The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लहानपणीच अपघातात हातपाय गमावलेल्या या मुलीच्या जिद्दीला तोड नाही

by द पोस्टमन टीम
3 July 2025
in विश्लेषण, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


२२ वर्षांची उत्फुल्ल् तरूणी.
डॉक्टर आई-वडीलांचा वारसा पुढे चालवण्यासाठी वैद्यकशास्त्र शिकणारी हुशार मुलगी.
चार भावांची लाडकी एकुलती एक बहीण.
एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व.

the postman
डॅनिएला गार्सिया

सँटिआगो – चिलीमध्ये राहणारी डॅनिएला मोठी होऊन डॉक्टर होणार हे जणू ठरलेलेच होते. तिचे आईवडील दोघेही डॉक्टर. वडील एक्सरे तज्ज्ञ आणि आई दंतवैद्य. शालेय शिक्षण पार पाडून डॅनिएला वैद्यकीय शिक्षणासाठी कॉलेजमध्ये दाखल झाली आणि अगदी सहजपणे तिथेही सर्वांची लाडकी झाली. अभ्यासात हुषार, बास्केटबॉल, टेनिस, व्हॉलीबॉलसारख्या मैदानी खेळांमध्येही दमछाक होईपर्यंत घाम गाळणारी डॅनिएला स्विमींगपूलमध्येही मासोळीसारखी लीलया वावरायची. वैद्यकशास्त्राचे एक एक वर्ष यशस्वीपणे पार करत चौथे वर्ष उजाडले. या वर्षात तिच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे, याची पुसटशी देखील कल्पना कोणाला नव्हती.

एका जीवघेण्या अपघाताने एक उमेदीचे आयुष्य उ*द्ध्वस्त केले आणि सुरू झाला एक लढा, नियतीशी.. परिस्थितीशी.. आणि अपघातामुळे जायबंदी झालेल्या स्वतःशी…

३० ऑक्टोबर २००२ – चिली. सँटिआगोपासून सहा / सात तास दूर ‘टेमुको’ शहरात होणार्‍या क्रीडास्पर्धांसाठी चिलीमधल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून विद्यार्थी येणार होते. वर्षातून एकदा भरणार्‍या या क्रीडास्पर्धांना कॉलेज विश्वामध्ये खूप मान दिला जातो. डॅनिएलाच्या कॉलेजमधूनही निवडक खेळाडूंना पाठवले जाणार होते. या निवडक खेळाडूंमध्ये तिचा समावेश झाला होता. मात्र ती जाण्याचे टाळत होती. एक अनामिक भिती तिच्या मनात ठाण मांडून बसली होती. जवळ आलेल्या परिक्षेचे, कधीकधी कुरकुरणार्‍या तब्येतीचे कारण सांगून पाहिले, पण प्रिन्सिपल, प्रोफेसर्स आणि सहकारी खेळाडूंनी आपला आग्रह सुरूच ठेवला. तिला नाही म्हणताच आले नाही. अखेर नाईलाजाने सर्व सहकार्‍यांसोबत क्रीडास्पर्धांना जाण्याचा निर्णय तिने घेतला.



चिलीच्या वेगवेगळ्या भागातून येणार्‍या खेळाडूंसाठी ‘खास बाब’ म्हणून एक वेगळी रेल्वे सोडली गेली होती, ‘खास बाब’ असलेली ही रेल्वे मात्र जुनाट व कमी वापरात असलेल्या डब्यांची बनलेली होती. रेल्वे प्रवासामध्येही ती खिन्न मनाने दूर अंधारात दिसणार्‍या चित्रविचित्र सावल्या बघत बसली होती. बाकी सर्वजण प्रवासाचा आनंद घेत होते, चेष्टामस्करी सुरू होती, नाच, हशा आणि दंगा भरात आला होता पण तिला त्यात भाग घ्यावासा वाटत नव्हता. सतत बडबडणार्‍या, उत्साही आणि खळखळून हसणार्‍या मुलीऐवजी एखादा प्रश्न विचारलाच तर जेमतेम बोलणार्‍या, न हसता खिन्न चेहर्‍याने बसलेल्या निरूत्साही मुलीला बघण्याची सवय कोणालाच नव्हती.

“चला बाजूच्या डब्यात आपले कोणी मित्र भेटताहेत का बघुया!” डॅनिएलासोबत शिकणारा तिचा मित्र म्हणाला आणि काहीही न बोलता पण अनिच्छेनेच डॅनिएला त्याच्यासोबत जायला निघाली. त्यांचा एक मित्रही सोबत चालू लागला.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

रेल्वेच्या एका डब्यातून दुसर्‍या डब्यात जाताना त्यांना एका चिंचोळ्या जागेतून, दोन डब्यांच्या जोडावरून जावे लागणार होते. नेमका तिथला दिवा नादुरूस्त असल्याने तिथे काळोख होता. झपाझप चालत तो मित्र पुढे निघून गेला. डॅनिएला त्याच्या मागे आणि त्यांचा मित्र तिच्या मागे असे जाणार तितक्यात रेल्वेने एक हलकेसे वळण घेतले आणि दोन डब्यांमधल्या त्या जोडामध्ये एक भेग तयार झाली.

नेमक्या त्याच क्षणी डॅनिएला चालता चालता त्या ठिकाणी आली होती. अजाणतेपणे तिने टाकलेले पाऊल दोन क्षण अधांतरीच राहिले, चालण्याच्या नादात तिने मागचाही पाय उचलला आणि डॅनिएला त्या पोकळीमधून ओंडक्यासारखी रेल्वेखाली फेकली गेली. डॅनिएला रेल्वेखाली पडली आणि धडधडत धावणारी रेल्वे तिच्या अंगावरून तिचे अवयव क्रू*रपणे चिरडत निघून गेली. धडाडणार्‍या रेल्वेच्या आवाजात डॅनिएलाच्या किंकाळ्या कोणाला ऐकू जाणे शक्यच नव्हते. मात्र घडलेले नाट्य तिच्या मागे चालणार्‍या मित्राच्या लगेच ध्यानात आले. त्याने धावत पळत जावून पुढे गेलेल्या मित्राला गाठले व सर्वप्रथम रेल्वे थांबवण्यासाठी साखळी ओढली. साखळी ओढल्याचा त्या जुनाट रेल्वेवर काहीही परिणाम झाला नाही, ती तशीच धावत राहिली… रक्ताळलेल्या चाकांसह.

रेल्वेमध्ये असलेल्या बाकी सर्वांनी पटापट आजूबाजूच्या वैद्यकीय सेवांना मोबाईलवरून कॉल करून सतर्क केले. रेल्वे थांबवण्यासाठी काहीजण झपाझप इंजिनाकडे धावू लागले, रेल्वेमधल्या कोणात्याही रेल्वे अधिकार्‍याचा अशा प्रकारच्या अपघातावर विश्वास बसला नाही, त्यामुळे त्यांनी रेल्वे थांबवण्यास नकार दिला. आता सर्वजण रेल्वेचे पुढचे स्टेशन लवकरात लवकर यावे ही प्रार्थना करत होते.

इकडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेली डॅनिएला आश्चर्यकारकरीत्या शुद्धिवर होती. वेदनांनी तळमळत, किंकाळ्या फोडत ती मरणप्राय वेदना सहन करत होती. चेहर्‍यावर उडालेले रक्त पुसण्यासाठी तिने हात चेहर्‍याजवळ नेण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या लक्षात आले की तिचे दोन्ही हात तुटले होते. रेल्वे रूळापासून बाजूला होण्याचा प्रयत्न केला. तिला जागेवरून हालता येत नव्हते, सगळे बळ एकवटून तिने आपल्या पायांकडे बघितल्यावर तिला जे दिसले त्यावर तिचा दोन क्षण विश्वासच बसला नाही. तिचे दोन्ही पायही तुटले होते. रेल्वे क्रू*रपणे डॅनिएलाच्या हातापायांवरून गेली होती.

आता मात्र ती मदतीसाठी आक्रोश करू लागली. डॅनिएलाच्या या किंकाळ्या सुदैवाने तिथे जवळ फिरत असलेल्या एका रिकार्डो मॉरल्स या शेतकर्‍याच्या कानावर आल्या व त्याने आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तिची गंभीर अवस्था त्याच्या लगेचच लक्षात आली, तिथून थोड्या लांब अंतरावर असलेल्या एकमेव फोनवरून त्याने तत्काळ अँब्युलन्स व वैद्यकीय सेवांना परिस्थितीची जाणीव करून दिली व त्यांची वाट पाहू लागला.

अवघ्या चार मिनीटात अँब्युलन्स आणि बाकी इमर्जन्सी सर्व्हिसेस रिकार्डो मॉरल्सने फोन केलेल्या ठिकाणी पोहोचल्या. आपण परतेपर्यंत डॅनिएला जिवंत असेल की नाही याची त्याला खात्री नव्हती. रेल्वेखाली आलेल्या व्यक्तीची अवस्था ऐकून इमर्जन्सी सर्व्हिसेस टीमलासुद्धा अपघाताच्या ठिकाणी कोणी जिवंत असण्याशी शक्यता वाटत नव्हती. पण डॅनिएलाच्या मनात काही वेगळेच होते.

स्वत: वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेत असल्याने तिला आपल्या जखमांची जाणीव झाली होती. हातापायांवरील भीषण जखमांमुळे आपण भरपूर रक्त गमावले आहे हे ही तिच्या लक्षात आले. त्याही परिस्थितीमध्ये तिने स्वतःला शांत केले, व वेदनांनी तळमळत निश्चय केला “मला जगलंच पाहिजे!”

तितक्या वेळातही रक्ताच्या वासाने तिच्या आजुबाजूला कुत्र्यांचे टोळके जमले होते व गुरगुरत जिभा वासत तिचे लचके तोडण्याचा प्रयत्न करत होते. मदतीसाठी आरडाओरडा करत व तुटलेल्या हातापायांसह डॅनिएला जमेल तशा हालचाली करून कुत्र्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होती. थोड्याच वेळात अँब्युलन्स व वैद्यकीय सेवांची पथके तिच्याजवळ पोहोचली. दोन रेल्वेरूळांमध्ये पडलेल्या, गंभीर जखमी असलेल्या तरीही शुद्धीवर असलेल्या या मुलीला बघून ते भयचकित झाले. तिला पटकन एका स्ट्रेचरवरून अँब्युलन्समध्ये ठेवले गेले. काही जणांनी इतस्ततः विखुरलेले तिचे अवयव गोळा करण्यास सुरूवात केली.

त्या परिस्थितीतही शुद्धीवर असलेल्या डॅनिएलाने आपले नाव, पत्ता व घराचा फोन नंबर वगैरे माहिती बिनचूक सांगितली. सुदैवाने रेल्वेने डॅनिएलाच्या डोक्याला एकही जखम केली नव्हती, तिच्या सर्व जाणीवा पूर्णपणे जिवंत होत्या. सर्व वेदना ती जागेपणी सहन करत होती.

“मी ठीक होईन का..??”

रेल्वेरूळाजवळ स्ट्रेचरवरती ठेवल्यापासून हॉस्पिटलपर्यंत पोहोचेपर्यंत प्रत्येकाला डॅनिएला हा प्रश्न विचारत होती.

तिच्या जखमा साफ करण्यात, तिच्यावर प्रथमोपचार करण्यात सर्वजण गर्क होते. अनेकजण तिला उत्तर द्यायचे टाळत होते. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावरही तिचा हा धोशा सुरूच होता. एका प्रेमळ चेहर्‍याच्या हसतमुख डॉक्टरांनी आश्वस्त केल्यानंतर ती शांत झाली. गंभीर अवस्थेतल्या डॅनिएलाला ताबडतोब ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. आश्चर्यकारकरित्या त्या वेळेपर्यंत ती शुद्धीवर आणि जाणीवेत होती. घरच्यांचे फोन नंबर, पत्ता, नावे वगैरे माहिती लागेल तिथे अचूकपणे सांगत होती. वेदनाशामके आणि भुल येणार्‍या औषधांचा मारा सुरू झाल्यानंतर जणू सर्व काही तिथल्या तज्ज्ञांकडे सोपवून, डोळे मिटून ती शांतपणे झोपी गेली.

ऑपरेशन बराच वेळ चालले. तज्ज्ञ डॉक्टर जखमा साफ करण्यात आणि रक्तस्त्राव लवकरात लवकर थांबवण्यात प्रयत्नांची शर्थ करत होते. रेल्वेरूळाच्या आजूबाजूला पडलेले तिच्या हातापायांचे तुकडे जोडण्याची शक्यता पडताळून पाहिली गेली परंतु रेल्वेच्या चाकांनी इतक्या विचित्र पद्धतीने तिचे हातपाय चिरडले होते की ते पुन्हा जोडणे निव्वळ अशक्य होते. अत्यंत अनिच्छेने तिच्या हातपायांच्या जखमा आहेत त्या अवस्थेत शिवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.

इकडे सँटिआगोमध्ये डॅनिएलाच्या घरी अपघाताची बातमी कळताच सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. अत्यंत बेचैन मनस्थितीमध्ये त्यांनी लगेचच डॅनिएलावर शस्त्रक्रिया सुरू असणार्‍या हॉस्पिटलकडे धाव घेतली. कुटुंबासोबत डॅनिएलाचा जवळचा मित्र रिकार्डो स्ट्रबही होता. डॅनिएला कोणत्या अवस्थेत आपल्याला दिसणार याची काळजी सर्वांनाच लागली होती. तिला पाहून सर्वांना धक्का बसला. कांही तासांपूर्वीची घरातून बाहेर पडलेल्या डॅनिएलाची परिस्थितीने केलेली क्रू*र चेष्टा ते बघून सर्वजण रडत होते. डॅनिएला शुद्धीवर नव्हती, आणखी दोन तास ती शुद्धीवर दिवस येणार नव्हती.

औषधांमुळे कोमामध्ये गेलेली डॅनिएला शुध्दीवर आली व नंतर सँटियागोमधल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. पुढे जवळपास दीड महिना ती हॉस्पिटलमध्ये होती. हातापायाच्या जखमा हळूहळू बर्‍या होत होत्या. अचानक आलेले परावलंबीत्व ती कसे स्वीकारणार याचीही सर्वांना काळजी होती. या दरम्यान हात व पाय नसतानाही ती हातापायाला होणार्‍या असह्य वेदनांना तोंड देत होती. वैद्यकीय परिभाषेत याला Phantom Pain म्हणतात. या वेदना मूलत: मानसिक असतात. रेकी व अन्य उपचारांनी तिने यावर मात केली.

यादरम्यान डॅनिएलाच्या वडिलांनी कृत्रिम अवयव बसवण्यासाठी व त्या प्रकारच्या पुढच्या उपचारांबाबत शोधाशोध सुरू केली. अनेक ठिकाणी संपर्क साधून, माहिती मिळवून शेवटी त्यांनी प्रख्यात Moss Rehabilitation Institute मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. जखमा बर्‍या झाल्यानंतर लगेचच फेब्रुवारी महिन्यात डॅनिएला तिथे पोहोचली. आपल्या नव्या अवयवांची ओळख करून घेण्यासाठी, त्यांची सवय करून घेण्यासाठी ती तिथे सहा आठवडे रहाणार होती.

यादरम्यान तिचे गुरू बनले डॉक्टर अल्बर्ट एस्क्वेन्झी. Moss Rehabilitation Institute मधले एक तज्ज्ञ डॉक्टर. यांनी आपला उजवा हात प्रयोगशाळेमधील एका स्फो*टामध्ये गमावला होता, परंतु हाताच्या अभावाचा कोणताही फरक पडू न देता ते सर्व कामे हाताच्या जागी जोडलेल्या हूकच्या सहाय्याने लीलया पार पाडत असत.

the postman
डॉक्टर अल्बर्ट एस्क्वेन्झी

“Your life is what you do with it.” डॉक्टर अल्बर्ट एस्क्वेन्झींचे आश्वासक शब्द कानी पडले आणि डॅनिएला सज्ज झाली, एका नवीन आव्हानाला तोंड देण्यासाठी. कृत्रिम अवयवांचा वापर कसा करायचा ते शिकण्यासाठी. रोज सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या गराड्यामध्ये व्यायाम करणे, आधाराच्या सहाय्याने चालणे, शरीराला जोडलेल्या अवयवांचा वापर करण्यास शिकणे, त्यांची सवय करून घेणे या गोष्टी ती शिकत होती व प्रचंड वेगाने आत्मसात करून घेत होती.

अनेकदा तिला शिकवणारे प्रशिक्षक, डॉक्टर व तज्ञ लोक बुचकळ्यात पडत असत कारण बरेचसे लोक एखाद्या अवयवाच्या अभावामुळेही मानसिकदृष्ट्या कमकुवत झालेले असतात व त्यांना नवीन काही शिकवणे ही अशक्यप्राय बाब असते मात्र डॅनिएला या सगळ्याला ढळढळीत अपवाद होती. तिने लवकरच नवीन अवयवांना आपलेसे करून घेतले व सर्व दैनंदिन कामे लीलया पार पाडू लागली.

the postman
कृत्रिम हात आणि पायांसह हसतमुख डॅनिएला

डॉक्टर अल्बर्ट एस्क्वेन्झी आणि सर्व कर्मचारी मात्र काळजीत पडले होते. खूप आत्मविश्वासाने कृत्रिम अवयवांच्या सहाय्याने जरी सर्व कामे करता येत असली तरी हे अवयव मानवी हाताला आणि हाताच्या कार्यक्षमतेला पर्याय ठरत नाही याची त्यांना पूर्णपणे जाणीव होती. एखादे काम कृत्रिम अवयवांच्या सहाय्याने जमले नाही तर तिचा आत्मविश्वास डळमळू नये म्हणून डॉक्टर अल्बर्ट एस्क्वेन्झींनी डॅनिएलाला स्पष्ट जाणीव करून दिली.

“तुला तुझ्या हातांची उणीव कायम भासेल, कोणतीही गोष्ट तुझ्या हातांइतकी कार्यक्षम असणार नाही. नियतीला दोष देऊन तू परावलंबी आयुष्य जगू शकतेस किंवा परिस्थितीशी झगडून जे मिळाले आहे त्यातून सर्वोत्तम साकारू शकतेस. तुला यातली एकच गोष्ट निवडावी लागणार आहे.”

डॉक्टर अल्बर्ट एस्क्वेन्झींचा आदर्श मानत डॅनिएलाने मानसिक बळ गोळा केले व पुनश्चः कॉलेजमध्ये परतून आपले शिक्षण पूर्ण करण्याचा निश्चय केला. कॉलेजमध्ये परतून शिक्षण पूर्ण करतानाही ते कृत्रिम अवयवांसदर्भातच असेल असेही तिने ठरवले.

कॉलेजमध्ये परतून तिने कोणत्याही विशेष सवलती न घेता शिक्षण पूर्ण केले. “First Quadrilateral
Amputee Physician in the World” असा मानही तिने मिळवला. रिहॅब डॉक्टर म्हणून तिने स्वत:ला कामात बुडवून घेतले.

नोव्हेंबर २००३ मध्ये एका संध्याकाळी घरी बसून Telethon Fundraising Marathon Event टीव्हीवर पाहताना तिच्या मनात अचानक एक विचार आला व अचानकपणे तिने त्या कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रम संपत आला असताना तिच्या आगमनाने कार्यक्रमाला हजर असणारे व संपूर्ण देशाभरातून टीव्हीद्वारे पाहणारे प्रेक्षक अवाक् झाले.

तिच्या अपघाताला भरपूर प्रसिद्धी मिळाली होती, रेल्वे खात्यानेही डॅनिएलाला अविश्वसनीय नुकसान भरपाई दिली होती. सर्वांना या गोष्टींचे कुतूहल असतानाच अचानक कार्यक्रमाला हजेरी लावून व त्यांच्या देणगीमध्ये भरभक्कम भर घालून डॅनिएला सर्वांच्या गळ्यातील ताईत बनली. घडलेल्या अपघाताला सामोरे जाऊन, परिस्थितीवर मात करून, आयुष्याला नवे वळण देणार्‍या डॅनिएलाचे सगळीकडून कौतुक होवू लागले. चिली सरकारनेही तिला “Woman of the Year” सारख्या सन्मानाने सलग दोनदा गौरवले.

आज डॅनिएला कृत्रिम हातांच्या सहाय्याने खास तिच्यासाठी बनवलेली गाडी वापरते, स्वतः वेगवेगळे पदार्थ बनवते. एक सामान्य मनुष्य जी कामे करतो ती सर्व कामे आपल्या कृत्रिम हाताच्या सहाय्याने करण्याचा प्रयत्न करते. अपघाताच्या क्षणापासून बदललेले आपले आयुष्य तिने शब्दबद्ध केले आहे.

the postman
डॅनिएला चे आत्मचरित्र – “I chose to Live”

तिच्याकडे पाहून सहानुभुती दाखवणार्‍यांना, अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करणार्‍यांना ती सांगते, “It’s a Happy Story”

आयुष्याला कलाटणी देणार्‍या दुर्दैवी घटना घडूनही नियतीच्या आव्हानाला समर्थपणे तोंड देणार्‍या डॅनिएलाचा थक्क करणारा प्रवास पाहिला की नकळत तिचेच शब्द उमटतात.. “It’s a Happy Story.”

– मनोज शेडबाळकर


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: daniela garcia
ShareTweet
Previous Post

नोस्ट्राडेमसने कोरोनाबद्दल भविष्यवाणी केली होती हे खरं आहे का?

Next Post

काय असते व्हर्चुअल रॅली? कसं केलं जातं नियोजन?

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

19 August 2024
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

काय असते व्हर्चुअल रॅली? कसं केलं जातं नियोजन?

हस्तांदोलन करण्याची प्रथा नेमकी कधी आणि का रूढ झाली?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.