आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सध्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर जिकडे तिकडे भर दिला जात आहे. पण ही संकल्पना भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या “स्वदेशी” चळवळीमधून उभी राहिली. स्वदेशी वस्तूंसाठी अनेक आंदोलने घडल्याचे आपण ऐकले आहे. केवळ २२ वर्षांच्या उमेदीच्या वयात ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध लढताना बाबू गेनू हुतात्मा झाले. स्वदेशी कपड्यांच्या समर्थनार्थ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुण्यात विदेशी कपड्यांची होळी केली. या प्रकरणात त्यांची फर्ग्युसन कॉलेजमधून हकालपट्टीही झाली होती. स्वदेशी आंदोलनांमध्ये अनेक स्थानिक कंपन्या निर्माण झाल्या, त्यामध्ये त्रिपुरा राज्यातील स्वदेशी टी आणि महाराष्ट्रातील सांगलीमधील किर्लोस्कर ग्रुप अशी मोठी नावे घेता येतील.
शिपिंग इंडस्ट्रीवर स्वातंत्र्यपूर्व काळात साहजिकच ब्रिटिशांची मक्तेदारी होती. त्यामुळे विदेशात जाणाऱ्या सर्व भारतीयांकडून ब्रिटिश आणि इतर पाश्चिमात्त्य शिपिंग कंपन्यांना प्रचंड फायदा होत होता. एकीकडे ब्रिटिश गरीब आणि मध्यमवर्गीय भारतीयांचे सर्व प्रकारे शोषण करीतच होते, शिवाय अशा प्रकारच्या व्यापारांमधून उच्चभ्रू आणि श्रीमंत भारतीयांचे धनही शेवटी युरोपातच जात असत. १९०५ साली ब्रिटीश सरकारने बंगालची फाळणी केली आणि स्वदेशी चळवळीची सुरुवात झाली. या स्वदेशी चळवळीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला तो लाल-बाल-पाल या तीन बड्या नेत्यांनी.
शिपिंग इंडस्ट्रीवरील ब्रिटिशांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी दक्षिण भारतातील व्ही. ओ. चिदम्बरम पिल्लई नावाच्या श्रीमंत वकिलाने आपली सगळी संपत्ती विकली आणि एक शिपिंग कंपनी सुरु केली. या कंपनीची सुरुवातच स्वदेशी चळवळीच्या प्रेरणेने झाल्याने या कंपनीचे नाव ‘स्वदेशी स्टीम नॅव्हिगेशन कंपनी (एसएसएनसी)’ ठेवण्यात आले होते. कंपनीची सुरुवात ऑक्टोबर १९०६ मध्ये पिल्लई यांनी केली होती.
सुरुवातीला कंपनीकडे एकही जहाज नव्हते. त्यावेळी भारतामध्ये शॉलाईन स्टिमर्स कंपनी जहाजांचा पुरवठा भाडेतत्त्वावर करत. तसा शॉलाईन स्टिमर्स आणि चिदंबरम यांच्यामध्ये करारही झाला होता. पण ब्रिटिश सरकारने शॉलाईन स्टिमर्स कंपनीला त्यांना जहाजे देऊ नयेत अशी सक्त ताकीद दिली होती.
पिल्लईसुद्धा हार मानणाऱ्यांमधले नव्हते. त्यांनी आधी मुंबईच्या इसाजी दोद्घीभोय या कंपनीकडून आणि नंतर श्रीलंकेमधून एक मोठे फ्राइटर जहाज भाडे तत्त्वावर घेतले. कंपनीकडे स्वतःची जहाजे असावीत अशी इच्छा पिल्लईंनी व्यक्त केली आणि ते कमला लागले. या कंपनीचे शेअर्स जास्तीत जास्त विश्वासार्ह आणि धनाढ्य लोकांना विकण्यासाठी त्यांनी संपूर्ण भारत पालथा घातला. “मी एकतर जहाजे आणेल नाहीतर समुद्रात आपला प्राण अर्पण करीन” अशी शपथ घेऊनच त्यांनी प्रवासाची सुरुवात केली.
काही दिवसांतच त्यांनी निधी गोळा केला आणि फ्रान्सकडून एस.एस. गालिया नावाचे जहाज खरेदी केले. यानंतर लगेच काही दिवसांत त्यांनी फ्रान्सकडूनच एस. एस. लावो देखील खरेदी केले. या कंपनीचे त्यावेळी ४० हजार शेअर्स होते, प्रत्येकाचे मूल्य तब्बल २५ रुपये, म्हणजेच कंपनीकडे १० लाख रुपयांचे भांडवल होते. सुरुवात झाल्यानंतर काही दिवसांतच स्वदेशी शिपिंग कंपनीने ‘ब्रिटिश इंडिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी लाइनर्स’ या ब्रिटिशांच्या अग्रगण्य शिपिंग कंपनीला मागे टाकण्यास सुरुवात केली.

असं का झालं असेल? त्याचं उत्तर आहे देशाप्रती असलेली भावना आणि स्वातंत्र्याची प्रेरणा. त्यावेळी लोकांकडे विदेशी आणि कदाचित जास्त सुलभ, सुरक्षित असा पर्याय उपलब्ध असूनही त्यांनी स्वदेशी शिपिंग लाईन्स निवडले. कारण यामुळे देशातील लोकांच्या धनाचा फायदा बाहेरच्या देशाला न होता देशातीलच एका कंपनीला होणार होता.
स्वदेशी शिपिंग लाईन्सचे प्रभुत्व पाहून ब्रिटिशांनी जहाज प्रवासाच्या किंमती कमी केल्या. सुरुवातीला ब्रिटिशांनी १६ अणे म्हणेजच १ रुपया किंमत केली तर काही दिवसांनी ती किंमत निम्म्यावर आणून ८ अणे म्हणजेच ५० पैसे केली. एक वेळ अशी आली की ब्रिटिशांनी ही सेवा विनामूल्य देण्याचे ठरवले. पण राष्ट्र प्रेमाने ओतप्रोत भरलेल्या तत्कालीन भारतीयांवर याचा काडीमात्र परिणाम झाला नाही. भारतात त्यावेळी स्वदेशी शिपिंग लाईन्स याच कंपनीच्या जहाजांचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता.
आपल्या किंमती कमी केल्या तरी स्वदेशी शिपिंग कंपनीवर काही परिणाम होत नाही म्हटल्यावर ब्रिटिश इंडिया स्टीम नॅव्हिगेशन कम्पनी लाइनर्स कंपनीने सरकारची मदत घ्यायचे ठरवले. अर्थातच ब्रिटिश सरकारने खोट्या आरोपांखाली पिल्लईंच्या काही मालमत्ता जप्त केल्या. पण यामुळे स्वदेशी शिपिंग कंपनीवर कोणताही विपरीत परिणाम होत नव्हता.

मग ब्रिटिशांनी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली. बिपीनचंद्र पाल यांची सुटका झाल्याचा उत्सव एका मिरवणुकीद्वारे साजरा करण्याच्या निमित्ताने पिल्लई यांनी तामिळनाडूच्या तुतिकोरिनमध्ये दंगल घडवून आणली असा आरोप ब्रिटिशांनी केला. यासाठी त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली. पिल्लईंना अटक झाल्यानंतर मात्र स्वदेशी शिपिंग कंपनी तोट्यात जाऊ लागली, शेवटी १९११ साली या कंपनीला विकण्याची वेळ आली आणि कंपनी बंद पडली.
पण सामान्य भारतीयांना हे मान्य नव्हते. लोकांनी आपापल्या पदरातील पैसे घालून पुन्हा भांडवल उभारले. यावेळी ही रक्कम ५ हजार इतकी होती. कोण्या वडीलधाऱ्या आणि प्रामाणिक माणसाकडे ही मोठी रक्कम ठेवावी म्हणून लोकांनी हे पाच हजार रुपये गांधीजींना देऊ केले. पण गांधीजींनी ते पैसे ना पिल्लईंना परत केले, ना स्वदेशी शिपिंग कंपनीला. तेव्हापासूनच तामिळनाडूमध्ये “गांधी कनक्कु” ही म्हण प्रचलित झाली, याचा शब्दाश: अर्थ होतो, गांधींचा हिशोब.
मधल्या काळात पिल्लईंचे कुटुंब दिवाळखोर झाले होते, कंपनीचे सगळे पार्टनर्स कंपनी तोट्यात असल्याने फरार होते. १९१२ साली पिल्लई यांची सुटका झाली तेव्हा त्यांना प्रचंड गरिबीचा सामना करावा लागला. एव्हाना लोक त्यांना विसरले होते. शेवटी त्यांनी मद्रासमध्ये एक दुकान सुरु केले, दुकानाच्या व्यवसायाबरोबरच ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवतही असत.
स्वातंत्र्योत्तर काळात, १९४९ साली, तामिळनाडू राज्याचे गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांनी तामिळनाडूच्या ट्युतिकोरिन शहरातून कोलंबोपर्यंत जाणाऱ्या एका शिपिंग सर्व्हिसचे उद्घाटन केले. त्यावेळी त्या कंपनीच्या पहिल्या जहाजाचे नाव ठेवण्यात आले होते, एस. एस. व्ही. ओ. चिदंबरम.
स्वदेशी शिपिंग कंपनी जरी बंद पडली असली तरी त्या कंपनीने स्वदेशी चळवळीच्या माध्यमातून ब्रिटिशांना घाम फोडला होता हे निश्चित.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.