला आणि एकमेव राजा होता. त्याकाळी लोकांना ही गोष्ट पचवणे अर्थातच कठीण होते. परिणामी वॉलिसला पुढे दशकभर या घटनेचे कारण म्हणून रोष पत्करावा लागला. इतकेच नव्हे तर तिच्या भूतकाळातील वर्तणूक आणि वैयक्तिक आयुष्याचा जाहीर बाजार मांडला गेला.
‘चायना डोसीएर’मध्ये (चीनमधील वॉलिसच्या कथित लैंगिक आणि गुन्हेगारी शोषणाचे तपशील) तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आले. मात्र वॉलिसचे प्रेम आणि एडवर्डच्या विश्वासाने त्यांच्या नात्यात या अफवांमुळे तसूभरही फरक पडला नाही. अखेरीस जून १९३७ मध्ये सर्व सामाजिक, राजकीय बंधने झुगारात वॉलिस आणि एडवर्ड विवाह बंधनात अडकले.
खरंतर प्रेरणादायी अशी यांची प्रेमकथा. मात्र लग्नानंतर देखील या दोघांचे राजपरिवाराशी सूत जुळले नाही. वॉलिसला कधीच ब्रिटनच्या राजपरिवाराने स्वीकृती दिली नाही. एडवर्डनंतर राजा झालेल्या जॉर्ज सहावा याने एडवर्डला ‘ड्युक ऑफ विंडसर’ म्हणून नेमले. त्यानंतर राजाने एक प्रस्ताव मांडला, ज्याला राणी एलिझाबेथ आणि विविध सत्ताधिकाऱ्यांनीही समर्थन दिले. या प्रस्तावाद्वारे वॉलिसचा ‘डचेस ऑफ विंडसर’ आणि ‘रॉयल हायनेस’ म्हणून अधिकार नाकारण्यात आला.
राजघराण्यातून वॉलिसला कटुतेचा सामना करावा लागला. त्यामुळे त्या दोघांना परिवारातील इतर लोकांसोबत राजमहालात राहणे शक्य नव्हते. लग्नानंतर वॉलिस पतीसह फ्रान्समध्ये वास्तव्यास होती. दरम्यान त्यांनी जर्मनीमध्ये जाऊन हिटलरची भेट घेतली. भेटीदरम्यान हिटलरने वॉलिसबाबत ‘ती उत्तम राणी बनू शकली असती’ असे उद्गार काढले. या भेटीची जोरदार चर्चा झाली. काहींनी या भेटीवरून वॉलिस ही जर्मनीची गुप्तहेर असू शकते इथपर्यंत निष्कर्ष लावले. मात्र डचेसने ड्युकला लिहिलेल्या पत्रात या गोष्टींचा उपहासाने केलेला उल्लेख या निष्कर्षांना खीळ बसवतो.
दोघांचा सुखी संसार चालू असताना महायुद्धाच्या परिस्थितीत एडवर्डला बहामा येथे गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले. गव्हर्नरची पत्नी म्हणून वॉलिसने एडवर्डला पूर्ण सहकार्य केले. बालकल्याण आणि रेड क्रॉसबाबत स्थिती सुधारण्यासाठी ती प्रयत्नशील होती. जगात घडत असणाऱ्या राजकीय घटनांबाबत आपले मत मांडण्यास, ठाम भूमिका घेण्यास वॉलिस जराही कचरली नाही. ब्रिटिश आस्थापनेने कायमच वॉलिसवर अविश्वास दाखवला.
अलेक्झांडर हार्डिंगने लिहिले आहे की, ‘तिच्या संशयास्पद ब्रिटिश विरोधी कारवाया या तिचे राणी पद हिरावून घेतले म्हणून बदला घेण्याच्या उद्देशाने प्रेरित होत्या’. ब्रिटन युद्धाच्या काळोख्यात अन्नधान्यासाठी लाचार असताना तिने अमेरिकेत उधळपट्टी केली यावरून ब्रिटिश माध्यमांच्या टीकेलाही तिला सामोरे जावे लागले.
युद्ध परिस्थिती निवळताच वॉलिस व एडवर्ड परत फ्रान्समध्ये राहायला आले. १९५२ साली पॅरिस मुनसिपल अधिकाराखाली त्यांना घर देण्यात आले. त्यानंतरचे बरेचसे आयुष्य वॉलिसने या ठिकाणी व्यतीत केले. जेव्हा १९६५ साली ड्युकच्या डोळ्यांच्या उपचारासाठी ते लंडनला गेले तेव्हा एलिझाबेथ द्वितीय आणि राजकुमारी मरिना यांनी त्यांची भेट घेतली. अखेरीस काही वर्षांनी वॉलिस राणी मॅरीच्या जन्मशताब्दी फलकाच्या अनावरणासाठी राजघराण्यातील सदस्य म्हणून सहभागी झाली. तसेच एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स चार्ल्स या दोघांनीही एडवर्ड आजारी असताना पॅरिसला जाऊन वॉलिस व एडवर्डची भेट घेतली.
आजारामुळे भेटी वाढल्या मात्र हा काळ काही फार दिवस टिकला नाही.१९७२ साली कॅन्सरमुळे एडवर्डचे निधन झाले.
एडवर्डच्या मृत्यूनंतर वॉलिस अधिक कमकुवत झाली. राणीकडून मिळणारा भत्ता आणि पतीची संपत्ती यावर ती आपले आयुष्य जगत होती. उतारवयात डिमेनशियाने तिची अगदी दुरवस्था करून टाकली. शेवटच्या काही वर्षांत तर तिची बोलण्याची शक्तीही गेली होती. तिची शारीरिक स्थिती इतकी बिकट होती की ती शेवटची काही वर्षे अंथरुणाला खिळलेली होती.
वॉलिसची शेवटची वर्षं एकांतातच गेली. असे म्हणतात की डॉक्टर आणि नर्स सोडल्यास तिला भेटायला दुसरे कोणीही येत नव्हते. अखेर या एकटेपणातून आणि आजारातून ती मुक्त झाली. २४ एप्रिल १९८६ रोजी वॉलिसची प्राणज्योत मालवली. पॅरिस मध्ये राहत्या घरी तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या अंतीमयात्रेच्या वेळी ब्रिटिश राजघराण्यातील प्रिन्सेस एलिस, राजमाता एलिझाबेथ आणि राजघराण्यातील इतर काही सदस्य देखील उपस्थित होते. पती एडवर्डच्या कबरीशेजारीच वॉलिसलाही दफन करण्यात आले. तिच्या कबरीला ‘वॉलिस, डचेस ऑफ विंडसर’ असे नाव देण्यात आले आहे.
सतत संशयाच्या आणि हिनतेच्या नजरा झेलत खडतर मार्ग पार करणारी ‘वॉलिस वॉरफील्ड’, ‘सिम्पसन’, ‘डचेस ऑफ विंडसर’ नावाची स्त्री कायमची विसावली. तिच्याबाबत लोकांच्या मनातील ऐकीव माहिती आणि अनुमाने इतकी प्रखर होती, की तिच्या सत्यावर देखील लोकांचा विश्वास बसला नाही. आयुष्याचा सारांश एका वाक्यात सांगताना वॉलिस सिम्पसन एके ठिकाणी म्हणते, ‘ तुम्हाला कल्पना नाही एक महान प्रेमकथा जगणे किती अवघड आहे’. तारुण्यावस्थेत ग्लॅमरस आणि सर्वांच्या डोळ्यात आकर्षणाचा बिंदू असणाऱ्या वॉलिस सिम्पसनचे आयुष्य एखाद्या जादुई परीकथेप्रमाणेच रोमांचकारी होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.