आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
मुंबई, पुणे, बंगलोर, चेन्नई अशा ठिकाणी आयटी आणि ऑटोमोबाईलच्या इंडस्ट्रीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यानंतर शहरांची लोकसंख्या आणि वस्ती वाढत जाते. वाढत्या वस्तीनुसार दैनंदिन गरजा देखील वाढत जातात आणि वाढत्या गरजांमुळे व्यवसायांमध्ये देखील वाढ होते. कारण अनेक लोकांना असलेली एक समान गरज व्यवसायाचं स्वरूप घेऊ शकते. रोजगाराची संधी उपलब्ध असणाऱ्या शहरांमध्ये आर्थिक भरभराट असली तरी नागरिकांना वाहतूक कोंडीसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
बँगलोरमध्ये वाहतूक कोंडीची ही समस्या अतिशय भीषण आहे. शहरातील वाहतूक कोंडीच्या घटना अनेकदा व्हायरल होत असतात. एकदा तर वाहतूक कोंडीमध्येच एका पठ्ठ्याने पिझ्झा मागवला. डिलिव्हरी बॉयने देखील अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने तो पिझ्झा थेट त्याच्या कारपर्यंत नेऊन पोहोचवला. ही घटना वरवर जरी साधी वाटत असली तरी या घटनेमुळे वाहतूक कोंडीच्या भयानक वास्तवाची जाणीव आपल्याला होऊ शकते. अशा मोठ्या शहरांतील अनेकांचा बहुतांश वेळ वाहतूक कोंडीतच जात आहे.
वाहतूक कोंडीच्या वाढत्या समस्येमुळे अलीकडच्या काळात बँगलोरमध्ये ऑफिसला जाण्यासाठी खासगी वाहनांपेक्षा ओला आणि उबेरच्या टॅक्सी किंवा रिक्षांचा उपयोग केला जातो. उबेर आणि ओला या दोन्ही बहुराष्ट्रीय कंपन्या रिक्षा तसेच टॅक्सी चालकांची लूट करतात असा आरोप अनेकदा केला जातो. कित्येकदा ओला ॲपमधून बुक केलेल्या रिक्षामध्ये बसल्यानन्तर रिक्षाचालक या ॲपबद्दल तक्रार करतात. ही तक्रार अनेकदा पेमेंटसंबंधी असते. आर्थिक स्वरूपांच्या आरोपाशिवाय अनेक आरोप या कंपन्यांवर केले जातात. पण कोणत्याही प्रकारची उकल कोणालाही सुचत नाही.
बँगलोरमधील एका टॅक्सीचालक युवक मात्र याला अपवाद ठरला आहे. त्याने या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी फक्त बोलून न दाखवता त्या दिशेने प्रयत्न देखील सुरु केले आहेत. या टॅक्सिचालकाने स्वतःचे एक ॲप तयार केले. लोकेश नावाच्या या उबेर ड्रायव्हरने ‘नॅनो ट्रॅव्हल्स’ नावाच्या ॲपमध्ये प्रवाशांसाठी सोयीस्कर आणि किफायतशीर किंमत ठेऊन ओला आणि उबेरसारख्या मोठ्या कंपन्यांना आव्हान दिले आहे. जुलै २०२३ पासून या ॲपची सुरुवात झाली. तर तीन दिवसांपूर्वी (२० डिसेंबर) ॲपचे आयओएस व्हर्जन देखील रिलीज झाले आहे.
बॅंगलोरमधील एका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने लोकेशच्या कारवर असलेल्या क्यूआर कोडचा आणि ‘नॅनो ट्रॅव्हल्स’ कंपनीच्या माहितीपत्रकाचा फोटो आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला. लोकेशच्या या उद्योजकीय प्रवासाची बातमी झपाट्याने पसरली, एका युजरने लोकेशच्या राईडचा अनुभव शेअर करून, त्याच्या उद्यमशीलतेला प्रोत्साहन दिले. लोकेश त्यांना म्हणाला, “तुम्हाला कधीही एअरपोर्टवर जायचे असल्यास मला कॉल करू शकता आणि माझ्या संपर्कात असेच सुमारे ६०० ड्रायव्हर्स आहेत.”
आपल्याकडे आधीपासूनच असलेल्या ग्राहकांना बांधून ठेवण्यात लोकेश पटाईत आहे असे प्रथमदर्शनी वाटते. लोकांशी सुसंवाद साधून आपल्या या ॲपचा तो प्रसार करत असतो.
जुलैपासून प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या त्याच्या अँड्रॉइड ॲपला अजूनही हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. परंतु लोकेशने फक्त समस्या दाखवून न देता, त्यावर प्रत्यक्षात काम करण्याचे ठरवून स्वतःचे एक ॲप तयार केले. त्याने यासाठी जी तयारी दाखवली, जे धाडस केले, ते मात्र प्रशंसनीय आहे. आता गरज आहे ती व्यवस्थापनाची. उत्तम आर्थिक आणि व्यवसाय संचालनाचे व्यवस्थापन असल्यास या ॲपला नक्कीच यश मिळू शकेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.