आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
एकविसाव्या शतकात वेगाने आर्थिक भरभराट होत आहे. शिक्षण, भांडवल इत्यादी व्यवसाय-पूरक संसाधने मिळणं पूर्वीपेक्षा सध्या सुलभ झालं असून अनेक लोक व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतात. संसाधनांच्या उपलब्धतेमुळे आणि विकसित तंत्रज्ञानामुळे बरेच व्यवसाय, प्रामुख्याने इ-कॉमर्स संबंधित व्यवसाय जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात चालू शकतात. आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे दिसतात, मग ते जस्टडायल असो किंवा नोकरी आणि छोकरी शोधून देणाऱ्या वेबसाईट्स असो.
पण हे सगळं सहज शक्य होतं ते इंटरनेटमुळे. अगदी सुरुवातीपासून अमेरिकेत इंटरनेट सहजतेने उपलब्ध झाल्याने तिथे असे अनेक व्यवसाय निर्विघ्नपणे चालतात. अमेरिकन माणसाच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात “ऑनलाईन” माध्यमाने शिरकाव केलेला दिसतो. या आणि अशाच अनेक कारणांमुळे अमेरिकेत इबे, ॲमेझॉनसारख्या कंपन्या उत्तम कमाई करतात.
पण हेच व्यवसाय जसेच्या तसे इतर देशांमध्ये उपलब्ध असतीलच असं नाही. तेव्हा अमेरिकेत चालणारे ऑनलाईन व्यवसाय जसेच्या तसे, फक्त वेगळे नाव आणि वेबसाईटला वेगळे डिझाईन देऊन तयार करण्यात जास्त नफा मिळू शकतो असा निष्कर्ष काढण्यात आला. जर्मनीमधील तीन भावांनी प्रचंड याच तंत्राचा वापर करून करोडो रुपये मिळवले. किंबहुना स्टार्टअप आयडिया स्टीलिंगचे हे तंत्र त्यांनीच विकसित केले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांनी नेमकं काय केलं हे या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया..
गोष्ट आहे १९९८ सालची. जर्मनीमधील मार्क सॅम्सवर, ऑलिव्हर सॅम्सवर आणि अलेक्झांडर सॅम्सवर या तीन भावांनी अमेरिकेतील इबे नावाच्या कंपनीचा झपाट्याने उदय होताना पहिले होते. १९९३ साली इबे कंपनीची स्थापना झाली होती. इबे कंपनीची वेबसाईट आपल्या इ-कॉमर्स सेवांसाठी अमेरिकेत प्रचंड लोकप्रिय ठरली होती. जर इबे कंपनीने पुरवलेल्या इ-कॉमर्स सेवा अमेरिकेत जोमाने चालू शकतात तर तशाच सेवा जर्मनीमध्ये सुरु केल्या तर का चालणार नाहीत काय? निश्चितच चालू शकतात, हा विचार या तिन्ही भावांच्या डोक्यात आला.
ही नाविन्यपूर्ण कल्पना त्यांनी इबेपर्यंत पोहोचवली. तुमची कंपनी जर्मनीमध्ये सुरु करून ती कंपनी तिथे चालवण्याचे काम आम्हांवर सोपवा असा प्रस्ताव त्यांनी इबेसमोर मांडला. त्यांनी आपले मत इबेच्या एक्झेक्युटिव्ह्ससमोर ठेवण्याचा शक्य तितका चांगला प्रयत्न केला खरा, पण त्यांना त्यामध्ये यश मिळाले नाही. या तीन भावांनी मात्र आपल्या या कल्पनेवर पाणी न सोडता आपापल्या परीने ती सत्यात उतरवण्याचे प्रयत्न सुरु ठेवले.
पुढच्याच वर्षी म्हणजेच १९९९ साली त्यांनी अलांडो नावाची वेबसाईट लाँच केली. अलांडो इबेचंच क्लोन होतं, म्हणजेच ज्या सेवा इबे ज्या प्रकारे पुरवत असत, तशाच सेवा अलांडो देखील पुरवत असत. फरक फक्त वेबसाईट डिझाईन आणि ब्रँडमध्ये होता. आश्चर्याची बाब म्हणजे लाँचनंतर केवळ १०० दिवसांत ही वेबसाईट एवढी प्रचंड लोकप्रिय झाली की इबेलाच त्यांना विकत घ्यावे लागले, जेणेकरून इबेला कोणत्याही मोठ्या प्रतिस्पर्ध्याचा सामना करावा लागू नये. अलांडो ब्रँड इबेने तब्बल ४ करोड ३ लाख डॉलर्सना विकत घेतला होता.
सॅम्सवर बंधूंनी या निधीचा उपयोग केला रॉकेट इंटरनेट नावाची कंपनी सुरु करण्यासाठी. २००७ साली रॉकेट इंटरनेट कंपनी बाजारात आली. या कंपनीचे काम तेच होते जे १९९८-९९ साली सॅम्सवर बंधूनी केले. अमेरिकेतील आघाडीवरच्या इंटरनेट ब्रॅण्ड्सचा क्लोन विविध देशांमध्ये तयार करण्यास रॉकेट इंटरनेट आर्थिक मदतीपासून सर्व प्रकारची मदत पुरवते. जेव्हा या नव्या कंपन्यांचे रूपांतर एका ब्रँडमध्ये होते तेव्हा मात्र अमेरिकेतील बड्या कंपन्या येऊन आपल्या पोटेन्शियल कॉम्पिटिटरला खरेदी करतात.
रॉकेट इंटरनेटची सुरुवात झाल्यानंतर काही वर्षांतच त्यांनी अनेक ब्रॅण्ड्सचा क्लोन यशस्वीरीत्या तयार केला. यामध्ये उबेरचा क्लोन इजी टॅक्सी, ॲमेझॉनचा क्लोन जुमीया, एअरबीएनबीचा क्लोन विमडू अशा अनेक कंपन्यांचा समावेश आहे. या क्लोन कंपन्यांसाठी मूळ कंपनी लाखो-करोडो डॉलर्स खर्च करायलाही तयार असते.
आज त्याच एका कल्पनेच्या आणि “आउट ऑफ द बॉक्स” विचाराच्या जोरावर या तिन्ही भावांची संपत्ती प्रत्येकी १२० करोड एवढी प्रचंड आहे. एका कल्पनेवर सातत्याने काम करून या भावांनी व्यवसायाचे एक नवीन विश्वच खुले केले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.