आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
जेव्हा केव्हा आपण जगासाठी धोकादायक असलेल्या गोष्टींचा विचार करतो, तेव्हा आपल्या नजरेसमोर दहशतवाद, अस्थिर देश, बेरोजगारी, जागतिक तापमानवाढ यासारख्या गोष्टी येतात. मात्र, जागतिक समस्या म्हणून एखादा गढुळ पाण्याचा ग्लास कधीच आपल्या नजरेसमोर येत नाही. आता तुम्ही म्हणाल गढुळ पाणी ही काय विचार करण्याची बाब आहे का? तर हो! आजही जगभरातील कोट्यवधी लोकांना दुषित पाणी प्यावे लागत आहे. त्यातून आरोग्याच्या समस्या उभ्या राहतात. सुरक्षित पाणीपुरवठा हा सुदृढ अर्थव्यवस्थेचा कणा आहे, तरीही जागतिक स्तरावर त्याला म्हणावं तितकं प्राधान्य दिलं जात नाही.
भारतातील गावाखेड्यांमध्ये तर ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते, याबाबत कितीही चर्चा केली तरी ती कमीच.
उत्तर प्रदेशमधील गौसगड गावही याला अपवाद नव्हतं. मात्र, आता तेथील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय झाली आहे. ही सोय शासन-प्रशासनाने नाही तर ‘नीरज रोड’नावाच्या व्यक्तीनं केली आहे. नीरज यांनी स्वतःच्या खिशातून ११ लाख रुपये खर्च करून स्वत:च्या जमिनीवर एक वॉटर फिल्टर प्लांट बसवला आहे.
त्यांच्या प्रयत्नांमुळं गावातील सर्व ३ हजार २०० लोकांना शुद्ध पाणी मिळत आहे. नीरज यांनी गावकऱ्यांसाठी लाखो रुपये का खर्च केले? शुद्ध पाण्याची गरज किती मोठी आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हा लेख नक्की वाचा.
‘पाणी’ हा शाश्वत विकासाचा मूलभूत घटक आहे. सामाजिक-आर्थिक विकासासाठी, निरोगी पर्यावरणासाठी आणि मानवी जीवनासाठी पाणी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. १९९७ ते २०११ या काळात मोठ्या प्रमाणात जगभरातील परिसंस्थांचं (इकोसिस्टिम्स) नुकसान झालं असून यामागे पाण्याचं प्रदुषण हा प्रमुख घटक कारणीभूत आहे.
सध्या जगभरातील २.१ अब्ज लोकांना पिण्यासाठी सुरक्षित पाणी उपलब्ध नाही. युनायटेड नेशन्सच्या अभ्यासानुसार, दरवर्षी जितके लोक युद्ध किंवा हिंसेमध्ये प्राण गमावतात, त्यापेक्षा जास्त लोक अस्वच्छ पाण्यामुळं प्राणाला मुकतात. जगातील गरीब राष्ट्रे पाण्यामुळे होणाऱ्या कॉलरा, टायफॉइड आणि आंत्र ताप या आजारांमुळं चिंताग्रस्त आहेत.
दररोज अंदाजे ६ हजार लोक अशा आजारांमुळे मृत्यूमुखी पडतात. पाण्यातील बॅक्टेरियल किंवा विषाणूजन्य दूषित घटक आतड्यांमध्ये विष पसरवू शकतात. त्यामुळं डायरिया आणि उलट्या होऊ शकतात. जागतिक स्तरावर, डायरिया हे आजारपणांचं आणि मृत्यूचं मुख्य कारण आहे.
भारताचा विचार केला, तर जलजन्य रोगांमुळे भारतावर दरवर्षी अंदाजे ६० कोटी युएस डॉलर्सचा आर्थिक भार पडतो. विशेषतः दुष्काळ आणि पूर-प्रवण क्षेत्रांमध्ये ही स्थिती भयानक आहे. युनिसेफनं दिलेल्या माहितीनुसार, भारतातील ५० टक्क्यांपेक्षाही कमी लोकसंख्येला पिण्याचं शुद्ध पाणी उपलब्ध आहे. १९ लाख ६० हजार घरांमध्ये प्रामुख्याने फ्लोराईड आणि आर्सेनिकद्वारे प्रदूषित झालेल्या पाण्याचा पुरवठा होत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, भारतात पाण्यातील अतिरिक्त फ्लोराईडमुळे १९ राज्यांमधील कोट्यवधी लोकांवर विपरीत परिणाम होत आहेत. याशिवाय, भारतातील ७६६ जिल्ह्यांपैकी सुमारे २५६ जिल्हे पाण्याच्या कमतरतेचा सामना करत आहेत.
पाण्याच्या सुरक्षेसाठी सध्याच्या नियोजनाचा अभाव ही एक चिंताजनक बाब आहे. लाखो कुटुंबांकडे सुरक्षित आणि विश्वासार्ह पाण्याचा स्रोत नसल्यानं स्त्रिया आणि मुलं पाण्याच्या शोधात भटकंती करत असल्याचं चित्र आहे. पाण्याच्या शोधात फिरावं लागत असल्यामुळं मुलांची शाळेतील उपस्थिती घटत असून दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये शाळेतील मुलांच्या गळतीचं प्रमाण २२ टक्क्यांनी वाढलं आहे.
उत्तर प्रदेशातील गौसगड गावामध्येही अशीच काहीशी परिस्थिती होती. हे गाव शामली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं आहे. कृष्णा ही यमुनेची उपनदी असून मोठ्या प्रमाणात प्रदूषित आहे. तिच्या काठावर डझनभर गावं वसलेली आहेत, त्यामध्ये गौसगडचाही समावेश होतो. येथील ग्रामस्थांचा दावा आहे की नदीतील प्रदुषित पाण्यामुळं त्यांना विविध प्रकारचे त्वचेचे आजार झाले आहेत. अनेकांचा कॅन्सरमुळंही मृत्यू झाला आहे.
गेल्या तीन-चार वर्षांत हे प्रमाण फार वाढलं आहे. दूषित पाणी प्यायल्यामुळं लोकांना त्वचेचे आणि कॅन्सरसदृश आजार होत आहेत. गावातील महिला सरपंच आणि त्यांच्या पतीनं याबाबत प्रशासनाकडे अनेकदा तक्रार केली. सातत्यानं पाठपुरावा केला मात्र, त्यांना यश मिळालं नाही.
शेवटी गावकऱ्यांच्या हितासाठी गावच्या सरपंच आणि त्यांचे पती नीरज यांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्वखर्चानं स्वत:च्या जमिनीवर एक वॉटर फिल्टर प्लांट उभा केला. त्यासाठी त्यांनी ११ लाख रुपये खर्च केले.
या फिल्टर प्लांटमधून गावातील प्रत्येक घराला १० लिटर शुद्ध पाण्याची होम डिलिव्हरी केली जात आहे. कोणालाही जास्त पाण्याची आवश्यकता असल्यास ते सरपंचाच्या घरी जाऊन वॉटर फिल्टर प्लांटमधून मोफत पाणी आणू शकतात.
नीरज हे गावातील प्रगतीशील शेतकरी आहेत. त्यांच्या पत्नी गावच्या सरपंच आहेत. “निसर्गाच्या कृपेनं मला शेतीतून पैसे मिळत आहेत. मी तेच समाजाच्या कल्याणासाठी खर्च करतो. माझ्या गावात शहरासारख्या सुविधा विकसित करण्याचे माझे स्वप्न आहे”, अशी प्रतिक्रिया नीरज यांनी दिली.
पाण्याच्या सुविधेशिवाय त्यांनी गावात सीसीटीव्ही, रुग्णवाहिका, पथदिव्यांची व्यवस्थाही केलेली आहे. नीरज यांच्या धडपडीमुळं गौसगडची पाण्याची समस्या काही प्रमाणात सुटली आहे. गावातील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत आहे. मात्र, गौसगडच्या शेजारील मुल्लापूर, तितरसी, डाखोडी, जमालपूर, हसनपूर आणि लुहारी या कृष्णा नदीकाठच्या गावांतील अशुद्ध पाण्याची समस्या सुटलेली नाही.
काही संवेदनशील सरकारी अधिकारी जल जीवन योजनेत या गावांना समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या अधिकाऱ्यांना नीरजसारख्या काही लोकप्रतिनिधींची साथ मिळाली तर कदाचित पिण्याच्या पाण्याची समस्या लवकर सुटू शकते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.