आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपल्या आयुष्यात आलेल्या अडचणी, हालअपेष्टा आणि कष्टांनी बरेच जण खचून जातात आणि निष्क्रीय बनतात किंवा संपूर्ण समाजाचा द्वेष करायला लागतात. काही जण मात्र, परिस्थितीने खचून न जाता तिचा सामना करून स्वतःचं आयुष्य घडवतात आणि आपल्याबरोबरच आपल्या समाजाची, देशाची प्रगती घडवून आणण्यासाठी आयुष्य झोकून देतात.
उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधल्या ऋता कौशिक हे अशा लढवैय्या आणि सेवाभावी व्यक्तिमत्वाचं जिवंत आणि प्रेरणादायी उदाहरण आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची कास ना सोडता त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाला आकार दिला आणि आता त्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून हजारो मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी झटत आहेत. त्यामुळेच त्यांच्यापासून प्रेरणा घेतलेल्या शेकडो जणी, ‘मला भविष्यात ऋतादीदी व्हायचं आहे,’ असा निर्धार बाळगून आहेत.
उत्तर प्रदेशमधल्या सर्वात उपेक्षित अशा मुसहर समुदायात एका रिक्षाचालकाच्या कुटुंबात ऋता यांचा जन्म झाला. पूर्वीपासून मुसहर हा भूमिहीन मजुरांचा समुदाय म्हणून ओळखला जातो.
मुसहर या शब्दाचा शब्दाश: अर्थ समजला तर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या शब्दाचा अर्थ आहे, उंदीर खाणारे लोक! या वरूनच समाजाच्या उतरंडीतलं या समुदायाचं स्थान समजून येईल. नद्या, नाल्यांच्या आसपास वस्ती करून रहायचं. मजुरीचं काम मिळालं तर करायचं. नाहीतर नदी-नाल्यात जे काही मिळेल त्यावर आपली गुजराण करायची हा समाजाचा शिरस्ता!
अशा वंचित समाजाच्या; विशेषतः अशा समाजातल्या मुली- महिलांच्या डोक्यावर सतत अत्याचाराच्या भीतीची टांगती तलवार असते. त्यामुळे ऋता यांच्या आजूबाजूच्या कुटुंबांप्रमाणेच त्यांच्या कुटुंबात शिक्षणाला, विशेषतः मुलींच्या शिक्षणाला कधीच प्राधान्य नव्हतं. त्यांचे वडील रिक्षा चालवण्याबरोबरच भाजीपाला विकून कुटुंबासाठी थोडीफार जास्तीची कामे करायचे. ऋता यांची मोठी बहीण घरातली आणि त्याच बरोबर इतर चार घरातली काम करायची. ऋता यांच्यावर दोघा धाकट्या भावांना शाळेत नेण्याची आणि आणण्याची जबाबदारी होती. ही शाळाही घरापासून ३ किलोमीटर दूर होती.
आज ‘केवळ शिक्षणानेच दलितांची खरी मुक्ती होऊ शकते,’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्रष्ट्या विचारावर ठाम असणाऱ्या ऋता यांच्या मनात ८ वर्षांच्या न कळत्या वयातही हा विचार कुठेतरी सुप्तावस्थेत रुजलेला असावा. त्यांनी आपल्यालाही शाळेत घाला म्हणून वडलांना गळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, डाळ शिजली नाही.
अखेर भावांच्या वर्गशिक्षिकेला त्यांनी, मला शेवटच्या बाकावर बसून तुम्ही काय शिकवता ते ऐकू द्या, अशी विनंती केली. त्यांची शिक्षणाबद्दलची ओढ लक्षात घेऊन बाईंनी अखेर तशी परवानगी दिली.
शिक्षणाबाबतचा ऋता यांचा निर्धार, निष्ठा आणि हुशारी पाहून त्यांना एका खाजगी शाळेने मोफत प्रवेश दिला. शिष्यवृत्तीही मिळाली. मात्र, मुलगी म्हणून, विशेषतः दलित मुलगी म्हणून इथेही त्यांना अन्याय आणि उपेक्षेला तोंड द्यावं लागलं. रीतीप्रमाणे वयाच्या १२ व्या वर्षी त्यांचं लग्न लाऊन देण्यात आलं. त्यातल्या सासरी जाण्यापूर्वी त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण केले.
अखेरच्या परीक्षेत पहिला क्रमांकही पटकावला. या पुढे सन १९९१ मध्ये ‘बिदाई’ झाल्यावर दुसऱ्याच दिवशी त्या माहेरी परत आल्या. कारण लग्न आणि संसार याच्यापेक्षाही जास्त काही तरी करायचं होतं. मिळवायचं होतं.
बीएससी करता करता एका सामाजिक संस्थेत काम करण्याची संधी ऋता यांना मिळाली. त्या ठिकाणी खूप शिकायला मिळालं. समाजाची बारी वाईट रूपं बघायला मिळाली. सरकारी प्रसूतिगृहात दोन दलित स्त्रियांची रुग्णालयाबाहेर होणारी बाळंतपणं त्यांनी बघितली. मात्र, अशा अनुभवांनी त्यांचा आणखी शिक्षण घेऊन सक्षम होण्याचा निर्धार पक्का झाला. नोकरी सुरू ठेऊन त्यांनी स्वतःच्या जीवावर पदव्युत्तर अभ्यासक्रमही पूर्ण केला.
सन २०००मध्ये ऋता यांनी दुसऱ्यांदा विवाह केला. सासरच्या कुटुंबियांकडून चांगले प्रोत्साहन मिळाल्याने पुन्हा एका ठिकाणी नोकरी करण्यास सुरुवात केली. प्रसूतीची हक्काची रजा घेणं त्यांना महागात पडलं. त्यांचा पगार २ हजारांनी कमी केला गेला. अन्याय सहन न करता आयुष्यभर झगडण्याची सवय असलेल्या ऋता यांनी नोकरी सोडून स्वतःची संस्था काढण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर सन २००३ मध्ये ऋता यांनी ‘सामुदायिक कल्याण एवं विकास संस्थान फाउंडेशन’ची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात संस्थेने शिक्षणाचा प्रसार करण्यावर मुख्य भर दिला. त्यानंतर हळूहळू आपले कार्यक्षेत्र वाढवत आरोग्य, पोषण, आर्थिक सक्षमीकरण, स्वच्छता, आणि भू हक्क यांसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम सुरू केले.
मुसहर समुदायासारख्या भूमिहीनांना हक्काची जमीन मिळवून देऊन त्यांच्या आयुष्यात स्थैर्य प्राप्त करून देण्याचं महत्वपूर्ण कार्य संस्थेने केलं आहे. सरकारला कल्याणकारी योजनांसाठी लाभार्थी प्रमाणित करून त्यांची नोंदणी करण्यात संस्था मदत करते.
ज्या समाजात महिलांच्या शिक्षणाची उपेक्षाच नव्हे तर विरोध आहे, त्या समाजात पालकांपासून सगळ्यांचा विरोध पत्करून औपचारिक शिक्षण घेणाऱ्या ऋता या त्यांच्या समुदायातल्या पहिल्या महिला आहेत.
आज कुशीनगर आणि गोरखपूरमधले १२६ समुदाय आणि ११२ गावांमधल्या मुली महिलांपर्यंत पोहोचून त्यांची सामुदायिक कल्याण एवं विकास संस्था काम करत आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी भारतीय उद्योग महासंघाने (CII) मागच्या वर्षीचा ‘एक्सम्पलर अवॉर्ड’ देऊन सन्मानित केले आहे. असे अनेक मन सन्मान त्यांना त्यांच्या कार्यामुळे मिळाले आहेत.
‘प्रत्येक स्त्रीचा सन्मान व्हावा आणि प्रत्येक मुलीला शिक्षण मिळावे,’ या उद्देशाने काम सुरू करणाऱ्या ऋता यांना त्यांच्या पुढच्या आव्हानांचीही जाणीव आहे. ‘माझ्या प्रवासात मला कोणकोणत्या क्षेत्रात, कशासाठी, कोणासाठी आणि काय काय काम करावे लागेल, याची यादी खरोखर न संपणारी आहे.’
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.