आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
अमेरिका. दोन महासागरांच्यामध्ये असलेला महाकाय खंडप्राय देश. कोलंबसच्या समुद्र सफारीनंतर जगाच्या एका कोपऱ्यात पडलेल्या या भागाला महत्त्व प्राप्त झालं. सुरुवातीला स्पॅनिश लोकांनी येऊन याठिकाणी वसाहती स्थापन केल्या, वसाहतवादाच्या प्रथेप्रमाणे तिथल्या मूळ रहिवाशांना टाचेखाली ठेवायचा पुरेपूर प्रयत्न झाला. कालांतराने स्पॅनिश आणि इतर युरोपीय प्रवाशांनी, व्यापाऱ्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी आपले पाय अमेरिकेत रोवले.
आपल्या साम्राज्यावरील सूर्य कधीही अस्ताला जात नाही असा दावा करणाऱ्या ब्रिटिशांनी अमेरिकेवर वर्चस्व स्थापन केल्याने अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्याला तोंड फुटले आणि ४ जुलै १७७६ साली हा देश स्वतंत्र झाला. या स्वातंत्र्यलढ्यात मात्र दोन्ही बाजूला होते युरोपियन्स. असं असलं तरी हे यु*द्ध सुरु होतं अमेरिकेत सुरुवातीपासून असलेल्या १३ वसाहती आणि नव्याने आलेल्या ब्रिटिशांमध्ये. यामध्ये मूळ अमेरिकन रहिवाशांची एकसंध भूमिका नव्हती. याचे प्रमुख कारण म्हणजे मूळ अमेरिकन रहिवासी अनेक जमातींमध्ये विभागले गेले असल्याने प्रत्येक जमात आपापलाच स्वतंत्र विचार करत होती. त्यांच्यात आभाव होता तो राष्ट्रविचाराचा.
अमेरिकन राज्यक्रांतीनंतर देखील मूळ अमेरिकन लोकांचे हक्क आणि अधिकार पद्धतशीरपणे काढून घेण्यात आले. अनेकदा शांततेच्या आणि चर्चेच्या मार्गाने जमिनीवरील हक्कांचे प्रश्न सोडवताना मूळ अमेरिकन लोकांच्या जमिनी लाटल्या गेल्या, नव्याने तयार झालेल्या युनायटेड स्टेट्सला पाठिंबा द्यायचा की विरोध करायचा यावरूनही मूळ अमेरिकन जमातींमध्ये टोकाचे मतभेद होऊ लागले, याचाच फायदा युनायटेड स्टेट्सला झाला. शिवाय युनायटेड स्टेट्सच्या सरकारने आपल्या अनेक धोरणांच्या माध्यमातून मूळ अमेरिकन जमातीतील लोकांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले, युरोपियन जीवनपद्धती अंमलात आणायला सुरुवात केली आणि शाळांच्या माध्यमातून मुलांवर हवे तसे संस्कार करायला देखील सुरुवात केली.
असं असलं तरी देखील या मूळ अमेरिकन जमाती आजवर फक्त टिकूनच नाहीत तर आपापले महाकाय व्यवसाय सांभाळत आहेत आणि काही मूळ अमेरिकन्स तर आपापल्या जमातीतील लोकांना स्टायपेंड्स देखील देत आहेत. एकेकाळी मागासलेल्या, अपमानित झालेल्या या जमाती आज मात्र आपापले जीवन आनंदात जगताना दिसतात, यांच्यापैकी काही जमाती प्रचंड श्रीमंत आहेत, अशाच ५ श्रीमंत मूळ अमेरिकन जमातींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
५. पेचांगा बँड
पेचांगा जमातीचे वार्षिक उत्पन्न आहे २० करोड अमेरिकन डॉलर्स. या जमातीकडे पेचांगा रिसॉर्ट, कॅसिनो, हॉटेल आणि रेस्टॉरंट्स आहेत. यांतील कॅसिनो अमेरिकेतील सर्वांत मोठ्या कॅसिनोपैकी एक असून लास वेगास येथील एमजीएम ग्रँड कॅसिनोला देखील ते मागे पाडतात. या कॅसिनोमध्ये ५००० हुन अधिक स्लॉट मशिन्स असून १५२ टेबल गेम्स आहेत.
पेचांगा हॉटेलमध्ये सुमारे ११०० गेस्ट्स रूम्स आणि सूट्स आहेत. याशिवाय या हॉटेलमधील सर्वांत आकर्षक बाब म्हणजे साडेचार एकराचा पूल कॉम्प्लेक्स. या पूल कॉम्प्लेक्समध्ये विविध प्रकारचे स्विमिंग पूल्स पाहायला मिळतील. या पूल कॉम्प्लेक्सचा आकार फुटबॉलच्या ५ मैदानांइतका प्रचंड आहे. हॉटेल, रिसॉर्ट्सशिवाय या जमातीकडे एक लक्झरी स्पा देखील असून त्यांचे ६ भव्य रिटेल स्टोअर्स आहेत.
ऐषारामाच्या गोष्टी वगळता या जमातीकडे सॅन डियागो स्पोर्ट्स ॲरिनाच्या अधिकृत नावाचे अधिकार देखील आहेत. शिवाय ही जमात ‘ग्रेट ओक प्रेस’ नावाचे प्रकाशन देखील चालवते.
४. मनशांत्युकेत पेकोट
मनशांत्युकेत पेकोट जमातीचे वार्षिक उत्पन्न आहे ५३.९२ करोड अमेरिकन डॉलर्स. या जमातीतील लोकांना दरवर्षी १ लाख डॉलर्स मिळतात. खरंतर मध्यंतरी या जमातीच्या नेतृत्वाने काही चुकीचे आर्थिक निर्णय घेतले होते, ज्यांमध्ये चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या गुंतवणुकीचाही समावेश होता. यामुळे २०१२ च्या सुमारास या जमातीतील अनेकांना नोकऱ्या शोधण्याची गरज भासली होती. पण जमातीच्या नेतृत्वाने आर्थिक सल्लागारांची मदत घेतली आणि त्यांच्या सांगण्यानुसार फॉक्सवूड्स रिसॉर्टचा विकास करत राहिले.
मनशांत्युकेत पेकोट जमातीच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे कॅसिनो. या कॅसिनोमध्ये ३०० गेम टेबल्स असून अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर स्थित कॅसिनोजपैकी सर्वांत मोठे पोकर टेबल देखील या कॅसिनोमध्ये आहे. या जमातीच्या लोकांनी कनेक्टिकट राज्याच्या विकासासाठी देखील आर्थिक योगदान दिलं आहे.
३. सेमिनॉल
सेमिनॉल जमातीचे वार्षिक उत्पन्न आहे ८५३८ करोड. यामध्ये विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेतली जाते. या जमातीच्या लोकांना दर वर्षी १ लाख २८ हजार अमेरिकन डॉलर्स मिळतात. वर्षाकाठी मिळणारे हे पैसे प्रत्येक दोन आठवड्यांना दिले जातात. याशिवाय महत्त्वाची बाब म्हणजे या जमातीतील लोकांना खाजगी शाळेतील शिक्षण आणि कॉलेजचे शिक्षण देखील मोफत आहे. या जमातीद्वारे ‘चिल्ड्रेन्स फंड’ नावाचा फंड देखील चालवला जातो. या फंडातून सदस्य असलेल्या मुलाला वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत कोणत्याही कारणासाठी निधी दिला जात नाही. तर विद्यार्थ्याने पदवी मिळवल्यानंतर त्याला सुमारे २ लाख डॉलर्स दिले जातात.
आपल्या जमातीतील फक्त विद्यार्थ्यांचीच नाही तर वयोवृद्धांची काळजी घेण्याचे कामही या जमातीने केले आहे. वयोवृद्धांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाते.
या जमातीकडे सेमिनॉल हार्ड रॉक हॉटेल आणि काही कॅसिनोजचे मालकी हक्क आहेत. या हॉटेल्स आणि कॅसिनोजमधून तसेच अन्य लहान-मोठे हॉटेल्स, कॅफेज् आणि रेस्टॉरंट्समधून देखील त्यांना उत्पन्न मिळत आहे.
२. मोहेगन
मोहेगन जमातीचे वार्षिक उत्पन्न आहे ९९ करोड अमेरिकन डॉलर्स. या जमातीच्या सदस्यांना वर्षाकाठी २८ हजार अमेरिकन डॉलर्स मिळतात. विशेष म्हणजे या जमातीचे लोक सन कॅसिनो नावाचे अमेरिकेतील दुसरे सर्वांत मोठे कॅसिनो चालवतात, या कॅसिनोमध्ये ६,२०० स्लॉट मशिन्स आहेत.
कॅसिनोशिवाय त्यांच्याकडे रेस ट्रॅक देखील आहेत. मोहेगन जमातीवर २०१९ साली आर्थिक संकट येऊन ठेपलं होतं. त्यावेळी त्यांना २०० कोटींचे कर्ज घ्यावे लागले होते. त्यावेळी त्यांनी विविध क्षेत्रात काम करण्यास सुरूवात केली.
सन कॅसिनोबरोबरच त्यांनी पेनिसिल्व्हानिया, न्यू जर्सी आणि कॅनडामधील काही कॅसिनोजचे मॅनेजमेंट करण्यास सुरुवात केली. याशिवाय अमेरिकेच्या बाहेर पडत त्यांनी दक्षिण कोरियामध्ये प्रचंड मोठे कॅसिनो उभारले, ग्रीसमधील काही कॅसिनोजची मालकी देखील त्यांच्याकडे आहे.
१. शॅकॉपी डिओकाऊंटेन
शॅकॉपी डिओकाऊंटेन या जमातीचे वार्षिक उत्पन्न आहे १०० करोड अमेरिकन डॉलर्स. ही अमेरिकेतील सर्वांत श्रीमंत मूळ निवासी जमात आहे. या जमातीतील लोक इतके श्रीमंत आहेत की त्यांच्यापैकी कोणालाच नोकरी अथवा व्यवसाय करावा लागत नाही. ‘शॅकॉपी डिओकाऊंटेन जमातीतील लोक वोल्युन्टीरीली बाळगलेल्या बेरोजगारीचा आनंद घेतात’ असा विनोद तिथे केला जातो.
या जमातीतील प्रत्येकाला दर महिन्यात ८४ हजार अमेरिकन डॉलर्स मिळतात. त्यांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत म्हणजे २ कॅसिनोज. या दोन कॅसिनोजपैकी मिस्टिक लेक कॅसिनो बराच प्रसिद्ध असून हा कॅसिनो कमी रिसॉर्ट जास्त आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. यामध्ये गोल्फ कोर्स, ६०० रूम्स असलेलं पंचतारांकित हॉटेल, ५ रेस्टॉरंट्स आणि सुमारे ८ हजार ३५० सीट्स असणारं मैदानी अँफिथिएटर आहे.
याशिवाय या जमातीकडे आणखी ६ छोट्या-मोठ्या कॅसिनोजची मालकी असून हे सहा कॅसिनोज आणि वर सांगितलेले दोन मुख्य कॅसिनोज यांच्यामधील जुगाराचे १४० करोड अमेरिकन डॉलर्स एवढे येते.
विषमता, दारिद्र्य, आणि एकूणच प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर येत या मूळ अमेरिकन निवासींनी आपल्या सामर्थ्याच्या बळावर ही साम्राज्ये उभी केली आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.