आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जगातील सगळ्यात चर्चित गोष्ट सध्या कुठली असेल तर ती म्हणजे ‘कोरोना’ नामक विषाणू ज्याने सगळ्या जगात थैमान घातले आहे. कोरोनापासुन लवकरात लवकर सुटका कशी मिळवता येईल यावर जगातील सगळे वैज्ञानिक संशोधन करत असतानाच उन्हाळ्यात तापमानवाढीचा परिणाम म्हणून कोरोनाचा प्रसार थांबेल हा अंदाज साफपणे खोटा ठरला आहे.
पावसाळ्याची सुरुवात झाली आहे आणि आता कोरोनाच्या प्रसारात अजुन जास्त वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काहींच्या मते हीच कोरोनाची दुसरी लाटही असु शकते.
बदलत्या हवामानाचा विषाणूवर नेमका काय परिणाम होईल याचा अभ्यास करणाऱ्या ‘मैरीलँड चिल्ड्रन्स हॉस्पिटल्स’ यांच्या मते पावसाने विषाणू मरत नाहीत. उलट ओलावा आणि कमी तापमान असल्याने विषाणूच्या जिवंत राहण्याच्या शक्यता वाढतात. बरेचसे देश आता लॉकडाउन कमी करत असताना पावसाच्या पाण्यात या विषाणूचा फैलाव होण्याच्या शक्यता जास्त आहेत.
डेलावेयर विद्यापीठातील जीवविभागात काम करणाऱ्या संशोधक डॉ. जेनिफर होर्ने यांनी एका मुलाखतीत पावसाबद्दल चिंता व्यक्त करताना पावसाच्या पाण्यात सफाई करण्याची ताकद नसते असे म्हटले आहे. तसेच हे पाणी विषाणूलाही संपवू शकत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. पावसाळा आपल्या बरोबर येताना अनेक जैविक आणि विषाणू पासुन होणाऱ्या आजारांना घेऊन येतो. कोरोना हा ही एक विषाणू असल्याने त्याचा प्रसारही पावसाळ्यात वाढेलच असं त्यांचं मत आहे.
२०१७ मध्ये फोर्ब्ज मासिकात आलेल्या एका लेखानुसार पावसाचे पाणी जीवाणू संपवत असले तरी विषाणूंच्या वाढीसाठी मात्र हा अनुकूल वेळ असतो.
२०१२ मध्ये झालेल्या अभ्यासानुसारही असेच काहितरी आपल्याला कळते. पावसाळ्याचे पाणी कोरोनाच्या वाढीस प्रोत्साहनच देईल असे स्पष्ट दिसत आहे. विषाणूच्या प्रसारास फक्त विषाणूच्या प्रसाराची पध्दतच नाही तर तापमान, आर्द्रता, हवेचा बदल या सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात. श्वसन यंत्रणेवर हल्ला करणारे सगळेच विषाणू या घटकांनी प्रभावित होतात.
मलेशियामध्ये केलेल्या अभ्यासानंतर तिथे ‘रेस्पीरेटरी सिंक्टीयल वायरस’ अजुन जास्त वेगाने पसरतो असे दिसले. भारतात होणाऱ्या असमान पर्जन्यामुळे भारतात हा प्रसार वेगवेगळ्या वेगाने झालेला दिसला.
१९१८ मध्ये आलेल्या स्पैनिश फ्लू प्रमाणेच कोरोनाही वेगवेगळ्या लाटेने येईल असे वैज्ञानिकांचे मत आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट जुलै- ऑगस्ट मध्ये येईल असे सांगितले जात आहे. भारतीय संशोधकही या मताशी सहमत आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार जसजसे आपण आपल्या दैनंदिन जीवनात जगायला सुरु करु तसे कोरोनाच्या प्रसारात अजुन वाढ होत जाईल. पावसामुळे तर कोरोनाचा धोका अजुनच जास्त वाढत जाईल असे मत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर मधील प्राध्यापक राजेश सुंदरसन यांनी व्यक्त केले आहे.
भास्कर या वृत्तपत्रात एम्सचे प्राध्यापक डॉ. संजय राय यांचे मत छापले आहे. त्यांच्या मते कोरोना आणि पावसाच्या संबंधांबाबत अजुन जास्त संशोधन केले गेले नसले तरीही पावसाच्या दरम्यान प्रसारात वाढच होईल यात काही शंका नाही.
‘सेंटर फॉर डिसीज कण्ट्रोल’ आणि जागतिक आरोग्य संघटनेने याबद्दल काहीही भाष्य केलेले नसले तरी याबद्दल सतर्क राहण्याची गरज आहे असे मत जगभरातील वैज्ञानिक करत आहेत.
लस येत नाही तोपर्यंत तरी स्वत:ची सुरक्षा स्वत:च करावी हा एकच प्रतिबंधात्मक उपाय सध्या तरी कोरोनावर दिसत आहे. “प्रिवेन्शन इज अलवेज बेटर द्यान क्युअर” हे तथ्य पाळण्याची गरज आज सगळ्यात जास्त आहे एवढं मात्र नक्की.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.