आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
फॅशनच्या जगात कधी कोणती लहर येईल हे सांगता येत नाही. काल परवापर्यंत विविध प्रकारचे शूज घालण्याला फॅशन विश्वात प्राधान्य होतं. पण दिवसेंदिवस जसजसे नवीन फॅशन ब्रॅण्ड्स बाजारात येत असून अधिकाधिक युवा वर्ग त्याकडे आकर्षित झालेला दिसतो. असाच एक फुटवेअर फॅशन ब्रँड म्हणजे क्रॉक्स. गेल्या काही वर्षांत या ब्रॅण्डची चर्चा अनेकांच्या तोंडावर असल्याची दिसून येते. पण शूज किंवा इतर फुटवेअरपेक्षा अतिशय सर्वसाधारण दिसणारे हे फुटवेअर आज स्टाइल स्टेटमेंट बनलं आहे, त्यामागे नेमकं कारण काय समजून घेऊ या लेखातून.
२००२ साली स्कॉट सिमेन्स, लिंडन हॅन्सन आणि जॉर्ज बॉडबेकर हे तिघेही कॅरिबिअनच्या समुद्रात एका लहानशा बोटीतून फिरत होते. या प्रवासादरम्यान त्यांना त्यांच्या नौकेवर रबरापासून तयार केलेले चपलीचे जोड सापडले. ही चप्पल एका कॅनडियन कंपनीद्वारे तयार केली गेली होती. या चपलांचे उत्पादन, वितरण आणि एकूण व्यवसाय हा कॅनडापुरताच मर्यादित होता, त्यामुळे अमेरिकेतून आलेल्या या तिघांनी असेच उत्पादन अमेरिकेत सुरु करण्याचा विचार केला.
हे फुटवेअर परिधान केल्यानंतर एखाद्या मगरीप्रमाणे पाण्यात पोहणे असो वा जमिनीवर चालणे, दोन्ही अतिशय आरामात करता येणार होते, म्हणूनच या फुटवेअरला आणि त्या बनवणाऱ्या कंपनीला नाव देण्यात आलं ‘क्रॉक्स’. क्रॉक्स हे क्रोकोडाईल या शब्दाचे लघुरूप आहे. २००६ पर्यंत क्रॉक्स हे अतिशय प्रसिद्ध फुटवेअर बनले होते. मूळ क्रॉक्स या फुटवेअरचा खप प्रचंड वाढला होता. व्यवसाय तेजीत आहे म्हटल्यावर कंपनीने आणखी उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली.
२००८ पर्यंत सर्वकाही आलबेल होतं, पण २००८ साली उभ्या राहिलेल्या आर्थिक संकटात क्रॉक्स देखील कोलमडणार की काय असे वाटू लागले, कारण क्रॉक्स कंपनी जवळपास दिवाळखोर बनली होती. आर्थिक समस्यांमुळे कंपनीने अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून देखील टाकले होते.
२००८ च्या आर्थिक संकटातून थोडक्यात बचावल्यानंतर ‘क्रॉक्स’ने अमेरिकेतील जिबिट्झ नावाची कंपनी विकत घेतली. ही कंपनी अनेक चार्म्स नावाची रंगीबेरंगी आणि आकर्षक उत्पादने बनवते. क्रॉक्सला हीच सर्जनशीलता अपेक्षित होती. या कंपनीने क्रॉक्स फुटवेअरचे रूप पालटवण्यात मोठा हातभार लावला आणि तरुण वर्ग त्याकडे जास्त आकर्षित होईल अशा पद्धतीने डिझाईन केली.
धोरणात्मक पावले टाकून, काही काळातच क्रॉक्सने प्रसिद्धीचे शिखर गाठले. २०२० साली त्यांना पुन्हा २००८ पूर्वी जसे यश मिळत होते, तसे मिळू लागले, अगदी अनेक देशांमध्ये कोरोना आणि लॉकडाऊनचं संकट असलं तरी देखील क्रॉक्सला प्रचंड प्रमाणात मागणी होती. भारतातून देखील लोक घरी बसून ऑनलाईन पद्धतीने क्रॉक्स मागवत होते. अल्पावधीतच क्रॉक्सला प्रचंड पसंती मिळाली कारण ते घालायला एकदम आरामशीर आणि दिसायला देखील “कुल” होते.
पोस्ट मॅलॉन आणि जस्टिन बिबरसारख्या प्रभावशाली सेलिब्रिटीजनी देखील क्रॉक्सचा उदो उदो केला आणि हळू हळू क्रॉक्स हा एक सर्वोत्तम ब्रँड बनला, आज कदाचित त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.