आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारताला पांढरपेशे गुन्हेगार काही नवे नाहीत. रामलिंगम राजू, ललित मोदी, नीरव मोदी, विजय माल्या आणि मेहुल चोक्सी यांसारख्या पांढरपेशा गुन्हेगारांशी आणि त्यांनी काढलेल्या पळवाटांशी आपण चांगल्या प्रकारे परिचित आहोत.
आजच्या या पांढरपेशा गुन्हेगारांच्या आधी ६०च्या दशकात एक असाच पांढरपेशा गुन्हेगार होता, ज्याने सरकारच्या हातावर तुरी दिल्या होत्या.
१९५०च्या दशकात आंध्र प्रदेशात जयंती धर्म तेजा नावाचा एक असाच व्यक्ती होता, जो डॉ. तेजा या नावाने सर्वत्र प्रसिद्ध होता. तो एकदा दिल्लीला गेला आणि सरळ भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची भेट घ्यायला जाऊन पोहोचला.
त्याने नेहरूंसमोर भारतात जगातील सर्वात मोठे असे शिपिंग साम्राज्य उभे करण्याचे स्वप्न उभे केले. जयंती धर्म तेजा हा एका अणु संशोधक, संगीततज्ञ, अर्थतज्ञ आणि भारतातील शिपिंग उद्योगाचा सम्राट होता. त्याकाळी भारतात पैसे फिरवणाऱ्या काही मोजक्या लोकांपैकी तो एक होता.
६०च्या दशकात जयंती धर्म तेजा हा एक मोठा उद्योगपती म्हणून भारतातील गर्भश्रीमंत आणि मोठे प्रस्थ असणाऱ्या लोकांच्या पार्टीज्-मध्ये वावरत असे. आपण एक फॉरेन रिटर्न आहोत असे सांगून जयंती धर्म तेजा त्या पार्टीजमध्ये आपली वेगळी छाप सोडत होते.
हे तेजा दांपत्य गर्भश्रीमंत होते आणि राजकारण्यांसाठी विविध पार्टीज् देखील ठेवत असे. भारताच्या तत्कालीन उच्चभ्रू लोकांमधील एक गर्भश्रीमंत घराणं म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता. अनेक अधिकारी, नेते त्यांच्या मर्जीतले होते.
त्यांचे प्रस्थ इतके वाढत चालले होते की एक दिवस ते थेट भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापर्यंत जाऊन पोहचले. यामुळे अनेकांनी तोंडात बोटं घातली होती.
इंदिरा गांधी जेव्हा भारताच्या पंतप्रधान झाल्या त्यावेळी तेजा ह्यांना भारतातील एक प्रथितयश उद्योगपती म्हणून आपल्या सोबत अमेरिकेला नेले होते, त्याठिकाणी वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्कमध्ये या जोडप्याने आपले प्रस्थ उभे केले.
तेजा हा स्वतःला एक देशभक्त म्हणून नेत्यांच्या समोर उभा करत होता, देशासाठी काहीतरी करायचे या भावनेतून त्याने नेहरूंना आपल्या शिपिंग इंडस्ट्रीच्या प्रोजेक्टसाठी राजी केले. इतकंच नाहीतर त्याने सरकारकडून २२ कोटी रुपये देखील ह्यात गुंतवून घेतले. १९६१ साली जयंती शिपिंग कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली. त्याने सरकार कृपेमुळे भारतातील विविध बँकेतून मोठ्या प्रमाणावर कर्ज देखील घेतले.
नेहरूंना आधी काही सरकारी अधिकाऱ्यांनी सूचित करण्याचा प्रयत्न केला की ते जे काही करायला पुढे जात आहेत, त्यामुळे अडचणी उत्पन्न होऊ शकतात. पण नेहरूंच्या मनावर तेजाने घट्ट पकड बसवली होती. त्यामुळे तेजा यांना धंदा करण्यासाठी कुठलीच अडचण येणार नव्हती. तेजा यांनी आधी जपानी जहाजं विकत घेतली, थोड्याच काळात त्याने मोठ्याप्रमाणावर उद्योग भरभराटीला नेला.
सर्वांना वाटत होतं की तेजा देशाची खूप मोठी सेवा करत आहे. त्याने एक मोठं साम्राज्य उभं केलं आहे. पण त्याच्या एका चुकीमुळे तो फसला.
त्याने युरोपात मोठ्या प्रमाणवर जमिनी विकत घेण्यास सुरुवात केली. त्याने युरोपातच नव्हे तर त्याने जगभरात प्रॉपर्टी विकत घेऊन ठेवली होती. एक दिवस त्याचे हे आर्थिक गौडबंगाल आयकर विभागाच्या दृष्टीस पडले. पण हे घडेपर्यंत नेहरू दगावले होते. आता तेजाचा सरकारमध्ये पाहिजे तितका प्रभाव नव्हता. पण तरीदेखील तेजा मागे हटला नाही. त्याने अनेक अधिकारी आणि पत्रकार यांना लाच देऊन अथवा मर्जीत घेऊन गप्प केलं होतं.
अगदी टाइम्स ऑफ इंडियाचा संपादक इंद्र मल्होत्रा देखील यातून सुटू शकला नव्हता.
पण हे गौडबंगाल जास्त काळ लपून राहिलं नाही. काही दिवसांनी कोस्टारिकाच्या शासनाने त्याला आपला शिपिंग इंडस्ट्रीचा सल्लागार म्हणून नेमल्याची बातमी आली आणि त्याने देश सोडला. लंडनला त्याला इंटरपोलने धरलं आणि तिथे काही दिवस जेलमध्ये काढल्यानंतर तो सुटून कोस्टारिकाला गेला आणि अशा प्रकारे भारताचा पहिला पांढरपेशा गुन्हेगार भारत सरकारच्या हातावर तुरी देऊन पसार झाला.
पुढे १९६५ साली जेव्हा त्याचा घोटाळा जगासमोर आला आणि भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी कोस्टारिकाच्या शासनाकडे केली. तोपर्यंत त्याने तिथे आपलं मोठं प्रस्थ बसवलं होतं.
आधी अमेरिकेने कोस्टारिकाकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारकडे २५००० डॉलर्सची मागणी केली आणि ती मागणी पुढे १००० डॉलर्सपर्यंत कमी करण्यात आली होती.
हे प्रत्यार्पण तेव्हाच शक्य होतं ज्यावेळी ती व्यक्ती भारतीय नागरिक असेल, पण तेजा हा इतका कुशाग्र होता की त्याने १९७० साली कोस्टारिकाचे नागरिकत्व घेऊन आपल्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला होता.
त्याने कोस्टारिका सरकारशी करार केला होता की त्याला कुठेही जावं लागलं तरी त्याच्या पत्नीला आणि मुलांना कोस्टारिकातच ठेवण्यात यावे.
त्याने आपली संपत्तीच नाहीतर आपल्या परिवाराला सर्व प्रकारच्या दोषातून मुक्त करून घेतले होते. त्याच्याकडे आता कोस्टारिकाचे नागरिकत्व असल्यामुळे भारत सरकारच्या हाती तो शेवटपर्यंत लागू शकला नाही. भारत सरकारने खूप प्रयत्न करून देखील त्यांना अपयश आले.
एकदा लंडन विमानतळावर एका पोलीस अधिकाऱ्याने त्याला पकडलं पण कोस्टारिका सरकारचा प्रतिनिधी म्हणून तो निसटला होता.
भारत सरकारला त्याने ४० कोटीत गंडवले होते. आजही भारताचे अनेक पांढरपेशे गुन्हेगार परदेशात आहेत, त्यांना पकडण्यासाठी भारत सरकार विविध प्रयत्न करत आहे. त्यासाठी नवीन कायदे आणि नवीन करार सगळंच झालं आहे.
पण तेजाच्या काळात सरकारच्या कृपेने त्याने जे काही केलं, ते निश्चितच धक्कादायक होतं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.