आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपल्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून शवर्मा हे एक स्ट्रीट फूड म्हणून विकले जाते. पण त्याचा उदय इथे झालेला नाही. मुंबई आणि महाराष्ट्रात जसा वडापाव, अगदी त्याचप्रमाणे शवर्मा अरेबिक आणि मध्य-पूर्वेच्या देशांमधील प्रमुख स्ट्रीट फूड. याची सुरुवात झाली तुर्कस्तानात, अठराव्या शतकात, ऑट्टोमन साम्राज्या दरम्यान. यामध्ये चिकन, मटण, बीफ, टर्की किंवा अन्य मांसाच्या पातळ चकत्या एका लोखंडी कोनच्या सभोवताली गुंडाळल्या जातात आणि त्याला मसाल्यांबरोबर तीव्र आचेवर भाजले जाते.
शवर्मा हे ग्रीक खाद्यान्न गायरोसारखेच आहे, यामध्ये पूर्वी मसाले घातले जात होते, त्यानंतर यात औषधी वनस्पतींचा देखील समावेश होऊ लागला. गायरोबरोबर हुमूस आणि ताहिनी देखील दिले जात असत. हुमूस हे देखील अरब आणि मध्य पूर्वेतील सॉससारखे खाद्यान्न आहे, जे शिजवलेले चिकनपीस आणि ताहिनीबरोबर मिसळून तयार केला जातो. त्झात्झिकी नावाचा यॉगर्ट सॉस सहसा गायरोसोबत दिला जातो.
लेबनॉन आणि जॉर्डनमध्ये शवर्मा ही राष्ट्रीय डिशच आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, शवर्मा सहसा मटण किंवा बीफ किंवा दोघांच्या मिश्रणाने बनवले जाते. अनेक ठिकाणी चिकन देखील वापरले जाते. धणे, हळद, काळीमिरी, जिरे, सुमन आणि असेच इतर मसाले वापरून शवर्माला मंद आचेवर भाजतात.
शवर्मा सहसा पिटा ब्रेडसोबत हुमस, तांदूळ, आणि इतर अरबी पदार्थांसह सर्व्ह केले जाते. मध्यपूर्वेतील रस्त्यावरील अनेक विक्रेते फ्रेंच फ्राईज्-सोबत शवर्मा सर्व्ह करतात, प्लेटमध्ये फ्रेंच फ्राईज् वेगळ्या दिल्या जातात किंवा पिटा ब्रेडने गुंडाळलेल्या मांसाच्या आत त्या ठेवतात. शवर्माच्या असंख्य आवृत्त्या देखील आहेत. तुर्कीमधील इस्तंबूलमध्ये लोकप्रिय असलेला एक प्रकारचा शवर्मा हा मटणाचा आणि भाजलेल्या टोमॅटोचा वापर करून बनवला जातो.
शवर्मा हा जर्मनी आणि स्वित्झर्लंडमधील तुर्की समुदायांमध्ये, एक लोकप्रिय पदार्थ आहे. याशिवाय इस्रायलमध्ये, अरब आणि ज्यू अशा दोन्ही समुदायांमध्ये शवर्मा हे एक सामान्य, आणि विशेष आवडीचे स्ट्रीट फूड आहे, ज्यू लोक शवर्मा तयार करताना कोशर पद्धतीचा वापर करतात तर अरब लोक हलाल तंत्राचा वापर करतात. इस्रायलमध्ये “टर्की” हे शवर्मात वापरले जाणारे सर्वांत लोकप्रिय मांस आहे.
१९५०-६० च्या दशकात लेबनीज निर्वासितांनी मेक्सिकोमध्ये पहिल्यांदा शवर्मा आणलं. ज्याप्रमाणे शवर्मा बनवला जातो, तसेच तंत्र मेक्सिकोमध्ये डुकराचे मांस शिजवण्यासाठी वापरले जात होते, त्यामुळे मेक्सिकोमध्ये शवर्माला टॅकोस अल पास्टर किंवा शेपहर्ड्स’ टॅकोस असे नाव पडले. वाचून कदाचित आश्चर्य वाटेल, पण ‘व्हेजिटेरियन शवर्मा’ ही डिश देखील मध्यपूर्वेत प्रसिद्ध आहे. कोबी, कांदा आणि इतर भाज्या भाजून ते तयार केले जाते.
निर्वासितांच्या माध्यमातून शवर्मा आणि कबाबसारखे पदार्थ युरोप आणि अमेरिकेत पोहोचले. आज युरोपमध्ये, कबाब उद्योग प्रत्यक्षात सुमारे ३.५ अब्ज युरोंचा आहे. या तुलनेत फास्ट फूड फ्रँचायझी पॉपायजची (Popeyes) किंमत १.६ अब्ज युरो आहे. असा हा शवर्मा संपूर्ण जगामध्ये लोकप्रिय होत आहे.
भारतात सर्वप्रथम केरळमध्ये हे स्ट्रीटफूड प्रसिद्ध झाले. गेली अनेक वर्षे केरळमध्ये हे विकले जात असून ते आता केरळचे देखील आवडते स्ट्रीटफूड बनले आहे. केरळबरोबरच अन्य राज्यात देखील आता शवर्माची क्रेझ आलीये. पण भारतात शवर्मा तयार करताना कोणत्याही प्रकारचे नियम पाळले जात नाहीत असे निदर्शनास आले आहे.
कारण या प्रसिद्ध स्ट्रीटफूडने केरळमध्येच अनेकांचा जीव धोक्यात घातल्याच्या बातम्या मागील वर्षापर्यंत येत होत्या. यांमध्ये एका सोळा वर्षीय मुलीचा देखील समावेश होता.
एप्रिल २०२२ च्या सुरुवातीला केरळच्या कासरगोडमध्ये शवर्मा खाल्ल्यानंतर १६ वर्षांची मुलगी देवानंदा आजारी पडली आणि तिचा मृत्यू झाला. ३ मे रोजी, केरळच्या आरोग्य विभागाने शिगेला बॅक्टेरिया हे अन्न विषबाधाचे कारण आहे म्हणून सांगितले, यामुळेच तिचा मृत्यू झाला होता तर ३० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. केरळ पोलिसांनी हॉटेलचा मालक आणि कर्मचाऱ्यांना अटक केली. देवानंदा २०२२ साली फूड पॉइजनिंगमुळे मृत्युमुखी पडली होती. शावरमा खाल्ल्याने तिला फूड पॉइजनिंग झाले असे तिच्या आईचे म्हणणे होते, तिने यावर दाद मागण्यासाठी न्यायालयात धाव घेतली.
याचिकाकर्त्या देवानंदाच्या आईने आपल्या मुलीच्या अकाली निधनासाठी एक करोड रुपयांच्या भरपाईची मागणी केली. शवर्मा मिळण्याचे ते ठिकाण कोणत्याही परवान्याशिवाय सुरू आहे, शिवाय तेथे मागील दोन वर्षांपासून कोणतीही तपासणी झाली नव्हती. असे त्यांचे आरोप होते.
न्यायमूर्ती देवन रामचंद्रन यांनी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना आदेश दिले की त्यांनी खाद्यपदार्थ बनवण्याची तारीख आणि नेमकी वेळ आपल्या पॅकेजिंगवर प्रिंट करणे बंधनकारक करावे. दूषित अन्न खाल्ल्यानंतर अन्नातून होणाऱ्या विषबाधेच्या घटनांना आळा घालण्यासाठी उचललेलं महत्त्वाचं पाऊल आहे.
अन्न सुरक्षा आयुक्त, अफसाना परवीन यांनी १४ नोव्हेंबर २०२३ रोजी न्यायालयाला माहिती दिली की ‘शवर्मा गाईडलाईन्स’ म्हणून ओळखली जाणारी मार्गदर्शक तत्त्वे सप्टेंबर २०२२ मध्ये जारी करण्यात आली होती. यांमध्ये शवर्मा विकणाऱ्या हॉटेल्सच्या तपासणीसाठीचे नियम देखील होते. न्यायमूर्ती रामचंद्रन यांनी या ‘मार्गदर्शक तत्त्वांचे’ किंवा ‘शवर्मा गाईडलाईन्स’चे काटेकोरपणे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित करून सांगितले आणि अधिकाऱ्यांना ते स्थानिक हॉटेल्सच्या परवान्यांमध्ये समाविष्ट करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने या निर्देशांचे उल्लंघन केल्याचा अधिकाऱ्यांनी त्वरीत अहवाल द्यावा, यावर जोर दिला.
या गाईडलाईन्सचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी वरच्या परिच्छेदात सांगितल्याप्रमाणे न्यायालयाने खाद्यपदार्थ बनवण्याची तारीख आणि नेमकी वेळ आपल्या पॅकेजिंगवर प्रिंट करणे बंधनकारक केले होते, मग तिथल्या तिथे खाण्याच्या गोष्टी असुद्या अथवा पार्सल, पॅकेजिंग केले जाणारे खाद्यपदार्थ असूद्या. या संपूर्ण अंमलबजावणीवर अन्न सुरक्षा आयुक्त नियमितपणे देखरेख ठेवतील, असे निर्देश देखील न्यायालयाने दिले.
हॉटेल्स आणि त्यांच्या ग्राहकांमध्ये जागरूकता न आल्यास दूषित शवर्मा खाण्याचे प्रकार सतत वाढू शकतात अशी चिंता न्यायमूर्ती रामचंद्रन यांनी व्यक्त केली होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.