आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
आई, असं म्हणतात आई ही एक मनाची अवस्था आहे. नऊ महिने उदरात वाढणाऱ्या त्या कोवळ्या जीवाच्या लाहान सहान हालचाली टिपणं, खाताना, पिताना, झोपताना, उठता बसता बाळाची काळजी करणं या सगळ्या प्रक्रियेतून आई घडत असते.
प्रसूतिच्या दिवशी बाळासोबत ती घडत जाणारी आई सुद्धा जन्म घेते. स्त्रीचं सर्वांत शक्तिशाली रूप म्हणजे ‘आई ‘. वैज्ञानिकांनी लावलेल्या शोधानुसार एका बाळाला जन्म देणं जगातील सर्वांत वेदनादयाक प्रक्रिया आहे. शरीरातील २६ हाडं एकाच वेळी तुटली तर जेवढा त्रास होइल तेवढा त्रास बाळाला जन्म देताना होतो.
असा समज आहे की गरोदरपणानंतर स्त्री कमकुवत होते, शारीरिक दृष्टीने होतंही असेल पण मानसिक आणि भावनिक दृष्ट्या अधिक शक्तिशाली होते.
एवढा त्रास सहन केल्यानंतर कुठल्याही परिस्थितीवर मात करण्याची ताकद येते, मग ती शारिरिक बदलांना देखिल मागे टाकून प्रचंड ईच्छाशक्तीच्या जोरावर तिला हवं ते प्राप्त करु शकते. मातृत्व तिच्यासाठी ऊर्जा आहे, ताकद आहे. याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे प्रसिध्द बॉक्सर मेरी कॉम! जुळ्यांना जन्म दिल्यावर पून्हा एकदा त्या रिंगणात उतरल्या आणि चौथ्यांदा विश्व विजेत्याचा मान पटकावला.
आई झाल्यानंतरचा त्यांच्या हा प्रवास नक्किच सोपा नव्हता. अत्यंत कठोर ट्रेनिंग, कसरतीनंतर त्या खेळू शकल्या. मेरी कोम सर्वांना परिचित आहेत.
पण नऊ वर्षांपूर्वी असाच पराक्रम एका हॉकीपटूने केला, जो प्रकाशझोतात येवू शकला नाही, ती म्हणजे प्रितम राणी सीवाच. तिच्या मुलालाच्या जन्मानंतर तिने पून्हा एकदा हातात हॉकी स्टिक धरली व आपल्या टीमला सुवर्णपदक मिळवून दिलं.
तिचा जन्म हरियाणा, गुरूग्राम जिल्ह्यातील झारसा या गावांत एक शेतकरी कुटुंबात झाला. तिचा संघर्ष इथूनच सुरू झाला होता.
आर्थिक परिस्थितीशी सामना तर करायचाच होता, शिवाय मुलींनी लग्न करून घर सांभाळाव असं मानणाऱ्या समाजाला आपलं अस्तित्व पटवून द्यायचं होतं. सर्वांच्या विरोधात जावून आपली आवड जोपासण्यासाठी तिने हॉकीची रीतसर ट्रेनिंग सुरू केली.
सुरुवातीपासूनच तिच्या खेळण्यावर तिचं प्रभुत्व होतं. वयाच्या १४ व्या वर्षीच राष्ट्रिय स्तरावर होणाऱ्या हॉकी स्पर्धेत तिची निवड झाली आणि इथूनच तिचा प्रवास सुरू झाला.
भारतीय महिला हॉकी संघात तिला सेंटर फॉरवर्ड म्हणुन खेळायची संधी मिळाली. आशिया खेळामध्ये तिच्या खेळासाठी तिला अर्जुन पुरस्काराचे गौरविण्यात आलं. अर्जुन पुरस्कार मिळवणारी ती पहिली महिला हॉकीपटू ठरली.
यशाची पायरी चढताना ‘ती आई होणार आहे’ हीं गोड बातमी तिला समजली. आपल्या करियरचा सगळा विचार सोडून ती तिच्या बाळाच्या संगोपनात व्यस्त झाली.
मुलाच्या जन्मानंतर कुठेतरी मनात दबून असलेलं आपल्या खेळाबद्दलच तिचं प्रेम तिला स्वस्थ बसू देत नव्हतं. तिने पून्हा एकदा ट्रेनिंग सुरू केली. पण या वेळी प्रसंग वेगळा होता. गरोदरपणानंतर तिचं शरीर तिला कितपत साथ देईल याची कल्पना तिला देखिल नव्हती. पन तरीही मोठ्या धाडसाने घराच्या मागेच्या अंगणात सराव सुरू केला. घर, मुलगा आणि ट्रेनिंग आशी तारेवरची तीची कसरत सुरू होती.
अखेर या मेहनतीला फळ मिळालं. २००० साली आंतर रेल्वे स्पर्धेत खेळण्याची संधी तिला मिळाली. तिचा आत्मविश्वास देखिल वाढला. पुढे ती राष्ट्र स्तरीय स्पर्धेत देखील खेळली. या खेळात नऊ गोल तिने आपल्या नावावर केले.
तिच्यावर उठणाऱ्या प्रश्नांवर कायमचा आळा बसला व तिला भारतीय महिला संघात खेळण्याची संधी मिळाली. २००२ साली मँचेस्टर, इंग्लंड येथे संपन्न झालेल्या कॉमन वेल्थ गेम्समधे याच भारतीय महिला हॉकी संघाने जबरदस्त कामगिरी केली व भरताला सुवर्णपदक मिळवून दिल.
निवड होण्यापासून ते कॉमन वेल्थ गेम्सपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. समिती अंतर्गत असणाऱ्या राजकारणाचे चटके इतर खेळाडूंप्रमाणे तिला देखिल सहन करावे लागले . कॉमनवेल्थ गेम्सनंतर तिने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला व सोनीपत येथें स्वतःची ‘प्रितम राणी हॉकी अकादमी’ सुरू केली. तिच्या सारख्या अनेक मुलींचे स्वप्न साकार करण्यासाठी तिने ही अकादमी सुरू केली.
२००८ साली पून्हा एकदा तिला भारतीय संघात अनुभवी खेळाडू म्हणुन खेळण्यासाठी बोलवलं गेलं. ही टीम खूप दूरवर नाही जावू शकली. इथून पून्हा ती आपल्या अकादमीकडे वळली.
बाळंतपणानंतर हॉकी जिथे प्रचंड शारीरिक ताकदीची गरज असते, अशा खेळात पदार्पण करून सर्व स्त्रियांसाठी एक आदर्श पुढे ठेवला. हॉकी आपला राष्ट्रीय खेळ जरी असला तरी ईतर खेळांच्या तुलनेत थोडा दुर्लक्षित खेळ आहे.
पुरुष संघातील खेळाडूंचे नावं आपल्याला क्वचितच महिती असतील, त्यात महिला हॉकी संघातील खेळाडूंची नावं प्रकाश झोतापासून फार लांब आहेत. प्रितम वयाच्या ४५ व्या वर्षी आपल्यापरीने हीं परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत आहे.
तिच्या सारख्या सर्व महिलांना समाजात सन्मान आणि ओळख मिळायलाच हवी. आज तिच्याकडून प्रेरणा घेऊन, पाऊलावर पाऊल टाकून अनेक मुली हॉकी असो किंवा इतर कुठल्याहीं खेळात उत्तम कामगिरी बजावत आहेत.
प्रितम सीवाच, पी. व्ही सिंधू, हिमा दास, साक्षी मलिक, मेरी कॉम खेळाडू महिला सर्वांसाठी आदर्श आहेत. खेळात वाढणारा भारतीय महिलांचा सहभाग देशासाठी अभिमानाची बाब आहे. अशा अनेक प्रितम भारतात जन्म घेत आहेत.
गरज आहे ती फक्त त्यांना ओळखून, त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना मंच उपलब्ध करून देण्याची.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.