आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
या पृथ्वीवर मानव वंश जन्माला आला त्यावेळी तो केवळ एक प्राणी म्हणूनच जन्माला आला. त्याचं आयुष्यही इतर रानटी पशूंसारखं भटक्या स्वरूपाचंच होतं. त्या काळात प्रवासाची कोणतीही साधनं उपलब्ध नसताना मानवाने स्थलांतरित प्राणी आणि पक्ष्यांप्रमाणे हजारो किलोमीटर अंतर पादाक्रांत केलं आणि कुठल्यातरी एखाद्या प्रांतात किंवा खंडात जन्माला आलेला माणूस जगभरात पसरला.
एका खंडापासून दुसऱ्या खंडापर्यंतचं हे खंडप्राय अंतर मानवाने कसं पार केलं असेल? शिवाय पृथ्वी ही सलग, अखंड भूभागाने बनलेली नाही. खंडाखंडांमध्ये समुद्र नावाचा अथांग जलाशय पसरलेला! कोणतीही साधनं नसताना माणसाने हे जलाशय नक्की कसे पार केले असतील? पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागापैकी ७१ टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. अशा वेळी माणसाचं जगणं सुसह्य करणाऱ्या शोधांपैकी अगदी प्राथमिक स्वरूपाचा म्हणता येईल, असा चाकाचा शोध लागण्यापूर्वीच होड्या आणि जहाज यांचा शोध लागला असणार! त्या अर्थी होड्या किंवा तत्सम काही तरंगणारी साधनं हे कदाचित माणसाचं पहिलं-वहिलं वाहन असू शकेल.
माणसांकडून जलाशय ओलांडण्यासाठी नौकासदृश साधनांचा वापर केला जात असल्याचे काही पुरावेही सध्या उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, ग्रीक आणि अमेरिकन पुरातत्व शास्त्रज्ञांना दगडापासून बनवलेल्या कुऱ्हाडीसारख्या साधनांचा शोध सन २०११ मध्ये क्रीट या बेटावर लागला. त्या दगडी कुऱ्हाडी किंवा तत्सम शस्त्रं तब्बल १ लाख ३० हजार वर्षांपूर्वीची आहेत, हे स्पष्ट झालं आहे. याचा अर्थ क्रीट या बेटावर त्या काळात मानवी वस्ती अस्तित्वात होती. हे बेट जमिनीच्या मुख्य भूभागापासून ५० लाख वर्षांपूर्वी तुटून ४० मैल अंतरावर पाण्यात गेले. याचा अर्थ त्या बेटावर वास्तव्य करणाऱ्या माणसांनी तिथे येण्यासाठी होडीसारखं काही तरी साधन वापरलं हे उघड आहे.
अगदी सुरुवातीचे मानववंशीय आफ्रिका खंडात जन्माला येऊन ते पायी, अर्थात जमिनीवरून युरोपपर्यंत पोहोचले, या आत्तापर्यंतच्या समजुतीला या शोधामुळे तडा गेला आहे. याशिवाय इंडोनेशियाच्या फ्लोरेल या बेटावर सध्याच्या मानवाच्या लहानखुऱ्या पूर्वजांचा निवास असल्याचे पुरावे मिळाले आहेत. या मानवी पूर्वजांना ‘हॉबिट्स’ म्हटलं जातं. त्यांचे सापडलेले जीवाश्म तर ७ ते ९ लाख वर्षांपूर्वीचे आहेत. या प्राचीन अधिवासांवरून मानव अगदी प्राथमिक अवस्थेपासून पाण्यातून प्रवास करण्याच्या साधनांचा वापर करत होता, हे स्पष्ट आहे.
सध्याच्या मान्यतेनुसार जगातील सर्वात जुनी नौका ही ‘कयाक’ ठरते, जी ७ ते १० हजार वर्षे जुनी होती. बऱ्यापैकी धड अवस्थेत प्रत्यक्ष आढळून आलेली आणि डागडुजी करून जतन करण्यात आलेली जगातील सर्वात जुनी नौका ही नेदरलँड्समध्ये सापडली. ही नौका ‘पिनस सिल्व्हेस्ट्रिस’ या पाईन वृक्षाच्या खोडातून कोरून बनवण्यात आलेली एक कयाक प्रकारची होडी होती. ही होडी ख्रिस्तपूर्व ८ हजार २०० ते ७ हजार ६०० या कालावधीत बनवण्यात आली आणि वापरण्यात आली. ती सध्या नेदरलँड्समध्ये एसेन इथल्या ‘ड्रेंट्स म्युझियम’मध्ये ठेवण्यात आली आहे.
अशाच प्रकारे तब्बल ८ हजार वर्षांपूर्वी वापरात असणारे तराफेही अनेक ठिकाणी सापडले आहेत. कुवेतमध्ये प्रामुख्याने नदीतल्या प्रवासासाठी वापरण्यात आलेली ७ हजार वर्षं जुनी नौका जतन करून ठेवण्यात आली आहे. सुमेर, प्राचीन इजिप्त आणि हिंदी महासागरात ख्रिस्तपूर्व ४ हजार आणि ३ हजार या कालावधीत नौका वापरल्या जात असल्याचे दाखले मिळतात.
सिंधू संस्कृती आणि मेसोपोटेमिया यांच्यात दळणवळणासाठी नौकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सिंधू खोऱ्यात असणाऱ्या अनेक पुरातत्व स्थळांवर वेगवेगळ्या प्रकारच्या नौकांचे संदर्भही सापडले आहेत. भारतात केरळ राज्यातल्या कालिकतच्या दक्षिणेला असलेल्या बेपोर या छोटेखानी शहरात उलू या शैलीत हाताने कोरून लाकडांच्या नौका तयार करण्याच्या व्यवसायाने चांगलं बाळसं धरलं होतं. मोठ्या आकाराच्या या नौका पूर्णपणे सागवानापासून बनवल्या जात असत. त्यांची मालवाहतुकीची क्षमता तब्बल ४०० टन होती. प्राचीन अरब आणि ग्रीक लोक या बोटीचा वापर वाहतुकीचं साधन म्हणून मोठ्या प्रमाणावर करत असत.
आतापर्यंत अगदी अश्मयुगापासून माणूस पाण्यावर तरंगत प्रवास करत असल्याचे अनेक संदर्भ आपण बघितले असले तरी आज ज्याला खऱ्या अर्थाने होडी किंवा जहाज म्हणता येईल; अशा प्रकारचं साधन बनवण्याचा जगातला पहिला प्रयत्न ज्ञात इतिहासानुसार ख्रिस्तपूर्व ४ हजार मध्ये प्राचीन इजिप्शियन लोकांनी केला. त्यांनी पाण्यातच वाढणाऱ्या एका वनस्पतींच्या कुडाचा वापर करून नौका बनवायला सुरुवात केली. मात्र, त्यांची वहनक्षमता अथवा प्रवासाचा कालावधी फारच मर्यादित होता. ख्रिस्तपूर्व अडीच हजार वर्षांपासून इजिप्शियन लोकांनी समुद्र ओलांडण्यासाठी मजबूत लाकडी नौका बांधण्यास सुरुवात केली. ख्रिस्तपूर्व १५५० ते ३०० पर्यंत, प्राचीन कनानच्या फोनिशियन लोकांनी गॅली नौका वापरल्या. या नौका प्रामुख्याने मालवाहतूक आणि युद्धासाठी वापरण्यात आल्या.
सन १००० मध्ये ‘व्हायकिंग्स’ दर्यावर्दींनी मोठ्या आकाराच्या नौका बांधण्यास सुरुवात केली. या नौकांची क्षमता ६० जण घेऊन जाण्याची होती. या बोटी लांबीला अधिक आणि रुंदीला कमी आकाराच्या होत्या. नद्या आणि उंच लाटांचा सामना करत समुद्रांतून प्रवास करण्यासाठी अतिशय योग्य रचना होती. इसवी सन ११०० च्या सुमारास चिनी लोकांनी जंक नावाच्या नौकांचा वापर करण्यास सुरुवात केली. जंक म्हणजे सुकाणू असलेल्या नौका. या नौकांचा तळ सपाट आणि रुंद होता. या नौकांवर जलरोधक खोल्या किंवा कप्पे असायचे.
सुमारे इ.स. १४५० पासून नंतर बऱ्याच काळापर्यंत अनेक देशांकडून लाकडापासून बनवलेल्या आणि आतमध्ये तीन किंवा चार खांब असलेल्या नौका वापरल्या जात होत्या. या जहाजांचा वापर दर्यावर्दींनी व्यापारी जहाजे म्हणून, मालवाहतुकीसाठी, प्रवासी वाहतुकीसाठी आणि युद्धनौका म्हणून केला.
सन १८०० च्या दशकात डोलकाठी आणि पातळ व हलक्या कापडांच्या शिडाची आटोपशीर रुंदीची जहाजं मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ लागली. सन १८१८ पासून नौकांचा वापर प्रवासी वाहतुकीसाठीही अधिकृतपणे आणि सर्रास केला जाऊ लागला. याच काळात वाफेच्या इंजिनावर चालणारी मोठी जहाजं विकसित करण्यात आली. अशा जहाजांमधून इंग्लंड आणि अमेरिका या दोन देशांमध्ये प्रवासी वाहतूकही सुरू झाली. सन १८१९ पर्यंत वाफेच्या इंजिनावर चालणारी जहाजं अटलांटिक ओलांडण्याच्या क्षमतेची बनली. सन १८४५ मध्ये लोखंडापासून बनवलेलं प्राथमिक स्तरावरचं समुद्री जहाज बांधण्यात आलं.
सन १८५० ते १९१० या काळात कोळशावर चालणाऱ्या नौका डिझेलवर चालायला लागल्या. त्या पाठोपाठ क्रिस्टोफर कॉकरेलने हॉवरक्राफ्ट तयार केली. हवेच्या पिशव्यांवर समुद्रकिनारी असलेल्या या जहाजाखालच्या हवेच्या पिशव्यांमध्ये (एअर पॅड) हवा भरून ती प्रवासासाठी समुद्रात लोटण्यात येते. सन १९८० च्या दशकात ही जहाजं मोठ्या प्रमाणावर मालवाहतुकीसाठी वापरली जात होती. आधुनिक बांधणीच्या या मालवाहू जहाजांमधून एकाच वेळी १ हजार कंटेनर माल वाहून नेला जाऊ शकतो.
सन १९९० च्या दशकापासून प्रवासी वाहतुकीसाठी क्रूझ जहाजांचा वापर केला जाऊ लागला. समुद्रपर्यटन करण्यासाठीच्या या जहाजांवर दुकानं, हॉटेल्स, जलतरण तलाव यासह सर्व प्रकारची ऐषाआरामाची साधनं उपलब्ध असतात. क्रुझची सफर हे सध्याच्या काळात एक प्रतिष्ठेचं लक्षण बनलं आहे.
साध्या मच्छिमार नौकांपासून ते अवाढव्य मालवाहू नौका, अजस्त्र क्रूझ नौका, अनेक लढाऊ विमानांना आपल्या पाठीवर सहज वाहून घेऊ शकणाऱ्या युद्धनौका, पाणबुड्या, कश्मीरच्या दल सरोवरातल्या सुंदर हाऊसबोट्स, अजूनही छोट्या अंतरावरच्या प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या वल्लीच्या होड्या, शर्यतीसाठी वापरल्या जाणाऱ्या होड्या असे नौकांचे सगळेच प्रकार सांगायचे तर एका लेखाएवढी यादी होईल.
माणसाच्या अगदी प्राथमिक अवस्थेपासून ते आजपर्यंत आपल्या स्थित्यंतरांमध्ये सतत साथ देणाऱ्या या नौकांचं वैविध्य आणि त्याचा आजपर्यंतचा प्रवास माणसाच्या उत्क्रांतीएवढाच विलक्षण आहे. म्हणूनच ख्रिश्चन धर्मग्रंथात नोआने बांधलेली ‘आर्क’ नौका किंवा हिंदू महाभारत आणि शतपथ ब्राह्मणासारख्या ग्रंथांमध्ये जलप्रलयातून तारणाऱ्या नौकांचा आदरपूर्वक उल्लेख आढळतो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.