गांगुलीने भारताला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दादा बनवलंय!

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


क्रिकेट हा भारतीय खेळ नाही. तरीही भारतात जे क्रिकेट वेड पाहायला मिळते ते इतरत्र कुठेही पाहायला मिळणार नाही. भारतातील क्रिकेट रसिकांसाठी क्रिकेट हा त्यांचा धर्म आहे. एकेकाळी भारतीय क्रिकेट संघ हा कमकुवत संघ असल्याचे मानले जात होते. परंतु, हळूहळू भारतीय संघाने आपली कामगिरी उंचवत नेली आणि आपल्या या प्रतिमेला कायमचा छेद दिला. क्रिकेट जगतातील काही सामने क्रिकेट रसिकांसाठी आजही संस्मरणीय आहेत.

लॉर्डसच्या मैदानावर भारतीय क्रिकेट संघाने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केला तो क्षण आजही क्रिकेट रसिक विसरले नसतील.

२००२ साली नेटवेस्ट सिरीजच्या फायनल मॅचचा तो प्रसंग भारतासाठी अगदीच संस्मरणीय आहे. ही अशी मॅच होती जिथे जवळजवळ भारताची हार निश्चित झाली होती. परंतु युवराज सिंग आणि कैफ या जोडीने हरलेला डाव जिंकून खेळाचा परिणामच उलटा करून टाकला.

२००२ सालापर्यंत क्रिकेटच्या क्षेत्रात भारतीय संघाचा चांगलाच बोलबाला होता. विदेशी दौऱ्यात भारतीय टीमला हलके समजण्याची चूक कोणीही करत नसे.

भारतीय संघात एकाच वेळी क्रिकेटचे तीन दिग्गज खेळाडू खेळत होते. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड.

सेहवागदेखील आपल्या खेळत तरबेज होता.

भारतीय संघाचा कर्णधार होतं सौरव गांगुली. सलग ९ मॅचेसमध्ये हर पत्करावी लागल्याने सौरव गांगुलीवर या मॅचचा चांगलाच दबाव होता. नेटवेस्ट सिरीजची ही फायनल जर जिंकली नसती तर सलग दहावा पराभव भारताच्या पदरी पडला असता. सौरव गांगुलीला आपली आणि आपल्या संघाची क्षमता सिद्ध करून दाखवायची होती.

१३ जुलै २००२ रोजी झालेल्या या मॅचमध्ये सौरव गांगुलीने पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने ८व्या ओव्हर पर्यंत ४२ रन केले होते.

झहीर खान बॉलिंग करत होते. झहीर खानचा स्विंग बॉल ओळखता न आल्याने निक नाईट आउट झाला आणि इंग्लंडचा कर्णधार नसीर हुसेनने बॅटिंग घेतली. हुसैनवरदेखील रन बनवण्यासाठी दबाव होता. नसीरने मार्क ट्रेस्कोथिकसोबत भागीदारी करत १८५ धावांचा डोंगर रचला.

मार्क ट्रेस्कोथिकने १०९ रन बनवले. नसीर हुसेनने ११५ रन बनवले. आशिष नेहराच्या बॉलवर नसीर हुसेन आउट झाला. नसीर हुसेनने चांगली कामगिरी केली होती. नंतर आलेल्या खेळाडूंनी पण चांगली कामगिरी केली. इंग्लंडच्या संघाने ५० ओव्हरमध्ये ५ बाद ३२५ धावांचे आव्हान उभे केले.

इंग्लंडने एवढी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर सौरव गांगुली आपल्या गोलंदाजांवर चांगलंच चिडला होता. कारण, फिल्डिंग करत असताना इंग्लंडच्या टीमला २६०-७० धावांवरच रोखणे हे त्यांचे लक्ष होते. परंतु भारतीय संघाचे हे लक्ष्य साध्य झाले नाही. दहावा पराभव पदरी पडतो की काय ही भीती सौरव गांगुलीला आतून अस्वस्थ करत होती. हीच भीती मनात घेऊन सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग मैदानात उतरले. दोघांनी मिळून शतकाची भागीदारी केली आणि विजयाचा पाया रचला.

५व्या ओव्हरमध्ये भारतीय संघाने १०६ धावा केल्या होत्या. संघाची स्थिती आत्तापर्यंत तरी मजबूत होती. परंतु चांगला शॉट खेळण्याच्या नादात गांगुली आउट झले.

काही काळाने सेहवाग पण बोल्ड झाला. आता २ बाद ११४ धावा अशी परिस्थिती होती.

यानंतर सचिन तेंडूलकर, दिनेश मोंगिया आणि राहुल द्रविड हेही फारशी चांगली कामगिरी न करताच परतले. इंग्लंडला आता विजयाची खात्री वाटत होती. कारण भारतीय संघातील चांगल्या खेळाडूंना त्यांनी परत पाठवले होते. इथून पुढे तर भारताला ही मॅच जिंकणे शक्यच नाही असा इंग्लंडचा पक्का समज झाला होता.

१५० धावाही पूर्ण झाल्या नव्हत्या आणि त्याआधीच भारताचे पाच खेळाडू चीत होऊन तंबूत परतले होते. सर्व फलंदाज लॉर्डस मैदानावर हताश होऊन बसले होते. इकडे इंग्लंडच्या गोलंदाजांची चेंडू फेक अधिक तीव्र होत होती. भारताला २०० चा टप्पा देखील पार करणे अशक्य आहे असे चित्र निर्माण झाले होते. अशातच मोहम्मद कैफ मैदानात उतरला आणि त्याने ५० धावा काढल्या. आता इंग्लंडचा कर्णधार नसीर हुसेनच्या चेहऱ्यावर देखील थोडीशी चिंता दिसू लागली. युवराजसिंगनेदेखील चांगले शॉट लावले. त्यावेळी हे दोन्ही नवोदित खेळाडू होते आणि दोघेही इतकी चांगली कामगिरी करतील याचा कुणीच अंदाज बांधला नव्हता.

दोघांनी मिळून ८० चेंडूत १२१ धावांची भागीदारी केली. यामुळे भारतीय संघाला थोडासा दिलासा मिळाला. आता भारतीय संघाला जिंकण्यासाठी ५० चेंडूत ५९ धावांची गरज होती. कसा बसा ३००चा टप्पा पार केला. आता तर हरभजन आणि कुंबळे देखील बाद झाले होते.

मोहम्मद कैफने कशीबशी गाडी रुळावर आणली होती. आता टीम इंडियाला शेवटच्या दोन ओव्हरमध्ये दोन धावांची आवश्यकता होती तर इंग्लंडला जिंकण्यासाठी दोन विकेटची आवश्यकता होती. नसीर हुसेनच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले होते. शेवटची ओव्हर कुणाला द्यायची यावर विचार विमर्श केल्यानंतर एंड्र्यू फ्लिंटॉपला पाठवण्यात आले.

फ्लिंटॉपने पहिलाच चेंडू डॉट टाकला. त्यावर धावसंख्या वाढली नाही. दुसऱ्या चेंडूत एक धाव घेता आली. आता भारताला ४ चेंडूत १ धाव हवी होती.

तिसऱ्या चेंडूत झहीर खानने कव्हर खेळला आणि धावत सुटला. कैफदेखील विजेच्या वेगाने पळाला आणि शेवटची धाव पूर्ण केली. इंग्लंडच्या संघाचा चेहरा पूर्ण उतरला होता. भारताने ही मॅच जिंकली होती.

सलग ९ पराभव पचवल्यानंतर मिळालेल्या विजयाने गांगुलीला अक्षरश: बेहोष करून टाकले होते. लॉर्डसच्या बाल्कनीत उभे असलेल्या गांगुलीने विजयाच्या जल्लोषात अंगातील टीमची जर्सी काढली आणि ती हवेत फिरवली.

भारतीय संघासाठी हा विजय अगदीच धुंद करणारा होता. भारतीय खेळाडूंनी जल्लोष सुरु केला. सगळ्यात जास्त आनंद तर गांगुलीच्या चेहऱ्यावरून झळकत होता. गांगुलीच्या जल्लोषाने लॉर्डसचे मैदानदेखील त्यादिवशी हादरून गेले होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!