आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आजची जागतिक अर्थव्यवस्था कच्च्या तेलाच्या किंमतींवर अवलंबून आहे, जागतिक राजकारणात देखील अनेक निर्णय कच्च्या तेलाच्या उत्पादनाच्या निकषांवरच घ्यावे लागतात. मध्य-पूर्वेतील देश, पश्चिम युरोपचा काही भाग, रशिया आणि पूर्व आशियाचा काही भाग अशा ठिकाणी कच्चे तेल मोठ्या प्रमाणात सापडते. अमेरिकेत देखील काही प्रमाणात कच्च्या तेलाचे साठे होते, पण अल्पावधीतच प्रचंड उपसा झाल्याने ते संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. गतकाळात जास्त हाव केल्याचे चटके अमेरिकेला भविष्यात बसले.
एकेकाळी सर्वाधिक साठे असणाऱ्या अमेरिकेत जगातील फक्त ५% तेलासाठा उरला. असं असलं तरी कच्च्या तेलाच्या किंमती आज सुमारे ८०$/बॅरेल इतक्या आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती नेहमीच अमेरिकन डॉलरनेच ठरवल्या जातात. भारतासह काही देशांनी भूमिका घेतल्यानंतर मात्र कच्च्या तेलाचे व्यवहार रशियन रुबेल आणि भारतीय रुपयांमध्ये देखील होत आहेत.
भारतातही एकेकाळी कच्च्या तेलाचे साठे होते, किंबहुना आजही ते साठे अस्तित्त्वात असून त्यातून आजही कच्च्या तेलाचे उत्पादन घेतले जात आहे, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. आसाममधील दिगबॉय याठिकाणी भारतातील सर्वांत पहिला कच्च्या तेलाचा साठा सापडला होता. त्याची कथा देखील रंजक आहे.
भारतातील सर्वात जुने तेलाचे साठे सापडलेले ठिकाण, आसाममधील दिगबॉय या ठिकाणच्या नावामागे देखील एक आख्यायिका आहे. आसाममध्ये ब्रिटिश अधिकारी हत्तीवर बसून प्रवास करीत असत. एकदा एक हत्ती जंगलात असताना दलदलीत फसला, तिथून सुटण्याच्या प्रयत्नांत हत्तीने दलदलीमध्येच आपल्या पायांची प्रचंड हालचाल केली, अविरत प्रयासांनंतर तो कसाबसा दलदलीतून बाहेर पडला.
एका प्रवासाला जाण्याच्या निमित्ताने त्याच हत्तीवर एक इंग्रज अधिकारी बसला. त्याच्याबरोबर हत्तींची देखभाल करणारे काही स्थानिक लोक देखील होते. त्यांचा प्रवास सुरु होताच काही वेळात त्यांना प्रचंड दुर्गंधी येऊ लागली. इंग्रज अधिकाऱ्यांनी आपल्याबरोबर असलेल्या लोकांना ती दुर्गंधी कुठून येत आहे हे पाहण्यास सांगितले.
ज्याठिकाणी हत्ती दलदलीत फसला होता तिथून ही दुर्गंधी मोठ्या प्रमाणात येत होती असे शोध घेतल्यानंतर लक्षात आले. इकडे हत्तीच्या पायांना देखील चिकट, काळा, जाड द्रवपदार्थ चिकटला असल्याचे त्या इंग्रज अधिकाऱ्याला आढळून आले, हत्ती जिथं जाऊन दलदलीत फसला होता, आणि जिथून प्रचंड दुर्गंधी येत होती, ते ठिकाण एकच होते. यावरून इंग्रजांना हा सामान्य पदार्थ नसून खनिज तेल आहे हे लक्षात आले.
काही इंग्रज अधिकारी तातडीने दलदलीच्या ठिकाणी गेले, त्यांनी गावातील अन्य तरुण मुलांना बोलावून घेतले आणि दलदलीच्या ठिकाणी खोदकाम करायला सांगितले. हळूहळू तिथली जमीन साफ झाली, चिखल दूर झाला आणि तिथे तेल असल्याचे समोर आले. खोदकाम चालू असताना तिथले इंग्रज सतत एक-दोन शब्द उच्चारत, “डिग बॉय, डिग”! त्याकाळात भारतामध्ये इंग्रजीचे शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचले नसल्याने कोणालाच “डिग बॉय, डिग!” चा अर्थ उमगत नव्हता, तेव्हा लोकांनी स्वतःहूनच याचा अर्थ लावला, की या ठिकाणाचे नाव दिगबॉय असावे किंवा जे खोदून मिळणार आहे त्याचे नाव दिगबॉय असावे. याशिवाय आणखी एक शक्यता म्हणजे ‘डिबोई नाला’ या स्थानिक नाल्याच्या नावावरून हे नाव आले असावे.
१८२५ साली ही घटना घडल्याचा अंदाज आहे. या इंग्रज अधिकाऱ्यांमध्ये एक प्रमुख इंग्रज अधिकारी होता लेफ्टनंट आर. विलकॉक्स. विविध ब्रिटीश अधिकारी आणि सर्वेक्षकांनी देखील इथल्या तेलसाठ्यांचा उल्लेख केलेला आढळतो. पण ब्रिटिश अधिकाऱ्यांनी येथील तेल उत्खननाकडे फारसे लक्ष दिले नाही. सुरुवातीला, तेलापेक्षा कोळशाला जास्त मागणी आणि महत्त्व असल्याने तेव्हा या तेलसाठ्याकडे दुर्लक्ष झाले.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, आसाममध्ये सापडलेले तेलसाठे जागतिक पेट्रोलियम अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे बनले होते. ब्रिटिश अर्थव्यवस्थेत देखील त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व होते. विविध ब्रिटिश कंपन्यांनी भारतातील कच्च्या तेलाचा प्रचंड उपसा केला. पहिल्या आणि दुसऱ्या महायु*द्धात ब्रिटिश सैन्य आणि इतर उद्योगांना कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यासाठी त्यांनी इथून कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवले.
स्वातंत्र्योत्तर काळात, दिगबॉय रिफायनरीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ‘आसाम ऑइल कंपनी लिमिटेड’कडे होती. १९८१ साली इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने रिफायनरी आणि रिफायनरीचे संपूर्ण व्यवस्थापन ‘आसाम ऑइल’कडून ताब्यात घेतले. यामुळे महत्त्वपूर्ण बदल झाले, आधुनिक सुविधा आणल्या गेल्या.
दिगबॉय रिफायनरीची क्षमता जुलै १९९६ मध्ये ६.५ लाख मेट्रिक टनपर्यंत वाढली. यामुळे दिगबॉय रिफायनरीला एक नवी ओळख प्राप्त झाली. आजमितीस ‘दिगबॉय’ जगातील सर्वांत जुना पण आजही कार्यरत असलेला तेलसाठा आहे. विशेष म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या रिफायनरीची क्षमता १० लाख मेट्रिक टनपर्यंत वाढवण्यासाठी पावले उचलली आहेत.
ऐतिहासिक दिगबॉय रिफायनरी आज “भारतीय हायड्रोकार्बन क्षेत्राची गंगोत्री” म्हणूनही ओळखली जाते. ही भूमी आज हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून देत आहे, सीएसआर उपक्रमांद्वारे आसपासच्या गावांचा देखील आज विकास होत आहे. एवढा मोठा इतिहास असूनही, दिगबॉयसाठी सरकारने केलेले प्रयत्न पुरेसे नाहीत असे दिसते. दिगबॉयसारख्या संस्थेला अधिक प्रभावी बनवण्यासाठी आधुनिक नवकल्पनांसह समृद्ध इतिहास लोकांसमोर आणणे गरजेचे आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.