आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
नोस्ट्राडेमस हा १६ व्या शतकातील एक डॉक्टर आणि कवी होते. शिवाय ते देश आणि जगाच्या संबंधाने भविष्य कथनही करत असत. त्यांनी जगाच्या भविष्यासंबंधी केलेली भाकिते आजही खरी ठरतात असे म्हटले जाते. ज्योतिष शास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या मते, त्यांनी राजकारण, दहशतवाद आणि नैसर्गिक आपत्तींच्या बाबतीत केलेली भाकिते बऱ्याचदा खरी ठरलेली आहेत.
आज संपूर्ण जग कोरोना महामारीच्या तडाख्यात सापडले आहे. जगभर याचा प्रादुर्भाव वाढतो आहे. मोठमोठे देश देखील कोरोना महामारीपुढे हतबल झाले आहेत.
नोस्ट्राडेमसने १६ व्या शतकात कोरोना महामारी विषयी भविष्यवाणी केली होती आणि आज ती अगदी तंतोतंत खरी ठरली आहे असे नोस्ट्राडेमसच्या अनुयायांचे मत आहे. फक्त कोरोना व्हायरसच नाही तर मास्कचा देखील नोस्ट्राडेमसने उल्लेख केला होता असाही दावा या अनुयायांकडून करण्यात येत आहे.
स्पॅनिश फ्लू नंतर कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला आपल्या संसर्गाने जखडून टाकले आहे. जगभरात अक्षरश: कोरोनाने हाहाकार माजवला आहे. वैज्ञानिकांना या व्हायरसवर लस शोधण्यात अजूनही यश मिळाले नाही. पण, यावर लस शोधण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच आहे. मात्र भविष्य कथन करणाऱ्या काही लोकांनी अशा रोगाबद्दल आधीच चेतावणी देऊन ठेवली होती, अशीही चर्चा एकीकडे सुरु आहे. या सगळ्या भविष्य कथनकारांमध्ये नोस्ट्राडेमसचा नंबर खूपच वरचा लागतो. फ्रांसच्या या भविष्यवेत्याने आपल्या संदिग्ध भाषेत या रोगाविषयीची भाकणूक करून ठेवली होती असे म्हटले जाते.
नोस्ट्राडेमसने आपल्या लेस प्रोफेटाइस या प्रसिद्ध ग्रंथात या महामारीविषयी लिहून ठेवले असल्याचे सांगितले जात आहे.
फ्रांसच्या सेंट-रेमी-दि-प्रोव्हिन्स या ठिकाणी १५०३ साली नोस्ट्राडेमसचा जन्म झाल. नोस्ट्राडेमस हे एक वैद्य होते आणि कवीदेखील होते. याशिवाय, त्यांना भविष्याचा अंदाज बांधण्याचाही छंद होता. त्यांनी आपल्या गोपनीय भाषेत लिहून ठेवलेली अशी कितीतरी भाकिते खरी ठरली असल्याचे म्हटले जाते.
त्यांच्या लेस प्रोफेटाइस या ग्रंथात त्यांनी नैसर्गिक आपत्तींच्या अनुषंगाने तब्बल ९५० भाकिते केली आहेत. यापैकी कित्येक कथने तंतोतंत खरी झाली असल्याचा त्यांच्या अनुयायांचा दावा आहे. तसेच नोस्ट्राडेमसने कथनही केल्याप्रमाणे कोरोना महामारीचे भविष्यही तंतोतंत खरे ठरेल आहे असाही दावा हे अनुयायी करता आहेत.
हिरोशिमा नागासाकीवर झालेल्या अणुबॉम्बच्या हल्ल्याचे भविष्यकथन नोस्ट्राडेमसने केले होते. याशिवाय, फ्रेंच राज्यक्रांती, ग्रेट फायर ऑफ लंडन आणि ९/११च्या दहशतवादी हल्ल्याचेही भविष्य नोस्ट्राडेमसने अचूक वर्तवले होते, असे या अनुयायांचे म्हणणे आहे.
इतकेच नाही तर अडॉल्फ हिटलर आणि दुसऱ्या महायुद्धाचे भाकीतही त्याने केले होते असे म्हटले जाते. याच कारणामुळे त्यांच्या अनेक अनुयायांचा असा विश्वास आहे की, कोरोना व्हायरसच्या संबंधानेदेखील नोस्ट्राडेमसने १५५५ मध्येच अचूक भविष्यकथन केले होते.
नोस्ट्राडेमसने आपल्या लेस प्रोफेटाइस या ग्रंथात खालील चार ओळी लिहिल्या आहेत –
There will be a twin year (2020) from which will arise a queen (corona)
who will come from the east (China)
and who will spread a plague (virus) in the darkness of night, on a country with 7 hills (Italy)
and will transform the twilight of men into dust (death),
to destroy and ruin the world.
It will be the end of the world economy as you know it.
भविष्य कथनावर विश्वास ठेवणारे आणि विशेषत: नोस्ट्राडेमसला मानणाऱ्या अनुयायांच्या मते, या चार ओळीतून नोस्ट्राडेमसने कोरोना विषयी विशिष्ट संकेत दिले आहेत. त्याच्या मते, ट्वीन इयर म्हणजे २०२० साल, इस्ट म्हणजे चीन, प्लेगचा अर्थ कोरोना व्हायरस आणि मेन इनटू डस्टचा संबंध त्यांनी मृत्यूशी जोडला आहे.
अर्थात, यात काही तथ्य आहे का, हे तपासण्यासाठी काही लोकांनी याची उलट तपासणी करून पहिली. नोस्ट्राडेमसने आपल्या लेस प्रोफेटाइस या ग्रंथात कुठेच या चार ओळी लिहिलेल्या नाहीत असे आढळून आले.
न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये फ्रेंचचा अभ्यास करणारे आणि इतिहासाचे प्राध्यापक असलेले प्रोफेसर स्टीफन गेर्सन यांच्या मते नोस्ट्राडेमसच्या ग्रंथात या चार ओळी कुठेही आढळत नाहीत. या ओळी मुळात त्याच्या ग्रंथातून घेतलेल्याच नाहीत असा त्यांचा दावा आहे. अर्थात, १६ व्या शतकापर्यंत प्लेगचा प्रादुर्भाव होत होता, त्यामुळे नोस्ट्राडेमसने आपल्या ग्रंथात ठिकठिकाणी प्लेगचा उल्लेख केलेला आढळतो. पण, त्याच्या ग्रंथात वरील चार ओळी कुठेच आढळत नाहीत. याचाच अर्थ या ओळी नोस्ट्राडॅमसच्या अजिबात नाहीत. त्यामुळे नोस्ट्राडॅमसने कोरोनाचे भाकीत १६ व्या शतकातच केले होते या दाव्यामध्ये काहीच तथ्य राहत नाही.
परंतु, इतरही असे अनेक भविष्यवेत्ते आहेत ज्यांनी या कोरोना रोगाविषयी भविष्यवाणी केली होती असा दावा करण्यात येतो. यात विज्ञान कथा लिहिणारे प्रसिद्ध अमेरिकन लेखक डील कोंट्झ यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या ‘द आईज ऑफ डार्कनेस’ या पुस्तकात अशा रोगाचा संदर्भ आला होता. हे पुस्तक १९८१ साली प्रकाशित झाले होते. त्याकाळी या पुस्तकाचा खप खूप झाला होता आणि लोकांकडून ते वाचले गेले होते.
या पुस्तकात वुहान४०० नावाच्या व्हायरसचा उल्लेख आढळतो. चीनने जैविक हत्यार म्हणून या व्हायरसचा वापर केल्याचेही या पुस्तकात म्हटले होते. या पुस्तकाला देखील कोरोना आणि चीनशी जोडले जात आहे.
अनेकांना कोरोना महामारीच्या प्रसाराबद्दल चीन दोषी आहे असे वाटते. याशिवाय, एंड ऑफ डेज या सिल्विया ब्राऊन या अमेरिकन लेखिकेच्या पुस्तकाचा हवाला देऊनही यात कोरोना विषयी भाकीत केले गेल्याचे बोलले जात आहे. हे पुस्तक बारा वर्षापूर्वी प्रकाशीत झाले होते. २००८ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकात न्यूमोनिया सदृश्य आजाराचा उल्लेख आहे. विज्ञान कथा लिहिणारे लेखद अॅस्टरहोम यांच्या डेडलिएस्ट एनेमी: अवर वॉर अगेन्स्ट किलर जर्म्स या पुस्तकात देखील कोरोना विषयी भाकीत केले गेले असल्याचे म्हंटले जात आहे.
अर्थात, कोरोनामुळे आजपर्यंत जगभरात ६३ लाख ७० हजारहून अधिक लोक बाधित झाले असून जवळपास पावणे चार लाखाच्या वर मृत्यू झाले आहेत. या व्हायरसवर संशोधकांना अद्यापही लस शोधण्यात यश आलेले नाही. याउलट, कोरोना आणि त्यासंबधी आजाराबद्दल गैरसमज आणि अफवांचा प्रसार मोठ्याप्रमाणावर होता आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.