“द बेस्ट फिनिशर” हे बिरूद त्याने वेळोवेळी सार्थ केलं आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


महेंद्र सिंग धोनी हे नाव ऐकता क्षणी आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते एक शांत, संयमी आणि तितकेच धारदार नेतृत्व असलेली व्यक्ती. “महेंद्र” ते “माही” हा त्याचा प्रवास निश्चितच प्रेणादायी आहे.

“MS Dhoni: The Untold Story” या चित्रपटातून त्याचा जीवनप्रवास आपण सर्वांनीच पाहिला. अर्थात त्याचा हा प्रवास पडद्यावर सादर करणे ही तितकेच आव्हानात्मक होते. यात सुशांत सिंग राजपूतने घेतलेली कठोर मेहनत पाहून माहीसुद्धा भारावून गेला होता.

लहानपणापासूनच त्याची क्रिकेटमधले त्याचे स्किल्स त्याच्या प्रशिक्षकांनी योग्य हेरले आणि त्याला त्यानुसार योग्य प्रशिक्षणही दिले. पुढे नोकरी आणि क्रिकेट यातून एकाची निवड करायची वेळ आली तेव्हा अखेर त्याने आपल्या स्वप्नांचीच ट्रेन पकडली. आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पण केल्यापासून त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.

तो भारतीय संघात आला आणि एका नव्या पर्वाची सुरुवात झाली.

माहीच्या “हेलिकॉप्टर शॉट”चे आजदेखील लाखो चाहते आहेत आणि ते नेहमी राहतील यात शंकाच नाही. त्याने भारतीय संघाला एका नव्या वळणावर आणले ज्याची सुरुवात “दादा”पासून झाली होती. सौरभ गांगुलीपासून सुरू झालेले विजयाचे पर्व धोनीने कायम ठेवले आणि भारतीय संघाची दखल घेण्यास इतर देशांना भाग पाडले.

केवळ क्रिकेटमधील नेतृत्वामुळेच नाही तर एक व्यक्ती म्हणूनही तो एक आदर्श बनला.

संघाच्या विजयात नेहमीच सहकाऱ्यांना पुढे करणारा आणि हार झाली तर खंबीरपणे त्यांच्यापुढे उभे राहणारा धोनी. असे नेतृत्व आपण खचितच पाहतो. स्वतःवर झालेल्या टीकेला त्याने कधीच शब्दांनी नाही तर आपल्या कामगिरीने उत्तर दिले. एकूणच त्याची प्रगल्भता थक्क करणारी आणि अविश्वसनीय अशी आहे.

विकेट्सच्या मागे राहून “Super Fast Stumping” करणारा माही हा वेगामध्ये “उसेन बोल्ट”ला देखील मागे टाकेल असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. इतकंच नाही तर निर्णायक क्षणी “DRS” वापरण्याच्या अचूक निर्णयक्षमतेमुळे चाहत्यांनी DRSचे नामकरण “Dhoni Review System” असे केले.

भारत सरकारने त्याला पद्मभूषण, पद्मश्री पुरस्कार या पुरस्कारांनी सन्मानित केले.

धोनी हा एकमेव असा कर्णधार आहे ज्याने ICCच्या २००७ चा २०-२० विश्वचषक, २०११चा एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी या तीनही स्पर्धांमध्ये भारताला विजयाचा मार्ग दाखवला.

तो टेस्ट क्रिकेट च्या कर्णधारपदी असताना १८ महिने भारताचे अव्वल स्थान टिकून होते.

त्याला इंडियन टेरीटोरियल आर्मीने लेफ्टनंट कर्नल या पदाने त्याला सन्मानित केले. हा सन्मान प्राप्त होणारा कपिल देवनंतर धोनी हा एकमेव कर्णधार आहे.

ICC Team Of The Year, ICC Player Of The Year, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, Youth Icon Of The Year, People’s Choice Award, Award for Spirit of Cricket असे अनेक पुरस्कारांनी त्याला गौरविण्यात आले.

सर्वात जास्त इंटरनॅशनल स्टम्पिंग्ज (१६१), ४००० धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक, टेस्ट क्रिकेटमध्ये सौरभ गांगुलीनंतर यशस्वी कर्णधार (२७ विजय), यष्टिरक्षक म्हणून भारताकडून सर्वात वेगवान शतक करणारा (१४८ धावा), कर्णधारपदी असताना सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा (३३१), यष्टिरक्षक म्हणून सर्वात जास्त धावांचा विक्रम (१८५), कर्णधार आणि यष्टिरक्षक दोन्ही असताना सर्वात जास्त एकदिवसीय सामने खेळणारा (१९९), आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्ती षटकार ठोकणारा, ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया मध्ये १४० वर्षात जिंकणारा पहिला कर्णधार असे अनेक विक्रम त्याने आपल्या नावावर केले.

त्याने कायमच नवोदित खेळाडूंना संधी योग्य ती उपलब्ध करून दिली. वरिष्ठ खेळाडूंऐवजी नवोदितांना संधी देण्याच्या त्याच्या निर्णयावर टीका झाली परंतु आपला निर्णय सर्वार्थाने सार्थ ठरवत त्याने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.

महत्त्वाच्या सामन्यात निर्णायक क्षणी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात धाडसी बदल करून तो अनपेक्षित विजयश्री खेचून आणत असे. “द बेस्ट फिनिशर” हे बिरूद त्याने वेळोवेळी सार्थ ठरवलं.

तो खेळत असताना “माही मार रहा है” ही भावनाच फार मनाला सुखावून जाई. आर्मीबद्दल असलेले त्याचे विशेष प्रेम नेहमीच दिसून आले. विश्वचषक झाल्यानंतर जेव्हा निवृतीच्या चर्चांना उधाण आले होते तेव्हा २ महिन्यांसाठी क्रिकेट मधून ब्रेक घेऊन त्याने आर्मी प्रशिक्षण पूर्ण केले.

“दादा”पासून सुरु झालेले “विजयपर्व” अखंड चालू ठेवण्याची जबाबदारी माहीने विराट कोहलीकडे सुपूर्द केली. कोहलीच्या नेतृत्वात प्रगल्भता यावी म्हणून त्याने वेळोवेळी मार्गदर्शन केले. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आलेले चढउतार यशस्वीरीत्या पार करून नम्रता कायम राखण्याचा एक अनमोल संदेश त्याने दिला.

आज त्याच्या निवृतीवरून उलटसुलट चर्चांना पेव फुटले असले तरी मला खात्री आहे की योग्य वेळी तो अचूक निर्णय नक्कीच घेईल आणि असंख्य चाहत्यांचा विश्वास सार्थ ठरवेल. आपल्या कारकीर्दीबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार हा सर्वस्वी त्याचाच असेल. माही पुढचा विश्वचषक खेळेल की नाही माहीत नाही. परंतु त्याने असंख्य भारतीयांचे पूर्ण केलेले विश्वचषकाचे स्वप्न मात्र कधीच कोणी विसरू शकत नाही हे तितकेच खरे.

अंतिम सामन्यात त्याने खेचलेला षटकार आणि त्यावर रवी शास्त्रींनी दिलेली प्रतिक्रिया केवळ अविस्मरणीय!!

जर कोणी मरण्यापूर्वी शेवटची इच्छा विचारली तर, ती धोनीने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मारलेला षटकार असेल असे उद्गार खुद्द सुनील गावसकर यांनी काढले. महेंद्र सिंग धोनी जरी क्रिकेट विश्वातून निवृत्त झाला असला तरी त्याच्या असामान्य कारकिर्दीने तो कायमच स्मरणात राहील यात शंका नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!