आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
इस्लामचे पाच स्तंभ आहेत. तौहिद, नमाज, जकात, रोजा आणि पाचवा म्हणजे हज यात्रा. एका सच्चा मुसलमानाने आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करावी असे मानतात. रमजानच्या शेवटच्या महिन्यात हजची यात्रा सुरू होते. सौदी अरेबियामध्ये असलेल्या मक्केला हज यात्रेसाठी जगभरातून लाखो मुस्लिम येतात. भारतातून देखील लाखोंच्या संख्येने लोक हजला जातात.
भारत सरकार पूर्वी हजला जाणाऱ्या भाविकांसाठी दरवर्षी विशेष नोट काढत असे. या हज नोटा दोन प्रकारच्या होत्या. एक निळ्या रंगाची १० रुपयाची नोट आणि दुसरी लाल रंगाची १०० रुपयांची नोट.
या नोटांचा रंग आकार मुद्दाम वेगळा ठेवला होता जेणेकरून त्या लगेच ओळखू येतील. या नोटा हज यात्रींना अगदी निघण्याच्या अगोदर दिल्या जात. पुढे यांना रियालच्या बदल्यात देऊन त्यांना खर्च करता येत.
१९५९ साली सर्वप्रथम या नोटा जारी करण्यात आल्या. १९७०च्या मध्यात यांना बंद करण्यात आले. नोटांचं वितरण मुंबई आणि दिल्ली येथून निघण्यापूर्वी हज कमिटीचे अधिकारी करायचे.
विशेष म्हणजे या नोटांवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये हज असे छापून येत असे. या नोटांवर जो नंबर असायचा त्या नंबरच्या आधीदेखील HA असे लिहिले असायचे.
जेव्हा आखाती देशांनी या नोटा स्वीकारणं बंद केलं त्यावेळी सरकारने नोटा बंद केल्या. आता काही लोकांनी या नोटा संग्रह म्हणून जपून ठेवल्या होत्या. ज्यावेळी या नोटा बंद करण्यात आल्या त्यानंतर काही लोकांनी त्या विकायला काढल्या. यातील एक नोट जवळपास ४९ लाखाला विकली गेली होती.
एक काळ असा होता जेव्हा सौदी आणि भारतीय मुद्रा यांची किंमत एकसारखी होती. लोक चोरून परवानगीपेक्षा जास्ती पैसे घेऊन जायचे. जेव्हा भारतीय मुद्रा आपल्याकडे परत यायच्या त्यावेळी त्या जेवढ्या दिल्या असायच्या त्यापेक्षा कायमच जास्ती असायच्या. हे थांबवण्यासाठीच वेगळ्या हज नोटा भारत सरकारने चालू केल्या.
आता या यात्रींना जेव्हा ते हजसाठी निघतात तेव्हा २१०० रियाल एवढी रक्कम दिली जाते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.