आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
महाभारतातील महायु*ध्दाचा कर्ताधर्ता समजला जातो तो श्रीकृष्ण. पण खरं सांगायचं तर यु*ध्द कोणा एका व्यक्तीमुळे जिंकता येत नाही. एका मोठ्या यु*ध्दात असलेल्या अनेक छोट्या छोट्या लढाया जिंकून देणारे शूर योध्देच खरे तर यु*ध्दाचे नायक असतात आणि यु*ध्द लढताना सगळ्यात धारदार असणारे शस्त्र तलवार, बंदुक हे नसुन बुध्दी आहे हे ज्याला लवकर कळले तो आधीच पुढे गेलेला असतो.
आपल्या बुध्दिने असे विजय मिळवणारे बरेच यो*ध्दे अज्ञात राहतात. पराक्रम हा फक्त शक्तीने नाही तर बुध्दीने ही दाखवता येतो हे आजही लोकाना मान्य नाही.
भारत-चीनच्या दरम्यान झालेल्या १९६२ च्या यु*ध्दातही असे अनेक नायक अज्ञातच राहिले. आपल्या बुध्दीचातुर्याने यु*ध्दाच्या निकालात आपला मोलाचा वाटा बजावणाऱ्या अशाच काही सैनिकांपैकी एक होते ते म्हणजे लेफ्टनंट कर्नल गुरबचन सिंग.
पांडवपुत्र भिमासारखी शक्ती आणि चाणक्यासारखं चातुर्य अंगी असलं की मग कितीही मोठा अडथळा सहजपणे पार करता येतो हे दाखवून देताना त्यांनी स्वत:च्या बुध्दीचातुर्याच्या बळावर लडाखसारखा महत्त्वपुर्ण भाग चीनच्या तावडीत जाण्यापासुन वाचवला. याच बुध्दीशौर्याची ही कहानी भारतीय इतिहासात धूळ खात पडून आहे. याच कथेला उजाळा देण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत.
तसं बघितलं तर १९६२ च्या यु*ध्दाचं खापर फोडलं जातं ते अयोग्य यु*ध्दनिती आणि पंतप्रधानांनी केलेल्या काही टाळता येणाऱ्या चुकांवरती. संख्येने आणि नितीनेही वरचढ असलेल्या चिनी सेनेने भारतीय सेनेचा धुव्वा उडवला हे सत्यही मान्य करावेच लागेल. परंतु यु*ध्दात असताना काही काही छोट्या लढाया भारतीय सेनेनेसुध्दा जिंकल्याच. त्यातीलच एक होती ती म्हणजे लडाखमधील चुशूल भागातील लढाई. चुशूल भागात झालेला पराभव म्हणजे चीनला लेह प्रदेशात येण्याची परवानगीच. म्हणून या भागात जिंकलेली ही लढाई अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
चीनच्या यु*ध्दनितीच्या मध्यभागी होते ते म्हणजे त्यांच्याकडे असलेले रणगाडे. चीनला आपला मोर्चा पुढे चालू देण्यात मोलाची भुमिका याच रणगाड्यांंनी पार पाडली होती. याला प्रत्यूत्तर म्हणुन भारतीय सेनेने सहा एएमएक्स-१३ रणगाड्यांची मागणी २० लँसर्स तुकडी जी चुशूलमध्ये स्थित होती त्यांच्यामार्फत केली.
चुशूलकडे येणाऱ्या मार्गाचे संरक्षण करण्यासाठी या रणगाड्यांची गरज होती असे संरक्षण अभ्यासक अजय शुक्ला म्हणतात. चिनी सेनेला चुशूलमध्ये येण्यासाठी सगळ्यात मोठी वाट होती ती एलएसीच्या रेषेत असणाऱ्या स्पंगुर पर्वतातून येणाऱ्या २ किमी मोकळ्या असलेल्या जागेतून. याच ठिकाणी संरक्षणाची गरज होती हे त्यावेळी सेनेने हेरले. त्यावेळी या प्रदेशात जाण्यासाठी रस्त्यांचीच सोय नव्हती म्हणुन हे रणगाडे हवाई वाहतूकीने पोहचविण्याशिवाय काही पर्यायच नव्हता.
परंतु भारतीय हवाईदलाच्या चंदिगढ तळावर वाहतुकीची एक भलतीच समस्या उभी होती. या रणगड्यांना वाहतुकीच्या विमानात चढवायचे कसे हाच मोठा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. एएन-१२ हे वाहतुकीचे विमान कितीही दणकट असले तरीसुध्दा रणगाडे वाहून नेण्याचे काम पहिल्यांदाच केले जाणार होते.
विमान कितीही मजबूत असले तरी रणगाड्याच्या चाकांनी खालची एल्युमीनियमची पट्टी फाटू शकते ही एक भिती होतीच असे एयर चिफ मार्शल पीसी लाल त्यांच्या ‘ माय इअर्स विद आयएएफ ‘ या पुस्तकात सांगतात.
सुदैवाने लेफ्टनंट कर्नल गुरबचन सिंग, जे त्यावेळी सेनेचे नेतृत्व करत होते त्यांना या प्रश्नांचे उत्तर मिळाले, विमानाचा मागील भाग रणगाड्याच्या वजनाचा भार पेलू शकेल का हा ही एक प्रश्न होता ज्याचे उत्तर गुरबचन सिंग यांच्याकडे होते.
पहिल्या प्रश्नासाठी त्यांनी सुतारांना बोलावले आणि विमानाच्या तळाच्या भागाच्या आकाराचे लाकडी आवरण बनवण्यास सांगितले. जेणेकरून रणगाडे चढवताना हे आवरण हलणार नाही. दुसरया प्रश्नासाठी त्यांनी मोठी आणि मजबूत लाकडी फळी बनवली आणि वाळूची पोती भरण्यात आली. खाली तो लाकडी ओंडका, मध्ये ते वाळूचे पोत आणि मग त्यावर रणगाडे अशी योजना आखली गेली.
तसेच हवाईदलाला विमानातील भार कमी करावा लागला, १० टन क्षमता असुनही कमी भार विमानात ठेवण्यात आला. हवाई दल आणि सेनेच्या चर्चेतून अजुन अनावश्यक वस्तू कमी करण्यात आल्या. काही हत्यारे आणि इंधनसुध्दा कमी करण्यात आले.
इंधनाचा विचार करुन हवाई सेनेने चंदिगढ- चुशूल- चंदिगढ एवढाच प्रवास होईल असे इंधन बरोबर घेतले.
योजना बनवून झाल्यावर आता ती सत्यात उतरवण्याची वेळ आली. या मोठ्या रणगाड्यांना आता विमानात चढवण्याची वेळ आली. यासाठी प्रत्येक रणगाड्यासाठी तीन लोकांची नियुक्ती करण्यात आली होती. एकजण रणगाडा चालवण्यासाठी तर एक जण दिशा दाखवण्यासाठी आणि एक जण लक्ष ठेवण्यासाठी अशी नियुक्ती केली होती. २४ ऑक्टोबर, १९६२ रोजी एकदा शेवटची चाचणी घेतली आणि सगळ्या बाबींची शहानिशा करुन घेतली.
दुष्काळात तेरावा महिने येणे म्हणतात तसंच दुर्दैवाने शेवटच्या क्षणी एका चालकाला त्याची बायको बाळाला जन्म देणार असल्याची माहिती मिळाली. बातमी ऐकताच त्याने घरी जाण्याची परवानगी मागितली.

एवढे कष्ट करुन बनवलेल्या या योजनेत येणाऱ्या अशा विघ्नांमुळे सेनेच्या जवानांमध्ये राग वाढीस लागला होता. खडतर प्रशिक्षण घेतलेला एक चालक अशा ऐन मोक्याच्या वेळी उपस्थित नसणार ही बाब चिंताजनक होती.
यावेळीसुध्दा सुदैवाने लेफ्टनंटकडे उत्तर होते. त्यांनी सेनेच्या डॉक्टरला त्या वाहकाच्या घरी पाठवुन त्याच्या बायकोच्या बाळंतपणाची जबाबदारी सोपवली. डॉक्टरने परत येताना चालकाच्या बाळाचा फोटो आणला. समाधान झालेल्या चालकाने मग हे रणगाडे विमानात चढवण्यास सुरुवात केली. शेवटी २४ आणि २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री रणगाड्यांचा पहिला ताफा चुशूलला पोहोचला. दुसरा ताफा २६ तारखेला पोहचला.
शेवटचा अडथळा होता तो म्हणजे कमी इंधनामुळे सेनेकडे रणगाडे उतरविण्यासाठी आणि परत येण्यासाठी कमी असलेला वेळ. चुशूल येथे पोहचल्यावर सेनेकडे फक्त १५ मिनिटे वेळ होता. त्यावेळेत आपले काम पुर्ण करुन विमाने परत चंदिगढला पोहचली. चंदिगढला पोहचल्यानंतर आत्ताच बाप झालेल्या त्या विमानचालकास सुट्टी मंजूर करण्यात आली.
हे रणगाडे पुढे जाऊन मग भारतीय सेनेच्या या छोट्याश्या पण महत्वपुर्ण विजयाचे आधारस्तंभ झाले. शर्थीच्या प्रयत्नांनंतरही चीनला लेह-लडाख प्रदेशात प्रवेश करता आला नाही.
एका व्यक्तीच्या चाणक्यनीतीने भारतीय सेनेने चीनसारख्या बलाढ्य सेनेला थांबवण्यात यश मिळवले. आज भारताची शान असलेल्या लडाख प्रांताला लेफ्टनंट कर्नल गुरबचन सिंग यांच्या बुध्दीची देणच म्हणावं लागेल. यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाकडून त्यांच्या कर्तुत्वास वंदन.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.