आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
ऑन ड्युटी २४ तास. पोलिसांच्या किंवा इतर सुरक्षा एजन्सीजच्या बाबतीत हे वाक्य जगभरात लागू पडतं. समाजामध्ये शांततामय सहजीवन अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध असलेलं पोलीस दल किंवा त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सीआयडी अथवा सीबीआयसारख्या इतर संस्थांना अहोरात्र मेहनत घेऊन इन्वेस्टीगेशनची कामे करावी लागतात. अनेकजण केवळ आपलं कर्तव्य म्हणून ही कामे करत असतात तर, काही जण स्वतःला पूर्णतः याच कामामध्ये झोकून देऊन, समर्पित भावनेने काम करतात, जणू काही त्यांच्या आयुष्याचं उद्दिष्टच ते आहे.
एकोणिसाव्या शतकात रॉबर्ट लेड्रयू नावाचा अतिशय हुशार आणि इन्वेस्टीगेशन्सच्या कामाचा ध्यास घेतलेला डिटेक्टिव्ह होऊन गेला. असामान्य बुद्धिमत्ता, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स आणि विश्लेषणात्मक कौशल्य यांच्या बळावर त्याने हे कर्तृत्व गाजवलं होतं. त्याच्या कार्यकाळात रॉबर्टने अनेक क्लिष्ट केसेस सोडवल्या, ज्यांमध्ये फ्रान्समधल्या धर्मांध लोकांच्या गटांचा सरकार पाडण्याचा डाव देखील त्याने उधळून लावला होता. त्याच्या आयुष्यातील शेवटची केस मात्र वैशिष्ट्यपूर्ण आहे. या केसमध्ये त्याने स्वतःलाच आरोपी म्हणून सिद्ध केलं होतं. नेमकं काय होतं हे प्रकरण जाणून घेऊ या लेखातून..
वर्कोहोलिक रॉबर्ट लेड्रयू
रॉबर्ट लेड्रयू सतत कार्यमग्न राहत असे. त्याला कामाचे व्यसनच होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वयाच्या अवघ्या ३५व्या वर्षीच त्याला संपूर्ण युरोपमध्ये ‘बेस्ट डिटेक्टिव्ह’ अशी ओळख प्राप्त झाली होती. आपल्याकडे असलेल्या केसेस सोडवण्यात तो इतका मग्न असे की त्याला झोपायला देखील वेळ मिळत नसे. सलग २४ तास जागं राहून काम करणं त्याच्यासाठी अतिशय सरावाचं होऊन बसलं होतं. रात्रीची झोप न घेतल्याने रॉबर्ट खूप चिंताग्रस्त आणि चिडचिडलेला असायचा, त्याचा हा ताण त्याच्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांनासुद्धा जाणवत होता.
१८८७ साली रॉबर्टला एका विशेष केसच्या तपासासाठी पॅरिसजवळच्या ‘ले हावरे’ या शहरात पाठवण्यात आले. हे शहर बंदर असल्याने व्यापाराचे मुख्य केंद्र तर होतेच, शिवाय याठिकाणी पर्यटन व्यवसाय देखील तेजीत होता. सहा खलाशांच्या मृत्यूने या शहरात एकच खळबळ माजवली होती. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, म्हणूनच हा तपास करण्यासाठी रॉबर्टला पाचारण करण्यात आले. ‘ले हावरे’मध्ये पोहोचल्या पोहोचल्या लगेचच रॉबर्टने तपासाचे काम सुरु केले, पण या केससाठी त्याला वेळ देता आला नाही. त्याच्या वरिष्ठांनी त्याच्या हाती काही काळासाठी दुसरा तपास सोपवला होता.
‘ले हावरे’ शहरापासून काही किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या सेंट अरड्रेस या समुद्रकिनाऱ्यावर एक ह*त्या झाली होती. हा समुद्रकिनारा रॉबर्ट राहत असलेल्या हॉटेलपासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर होता. हातात असलेलं काम अर्ध्यावर सोडून दुसरं काम हाती घेणं हे रॉबर्टला पटलं नव्हतं. पण वरिष्ठांनी एवढ्या तातडीने हे बदल घडवून आणले असतील तर यामध्ये नक्कीच काहीतरी महत्त्वाचे आहे हे रॉबर्टला लक्षात आले. त्यामुळे त्याने हे काम कोणतीही शंका उपस्थित न करता करायचे ठरवले.
ट्विस्ट
सेंट अरड्रेस बीचवर ह*त्या झालेल्या व्यक्तीचं नाव होतं अँड्रे मोने. रात्रीच्या वेळी त्याची ह*त्या झाली होती. हे शहर पर्यटनाचे केंद्र असल्याने अशा प्रकारच्या बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षा प्रदान करणं आणि आरोपीला कठोर शासन करणं ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी होती. उन्हाळ्याची सुट्टी होती म्हणून काही दिवसांसाठी अँड्रे आणि त्याची पत्नी या शहरातील रिसॉर्टमध्ये विश्रांतीसाठी आले होते. दिवसभर वण वण झाल्याने फ्रेश होण्यासाठी अँड्रे बीचवर फेरफटका मारायला गेला होता.
अँड्रेचे कोणाशीही म्हणावे असे शत्रुत्व नव्हते, किंवा त्याच्यामागे एवढी संपत्ती देखील नव्हती, ज्यामुळे त्या संपत्तीचे भावी वारस असं कृत्य करण्याचा प्रयत्न करतील. त्याचे कपडे आणि पैशाचे पाकीट देखील सुस्थितीत होते, याशिवाय त्याच्या शरीरावर जखमांच्या खाणाखुणा देखील नव्हत्या. एखाद्या अनोळखी व्यक्तीने येऊन त्याला गोळी मारली होती आणि तो खु*नी अतिशय शांतपणे तेथून निघून गेल्या असल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या.
पोलिसांना कोणावरही संशय नसल्याने उपलब्ध असलेल्या पुराव्यांवर निर्भर राहावे लागणार होते आणि त्यांच्याच आधारावर पुढील तपास करावा लागणार होता. पण उपलब्ध पुराव्यांमध्ये देखील विशेष असे काही नव्हते. पुराव्यांपैकी एक म्हणजे अँड्रेच्या मृतदेहातून काढलेली बंदुकीची गोळी. अशा गोळ्या जर्मन लुगर पिस्तुलमध्ये सर्रास वापरल्या जात होत्या. हे पिस्तूल फ्रान्समध्ये सर्वसामान्य होते. गुन्हेगारी जगतातील जवळपास सर्व लोकांकडे अशी बंदूक होती. आता इतर गोष्टींवर लक्ष देणेच क्रमप्राप्त होते.
मृतदेहाच्या आजूबाजूला मारेकऱ्याच्या पायाचे ठसे आढळून आले होते. पायाचे ठसे पाहता मारेकरी कोणतीही चप्पल किंवा बूट न घालताच बीचवर आला होता स्पष्ट झाले, मारेकरी मोजे घालून आला होता. स्थानिक पोलिसांना मारेकऱ्याच्या पावलाचे ठसे देखील सापडलेल्या बुलेटसारखे निरुपयोगी पुरावे वाटत होते. पण रॉबर्टला त्यांनी त्या रात्री समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या जवळजवळ सर्व गोष्टींची कल्पना दिली.
रॉबर्टने सर्व पुरावे काळजीपूर्वक तपासले आणि क्षणांत त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. एकही शब्द न बोलता तो घटनास्थळावरून निघून गेला आणि स्वतःला खोलीत कोंडून घेतले. अख्खी रात्र तिथेच घालवली आणि सकाळी पॅरिसला गेला. पॅरिसला पोचल्यावर तो मुख्य पोलीस मुख्यालयात गेला आणि त्याने आपल्या वरिष्ठांना केस सॉल्व झाल्याचे कळवले. त्याने समुद्रकिनाऱ्याच्या वाळूवर पायाच्या ठशाचे प्लास्टर कास्ट काढले. या पुराव्यानुसार मारेकऱ्याला उजव्या पायाचे मोठे बोट नव्हते. सर्वांसमोर रॉबर्टने आपला बूट काढला आणि आपल्या उजव्या पायाला देखील ते बोट नसल्याचे दाखवून दिले. लहानपणी त्याने केलेल्या उपद्व्यापामध्ये हे बोट गमावले होते.
ज्यादिवशी तो ‘ले हावरे’ शहरात पोहोचला, तेव्हा त्याला फार अस्वस्थ वाटत होते, त्यामुळे तो झोपला आणि तब्बल १२ तासांनी त्याला जाग आली. त्याच्यासाठी हे शक्यच नव्हते. उठल्यानंतर आपले मोजे किनाऱ्यावरील वाळूने भरलेले आहेत आणि बॅग देखील उघडी आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने आपली बंदूक तपासली आणि त्यात एक गोळी कमी होती.
तुमच्या-माझ्याप्रमाणेच उपस्थित अधिकाऱ्यांना देखील यावर विश्वास बसला नाही. पण रॉबर्ट यावर ठाम होता आणि त्याने इन्व्हेस्टिगेटिव्ह एक्सपेरिमेंट करायचा ठरवलं. रात्री त्याने आपल्या बंदुकीतील सर्व गोळ्या काढून ठेवल्या आणि तो झोपी गेला. यावेळी दोन गार्ड्स त्याच्या खोलीबाहेर गस्त घालत होते. मध्यरात्री रॉबर्ट खोलीच्या बाहेर आला आणि त्याने त्या दोन गार्ड्सवर रिकाम्या बंदुकीतून गोळ्या चालवल्या.
खरंतर रॉबर्टला ‘स्लिपवोकिंगचा’ मानसिक आजार झाला होता. यामध्ये व्यक्ती झोपेच्या अवस्थेतच, नकळतपणे काही क्रिया करते. बहुतांश वेळा या क्रिया धोकादायक नसतात, अंथरुणावर उठणे, चालणे, साफसफाई करणे इत्यादींचा त्यात समावेश असतो. परंतु क्वचित प्रसंगी, या क्रिया अधिक धोकादायक असू शकतात. काही दिवसांपासून त्याला आपण कोणालातरी जीवे मारत आहोत अशी स्वप्ने त्याला वारंवार पडत होती. डॉक्टरांनी त्याला पुरेशी झोप आणि विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता, पण त्याने त्याचं पालन केलं नाही.
रॉबर्टवर खटला चालवण्यात आला. यावेळी रॉबर्टला फक्त रात्रीच्या वेळी हा मानसिक त्रास होतो हे त्याच्या वकिलांनी सिद्ध केले. युरोपातील या सर्वांत श्रेष्ठ डिटेक्टिव्हला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. परंतु त्याच्या गुणवत्तेमुळे आणि त्याने दिलेल्या योगदानामुळे त्याला दिवसा मुक्त राहण्याची परवानगी होती. मात्र, रोज संध्याकाळी त्याला तुरुंगात परतावे लागत असे. त्याने कधीही आपली तत्त्वे बदलली नाहीत आणि रॉबर्टने पकडलेला शेवटचा गुन्हेगार तो स्वतः होता.
या कर्तव्यनिष्ठ डिटेक्टिव्हचे १९३९ साली वयाच्या ७७व्या वर्षी निधन झाले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.