आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
बुद्धिबळ हा अस्सल भारतीय खेळ असूनही विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांच्यापूर्वी आणि नंतर कोणताही भारतीय बुद्धिबळपटू या खेळात जागतिक स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करून फार मोठी कामगिरी करू शकलेला नाही. मात्र, चेन्नईच्या केवळ १६ वर्षीय बुद्धिबळपटूने तब्बल ५ वेळा जगज्जेतेपद पटकावणाऱ्या मॅग्नस कार्लसनचा ‘ऑनलाइन एअरथिंग मास्टर्स’ स्पर्धेत काळ्या प्याद्यांसह खेळून पराभव करण्याचा चमत्कार केला आणि अवघ्या बुद्धिबळ क्षेत्राचे डोळे विस्फारले.
या चमत्काराने भारतीय बुद्धिबळ क्षेत्रात मात्र, आशेचा तेजस्वी किरण दिसू लागला आहे. प्रज्ञानंद रमेशबाबू हे आहे त्या आशेच्या किरणांचे नाव! कार्लसनला पराभूत करण्याची कामगिरी करणारा हा सरावात कमी वयाचा बुद्धिबळपटू! त्याच्यापूर्वी विश्वनाथन आनंद आणि पेंटाला हरिकृष्णा यांनी ही कामगिरी केली आहे.
या अभूतपूर्व विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व स्तरांतून प्रज्ञानंदावर कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याच वेळी भारतीय बुद्धिबळ क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व आणि प्रज्ञानंदाचे प्रशिक्षक प्रशिक्षक ग्रँडमास्टर आर. बी. रमेश यांनी प्रज्ञानंदाला आणि त्याच्या चाहत्यांनाही सबुरीचा सल्ला दिला आहे. प्रज्ञानंदाला कौतुकाने हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका किंवा अपेक्षांचे ओझेही त्याच्यावर लादू नका; असे ते चाहत्यांना उद्देशून म्हणतात.
तसेच हा विजय महत्वाचा असला तरी या ‘ऑनलाईन’ विजयावर आपल्याला फार वेळ थांबयचे नाही. पुढचा प्रवास लांबचा आहे, याची जाणीव ते प्रज्ञानंदालाही करून देतात. प्रज्ञानंदांच्या असाधारण प्रतिभेची आणि क्षमतेची जाणीव त्यांना आहे आणि तो केवढी झेप घेऊ शकतो हे ही त्यांना पुरेपूर माहिती आहे.
प्रज्ञानंदाने त्याच्या न कळत्या वयापासूनच बुद्धिबळाची कास धरली. त्याची बहीण वैशाली हिच्याकडून त्याला बुद्धिबळाचे प्राथमिक धडे मिळाले. वैशाली बुद्धिबळाकडे कशी वळाली याचा किस्साही रंजक आणि सुजाण पालकांसाठी उद्बोधकही आहे. वैशालीला लहानपणी टिव्हीवर कार्टून फिल्म्स बघत बसण्याची आवड होती. ती तासंतास टिव्हीसमोरच बसून असायची. त्यामुळे तिचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तिची आई आणि वडलांनी तिला बुद्धिबळाच्या प्रशिक्षण वर्गात पाठवले. तिला हा खेळ भावला आणि ही आवड तिच्यामुळे तिच्या भावातही रुजली. त्यांच्या आई-बाबांचा हा निर्णय अत्यंत अचूक ठरला. वैशालीही आज ग्रँड मास्टर आहे आणि प्रज्ञानंदाचा पराक्रम तर आपल्या नजरेसमोरच आहे.
ज्या वयात आपल्याला मोठे होऊन काय करायचे याचा विचारही केला जात नाही, त्याच वयात प्रज्ञानंदासाठी बुद्धिबळ हीच आयुष्याची दिशा ठरून गेली. घरातून मिळालेल्या प्रेरणेने आणि दोन्ही मुलांना या खेळात रुची निर्माण झाल्याने त्यांनी कारकीर्द म्हणून तो खेळायचा निर्णय घेतला, असं प्रज्ञानंदाचे वडील रमेशबाबू सांगतात.
आपल्या दोन्ही मुलांनी बुद्धिबळाच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केल्याचा आनंद तर निश्चितपणे आहेच. मात्र, ते खेळाचा मनसोक्त आनंद घेत आहेत याचा आम्हाला अधिक आनंद आहे, असे ते नमूद करतात. त्यांची आई नागलक्ष्मी या दोघांसोबत विविध ठिकाणच्या स्पर्धांसाठी त्यांच्याबरोबर जातात. माझ्या मुलांच्या कर्तृत्वाचे श्रेय माझ्या पत्नीला जाते. ती त्यांना स्पर्धांसाठी घेऊन जाते आणि प्रेरणा देते. ती दोघांची खूप काळजी घेते, असे ते कृतज्ञतेने सांगतात.
प्रज्ञानंदाने बुद्धिबळाच्या क्षेत्रात स्वतःच स्वतःचा मार्ग तयार केला आणि सन २०१८ मध्ये त्याने वयाच्या केवळ १० व्या वर्षी प्रतिष्ठित ग्रँडमास्टर पदवी मिळवली. तो देशातील सर्वात लहान वयातला आणि जगातील आतापर्यंतचा दुसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर ठरला. प्रज्ञानंदाने ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवल्यावर भारतातील सर्वधिक यशस्वी बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने त्याला आपल्या पंखाखाली घेतले.
प्रज्ञानंद ग्रँडमास्टर झाल्यापासून काही काळातच कोविड-19 महासाथीच्या विळख्यात जग अडकले आणि केवळ क्रीडाक्षेत्रच नव्हे तर अवघे जागाच जणू ठप्प झाले. प्रशिक्षक आर बी रमेश सांगतात, कोरोना काळातील सक्तीच्या विश्रांतीमुळे कदाचित प्रज्ञानंदाच्या आत्मविश्वासावर काहीसा विपरीत परिणाम झाला असेल, मात्र, ‘एअरथिंग्स मास्टर्स ऑनलाइन स्पर्धेत कार्लसनवर मिळालेल्या विजयामुळे त्याचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे.
नेदरलँड्समध्ये नुकत्याच झालेल्या ‘टाटा स्टील मास्टर्स’ स्पर्धेच्या वेळी प्रशिक्षक रमेश कोरोनाबाधित असलेल्याने प्रज्ञानंदाला निश्चितपणे त्यांची उणीव भासली असणार. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीतही त्याने चांगली कामगिरी केली. हे त्याच्या मनोधैर्याचे द्योतक आहे. रमेश म्हणतात, मला प्रज्ञानंदाच्या कर्तृत्वाचा खूप अभिमान आहे. त्याने याच आत्मविश्वासाने जगाला कवेत घ्यावे.
प्रज्ञानंदाचा गेल्या काही वर्षांत बुद्धिबळाच्या क्षेत्रात कर्तृत्वाचा आलेख सातत्याने चढता राहिला आहे. बुद्धिबळाच्या वर्तुळातील प्रज्ञानंद चर्चेच्या केंद्रभागी आला आहे. चेन्नईच्या पाडी उपनगरात असलेल्या त्याच्या घराच्या भिंती अनेक पदके आणि अनेक ट्रॉफी यांनी सजल्या आहेत. वयाच्या आठव्या वर्षांपासून प्रत्येक गटातील विजेतेपदाची माळ प्रज्ञानंदाच्या गळ्यात पडली आहे.
मात्र, याचा अर्थ प्रज्ञानंदाचं अवघं आयुष्य केवळ बुद्धिबळानेच व्यापले आहे, असा नाही. त्याच्या विनोदी चित्रपट आणि टेबल टेनिसवरील प्रेमाबद्दल वैशाली मोकळेपणाने बोलते. त्याला विनोदी चित्रपट आवडतात. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा टेबल टेनिस खेळायला आवडतं. वैशाली सांगते की, जेव्हा तो घरी असतो तेव्हा त्याला कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडतो. आम्ही एकत्र टिव्ही बघतो तसंच त्याला क्रिकेट देखील खेळायला आवडतं आणि तो नेहमी त्याच्या चुलत भावांसोबत वेळ मिळेल तेव्हा क्रिकेट खेळतोही.
अर्थात, बुद्धिबळ हेच त्याच्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे आणि आतापर्यंतचा प्रवास प्रज्ञानंदासाठी महत्त्वाचा ठरला आहे. या पुढेही त्याला बुद्धिबळाच्या क्षेत्रात खूप काही करायचे आहे या प्रवासात प्रशिक्षक रमेश ज्या प्रकारे त्याच्यावरचे अपेक्षांचे दडपण हाताळत आहेत त्यामुळे तो समाधानी आहे.
प्रज्ञानंदाने कार्लसनवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर बरेच पालक आपल्या मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी आर बी रमेश यांच्याशी संपर्क साधत आहेत. मात्र, खेळातून मिळणारे यश हे मुलांच्या प्रतिभेवर, कष्टांवर आणि खेळाबद्दल असलेल्या निष्ठेवर अवलंबून असते. केवळ प्रशिक्षकावर अवलंबून नसते, याची जाणीव रमेश आवर्जून करून देतात. पालकांनी आपल्या मुलांना केवळ स्पर्धांच्या मागे पळवण्यापेक्षा खेळाच्या सौंदर्याची आणि मूल्यांची ओळख करून दिली पाहिजे. त्याचा आनंद लुटण्याची संधी दिली पाहिजे, असेही ते म्हणतात.
प्रज्ञानंद विश्वनाथन आनंदचा मोठा चाहता आहे. मुख्य धारेतील बुद्धिबळाचा जगज्जेता बनण्याचा निर्धार त्याने अनेकदा व्यक्त केला आहे. त्यासाठी त्याला काय कष्ट करावे लागतील याची पुरेपूर जाणीवही आहे. आंतरराष्ट्रीय मास्टर आणि प्रशिक्षक व्ही सर्वाननं म्हणतात की, कार्लसनवरचा विजय हा एक प्रज्ञानंदाच्या बुद्धिबळ कारकिर्दीतला मैलाचा दगड आहे. या विजयाने त्याला त्याच्या क्षमतेची अधिक स्पष्ट जाणीव झाली असेल. त्याच्या आत्मविश्वासात अधिक भर पडेल. या विजयामुळे त्याला आणखी खूप संधी खुणावतील; असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.